भुलेश्वर देवालय / शितलादेवी मंदिर

भुलेश्वर रोड, मुंबई

मुंबईपासून जवळच असलेल्या घारापुरी बेटावर सहाव्या ते नवव्या शतकात खोदण्यात आलेल्या लेण्यांमध्ये अघोर-भैरव, तत्पुरुष महादेव आणि वामदेव यांची त्रिमुखी शिवमूर्ती जगप्रसिद्ध आहे. या लेण्यांतील शिल्पांवरून मुंबई परिसरावर प्राचीन काळी शैवसंप्रदायाचा प्रभाव असल्याचे दिसते. मुंबईतही शंकराची अनेक मंदिरे आहेत आणि त्यातील एक प्रसिद्ध मंदिर भुलेश्वर येथे आहे. येथील महादेवावरूनच या परिसरास भुलेश्वर हे नाव प्राप्त झाले. गौड सारस्वत ज्ञातीचे आराध्य दैवत असलेल्या भुलेश्वराच्या या मंदिरात शितलामातेचेही प्राचीन स्थान आहे. येथील गुजराती आणि महाराष्ट्रीय शिवभक्तांचे व खासकरून व्यापारी वर्गाचे भुलेश्वर महादेव हे प्रमुख श्रद्धाकेंद्र आहे.

या मंदिरामुळे, तसेच या परिसरात असलेल्या विविध देव-देवतांच्या अनेक लहान-मोठ्या मंदिरांमुळे भुलेश्वरला ‘मुंबईची काशी’ असे म्हटले जाते. ब्रिटिशांच्या काळात, साधारणतः १७४४ च्या सुमारास चकाला, उमरखाडी, मांडवी या परिसरांबरोबरच भुलेश्वर भागातही मोठ्या प्रमाणावर घरबांधणीस प्रारंभ झाला. यानंतर सुमारे शतकभराने, १८६५ मध्ये भुलेश्वरची गणना मुंबई पालिकेच्या एका प्रभागात झाली. ‘ग्रेटर बॉम्बे डिस्ट्रिक्ट गॅझेटियर’नुसार, त्या काळात भुलेश्वर ही एक अत्यंत गचाळ अशी वस्ती होती. येथील गवळ्यांच्या गोठ्यांमुळे हा परिसर गलिच्छ झाला होता. १८७१ मध्ये ब्रिटिश सरकारने येथील गोठे हलवून स्वच्छतेस प्रारंभ केला. मात्र तरीही १८७६ मध्ये या भागात मोठ्या प्रमाणावर देवीची साथ आली होती. भुलेश्वर महादेव मंदिरात विराजमान असलेली शितलामाता ही देवीची साथ दूर करणारी देवी मानली जाते. ब्रिटिश काळापासून आजतागायत हा परिसर मुंबईतील एक महत्त्वाचा व्यापारी भाग म्हणून गणला जातो. येथील भुलेश्वर महादेवाच्या मंदिराविषयी विविध आख्यायिका सांगितल्या जातात. त्यातील काही आख्यायिकांची नोंद कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी १८९५ साली प्रसिद्ध केलेल्या ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ या पुस्तकात आहे. त्यातील एक कथा अशी की भोलानाथ नावाच्या एका रजपूत परदेशी व्यक्तीने हे मंदिर स्थापन केले. त्यामुळे त्याला ‘भोलेश्वर’ असे नाव पडले आणि तेच नाव पुढे ‘भुलेश्वर’ असे झाले. काही जणांच्या म्हणण्यानुसार, एका वाण्याच्या विधवा अपत्यहीन स्त्रीने मृत्यूपूर्वी दिलेल्या दानातून हे मंदिर उभारण्यात आले. अन्य एका मतानुसार, सध्या हे मंदिर जेथे उभे आहे, त्या जागेवर बनिया जमातीतील एका स्त्रीला घर बांधायचे होते. त्या घराचा पाया खणत असताना मजुरांना तेथे शिवलिंग आढळले. त्यांनी ही बाब त्या स्त्रीला सांगितल्यावर तिने घराऐवजी येथे हे मंदिर बांधले. के. रघुनाथजी यांनी आपल्या पुस्तकात असेही म्हटले आहे की हे मंदिर मंगेश आनंदराव धोंडे या शेणवी गृहस्थाने बांधल्याचे सांगण्यात येते. त्यांनी ही जमीन सुतार जातीतील मदन केशवजी यांची विधवा पत्नी लक्ष्मीबाई हिच्याकडून विकत घेतली होती. या जमिनीतील एक भाग सुंदर बाबाजी बारभाई यांना मिळाला. त्यांनी त्यावर गणपती मंदिर स्थापन केले. दुसरा भाग रामेश्वर मंदिराचे संस्थापक मुकुंद गुजर यांना, तर तिसरा भाग आत्माराम विश्वनाथ यांना मिळाला. त्यांनी तेथे वेगवेगळ्या वेळी काळभैरव, काशीविश्वेश्वर आणि नर्मदेश्वर अशी तीन मंदिरे बांधली. याच जमिनीतील एक भाग भाईदास साकीदास यांनी विकत घेतला होता. त्यांनी तेथे भुलेश्वर तलाव बांधला. (हा तलाव आज अस्तित्वात नाही. त्या जागेवर फूलबाजार आहे असे सांगण्यात येते.)

