महाराष्ट्रात धनगर समाजाची वेगळी ओळख आहे. हा लढवय्या क्षत्रीय समाज एकेकाळी राज्यकर्ता होता, हे अनेक ओव्या व इतिहासातील पानांवर नमूद आहे. या समाजाचे आराध्यदैवत आणि अठरा पगड जातीच्या लोकांचे श्रद्धास्थान असलेला बिरदेव हा बिरुबा, विरोबा, बिरप्पा किंवा विरूपा, वीरण्णा या नावांनीही ओळखला जातो. राज्यात बिरदेवाची सात प्रमुख स्थाने आहेत. त्यापैकी उमरगा येथील जागृत बिरुदेव देवस्थान हे प्राचीन व प्रसिद्ध आहे. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत, धनगरी ढोल-कैताळांच्या निनादात येथे भरणारी बिरुदेवाची यात्रा हा एक मोठा उत्सव असतो.
बिरुदेवाची जन्मकथा तसेच माहात्म्य यांचे वर्णन ‘श्री विठ्ठल बिरदेव माहात्म्य’ या ग्रंथात वर्णिले आहे. ‘सुंबरान मांडिलं’ या धनगरी ओव्यांतून गायली जाणारी आख्याने यांच्या आधारे दत्तात्रय बोरगावे आणि विठ्ठल ओमापुजारी या बिरुदेव भक्तांनी हा ग्रंथ रचला आहे. त्यात अशी आख्यायिका सांगण्यात आली आहे की दक्षयज्ञाच्या वेळी शंकराचा अपमान झाल्याने दाक्षायणीने म्हणजेच पार्वतीने आत्मदहन केले. त्यामुळे क्रोधित झालेल्या शंकराने जटा आपटल्या व त्यातून वीरभद्राचा जन्म झाला. वीरभद्राने दक्षाचे धड उडवले. त्यावेळी दक्षपत्नीने वीरभद्राची करुणा भाकली. आपल्या पतीस जिवंत करावे, अशी
याचना तिने केली. त्यास जिवंत कसे करावे याचा विचार करीत असताना वीरभद्रास जवळच मेंढ्या चारीत असलेला धनगर दिसला. त्याने मेंढीचे शिर दक्षाच्या धडास लावण्याचे ठरवले. त्यावेळी धनगराने वीरभद्राची प्रार्थना केली की आपण आमच्या हीन कुळात अवतार घ्यावा व शिवनिंदक व दुष्टांचा संहार करावा. तेव्हा वीरभद्राने त्यास सांगितले की कलीयुगात मी धनगरकुळात जन्म घेईन.
पुढे नारदपुरातील राजा ध्रुवाइत याची कन्या गंगासूरवंती (गंगा-सरस्वती) हिच्या पोटी वीरभद्र म्हणजेच बिरुदेवाने जन्म घेतला. मात्र तो पुत्र मातेजवळ राहू शकला नाही. नदीच्या शापामुळे त्याला वनात एका पाळण्यात घालून ठेवावे लागले.
त्या शापाची अशी आख्यायिका आहे की आपली कन्या विवाह न होता गर्भवती राहिली आहे, या कारणाने गंगासूरवंतीच्या पित्याने तिच्या जेवणात विष कालवले. गर्भात असलेल्या बिरुदेवांनी मातेला विषापासून वाचवले. पण उरलेले अन्न सूरवंतीच्या दासीने नदीत टाकले, त्यामुळे जलचर मृत झाले. माझी मुले तू मारलीस म्हणून तुझा मुलगा जन्माला आला की तुझ्यापासून दूर राहील, असा नदीने शाप दिला. त्यामुळे बिरुदेवाला अरण्यात पाळण्यात ठेवले गेले. मोठा झाल्यानंतर त्याने अनेक राक्षसांचा संहार केला व पुढे त्याने विरक्त जीवन जगून समाजाचा उद्धार केला. हा मुलगा म्हणजेच बिरूदेव व त्याच्या सोबत सावलीसारखा राहिला तो शिष्य म्हणजे महालिंगराय, महालिंगेश्वर होय.
