बृहस्पती मंदिर

चौकी, ता. हिंगणा, जि. नागपूर

नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील श्रीक्षेत्र चौकी येथील जागृत स्वयंभू देवगुरू बृहस्पती मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर नागपूर वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर असून गुरू बृहस्पतींचे महाराष्ट्रातील ते एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. बृहस्पती हे सर्व देवांचे गुरू मानले जातात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला येथे भरणारी यात्रा ही तालुक्यातील मोठी यात्रा असून हजारोंच्या संख्येने भाविक यावेळी येथे दर्शनाला येतात.

बृहस्पती मंदिराचे निर्माण कोणत्या कालावधीत झाले याचा निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी काही अभ्यासकांनुसार येथील पुरातन वास्तू पांडवकालीन आहेत. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलातील बहुमूल्य वृक्ष वनसंपदेची चोरी, तसेच पशूपक्ष्यांची अवैध शिकार थांबविण्यासाठी १९६५ मध्ये वन विभागामार्फत येथे काही आदिवासी कुटुंबांना विनामूल्य घरे बांधून देण्यात आली उदरनिर्वाहासाठी जमिनी देऊन त्यांची वस्ती निर्माण करण्यात आली. त्याचवेळी वन विभागाकडून येथील बृहस्पती मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला. या परिसराची देखरेख करण्यासाठी वन विभागातर्फे येथे चौकी (तपासणी नाका) उभारण्यात आली. तेव्हापासून या गावाचे नाव चौकी असे पडले.

या मंदिराची आख्यायिका अशी की विदर्भ हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. पांडवकाळात या परिसरात एकचक्र नावाचे राज्य होते. अज्ञातवासाच्या काळात पांडव एकदा एकचक्र नगरात वास्तव्याला होते. तेव्हा येथील जंगलामध्ये बकासुर नावाचा बलाढ्य राक्षस राहत असे. त्याला दररोजच्या भोजनात गाडा धान्य जिवंत पुरुष लागत असे. आपल्या राज्यातील जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या या त्रासामुळे येथील राजा हताश झाला होता. हे सर्व अज्ञातवासात असलेल्या पांडवांना समजले. त्यांनी याच नगराच्या परिसरात घनदाट जंगलात एका उंच पहाडावर जाऊन या समस्येचा तोडगा काढण्यासाठी गुरू बृहस्पतींची तपश्चर्या केली. आपल्या भक्तांची तपश्चर्या पाहून बृहस्पती तेथे प्रकट झाले पांडवांना कार्यसिद्धी पार पाडण्यासाठी आशीर्वाद दिले.

देवगुरू बृहस्पतींचे आशीर्वाद मिळाल्यानंतर बकासुराकडे जाण्याची जबाबदारी भीमाने घेतली. गाडीभर धान्य घेऊन स्वतः भीम बकासुर राहत असलेल्या जंगलात गेला. यावेळी त्यांच्यात भयंकर युद्ध होऊन बकासुर मारला गेला एकचक्र नगरी भयमुक्त झाली. पांडवांनी आपल्या अज्ञातवासातील बराच काळ या तीर्थक्षेत्री व्यतित केला. तेव्हापासून दिव्य ज्योती रूपात स्वयंभू गुरू बृहस्पती येथे विराजमान आहेत.

ऐतिहासिक नोंदींनुसार, नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी १७०० च्या कालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पहिले रघुजीराजे भोसले यांनी हा परिसर नागा गोसावी (नहंग) यांना दान दिला आणि या धार्मिक स्थळाचा सर्वत्र प्रचार केला. तेव्हापासून दूरवरून भाविक गुरू बृहस्पतींच्या दर्शनासाठी येऊ लागले. नागा गोसावी यांचे वास्तव्य असताना शामगिरी महाराजांनी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत या घनदाट जंगलातील मंदिरात पुजारी म्हणून सेवा केली. आजही मंदिराशेजारी त्यांचे समाधी स्थळ आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत या परिसराचे मालगुजार (खोत) भास्करराव (पाटील) घारपुरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विठ्ठलपंत सोमनकर ऊर्फ कानटोपरे महाराज यांनी १९३० सालापासून याठिकाणी चैत्र कृष्ण षष्ठी ते द्वादशीपर्यंत सप्ताहाची सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.

केळझर सावळी मार्गाला लागून असलेल्या या मंदिरातील गर्भगृहात देवगुरू बृहस्पतींची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचा मुकुट असून मूर्तीशेजारीच अखंड दिव्य ज्योत सुरू असते. मूर्तीसोबतच भाविक या ज्योतीचीही पूजा करतात. मंदिराचे आवार प्रशस्त असून तेथे एक नवग्रहांचे मंदिर आहे. बृहस्पती हे नवग्रहांपैकी एक असल्यामुळे येथे दररोज या ग्रहांचीही पूजा होते. मंदिर समितीतर्फे येथे गुरुपौर्णिमा हा मोठा उत्सव, तर कोजागरी पौर्णिमा, महाशिवरात्र, हनुमान जयंती, गुरुपुष्यामृत योग पूजन आदी उत्सवही साजरे केले जातात. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

धार्मिक कार्यक्रमांसोबतच येथे अन्नदान, सामूहिक विवाह, बाल सुसंस्कार शिबिर इत्यादी कार्यक्रम होतात. मंदिर समितीतर्फे निराधार वृद्धांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरावर हिंगणा तालुक्यातील भाविकांची विशेष श्रद्धा असून कोणत्याही कामाचा शुभारंभ येथूनच करण्याची पद्धत आहे. कोणतीही निवडणूक असली तरी प्रचाराची सुरुवातही येथूनच केली जाते. महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला असून त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या निधीतून वेळोवेळी येथे अनेक विकासकामे करण्यात येत आहेत.

उपयुक्त माहिती:

  • हिंगणा शहरापासून ३१, तर नागपूरपासून ४४ किमी अंतरावर
  • हिंगणा वर्धा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिर परिसरात जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था नाही
Back To Home