
कामठी तालुक्यातील खापरखेडानजीक कन्हान, कोलार व पेंच या नद्यांच्या संगमावर भोसले कालीन श्री संगमेश्वर शिव मंदिर प्रसिद्ध आहे. हा त्रिवेणी संगम बिना संगम म्हणून परिचित आहे. त्यामुळे या मंदिराचीही ओळख बिना संगम मंदिर अशी आहे. कामठी, पारशिवनी आणि सावनेर या तालुक्यांच्या सीमेवर असलेले हे मंदिर व हा परिसर तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटनक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारतर्फे या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्राच्या ‘क’ दर्जाच्या यादीत करण्यात आला आहे.
संगमाकाठी असलेल्या या शिव मंदिराची बांधणी साधीशी असली तरी जिल्ह्यातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. या शिव मंदिराचा परिसर सुमारे सव्वादोन एकर असून त्यात शिव मंदिर व महामुक्तेश्वर धाम आहे. जैन धर्मियांचीही २४ प्रतिके या परिसरात आहेत. शिव मंदिराच्या दर्शनी भागात म्हणजेच दर्शनमंडपावर चार स्तंभ असून ते महिरपी कमांनींनी एकमेकांशी जोडलेले आहेत.
या दर्शनमंडपावर दोन शिखरे आहेत. येथेच चौथऱ्यावर सुंदर नंदीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडी आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. १९८१ पासून येथे यात्रेला सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील अनेक शिवभक्त यावेळी येथे येतात. यात्रेसाठी आलेल्या भाविकांना गावकऱ्यांकडून महाप्रसाद दिला जातो. हे मंदिर त्रिवेणी संगमावर असल्यामुळे याला धार्मिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
ऋषी पंचमीला येथे महिला भाविकांची संख्या जास्त असते. या दिवशी संगमावर स्नान करून महादेवांचे दर्शन घेतल्यास पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात दररोज हरिपाठ आणि प्रवचन होते. अधिक मासात येथे महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा संगम अस्थिविसर्जनासाठी प्रसिद्ध असल्याने दररोज शेकडो लोक येथे नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या विधीसाठी येत असतात.
या शिव मंदिरासोबतच येथील निसर्गसुंदर परिसराला पर्यटनस्थळ म्हणूनही महत्त्व आहे. येथे दररोज हजारो भाविक व पर्यटक येत असतात. या परिसरात पूजा साहित्य विक्रीची शेकडो दुकाने आहेत. प्रत्येक रविवारी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, दसरा, दिवाळी आणि सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी येथे २५ हजारांहून अधिक भाविक येतात, अशी नोंद आहे. येथे मिळणारी झुणका–भाकर प्रसिद्ध असून त्याचीही अनेक हॉटेलवजा दुकाने या परिसरात आहेत. येथे आलेले पर्यटक व भाविक येथील चविष्ट झुणका–भाकरीचा हमखास आस्वाद घेतात.
येथे शिव मंदिराशेजारी असणारे महामुक्तेश्वरी धाम मंदिरात देवी काली दहा रूपांमध्ये, दुर्गामाता नऊ रूपांमध्ये आणि महादेव आपल्या आठ शक्तींसमवेत स्थापित आहेत. राज्यातील हे एकमेव अशाप्रकारचे स्थान असल्याचे सांगितले जाते. सकाळी ५ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाविक येथील महादेव मंदिर व महामुक्तेश्वरी धाम मंदिरात दर्शन घेऊ शकतात.
मंदिरांशिवाय बिना संगमावर असलेले वीजनिर्मिती केंद्र व परिसरातील कोळसा खाणी यामुळे बिना संगमाची ओळख अधिक प्रचलित आहे. कन्हानपासून वायव्येकडे सावनेरपर्यंतचा प्रदेश येत असून त्याचे क्षेत्रफळ १३८ चौरस कि.मी. इतके आहे. त्यात मध्यभागी बिना संगमचा परिसर आणि पश्चिमेकडे सिल्लेवाडा या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दगडी कोळसा उपलब्ध आहे. भारतीय खनिज विभागाच्या माहितीनुसार येथे असलेल्या खडकांच्या मधल्या ८५ ते १२५ मीटरपर्यंतच्या जाडीत कोळशाचे पाच थर असून त्यातील कोळसा प्रथम ते तृतीय श्रेणीचा आहे. खालच्या दोन थरांत चांगल्या दर्जाचा कोळसा आहे. या विभागात एकंदर ८३.६६ दशलक्ष टन कोळसा उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते.