बिरोबा मंदिर

आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली

धनगर समाजाचे आराध्यदैवत आणि अठरा पगड जातीच्या लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या बिरोबाचे आष्टा येथील स्वयंभू स्थान प्रसिद्ध आहे. आष्टा शहराचे ग्रामदैवत असलेल्या बिरोबाचे प्रशस्त मंदिर अनेक अर्थांनी आगळेवेगळे आहे. असे सांगितले जाते की येथे महिन्यातून एकदा होणारे सामिष अन्नदान कितीही भक्त आले तरीही कमी पडत नाही. उत्सवाच्या वेळी येथे उसळणाऱ्या गर्दीसाठी टनावारी मांसाहारी जेवण तयार होते. येथील वैशिष्ट्य असे की हा बिरोबा आपल्या मुखवट्यांच्या रुपाने भक्तांच्या घरी भेट देतो. मंगलकार्यांसाठी आणि उत्सवासाठी तो फिरतीवरच असतो

बिरोबाची कथा अशी सांगितली जाते की प्राचीन काळी पद्मना आणि सिद्रामा ही हनगू जगदाळ्याची मुले नांगरणी करीत होते. ते करताना त्यांनी शेतात असलेल्या मोठ्या वारुळावरही नांगर फिरवला. त्यावेळी वारुळत काही मेंढ्या एक सोन्याची पेटी असल्याचे त्यांच्या निदर्शास आले. पेटी उघडून पाहिल्यावर त्यांना त्यात एक मुलगी दिसली. त्या दोघांनी त्या पेटीसह मुलगी राजाच्या स्वाधीन केली. राजाने तिचे नामकरण सुरवंती असे करून तिचा आपल्या मुलीप्रमाणे सांभाळ केला. सुरवंती वयात आल्यावर तिचे लग्न करावे, अशी राजाची इच्छा होती. परंतु तिने आपण कधीच लग्न करणार नाही, असे राजाला सांगितले

एके दिवशी सुरवंतीला स्तनपान करणारे वासरू दिसले. ते पाहताच तिचे मातृत्व जागृत झाले आणि आपल्यालाही एक मूल हवे, असे तिला मनोमन वाटू लागले. परंतु लग्न करण्याचा तिचा निर्धार कायम होता. तिने पुरुषाशिवाय मातृत्व मिळविण्यासाठी व्रत सुरू केले. तिच्या या व्रतामुळे शंकर पार्वती प्रसन्न झाले. त्यांनी तिला बिनमेघाचे धान्य, बिनफुलाचे फळ आणि वनगाईच्या दुधाचे तूप एकत्र करून त्याचा दिवा प्रसादरूपाने खाण्यास सांगितले. गरुडाच्या मदतीने तिने हे सर्व मिळविले आणि प्रसाद म्हणून ते भक्षण केले. त्याच वेळी शंकराच्या अंशाने सुरवंतीच्या गर्भात प्रवेश केला. काही काळानंतर सुरवंतीने एका मुलाला जन्म दिला तो म्हणजे बिरोबा. धनगर समाजाचे बिरोबा हे कुलदैवत असले तरी महाराष्ट्रात ते एक उग्रदैवत म्हणून परिचित आहे

मंदिराची अख्यायिका अशी की या परिसरात दुष्ट शक्तींचा त्रास वाढला होता. त्यामुळे नागरिक त्रस्त होते. त्यावेळी एका भक्ताला जंगलात काशीचे शिवलिंग असल्याचा स्वप्नदृष्टांत झाला. त्यानुसार शोध घेतला असला लिंग स्वरूपातील बिरोबाचे त्याला दर्शन झाले. त्याला स्वप्नात ज्या ठिकाणी मंदिर बांधण्याची आज्ञा झाली होती, त्यानुसार त्याने येथे मंदिर बांधले. हेच मंदिर पुढे काशिलिंग बिरोबा मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, एका तपस्वी साधुपुरुषाने या परिसराची दुष्ट शक्तींपासून सुटका व्हावी म्हणून मोठे तप केले. त्यामुळे प्रसन्न होऊन महादेवाने त्याला दर्शन दिले आणि त्या ठिकाणी शिवलिंग स्थापन करण्याची आज्ञा दिली.

