
असे म्हटले जाते की काही ठिकाणचे वेगळेपण हे तेथे गेल्याशिवाय कळत नाही. असेच एक ठिकाण आहे नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सीताबर्डी येथील भोंडा महादेव मंदिर! पूर्वाभिमुख असलेले हे मंदिर त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण शिल्पवैभव आणि कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहे. या मध्यम आकाराच्या मंदिरावर असंख्य शिल्पे आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे येथील प्रत्येक शिल्प हे सुस्थितीत आहे. त्यामुळेच या मंदिराचा उल्लेख ‘नागपूरचे वेरूळ‘ असा केला जातो.
ऐतिहासिक नोंदींनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू इ. स. १६८० मध्ये झाला. त्यानंतर सरदार यशवंतराव होळकर, शहाजी शिंदे, भोसले, गायकवाड, पवार, इंगळे हे इंदूर, ग्वाल्हेर, नागपूर, बडोद्याकडे निघाले व चौथाई (मराठी राज्याच्या बाहेर; परंतु राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करण्यात येणारा कर. हा कर थेट राज्याच्या खजिन्यात जमा होत असे) वसूल करू लागले. नागपुरात पहिले रघुजी राजे यांनी महापराक्रम करून छत्रपतींचा झेंडा कटकेपर्यंत पोहचवला होता.
बंगाल, छत्तीसगड, बस्तर, उत्कल हा सर्व भाग रघुजी राजेंच्या अधिपत्याखाली होता. त्यांचा नातू द्वितीय रघुजी यांनी नागपूरचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली. त्यासाठी शहरात ठिकठिकाणी महाल बांधण्यात आले, राजवाडे, उद्याने तयार झाली व अनेक मंदिरे बांधण्यात आली.
नागपूरच्या आजच्या स्वरूपाचे संपूर्ण श्रेय जाते ते द्वितीय रघुजी राजांना. अंबाझरी, तेलंगखेडी येथील हनुमान मंदिर व कल्याणेश्वर शिव मंदिर, जागेश्वर, पाताळेश्वर, लक्ष्मीनारायण मंदिर (सक्करदरा), वेणुगोपाळ मंदिर (तुळशीबाग), श्रीकृष्ण मंदिर (सोनेगाव), श्रीगणेश मंदिर (शुक्रवार तळ्याची पाळ), रुख्मिणी मंदिर ही सर्व मंदिरे त्यांच्याच काळात निर्माण झाली. या सर्व मंदिरांचा मुकुटमणी ठरावा, असे अत्यंत सुंदर व सुबक शिल्पांनी नटलेले मंदिर म्हणजे भोंडा महादेव मंदिर होय.
नागपूर शहरातील सीताबर्डी येथील पटवर्धन हायस्कूलसमोर हे मंदिर आहे. लालसर दगडांचे बांधकाम असलेल्या या मंदिरावर नखशिखांत शिल्पांकने कोरलेली आहेत. एक इंचही जागा येथे रिक्त नाही, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या मंदिराच्या प्रत्येक भागावर शिल्प, शिल्प आणि शिल्पच आहेत. रामायण, महाभारत, महादेव, ब्रह्मदेव, कृष्णलीला, गोप–गोपिकांचे नृत्य, दशावतार, मानवी जीवन, कळ्या–फुले, पक्षी, प्राणी, व्याल (या प्रकारच्या शिल्पांमध्ये हत्ती, घोडा, मेंढा यांसारख्या प्राण्यांचे केवळ मुख असून त्याखाली काल्पनिक प्राणी वा पक्ष्याचा आकार असतो. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची गजव्याल, अश्वव्याल, शरभव्याल अशी ओळख पटविली जाते) वादकवृंद, पांडवांचा पराक्रम, नृत्यांगना, नृत्यपुरुष व किचकशिल्प असे किती तरी प्रसंग व कलाकृती या मंदिरावर कोरलेल्या आहेत. मंदिराच्या भिंतींवर (जंघा) चार स्तरांत वरपर्यंत शिल्पे कोरलेली आहेत. त्या शिल्पांवरील वेशभूषा, रंगभूषा, दागिने, अस्त्र, शस्त्र, संगीत साधन, वाद्य, स्त्रियांचे अलंकार, वस्त्रे यांचेही सूक्ष्म अलंकरण करण्यात आले आहे. याशिवाय वाहन, अंबाऱ्या, अश्व, गाय, रथ, हत्ती यांसारख्या शिल्पांनी हे मंदिर पूर्णतः व्यापले आहे.
‘आजचे सुवर्णकार सोन्यात कलाकुसर करू शकणार नाहीत, अशी कलाकुसर नागपूरकर भोसलेंच्या कारागिरांनी या मंदिरावर केली आहे,’ अशा शब्दांमध्ये या शिल्पमंदिराचा येथे गौरव करण्यात येतो. या मंदिराचा आकार केवळ ५४० चौरस फूट आहे. त्यामध्ये नंदीमंडप, लहानसे अंतराळ व गर्भगृह आहे. मंदिराच्या दर्शनी भागात २ स्तंभ असून वरील बाजूस महिरपी कमानीने ते जोडले आहेत. त्याखाली नंदीमंडप असून त्यात वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असलेली नंदीची मूर्ती विराजमान आहे. येथील प्रतिमांमध्ये अश्वबंधनशिल्प, मत्स्याभेदक अर्जुन (स्वयंवर), ब्रह्मदेव, नटनारायण, महिषासुरमर्दिनी, लव–कुश यांचा पराक्रम, राम–रावण युद्ध, गोप–गोपिकांचे नृत्य, अंबारीशिल्प, कृष्णलीला, कालियामर्दन, दशावतार, कीचकशिल्प, युद्धस्थ योद्धे, गदायुद्ध, शिखंडी युद्ध अशा शिल्पप्रतिमा आहेत. गाभाऱ्यात प्राचीन शिवपिंडी आहे.
या मंदिरात श्रावणी सोमवारी, नागपंचमी, त्रिपुरारी पौर्णिमा, महाशिवरात्र या दिवशी उत्सव होतात. मंदिराच्या समोरील बाजूस अरविंद स्वामी यांचा आश्रम आहे. भाविकांना सकाळी ६ ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत या मंदिरात महादेवांचे दर्शन करता येते.