उमरगा शहराच्या सीमेवर असलेल्या बिरूदेव मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. मंदिराच्या तटबंदीतील प्रवेशद्वारासमोर बाहेरील बाजूस दोन चौथऱ्यांवर दीपमाळा आहेत. वाहनतळाजवळील एका मोठ्या प्राचीन वृक्षाभोवती पक्का पार बांधलेला आहे. येथे यात्राकाळात ‘भाकणूक’ केली जाते. यात्रेच्या वेळी होणारी ही भाकणूक अर्थात भविष्यकथन ऐकण्यासाठी येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमते. हे मंदिर सुमारे आठशे ते हजार वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.
काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. स्तंभशाखा असलेल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपाल शिल्पे व आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रांगणात सभोवती तटबंदीला लागून प्रशस्त ओवऱ्या व काही कक्ष आहेत. प्रांगणात मंदिरासमोर दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर गोलाकार दीपमाळा आहेत. डाव्या बाजूच्या दीपमाळेच्या चौथऱ्यास लागून मागे व पुढे प्रत्येकी दोन देवकोष्टके आहेत. त्यात स्थानिक देवतांचे शेंदूरचर्चित पाषाण आहेत. उजव्या बाजूच्या दीपमाळेच्या चौथऱ्याच्या भिंतीत देवी देवतांची शिल्पे व चक्र नक्षी आहे. चौथऱ्यावर मेष शिल्प आहे. प्रांगणात अन्नछत्र आहे. येथे उत्सवांच्यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते.
प्रशस्त सभामंडप व दोन गर्भगृहे अशी मंदिराची रचना आहे. पूर्ण खुल्या स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. नंदीसमोर बिरूदेवाचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीच्या दोन्ही बाजूला अश्वमुख शिल्पे आहेत. अश्वमुख शिल्पांच्या वरील बाजूस चक्र नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत दीपकोष्टके आहेत. गर्भगृहात देवाचा स्वयंभू शेंदूरचर्चित पाषाण आहे. या पाषाणास चांदीचा मुखवटा व मानाचे बाशिंग लावलेले आहे.
बिरूदेव गर्भगृहाच्या उजवीकडे अशीच रचना असलेले महालिंगराय यांचे गर्भगृह आहे. गर्भगृहात महालिंगराय यांच्या शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाणावर चांदीचा मुखवटा आहे. दोन्ही गर्भगृहांभोवती प्रदक्षिणा मार्ग आहेत. सभामंडपाच्या छतावर चहूबाजूंनी सुरक्षा कठडा आहे. तसेच चारही कोनांवर चौकोनी नक्षीदार अर्धस्तंभ, त्यावर आमलक व कळस आहेत. दोन्ही गर्भगृहांच्या छतावर मध्यभागी घुमटाकार शिखरे आहेत. शिखरांच्या खालील बाजूला कमळदल नक्षी व मध्यभागी नागफण्यांचे रिंगण आहेत. बिरुदेवाच्या शिखरावर समोरील बाजूस शिवपिंडी व त्यावर नाग आहे. चारही दिशांना डोक्यावर मोर असलेल्या कीर्तीमुख शिल्पांची रचना आहे. शिखरांच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहेत.
अश्विन अमावस्येला येथील यात्रोत्सव सुरू होतो. पाच दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून हजारो भाविक उपस्थिती लावतात. ढोल ताशांच्या गजरात, भंडाऱ्याची उधळण करीत गावोगावच्या पालख्या यावेळी मंदिरात येतात. देवाचे मुख्य पुजारी अंगावर सोटे मारून घेतात. देवाचे वारे आलेल्या अवस्थेत भाकणूक केली जाते. त्यात वर्षभराचे हवामान, पीकपाणी, बाजाराची स्थिती, राजकारणाची स्थिती यांचे भविष्य वर्तवले जाते. आलेले भाविक नवस फेडतात. गावातील मानकरी देवास मानाचे बाशिंग अर्पण करतात. येथील पंधरा दिवस चालणारा बैलांचा बाजार विशेष प्रसिद्ध आहे. बैलांच्या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.