नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात असलेल्या चैतन्येश्वर देवस्थानाचा विदर्भातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक आहे. आंभोरा देवस्थान अशी ख्याती असलेल्या या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते वैनगंगा, कन्हान, आम, मुर्जा, कोलारी या नद्यांच्या संगमावर स्थित आहे. पाच नद्यांच्या संगमावरील टेकडीवर असणारे राज्यातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. याच मंदिर परिसरात मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांनी शके १११० मध्ये ‘विवेकसिंधू’ या ग्रंथाचे लेखन केले होते.
वैनगंगेचीये तिरी । मनोहर अंबानगरी ।।
तेथे प्रकटले श्रीहरि । जगदीश्वर।।
आद्यकवी मुकुंदराज यांच्या ‘विवेकसिंधू‘ या ग्रंथामधील हा उल्लेख चैतन्येश्वर देवस्थानाबद्दल आहे. देवस्थानचा परिसर निसर्गसमृद्ध असल्याने भाविकांसोबतच येथे पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिला आहे. असे सांगितले जाते की १२ वर्षांच्या महाव्रतानंतर येथे झालेल्या महायज्ञातून चैतन्येश्वरांची पिंडी प्रगट झाली आहे. वनवासकाळात श्रीराम, लक्ष्मण व सीतेने या परिसरातून नदी तीराने प्रवास केला होता, तर महाभारत काळात पांडवांनी वनवासातील काही काळ या परिसरात वास्तव्य केले होते. त्यामुळे भाविकांच्या दृष्टीने या स्थानाचे आगळे महत्त्व आहे.
हे तीर्थस्थान नागपूर जिल्ह्यात असले तरी भंडारा शहरापासून या मंदिराचे अंतर केवळ १८ किमी आहे. भंडाऱ्याहून या मंदिरात येण्यासाठी नदी पार करावी लागते. त्यासाठी येथे डोंगा (होड्या) असतात. डोंग्यातून नदी पार करताना येथील नद्यांचे विस्तृत पात्र, तेथील रुपेरी वाळू, ५ नद्यांचा संगम, टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आम नदी आणि निसर्गसौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर हे दृश्य चैतन्य निर्माण करणारे आहे. कदाचित म्हणूनच येथील देवस्थानाचे नावही चैतन्येश्वर असावे.
चैतन्येश्वराचे मंदिर हे विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. आंभोरा येथील ब्रह्मगिरी टेकडीवर (ज्या टेकडीवर हे मंदिर आहे ती टेकडी) पांढऱ्या रंगाने रंगविलेले चैतन्येश्वराचे मंदिर लांबूनच लक्ष वेधून घेते. पायथ्यापासून मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. सुमारे १०० पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. चैतन्येश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी तेथे नंदेश्वर हे नंदीचे मंदिर लागते. त्यापुढे दर्शन मंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात चैतन्येश्वराची प्राचीन पिंडी आहे. मंदिराच्या आवारातून खाली पाहिल्यास सर्वत्र वाहणाऱ्या नद्या, डोंगर, हिरवाई असा सुंदर परिसर दिसतो.
चैतन्येश्वराचे दर्शन घेऊन पायथ्याशी आल्यावर येथे अनेक मंदिरांचा समूह आहे. त्यामध्ये हरिनाथ महाराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शिलालेखानुसार मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा ग्रंथ येथे लिहिल्याची नोंद आहे. असे सांगितले जाते की हरिनाथांनी १२ वर्षे पशुपत नावाचे महाव्रत करून येथील ब्रह्मगिरी टेकडीवर महायज्ञ केले. त्यातून स्वतः महादेव प्रकट झाले व हरिनाथास तुझ्या मनोकामना पूर्ण होतील, असा आशीर्वाद देऊन गुप्त झाले. महादेव गुप्त झाल्यानंतर त्यांच्यामागोमाग यज्ञातून शिवलिंग प्रकट झाले. तेच आजचे हे चैतन्येश्वर शिवलिंग होय.
या मंदिराला लागून विठ्ठल–रुक्मिणीचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या समाधी मंदिरांमध्ये एक नेपाळच्या राजाच्या मुलाची (नेपाळचा राजपुत्र राजवैभव त्यागून येथे तपसाधना करण्यासाठी आला होता), तर दुसरी समाधी हरिनाथ महाराजांचे शिष्य रघुनाथ ऊर्फ रामचंद्र महाराज यांची आहे. या गुरु–शिष्यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशीला मध्यान्ही समाधी घेतली. या तिथीला त्यांचा पुण्यतिथी उत्सव येथे साजरा केला जातो. ऋषी पंचमी, भाद्रपद शुद्ध पंचमीला येथे भरणाऱ्या यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. नागपूर, भंडारा, गोंदिया, बाळाघाट, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व अमरावती येथून मोठ्या प्रमाणात महिला येथे येतात. येथील ५ नद्यांच्या संगमावर स्नान करून त्या आपल्या व्रताची उजवणी करतात. घरी लावलेल्या धान्यापासून तयार केलेले अन्न (तांदूळ व भाजीपाला, बैलाच्या पायाने तयार केलेले नाही) प्रसाद म्हणून ग्रहण करतात. याशिवाय या नद्यांच्या संगमावर अस्थी विसर्जनासाठी अनेक लोक येत असतात. त्यासाठी देवस्थान कमिटीतर्फे येथे घाट बांधण्यात आले आहेत. मंदिर परिसरात भाविकांना राहण्याची सुविधा असून यात्रेसाठी आलेल्या भाविकांनाही राहण्यासाठीही येथे मोठे दालन बांधण्यात आले आहे.