सॅम्युएल टी. शेपर्ड यांच्या ‘बॉम्बे प्लेस नेम्स अँड स्ट्रीट नेम्स : ॲन एक्स्युर्शन इनटू द बाय-वेज ऑफ द हिस्ट्री ऑफ बॉम्बे CITY’ (द टाइम्स प्रेस, १९१७) या पुस्तकात या मंदिराच्या स्थापनेविषयीचे रावबहादूर पी. बी. जोशी यांचे मत उद्‌धृत केले आहे. भोलानाथवरून भोलेश्वर असे नाव पडल्याचे विधान चुकीचे असल्याचे सांगून, ते म्हणतात की ‘हे मंदिर एका स्थानिक श्रीमंत मच्छीमार कोळ्याने बांधले होते. भुला वा भोल्या असे त्याचे नाव होते व त्यावरून या मंदिरास तेथील यजुर्वेदी ब्राह्मण पुजाऱ्याने भुलेश्वर हे नाव दिले.’ एकंदर या मंदिराचा नेमका इतिहास अस्पष्ट आहे. येथील महादेवाचे स्थान सुमारे ६०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येते. के. रघुनाथजी यांनी, ‘येथील मूळ मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वी स्थापन झाले व त्याची पुनर्बांधणी सुमारे ७० वर्षांपूर्वी झाली’ असे म्हटले आहे. के. रघुनाथजी यांची ही नोंद १८९५ मधील आहे. यावरून हे मंदिर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात, १६९५ च्या सुमारास स्थापन झाल्याचे व त्याची पुनर्बांधणी १८२५ च्या सुमारास झाल्याचे दिसते. येथील मूळ मंदिर हे गोलाकार घुमट असलेले होते. कालौघात त्याची अवस्था खराब झाली. ते पडण्याच्या बेतात आले असताना लोकवर्गणी गोळा करून त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. त्यासाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च झाला, असेही के. रघुनाथ यांनी म्हटले आहे.

अत्यंत वर्दळीच्या भुलेश्वर रोडवरील दुकानांच्या रांगेमधील एका अरुंद अशा बोळातून या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या बोळामध्ये एका देवळीत पंचमुखी मारूतीचे स्थान आहे. येथून काही अंतरावर भुलेश्वर महादेवाचे मंदिर स्थित आहे. प्राचीन मराठी स्थापत्यशैलीची छाप असलेल्या या मंदिरास प्रशस्त असा सभामंडप आहे. त्यास मोठे कोरीव महिरपी कमानदार प्रवेशद्वार आहे. सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा आहे. त्यास महिरपी कमान असलेल्या मोठ्या खिडक्या आहेत. प्रशस्त अशा या सभामंडपात उजव्या बाजूस संगमरवरी फरशा लावलेल्या उंच अधिष्ठानावर चारी बाजूंनी खुली असलेली व पिरॅमिडच्या आकाराचे शिखर असलेली मोठी देवळी आहे. या देवळीमध्ये शितलामातेचे स्थान आहे. येथे शितलामातेची मूर्ती आहे. तिच्या शेजारीच आणखी दोन लहान पाषाणमूर्ती आहेत. एकोणिसाव्या शतकापर्यंत येथील तिन्ही पाषाणमूर्ती या शितलादेवीच्या असल्याचे मानले जात असे. आता त्यातील एक मूर्ती काली मातेची आणि एक बडियार देवाची म्हणून पूजली जाते. शितलामाता ही गोवर, कांजिण्या, तसेच व्हॅरिओला मेजर या विषाणूमुळे होणारा देवीचा रोग यांची देवता मानली जाते. तिच्या पूजेने बालकांमधील हे रोग दूर होतात, अशी श्रद्धा पूर्वी पारशी व मुस्लिमांमध्येही होती. पूर्वी या समाजातील स्त्रिया आपल्या आजारी मुलांना घेऊन या मंदिरात येत असत, असे सांगण्यात येते.

