धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेला बिरदेव हा विरुबा, विरोबा, बिरप्पा किंवा विरूपा, वीरण्णा या नावांनी ओळखला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकात बिरदेवाची सहा-सहा अशी बारा प्रमुख ठाणी आहेत. त्यातीलच एक ठाणे वाशी येथे आहे. येथील बिरदेवाचे मंदिर हे महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक व गोवा या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. फाल्गुन शुद्ध द्वितीयेला व दर तीन वर्षांनी होणारी येथील जळयात्रा प्रसिद्ध आहे. यावेळी सुमारे सहा ते सात लाख भाविक बिरदेवाच्या दर्शनासाठी येथे येतात.
येथील मंदिराची आख्यायिका अशी की पट्टणकोडोली येथील विठ्ठल-बिरदेव मंदिराचा पुजारी नारायण गावडे याचा डोण्या नावाचा एक सावत्र पुत्र होता. नंतर त्यांना स्वतःचे तीन पुत्र झाले. परंतु त्यांनी आपला पुजारी म्हणून वारसा डोण्याकडे देण्याचे ठरवले. त्याला त्या तीन पुत्रांनी व गावकऱ्यांनी विरोध केला. तेव्हा डोण्या गाव सोडून निघाला. वाटेत वाशी या गावात त्याला बिरदेवांचा एक निस्सिम भक्त भेटला. त्यांनी त्याला डोणमुलखाकडे पाठवले. वाटेत आलकनूर या गावामध्ये डोण्याने करिसिद्धाचे म्हणजेच बिरदेवाचे दर्शन घेतले. काही काळाने डोण्याने वाशीमध्ये जाऊन स्थायिक होण्याचे ठरवले. त्यावेळी त्याने बिरदेवाची प्रार्थना करून त्यांना आपल्याबरोबर यावे, अशी विनंती केली. तेव्हा बिरदेव एका दगडाच्या रूपात त्याच्यासमवेत वाशी येथे आले.
डोण्या याने वाशीमधील एका झाडाखाली या पाषाणाची स्थापना केली. येथील गुराखी त्याची नित्यनेमाने पूजा करीत असत. त्या वेळी त्यांची गुरे शेतांत घुसून पिकांची नासाडी करीत असत. त्यामुळे शेतकरी त्रासून गेले व या अनर्थाचे कारण हा दगड असल्याचे समजून त्यांनी तो एका डोहात फेकून दिला. त्यानंतर गावावर अरिष्ट आले व रोगराई पसरली. सर्वत्र जणू अंधकार पसरला. तेव्हा काही लोकांनी भादोले गावच्या धुळसिद्ध नामक सिद्ध पुरूषास वाशी गावात बोलावून घेतले. तेथील वतनदारांनी आधी धुळसिद्ध यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. त्यांनी एक घोडी आणली व तिच्या पोटात नर आहे की मादी हे ओळखण्यास धुळसिद्ध यांना सांगितले. ते आव्हान स्वीकारून धुळसिद्धांनी घोडीच्या पोटावर भंडाऱ्याची मूठ मारली व सांगितले की घोडीच्या पोटात नर आहे. तो काळ्या रंगाचा व त्याच्या कपाळावर पांढरा टिळा आहे. त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वतनदाराने घोडीचे पोट कापून शिंगरू बाहेर काढण्यास सांगितले. त्यानुसार केले असता धुळसिद्धांनी केलेले वर्णन हुबेहुब होते याची खात्री पटली. त्यानंतर धुळसिद्ध वतनदाराला म्हणाले की ‘इर्षेला पडून आपण हा अनुचित प्रकार केला. या पापाचे आपल्याला प्रायश्चित्त करावे लागेल. येथील शेतकऱ्यांनी देवाला डोहात फेकून दिले. गावावर संकट आले ते त्यामुळे. मी डोहातून देवाला बाहेर काढतो. सर्वांनी त्याची पूजा करावी.’ असे म्हणून धुळसिद्धाने डोहात उडी मारली व दगड (गुंड) घेऊन ते बाहेर आले. सर्वांनी मिळून त्याची गावातील उंच ठिकाणी स्थापना केली. त्यास कोणी बिरदेव, कोणी करिसिद्ध असे म्हणतात, तर कोणी अवघडखान. यानंतर बिरदेव धुळसिद्धांवर प्रसन्न झाले व त्यांना वाशी येथेच स्थायिक होण्यास सांगितले. याशिवाय दर तीन वर्षांनी मी तुझ्या भेटीसाठी वाशी गावात येईन, असा शब्दही करिसिद्धाने धुळसिद्धांना दिला. बिरदेव व धुळसिद्ध यांची दर तीन वर्षांनी होणारी भेट ही येथे जळ यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.
