गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले नांदेड जिल्ह्यातील राहेर हे गाव एका आध्यात्मिक वारशाचे साक्षीदार आहे. याच पवित्र भूमीत १३व्या शतकातील यादवकालीन राजवटीत निर्माण झालेले भोग नृसिंह मंदिर आहे. सुमारे आठशे ते हजार वर्षांचा इतिहास सांगणारे हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली आणि प्राचीन शिल्पकलेचा एक उत्कृष्ट आविष्कार मानले जाते. भक्त प्रल्हादाचा उद्धार करणाऱ्या भगवान नृसिंहाचे हे स्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. भक्ताच्या हाकेला धावून येणाऱ्या आणि नवसाला पावणाऱ्या या देवावर भाविकांची असीम श्रद्धा आहे.
हिरण्यकश्यपूचा वध करून भक्त प्रल्हादाचा उद्धार करणाऱ्या नरसिंह अथवा नृसिंहाची संपूर्ण देशात विविध ठिकाणी मंदिरे आहेत. यात आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील अहोबिलम, तेलंगणातील यदाद्री, तामिळनाडू राज्यातील शोलिंगूर, उत्तर प्रदेशातील इटावा येथील नरसिंह मंदिरे प्रसिद्ध आहेत. सुमारे आठशे ते हजार वर्षांपूर्वीची ही मंदिरे प्राचीन वास्तुकला व शिल्पकला यांची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या तीरावर अनेक ठिकाणी नृसिंह मंदिरे आहेत. त्यापैकी नायगाव येथील राहेर गावातील खडक्या नृसिंहाचे स्थान व भोग नृसिंह मंदिर विशेष प्रसिद्ध आहेत. १९८३ साली आंध्र प्रदेशातील पोचमपाड प्रकल्पामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने गाव येथून २ किलोमीटर दूर पुनर्वसित करण्यात आले. मात्र हे प्राचीन मंदिर आपल्या मूळ स्थानी कायम राहिले.
हे हेमाडपंती शैलीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर तेराव्या शतकातील यादव राजा दुसरा भोज यांच्या काळातील असल्याचे मानले जाते. असे सांगितले जाते की गोदाकाठी असलेल्या या मंदिराच्या परिसरात संत बाळगीर महाराज, मायनदेव प्रभू, चक्रधर स्वामी, संत कवी दासगणू आदींचे वास्तव्य होते आणि महानुभाव पंथाचे हे महत्त्वाचे स्थान होते.
या मंदिराची आख्यायिका अशी की राहेर येथील मायनदेव प्रभू हे नृसिंह देवाचे निस्सीम भक्त आंध्र प्रदेशातील अहोबिलम येथील नृसिंह देवाच्या दर्शनासाठी नित्यनेमाने जात असत. पुढे वृद्धापकाळात त्यांना अहोबिलम येथे जाणे अशक्य होऊ लागले. तेव्हा त्यांनी देवाला आपल्या गावी येण्याची विनंती केली. गावी येताना आपण तुमच्या मागे चालू परंतु तुम्ही मागे वळून पहायचे नाही, अशी अट घालून देव अहोबिलम येथून राहेरपर्यंत आले. गावाच्या वेशीवर आल्यानंतर मायनदेव प्रभू यांनी मागे वळून पाहिले आणि त्याच क्षणी देव खडकात गुप्त झाले. ते स्थान म्हणजे येथील खडक्या नृसिंह होय. खडक्या नृसिंह देवास नवस बोलल्याने वरंगळ प्रभू राजास संतानप्राप्ती झाली, म्हणून राजाने भोग नृसिंह मंदिर बांधले.
मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ आहे. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या मागील बाजूला तटबंदीत एक प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारास ‘नैवेद्य द्वार‘ म्हटले जाते. असे सांगितले जाते की यादव काळात देवाचा नैवेद्य या द्वारातून येत असे. अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धमंडपास पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस कठडे आहेत. अर्धमंडपासही कठडे आहेत. या कठड्यांवर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस दोन गोलाकार नक्षीदार वामन स्तंभ आहेत.
अर्धमंडपात दोन्ही बाजूस कक्षासने आहेत आणि पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारास पाच द्वारशाखा आहेत. पहिल्या तीन द्वारशाखांवर पर्णलता व पुष्पलता नक्षी आहे. तिसऱ्या नक्षीदार स्तंभशाखेवर सज्जा आहे. इतर दोन द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. ललाटबिंबावर देवप्रतिमा आहे, तर उत्तरांगावर शिखरशिल्पे आहेत.
सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ भिंतीत आहेत. स्तंभपाद अधिक रुंद व चौकोनी आहेत. स्तंभदंडाचा खालील सुमारे तीन फूट भाग चौकोनी आहे. वरील भाग गोलाकार, षटकोन किंवा अष्टकोन अशा विविध भौमितिक आकारात आहे. स्तंभांवरील चौकोनी भागावर विविध नक्षी, कीर्तिमुख, मगरमुख, मयूरयुगल शिल्पे कोरलेली आहेत. स्तंभाच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. हस्तांवर तुळई व तुळईवर छत आहे. कणी, हस्त व तुळई नक्षीदार आहेत. हस्तांवर यक्षशिल्पे आहेत. त्यांनी वरील हातांनी छत तोलून धरले आहे, असे भासते. वितानावर चक्राकार नक्षी व मध्यभागी पाषाणी झुंबर आहे. सभामंडपात चार स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर काही इंच उंचीची गोलाकार रंगशिळा आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत.
पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर देवशिल्प आहे. स्तंभशाखांवर सज्जा व त्यावरील उत्तरांगावर शिखरशिल्पे आहेत. मंदारकास चंद्रशिळा आहे. येथील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचनाही अंतराळाच्या प्रवेशद्वारासारखीच आहे. गर्भगृहात वज्रपीठावर नृसिंह देवाची पद्मासन मुद्रेतील चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. मूर्तीस चांदीचे डोळे व मिशा लावलेल्या आहेत. डोक्यावर सोनेरी मुकुट आहे. मूर्तीच्या मागील प्रभावळीवर दोन्ही बाजूस स्तंभनक्षी आणि वरील बाजूला मकरतोरण आहे. तोरणावर शंख, चक्र, ध्वज व पद्म शिल्प आहेत. वज्रपीठ व मूर्ती काळ्या पाषाणात आहेत. वज्रपीठावर पुष्पनक्षी आहे. गर्भगृहात मागील भिंतीत चौकोनी व अरुंद खिडकीवजा द्वार आहे. त्या पलीकडील पोकळीवजा कक्षात देवाचे भक्त मायनदेव प्रभू यांची समाधी असल्याचे सांगितले जाते.
हे एकजंघा रचनेचे मंदिर सुमारे चार फूट उंच अधिष्ठानावर उभे आहे. अधिष्ठानात अधःपाद, कणी, पुष्पथर, उपान, कुंभ व मंची असे सहा थर आहेत. बाह्य भिंतींवर पर्ण, पुष्प व भौमितिक आकृत्यांचे थर आहेत. छतावर चहूबाजूंनी सज्जा आहे व तेथे पावसाचे पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी प्रणाले आहेत. गर्भगृहावरील चौकोनी शिखर निमुळत्या होत जाणाऱ्या पिरॅमिडसारख्या रचनेचे म्हणजे फांसना पद्धतीचे आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. मूळ मंदिरावरील शिखर प्राचीन असले तरी ते नंतरच्या काळात बांधले असल्याचे सांगितले जाते.
या मंदिरापासून जवळच खडक्या नृसिंह देवस्थान आहे. नृसिंह देव खडकात गुप्त झाले तो खडक व नृसिंह मूर्ती या ठिकाणी आहे. हे स्थान नदीपात्रात पाण्याखाली असते. एप्रिल व मे महिन्यात पाणी कमी झाल्यावर ते पाहता येते. येथून जवळच योग नृसिंह देवाचे अकराव्या शतकातील प्राचीन मंदिर आहे, मात्र ते पूर्णपणे दुर्लक्षित आहे. या मंदिराची रचना भोग नृसिंह मंदिरासारखी आहे. येथील देवाची मूर्ती योगासन मुद्रेत आहे. नदीपात्रातील डोहात आग्या नृसिंह स्थान आहे. ते पूर्णपणे पाण्याखाली आहे. हे स्थान कधीही पाण्याबाहेर येत नाही. आग्या नृसिंह पाण्याबाहेर आला तर जगावर संकट येऊ शकते, असे येथील गावकरी सांगतात. चक्रधर स्वामी मठ व संत बाळगीर महाराज जन्मस्थान येथून जवळ आहे.
मंदिरात नृसिंह जयंती हा मुख्य वार्षिक उत्सव भक्तिभावाने व उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी मंदिरात अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.