ब्रह्मनाथ मंदिर

येळंबा, ता. शिरूर कासार, जि. बीड

कर्मकांड, चातुर्वर्ण्य आणि जातिभेद नाकारून मानवता व समतेची तत्त्वे रुजवणारा नाथ संप्रदाय तेराव्या शतकात उदयास आला. महादेवाला आद्यगुरू मानणाऱ्या या संप्रदायात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ आणि नागनाथ हे नवनाथ तसेच ८४ सिद्ध प्रमुख प्रचारक होते. यांपैकी ब्रह्मनाथ यांना ४८ वे सिद्ध मानले जाते. ब्रह्मनाथांची मोजकीच मंदिरे महाराष्ट्रात आढळतात; त्यांपैकी शिरूर तालुक्यातील येळंबा गावात सिंधफणा नदीच्या काठी ब्रह्मनाथांचे मूळ स्थान मंदिर वसलेले आहे. येथील हे जागृत दैवत नवसाला पावते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे.

मूळ हेमाडपंती पाषाणी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे तेराव्या शतकातील यादवकालीन वास्तुशैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे इतिहास अभ्यासक सांगतात. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. नाथसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसारासाठी नवनाथ व ८४ सिद्धांनी देशभर भ्रमण केले असून अनेक ठिकाणी मठ व मंदिरे उभारली. सामान्य जनतेची सेवा व प्रबोधन करीत असताना त्यांनी विपुल ग्रंथांची रचना केली. संप्रदायाच्या कार्याची महती अधोरेखित करताना अनेकदा त्यासोबत चमत्कार व अद्भुत कथा जोडल्या गेल्या. ८४ सिद्धांमधील ब्रह्मनाथ यांचे कार्य विशेष मानले जाते. ते महादेव भैरवनाथाचा अवतार असल्याची जनसामान्यांची धारणा असल्यामुळे त्यांच्या चतुर्भुज मूर्ती घडवल्या गेल्या. त्यांच्या हातात शंख, चक्र व त्रिशूल ही आयुधे आहेत. नाथ संप्रदायाच्या कार्याचा प्रसार करताना ब्रह्मनाथ येळंबा गावात स्थिरावले आणि हेच त्यांचे मूळ स्थान असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. ब्रह्मनाथांची उत्सव मूर्ती गावातील मंदिरात विराजमान आहे.

गावापासून जवळ असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पक्की सडक आहे. मंदिरास भक्कम तटबंदी असून तिला एक मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात तुळशी वृंदावन आणि बाजूला एक लहान देवालय आहे. मंदिराच्या दर्शनी भिंतीलगत विरगळ व इतर प्राचीन शिल्पे जतन केलेली आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपास समोर, डाव्या व उजव्या बाजूला अशी एकूण तीन प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपाची प्रवेशद्वारे प्रांगणापेक्षा उंच असल्याने तिन्ही प्रवेशद्वारांसमोर प्रत्येकी दोन पायऱ्या आहेत. समोरील प्रवेशद्वारावर महिरपी तोरण आणि ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. तोरणाच्या दोन्ही बाजूंना दर्शनी भिंतीवर पद्मनक्षी कोरलेली आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपापुढील अंतराळात डाव्या व उजव्या बाजूंना दोन कक्ष आहेत.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार अंतराळापेक्षा उंचावर असल्यामुळे तिथेही दोन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे आणि नक्षीदार लाकडी झडपा लावलेल्या आहेत. झडपांवर मंगल कलश व गजतोरण कोरलेले आहे, त्यावर पानाफुलांची नक्षी दिसते. गर्भगृहात वज्रपीठावर ब्रह्मनाथांची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या वरील दोन हातांत शंख व चक्र, तर खालील एका हातात त्रिशूल आणि दुसरा हात अभय मुद्रेत आहे. ब्रह्मनाथ हे भैरवनाथ महादेवाचा अवतार असल्याची मान्यता असल्याने मूर्ती चतुर्भुज असल्याचे सांगितले जाते. वज्रपीठावर मूर्तीच्या बाजूला पितळेचे अश्वशिल्प आहे. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. गर्भगृहाच्या वितानावर (छतावर) पद्मनक्षी कोरलेली आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे चौकोनी शिखर आहे. द्रविडी शैलीतील या शिखरावर पहिल्या दोन थरात कूट व शाल रचना आहे आणि तिसऱ्या वर्तुळाकार थरावर घुमट आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत.

या मंदिराच्या बाजूला तटबंदीतील प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला लहान शिवमंदिर आहे. मंदिरासमोर वज्रपीठावर नंदी विराजमान असून प्रवेशद्वाराजवळ विरगळ व देवशिल्पे आहेत. या मंदिरात शिवपिंडी स्थापित आहे. मंदिराच्या छतावर घुमटाकार शिखर, शीर्षभागी स्तूपिका व त्यावर कळस आहे. प्रांगणाबाहेर मंदिरापासून काही अंतरावर स्थानिक देवतेचे लहानसे मंदिर आहे.

चैत्र महिन्यातील चौथ्या सोमवारी मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात विशेष जत्रा भरते. जत्रोत्सवाच्या वेळी भाविक मंदिरात कावड तीर्थ आणून देवावर लिंगार्चन अभिषेक करतात. मंदिरात दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन व महाप्रसाद इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळीत देवाची पालखी मिरवणूक निघते. यावेळी ब्रह्मनाथांची गावात असलेली उत्सवमूर्ती पालखीत बसवून ग्रामप्रदक्षिणा केली जाते. उत्सवाच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी, नवस फेडण्यासाठी व पालखी उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. चैत्र पाडवा, दसरा, दिवाळी, नागपंचमी इत्यादी सण व उत्सव मंदिरात उत्साहाने साजरे केले जातात. सोमवार, गुरुवार, प्रदोष, पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची विशेष गर्दी होते.

उपयुक्त माहिती:

  • शिरूर कासार येथून १० किमी अंतरावर
  • बीड येथून ३३ किमी अंतरावर
  • शिरूर कासार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : रामेश्वर महाराज शास्त्री, मो. ९६७३२७३१५८

ब्रह्मनाथ मंदिर

येलाम्बा, ताल. शिरूर कसार, जिला. बीड

Back To Home