कोल्हापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या वाशी गावातील एका पठारावर बिरदेव मंदिर आहे. पायथ्यापासून पायरी मार्गाने या मंदिरापर्यंत येता येते. काही वर्षांपूर्वी मंदिरापर्यंत येण्यासाठी थेट गाडीरस्ताही करण्यात आलेला आहे. मंदिर परिसरात येताच येथील दोन उंच दीपमाळा आणि मंदिराच्या आवाराभोवतीची उंच तटबंदी नजरेस पडते. या तटबंदीच्या दर्शनीभिंतीत दोन्ही कडेला मोठी प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारासमोर एक दगडी समाधी आणि नंदीमंडप आहे. या मंडपात एका उंच दगडी चौथऱ्यावर नंदीची मोठी पितळी मूर्ती व त्यावर घुमटाकार छत्र आहे.
मुख्य प्रवेशद्वार दगडी बांधणीचे आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना छोट्या चौथऱ्यावर मेंढ्याची शिल्पे आहेत. प्रवेशद्वार दंडगोलाकार आहे व त्याच्या दोन्ही बाजूंस दगडी भिंतीत दीपकोष्ठकांची उभी रांग आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या मजल्यावर लाल दगडात बांधलेला, राजस्थानी स्थापत्यशैलीतील नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या आतील भागात उजव्या बाजूस एका देव्हाऱ्यात मोठा दगडी नागफणा आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्याचे दर्शन घेतले जाते. येथून थेट मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो.
हा सभामंडप दुमजली व खुल्या स्वरूपाचा आहे. गोलाकार स्तंभांनी तोललेल्या या सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावर शेकडो भाविक बसू शकतील असा सज्जा आहे. सभामंडप आधुनिक बांधणीचा आहे. प्राचीन मंदिरास तो नंतर जोडलेला आहे. प्राचीन मंदिर दगडी बांधकामाचे व मध्ययुगीन कालखंडामधील स्थापत्यशैलीतील आहे. त्याचे मूलतः सभामंडप आणि गर्भगृह एवढेच दोन भाग होते. मूळ प्राचीन मंदिराच्या सभामंडपाच्या समोरील भिंतीवर वरच्या बाजूस तीन देवकोष्ठके आहेत. त्यात बिरदेवाशी संबंधित चरित्रकहाणीतील काही प्रसंग शिल्पांकित केलेले आहेत. येथेच काळविटांची दोन मुंडकी टांगलेली आहेत. सभामंडपात साधे कोरीव दगडी खांब आहेत. त्यांच्या रचनेतून त्यांचे प्राचिनत्व लक्षात येते. एका आख्यायिकेनुसार सभामंडपातील नऊ दगडी स्तंभ हे बादशहाच्या महालाचे आहेत. ते पूर्वीच्या काळी जीर्णोद्धाराच्या वेळी येथे आणण्यात आले. त्या खांबाच्या ठिकाणी बसणाऱ्याने खोटे बोलू नये असा संकेत असल्याचे सांगण्यात येते.
या मूळच्या सभामंडपात उजवीकडे एका चौथऱ्यावर धूळसिद्धांचा पुतळा आहे. त्याच्या बाजूस चांदीच्या मोठ्या नागाच्या वेटोळ्यावर विराजमान असलेला देवाचा मुखवटा आहे. येथे पितळी घोडे तसेच नंदीची मूर्ती आहे. या ठिकाणी दोन वैशिष्ट्यपूर्ण पितळी मूर्ती पाहावयास मिळतात. समोरून येथे व्याघ्रमुखे दिसतात, मात्र त्यांचा मागचा धडाकडील भाग एखाद्या मोठ्या पितळी प्याल्यासारखा आहे. या चौथऱ्याच्या बाजूलाच बिरदेवभक्ताची उंच मूर्ती आहे. कवेत वाघाचा बछडा, एका हातात मोठी काठी, दुसऱ्या हातात गडवा, खांद्यावर व डोईवर घोंगडी अशा या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना तिच्या गुडघ्याएवढे वाघ दिसतात. येथून पुढे काही अंतरावर कासवाची भंडाऱ्यात न्हालेली पितळी मूर्ती आहे.
