भुवनेश्वरी मंदिर

भुवनेश्वरी वाडी, भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली

संपूर्ण पृथ्वी म्हणजे एक भुवन आहे या भुवनाचे आधिपत्य ज्या देवीकडे आहे ती भुवनेश्वरी देवी जगाचे कल्याण करणारी आहे. तिच्या शक्तीनेच या जगाचे रहाटगाडे सुरू आहे, असे मानले जाते. या देवीचे प्रसिद्ध मंदिर ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे असले, तरी देशात अनेक ठिकाणी भुवनेश्वरी देवीची मंदिरे आहेत. यापैकीच एक असलेले भुवनेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर भिलवडी गावात कृष्णाकाठावर आहे. हे देवीचे मूळपीठ असल्याचे सांगितले जाते. ही जागृत देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराचा उल्लेख सरस्वती गंगाधर रचितगुरुचरित्राच्या १७व्या अध्यायात आहे. त्यातील कथेनुसार, करवीर नगरात एक अनाथ अडाणी बालक राहात होता. ‘जन्मोनियां संसारीं। वृथा जाहलासी सूकरापरी।असे म्हणत सर्वजण त्याची हेटाळणी करीत. अखेर एकदा कंटाळून त्याने गाव सोडले भिल्लवडीगावी आला. येथे भुवनेश्वरी देवीच्या दारी त्यानेधरणें घेतले तया वेळीं’. तीन दिवसानंतर देवीचा अनुग्रह झाल्याने या बालकानेआपुली जिव्हा तत्काळी। छेदूनि वाहे देवीचरणीं।।यानंतर देवीने उपेक्षिल्यास तिच्या चरणी शिर वाहण्याचे त्याने मनोमनी ठरवले. रात्री त्याला स्वप्न पडले. त्यात देवी म्हणाली की तू कृष्णेच्या पश्चिम तीरी जा. तेथेऔदुंबरवृक्षातळीं। असे तापसी महाबळी। अवतारपुरूष चंद्रमौळी। तुझी वांछा पुरवील।।’ 

लगेचच तो पोहत नदीच्या पैलतटावर गेला. तेथे ध्यानस्थ बसलेल्या नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवले. तेव्हा स्वामींनी त्या बालकाच्या मस्तकी हात ठेवून अनुग्रह दिला. त्याला सर्व विद्यांची प्राप्ती झाली कापलेली जीभही पूर्ववत झाली. या बालकाने ज्या देवीची प्रार्थना केला होती त्या भुवनेश्वरीचे देवीचे मंदिर भिलवडी गावापासून जवळच असलेल्या भुवनेश्वरी वाडीत आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते.

देवीच्या मंदिराभोवती आवारभिंत आहे. मंदिरासमोर दोन दगडी चौथरे त्यावर तीन थरांच्या गोलाकार दीपमाळा आहेत. या दीपमाळांमध्ये दीपहस्तांची संख्या तुलनेत कमी आहे, परंतु त्यावर विविध प्राणी मानवी आकृत्यांची उठावशिल्पे कोरलेली आहेत. दोन्ही दीपमाळांच्या मध्यभागी तुलसी वृंदावन त्या शेजारी मारुतीचे लहानसे मंदिर आहे. मंदिरात मारूतीची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे

पुढे भुवनेश्वरी मंदिराचा खुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात दोन्ही बाजूस प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. त्या पुढे मूळ मंदिराचा बंदिस्त सभामंडप आहे. हा प्राचीन सभामंडप अलिकडे आधुनिक पद्धतीने बांधलेल्या सभामंडपापेक्षा उंचावर आहे. पाच पायऱ्या चढून या बंदिस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपाच्या दर्शनीभिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस देवकोष्टके आहेत. सभामंडपात प्रत्येकी पाच नक्षीदार दगडी स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूच्या रांगेतील स्तंभ हे भिंतीत आहेत. स्तंभ पायाजवळ चौकोनी अधिक रुंद आहेत. वरील भागात षट्कोनी, चौकोनी, वर्तुळाकार अशा विविध भौमितिक आकारात ते घडवले गेले आहेत

पुढे गर्भगृहाचे पाच द्वारशाखा असलेले प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची अस्पष्ट नक्षी आहे. मंडारकावर कीर्तिमुख ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. ललाटपट्टीच्या वरील भागात नक्षीदार तोरण कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस केदारनाथाची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपिठावर भुवनेश्वरी देवीची सुमारे साडेचार फूट उंचीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, खड्ग त्रिशूल आहे आणि ती राक्षसावर पाय ठेवून उभी आहे. देवीने डोक्यावर मुकुट, अंगावर उंची वस्त्रे अलंकार परिधान केलेले आहेत. देवीच्या डोक्यावर छत्र धरलेला चांदीचा पंचफणी नाग आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या नक्षीदार प्रभावळीत दोन्ही बाजूंस व्याल वर मध्यभागी कीर्तिमुख आहे

मंदिराच्या छतावर चहूबाजूंनी कठडा मध्यभागी दोन शिखरे आहेत. प्राचीन सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडील बाजूस असलेल्या चौकोनी शिखरात चारही बाजूने देवकोष्टके त्यात देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर चारही कोनावर असलेल्या चौकोनी शिखरांत चारही बाजूंनी देवकोष्टके त्यात विविध देवतांच्या मूर्ती आहेत. वर आमलक त्यावर कळस आहेत. मध्यभागी पाच थरांचे मुख्य शिखर आहे. शिखराच्या चारही बाजूंच्या नक्षीदार भिंतीत विविध मूर्ती असलेली देवकोष्टके आहेत. चौथ्या थरातील देवकोष्टकांवर शिखरे त्यांवर कळस आहेत. मुख्य शिखराच्या पाचव्या थरात आमलक, त्यावर कळस ध्वजपताका आहे.

प्रांगणात एका बाजूला शाळेची इमारत आहे. भुवनेश्वरी मंदिरासमोर देवीचा रक्षक काळभैरव मंदिर आहे. फरसबंदी केलेल्या सभामंडपात पितळी कासव गर्भगृहात वज्रपिठावर काळभैरवाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. मंदिराच्या छतावर कमळ फुलाच्या प्रतिकृतीतून निघालेले वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. या शिखरात शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे. भुवनेश्वरी मंदिरास लागून डाव्या बाजूला महादेव विठ्ठलरखुमाई मंदिर आहे.

पौष पौर्णिमेस देवीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मंदिरात चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्रौत्सव, महाशिवरात्र आदी उत्सव साजरे केले जातात. जत्रोत्सवात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व उत्सवांचे वेळी राज्यभरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. कृष्णा नदीच्या पलीकडील औदुंबर देवस्थानाला येणारे भाविक आवर्जून या मंदिराला भेट देऊन भुवनेश्वरी देवीचे आशीर्वाद घेतात.

उपयुक्त माहिती

  • पलूसपासून १३ किमी, तर सांगलीपासून २६ किमी अंतरावर
  • पलूस सांगली येथून एसटीची सुविधा
  • श्रीक्षेत्र औदुंबर येथून बोटीने येण्याची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : नागेश गुरव, मो. ९८६०८४४२२८
Back To Home