बोंबडेश्वर मंदिर

मठ बुद्रुक, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग

मालवण तालुक्यातील मठ बुद्रुक या गावातील बोंबडेश्वर मंदिर अनेक भाविकांना आकर्षित करीत असते ते तेथील नैसर्गिक चमत्कारामुळे! येथे बोंबडेश्वर देवास मोठ्याने हाक दिल्यानंतर किंवा ‘बोंबडेश्वरा, बोंबाडे काढ’ अशी साद घातल्यानंतर येथील चिऱ्याने बांधलेल्या तळ्यातून बोंबाडे म्हणजेच बुडबुडे येतात. या बोंबाड्यांच्या चमत्कारामुळेच येथील देवास बोंबडेश्वर हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. बोंबडेश्वर महादेवाचे येथील स्थान अत्यंत जागृत आहे व मठबुद्रुक या गावाचे ते ग्रामदैवत आहे.

आचऱ्यापासून जवळच असलेल्या मठबुद्रुक या गावामध्ये रस्त्यानजीकच हे मंदिर आहे. मंदिराच्या आवारभिंतीतून आत गेल्यानंतर समोरच बोंबडेश्वर महादेवाचे देवालय आहे. येथे पूर्वी जुन्या कोकणी स्थापत्यशैलीचे उतरत्या छपराचे कौलारू मंदिर होते. या ठिकाणी महादेवाची प्राचीन शिवपिंडी आहे. पिंडीसमोर नंदीच्या दोन मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती प्राचीन दगडी आहे व दुसरी संगमरवरी पाषाणात कोरलेली आहे. या ठिकाणी गणेशाच्याही दोन मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती प्राचीन, तर दुसरी संगमरवरी आहे. अलीकडील काही वर्षांत या मंदिरास धार्मिक पर्यटनासाठी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. हे पाहून मठ बुद्रुकमधील ग्रामस्थांनी एकत्र येऊन भाविकांना आकर्षित करीत असलेल्या मंदिराच्या ठिकाणी भव्य मंदिर उभारण्याचे ठरवले आहे.

या देवाचे स्थान साधारण जैन काळातील असल्याचे येथील जुनेजाणते ग्रामस्थ सांगतात. बोंबडेश्वर मंदिराच्या बाजूस जैन भैरी देवीचे पाषाण आहेत. याबाबतचा इतिहास असा की प्राचीन काळी कोकणास अपरान्त म्हणत. कोकण एकच नसून सात कोकणे होती. सह्याद्री खंडात त्यांची नावे पुढीलप्रमाणे देण्यात आली आहेत – केरळ, तुलुंभ, गोराष्ट्र, कोकण, केरठ, वरलाट व बर्वेरा. या सप्तकोकणात इ.स. ७६५ ते १०२० या काळात शिलाहार राजघराण्याचे राज्य होते. हे शिलाहार राजे आपणांस विद्याधर नृपती जीमूतकेतू याचा पुत्र जीमूतवाहन याचे वंशज समजत. बलिपत्तन म्हणजे सध्याचे रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे त्यांची राजधानी होती. या शिलाहारांच्या काळात जैनमतास मोठा राजाश्रय होता. त्या काळात अनेक ठिकाणी जैन मंदिरे, तसेच जैनांचे मठ स्थापन झाले. बोंबडेश्वर मंदिरालगत जैन भैरी देवीच्या पाषाणानजीक गोसाव्याचा पाषाण आहे. ही एक छोटी दगडी स्तंभाकार देवळी आहे व त्यात मांडी घालून बसलेल्या व नमस्कार मुद्रेतील स्त्री व पुरुषाच्या दोन मूर्ती आहेत. जाणकार ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, हा पाषाण येथे साडेतीनशे-चारशे वर्षांपासून आहे. या ठिकाणास गोसाव्याचा मठ असे म्हणत. या गोसाव्यांनीच मठ गावाची रचना केली आहे व त्यांच्या मठामुळे या गावाचे नाव मठ असे पडले.

पुढे शंकराचार्यांनी प्रयत्नपूर्वक जैनमताचे खंडन केले. श्रीधरस्वामींनी इ.स. १७१८ मध्ये रचलेल्या ‘शिवलीलामृत’ ग्रंथाच्या १५व्या अध्यायात याविषयीची माहिती आहे. त्यात असे म्हटले आहे की सर्वत्र जैनमताचा प्रसार झाल्याचे पाहून त्याचा उच्छेद करण्यासाठी शंकराने अवतार घेतला. ‘तेव्हा तो शंकर पिनाकपाणी। अत्यंत कोपाविष्ट होऊनि। म्हणे सर्व कर्ममार्ग बुडवुनी। वर्तती की जैनधर्मे।।’ शंकराचार्यांच्या रूपात त्यांनी अवतार घेतला. या शंकराचार्यांनी ‘जैनशास्त्रांच्या मोटा बांधुनि। अति अगाध सुमद्रजीवनी। नेऊनिया बुडविल्या।।’. परंतु अनेक गावांमध्ये जैनांनी स्थापन केलेली ग्रामदैवते होती. ती त्यांनी स्थापन केलेली असली, तरी लोकांनी भजावीत असे शंकराचार्यांनी सांगितले. ‘अहो ही ग्रामदैवते समस्त। आहेत खरी जैनस्थापित। परीत त्याते तुम्ही सतत। भजत जावे स्वधर्मे।। जैने स्थापिली म्हणोनी। संशय काही न धरावा मनी। आपुला धर्म आपणालागुनी। देवापाशी काय असे।।’ असे शंकराचार्यांनी सांगितले. त्यावर जैनांच्या धर्मपंडितांनी शंकराचार्यांना शरण येऊन त्यांची विनवणी केली. त्यांची विनवणी ऐकून शंकराचार्यांनी ग्रामदेवतांच्या जवळ जैनांचा धोंडा स्थापन केला. शिवलीलामृतात याबाबत असे म्हटले आहे की ‘जेथे जेथे ग्रामदैवत। तेथे जैनांचा धोंडा वसत। ग्रामदेवतासंगे त्याप्रत। प्रतिदिन पूजिती।।’ यावरून मठ येथील मंदिरातील जैन भैरीचे पाषाण नंतर बाहेर ठेवण्यात आले.

येथील बोंबडेश्वर मंदिर व जैन भैरी देवीचे स्थान यांना लागूनच दोन मोठ्या हौदासारखी तळी आहेत. ती चिऱ्यांनी बांधलेली आहेत. या तळ्यांत उतरण्यासाठी काही पायऱ्याही आहेत. या तळ्यांच्या मध्ये एक भिंत आहे व तिला पाणी येण्या-जाण्यासाठी वरच्या बाजूने चौकोनाकार छिद्रे ठेवलेली आहेत. त्यामुळे या दोन्ही तलावांतील पाणी समपातळीत राहते. येथे उन्हाळ्यातही पाणी असते. येथील पाण्याचा उगम हा जैन भैरी देवाच्या स्थानाच्या खालच्या बाजूने होतो. उजवीकडील तळ्यात असलेल्या खडकातून सतत पाणी झिरपत असते. मोठ्या आवाजात ‘बोंबडेश्वर’ अशी हाक दिल्यास त्या ठिकाणातून बुडबुडे येतात वा त्यांची संख्या वाढते. बुडबुड्यांना मालवणी बोलीत बोंबाडे असे म्हणतात.

देवाचे नाव घेतल्यानंतर बुडबुडे वा बोंबाडे येणे हा चमत्कार असल्याचा लोकसमज आहे. याची वैज्ञानिक मीमांसा अशी आहे की भूस्तराखाली असलेल्या खडकांत काही सच्छिद्र खडकही असतात. त्यांतील पोकळीत हवा असते. कोकणात बसॉल्ट प्रकारचे खडक आहेत. त्यांत क्षार असतात. ते येथील प्रचंड पावसामुळे हळूहळू वाहून जातात. त्यामुळे खडक सच्छिद्र बनतात. मोठ्याने केलेल्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. त्या कंपनांमुळे खडकांच्या पोकळीतील हवा बाहेर येते व त्यामुळे बुडबुडे निर्माण होतात. बोंबडेश्वर मंदिराच्या तळ्यांत असा नैसर्गिक चमत्कार पाहावयास मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील नाधवडे या गावातील महादेव मंदिरानजीकच्या कुंडातही असे बुडबुडे पाहावयास मिळतात. त्या ठिकाणास उमाळा असे म्हटले जाते. उमाळे म्हणजे जमिनीतून येणारे पाण्याचे बुडबुडे. असे पाच-सहा उमाळे या गावपरिसरात आहेत. या बुडबुड्यांमुळे नाधवडे हे गाव उमाळ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. बोंबडेश्वर मंदिरातील या बुडबुड्यांच्या चमत्कारांमुळे येथे अनेक भाविक आकर्षित होत असतात. बोंबडेश्वराच्या या मंदिरात महाशिवरात्र, होळी, नवरात्र, तसेच त्रिपुरारी पौर्णिमा (टिपराचा जागर) हे उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहाने साजरे करण्यात येतात.

उपयुक्त माहिती

  • मालवणपासून ३३ किमी, देवगडपासून ३४ किमी
  • मालवण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : गुरुदत्त गायतोंडे, अध्यक्ष, मो. ९४२२६३३७९६,
  • सतीश परुळेकर, उपाध्यक्ष, मो. ९४२३३००३४२
Back To Home