भुलेश्वर मंदिराच्या सभामंडपात उंच दगडी अधिष्ठानावर शंकराचे वाहन असलेल्या नंदीची पाषाणमूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीच्या पत्र्याचे आवरण चढवण्यात आले आहे. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूस महिरपी कमानीने जोडलेले दोन मोठे स्तंभ आहेत. या स्तंभांच्या शीर्षभागी सूरसुंदरींच्या दोन उंच मूर्ती आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार जुन्या पद्धतीचे दगडी आहे. या त्रिशाखीय प्रवेशद्वाराच्या स्तंभांवर खालच्या बाजूस कोरीव नक्षीकाम केलेले आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती आहे. द्वारचौकटीच्या वरच्या भागात मंदिर शिखरांचे आकार कोरलेले आहेत. येथील स्तंभ, त्यातील कमान आणि द्वारचौकटीस सोनेरी पत्रा मढवलेला आहे. गर्भगृह सभामंडपापासून खालच्या स्तरावर आहे. आत चौकोनाकार शाळुंखेमध्ये भुलेश्वराचे पाषाणलिंग स्थित आहे. या पाषाणलिंगावर तांब्याच्या नागदेवतेने फणा धरलेला आहे. या लिंगास मधोमध एक खाच आहे. त्याबाबत येथील पुजारी अशी आख्यायिका सांगतात की भोला नामक मच्छीमारास एकदा स्वप्नदृष्टान्त झाला. त्यात एका विशिष्ट ठिकाणी जमिनीत शिवलिंग असल्याचे शंकराने त्यास सांगितले. त्या स्वप्नानुसार, भोलाने त्या ठिकाणी खोदले असता त्यास हे शिवलिंग आढळले. खोदताना त्या शिवलिंगावर कुदळीचा घाव पडला. त्याबरोबर त्यातून रक्त निघू लागले. ते पाहून सर्वजण चिंतेत झाले. तेव्हा एका पुजाऱ्याने त्यांना शिवलिंगास दुग्धअभिषेक करण्यास सांगितले. त्यानुसार अभिषेक केल्यानंतर हे रक्त येणे बंद झाले. गर्भगृहात उजवीकडे एका संगमरवरी वेदीवर पार्वतीमातेची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. मागच्या भिंतीतील देवळीत पार्वतीची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित आहे.

‘गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्ट’च्या मालकीच्या या भुलेश्वर व शितलामाता मंदिरामध्ये सकाळी ६.३० ते दुपारी १२.३० व दुपारी ४ ते रात्री ८.३० या काळात भाविक देवदर्शन घेऊ शकतात. या मंदिरात अनेक भाविक दर सोमवारी दुग्धाभिषेक करतात. मात्र येथे सकाळी ११ वाजेपर्यंतच कोणत्याही मूर्तीवर दूध, दही वा पाण्याने अभिषेक करण्याची परवानगी आहे. मंदिरात भुलेश्वराची दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते. सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते. त्यात भुलेश्वर परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांचा मोठा भरणा असतो. येथे कोजागिरी पौर्णिमा आणि कार्तिक महिन्यातील त्रिपुरी पौर्णिमेला जत्रा असते. यावेळी रात्री देवाची पालखी काढली जाते.

भुलेश्वर मंदिरालगत सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हा गणपती जागृत व नवसास पावणारा असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या सिद्धिविनायकास ‘भुलेश्वरचा महागणपती’ असे म्हटले जाते. गणेशाचे येथील स्थान प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. जुन्या दुमजली इमारतीच्या तळमजल्यावर स्थित असलेल्या या मंदिराची संरचना सभामंडप आणि गर्भगृह अशी आहे. गर्भगृहात उंच वेदीवर सिद्धीविनायकाची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीसमोर गणेशाचे वाहन असलेल्या मूषकाची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे. येथे साईबाबांची मूर्तीही विराजमान आहे. या मंदिरात सकाळी ६ ते दुपारी १२.३० व सायंकाळी ४ ते रात्री ८.३० या कालावधीत देवदर्शन घेता येते. मंदिरात रोज सकाळी ९ वाजता व सायंकाळी ७ वाजता श्रींची आरती होते. येथे माघ जन्मोत्सव, भाद्रपदी गणेश चतुर्थी या दिवशी मोठा उत्सव केला जातो. या दिवशी येथे सहस्त्र आवर्तने, गणेशाभिषेक, महाआरती, भजन तसेच महाप्रसाद असे कार्यक्रम होतात.

उपयुक्त माहिती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून  ४ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिराबाहेर असलेल्या भाजी मंडईपर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
Back To Home