समोरच मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दगडी द्वारचौकटींवर पितळेचा पत्रा चढवण्यात आला आहे. त्यावर पानफुलांची नक्षी कोरलेली आहे. या चौकटीच्या ललाटबिंब स्थानी गणेशाची मूर्ती आहे व तिच्या दोन्ही बाजूंना हत्तीशिल्पे कोरलेली आहेत. गाभाऱ्यात दगडी देव्हाऱ्यामध्ये बिरदेवाची मूर्ती विराजमान आहे. पाषाणात उठावशिल्प प्रकाराची ही मूर्ती आहे. त्यात मूर्तीचा एक हात भाल्याच्या फाळासारखा, दुसऱ्या हातात गोलाकार ढाल वा पात्र दिसते. मूर्तीच्या मस्तकी उंच मुकूट आहे. मूर्तीच्या मागे चांदीची भिंत व त्यावर पानाफुलांची नक्षी तसेच नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत. मूर्तीच्या समोर बिरदेवाचे वाहन असलेल्या अश्वाची धातूची मूर्ती आहे. त्या समोर चांदीच्या चौरंगावर फणा उंचावलेल्या नागाची कृष्णमूर्ती आहे. चौरंगाच्या दोन्ही बाजूंसही अश्वमूर्ती आहेत.
मंदिराच्या गर्भगृहावर पिरॅमिडच्या आकाराचे दगडी शिखर आहे. त्यावर मध्यभागी मोठा आमलक व कळस आहे व त्याच्या चारी बाजूला लहान आमलक आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला एक चौकोनाकार देवालय आहे. तेथे बिरदेवाची धर्मकन्या भागुबाईची आशीर्वाद मुद्रेतील कृष्णपाषाणातील उभी मूर्ती प्रतिष्ठापित आहे.
या मंदिरात दररोज पहाटे ५.३० ते ६.३० या वेळेत अभिषेक, स्नान होऊन देवाची आरती होते. येथे दर तीन वर्षांनी फाल्गुन शुद्ध द्वितीयेला बिरदेवाची मोठी यात्रा असते. पाच दिवस मोठ्या धामधुमीत, ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात, खारीक-खोबरे आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत आणि ढोल-कैताड्या निनादात चालणारी ही यात्रा जळ यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी वाशीतील धनगर गल्ली व रानगे परिवार यांच्या दारात बिरदेव आणि धुळसिद्ध यांच्या गळाभेटीचा सोहळा पार पडतो. यानंतर देवाची पालखी येथील भानूस मंदिरातून मुख्य मंदिराकडे प्रस्थान करते. रात्रभर ही पालखी मिरवली जाते. दुसऱ्या दिवशी पहाटे मुख्य मंदिरात देवास गादीवर बसवण्यात येते. यावेळी येथे जोरदार आतषबाजी केली जाते. देवास आंबिलचे कलश, वडीभाकरी, पुरणपोळी असा नैवेद्य अर्पण केला जातो. संध्याकाळी पहिली भाकणूक, हेडाम नृत्य आदी कार्यक्रम होतात.
तिसऱ्या दिवशीचे मुख्य आकर्षण हे दुसरी भाकणूक आणि देव जळास नेण्याचा कार्यक्रम हे असते. चौथ्या दिवशी छबिना आणि भाकणूक असते. या दिवशी देवास खारा नैवेद्य दाखवला जातो. अखेरच्या दिवशी धुळसिद्धांस निरोप देऊन यात्रेचा समारोप होतो. या यात्रेत सुमारे दहा ते पंधरा हजार बकऱ्यांचा बळी दिला जातो.