आष्टा शहराच्या मध्यवर्ती भागात महामार्गाला लागून बिरोबाचे हे प्रशस्त मंदिर आहे. मंदिरासमोर असलेल्या मोठ्या प्रांगणात पेव्हरब्लॉकची फरसबंदी आहे. त्यामुळे हा परिसर स्वच्छ सुंदर भासतो. त्यापुढे मंदिराची सुमारे १२ फूट उंचीची तटबंदी आहे. त्यात असलेले तीनमजली प्रवेशद्वार वैशिष्ट्यपूर्ण आहे. महिरपी आकाराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल कमळफुलांची उठावशिल्पे आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस बाशिंगी कठडा, त्यावर दोन बाजूला वाघांची शिल्पे आणि मध्यभागी शंकराची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वाराच्या मंदिराकडील मागील बाजूला समाजातील विविध व्यक्तींची चित्रे रेखाटलेली आहेत. याशिवाय वासराला दूध देणारी गाय, सिंह, घोडा गाढव यांचीही चित्रे आहेत. प्रवेशद्वाराच्या बाजूने तटबंदीसाठी जिना आहे

मंदिरासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळ आहे. या षटकोनी दीपमाळेचा खालील चौथरा वरील हस्त यामध्ये तिचा आकार कमळफुलासारखा आहे. त्यापुढे मंदिराचा खुला सभामंडप आहे. भाविकांच्या सुविधेसाठी या मंडपावर पत्र्याची शेड उभारण्यात आलेली आहे. बिरोबा हे शंकराचे एक रूप असल्याने या मंडपात नंदीची स्थापना केलेली आहे. नंदीच्या मागील बाजूस चौथऱ्यावर दोन्ही बाजूंना पाषाणी मेंढ्या आहेत. अशाच दोन मेंढ्या मंदिराबाहेरील चौथऱ्यावरही आहेत.

नंदीच्या मूर्तीसमोर तीन कमानी असलेले अंतराळ आहे. या कमानींच्या भोवतीही दोन मेंढ्यांची शिल्पे आहेत. या कमानींच्या वरच्या मजल्यावर आणखी तीन कमानी आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखा नक्षीकामाने सुशोभित आहेत. रजतपटलाने त्या मढविलेल्या आहेत ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात एक पितळी कासव त्यासमोर बिरोबाचा स्वयंभू पाषाण आहे. मूर्तीच्या कपाळावरील गंध डोळे हे चांदीचे आहेत. बिरोबाच्या डाव्या हाताला त्याच्यासाठी घोंगडीने सजवलेली बिछायत आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक गोशाळा परिसरात सुसज्ज भक्तनिवास आहे

दर तीन वर्षांनी बिराबाची मोठी यात्रा असते. या त्रैवार्षिक सोहळ्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी उसळते. त्यांना सामिष भोजनाचा महाप्रसाद दिला जातो. असे सांगितले जाते की हजारो वर्षांपूर्वी एका सिद्धपुरुषाने गावावरील संकट टाळण्यासाठी ही प्रथा सुरू केली होती. तो दिवस मंगळवार होता. त्यामुळे दर तीन वर्षांनी अक्षयतृतियेनंतर येणाऱ्या मंगळवारी ही यात्रा होते. त्याला थोरली जत्रा असेही म्हणतात. इतरवेळी दरवर्षी गुढीपाडव्याला येथे यात्रा असते. या यात्रेच्या वेळी होणारीभाकणूकअर्थात भविष्यकथन ऐकण्यासाठी येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमते. यावेळी बेभान होऊन हेडाम नृत्य केले जाते. धनगरी ओव्या गायल्या जातात. भंडाऱ्याची अमाप उधळण होते. धनगरी ढोल आणि कैताळाच्या गजरात पालखी निघते. या उत्सवादरम्यान असलेला उत्साह आणि सजावट पाहता

सोन्याचा देव माझा, त्याचं सोन्याचं देऊळ,

नवलाख तारांगणं उतरती तेथे

असे माझ्या काशिलिंगाचं राऊळ

अशी एका भक्ताने केलेली रचना प्रत्यक्षात साकारताना दिसते

उपयुक्त माहिती

  • आष्टा बसस्थानकापासून पायी पाच मिनिटांच्या अंतरावर
  • पेठपासून २६ किमी, तर सांगली येथून २८ किमी अंतरावर
  • पेठ सांगली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : संदीप ढोले, मो. ७३८३११२५२५, केरबा भानुसे, मो. ९३७०५५५१२२
Back To Home