धाराशिव जिल्ह्याला इसवीसनपूर्व इतिहास आहे. येथील धाराशिव लेणी इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील आहेत व ती बुद्ध व जैन संस्कृतीचा समृद्ध वारसा आहेत. जिल्ह्यातील तेर येथे झालेल्या पुरातत्वीय उत्खननात मानवी संस्कृतीच्या पंधरा ते वीस हजार वर्षांपूर्वीच्या खुणा सापडल्या आहेत. येथील किल्ले व मंदिरे जिल्ह्याच्या संपन्न इतिहासाची साक्ष देतात. प्राचीन काळी जगाशी व्यापार करणारा हा संपन्न भूभाग होता. या जिल्ह्यातील कोंड गावचे प्राचीन व स्वयंभू भीमाशंकर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.
हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मूळ भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या गावी आहे. भीमा नदीचा उगम येथे असल्याने देवास भीमाशंकर नावाने ओळखले जाते. कोंड येथील मंदिराबाबत अख्यायिका अशी की या गावातील एक ग्रामस्थ देवाचा निस्सिम भक्त होता. तो वर्षातून एकदा देवाच्या दर्शनासाठी पायी भीमाशंकरला जात असे. पुढे वृद्धापकाळाने त्याला तेथे जाणे अशक्य होऊ लागले. तेव्हा देवाने आपणच तूझ्या गावी तूझ्या मागोमाग येवू, पण तू ज्या ठिकाणी थांबशील त्याच ठिकाणी स्थापीत होऊ, असे सांगितले. देवाच्या पुढे चालता चालता भक्त दमला व या ठिकाणी थांबला. त्याच वेळी देव शिवपिंडी रूपात येथे स्थापित झाला. अनेक प्रयत्न करूनही शिवपिंडी येथून हलवता न आल्याने गावकऱ्यांनी या ठिकाणीच देवाचे मंदिर बांधले.
पूर्वी गावाबाहेर असलेले हे मंदिर आता वस्ती वाढल्याने गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आलेले आहे. मंदिरास भक्कम आवारभिंत आहे. या भिंतीत मंदिराचे दुमजली प्रवेशद्वार आहे. रस्त्यापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारास पाच पायऱ्या आहेत. पाचव्या पायरीवर कासव शिल्प आहे. पायरीमार्गाच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आणि मंडारकावर व ललाटबिंबावर कीर्तिमुख आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा व आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष आहेत.
प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. नगारखान्यात जाण्यासाठी तटबंदीच्या भिंतीत पायरीशिळा आहेत.
मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात प्रवेशद्वारालगत विरगळ स्तंभ आहेत. पुढे तुलसी वृंदावन व पाषाणात बांधलेली प्राचीन गोलाकार विहीर आहे. या विहिरीतून भुयारी मार्ग गावातील नागोबा मंदिरापर्यंत जातो, असे सांगितले जाते. प्रांगणात स्थानिक देवतांची मंदिरे व नंदी शिल्पे आहेत. हेमाडपंती स्थापत्य शैलीतील या मंदिराची सभामंडप व गर्भगृह अशी संरचना आहे. सभामंडपात समोरील बाजूला चार स्तंभ व त्यावर तीन अर्धंचंद्राकार कमानी आहेत. मधल्या कमानीत प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोर सभामंडपात चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती व उत्सवकाळात वापरली जाणारी देवाची पालखी आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात मध्यभागी प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. प्रत्येक रांगेतील स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत. कमानीवर तुळई व तुळईवर छत आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहेत. सभामंडपात हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी वातायने आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. या अरुंद प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर चक्रनक्षी आहेत.
प्रवेशद्वाराच्या वर, वर्तुळात सहा पाकळ्यांच्या फुलाची अनोखी रचना आहे. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतींवर महिरपी नक्षी व महिरपाच्या वरील दोन्ही बाजूस चक्र नक्षी आहेत. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे व जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेकपात्र छताला टांगलेले आहे. मागील भिंतीलगत वज्रपिठावर पार्वतीची चतुर्भुज मूर्ती आहे. त्याशेजारी महादेवाचा पितळी मुखवटा व त्यावर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे. गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे द्वादशकोनी उंच व निमुळते शिखर आहे. शिखराच्या प्रत्येक थरात देवकोष्टके व त्यावरील आमलकावर कळस आहेत. शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील बाजूला भिमाशंकर गणेश मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरात गणेशाची काळ्या रंगातील सुंदर व मोठी मूर्ती आहे.
चैत्र अष्टमी हा देवाचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. आठव्या दिवशी देव पालखीत बसून ग्राम प्रदक्षिणेला जातात. पहाटे तीन वाजता सुरू होणारा हा पालखी सोहळा मशाली, काकडे, पणत्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघतो. ढोल ताशांच्या गजरात छत्र, चामर, पताका नाचवीत, टेंभे, काकडे, मशाली व पणत्या हातात धरून हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी मंदिरात विशेष उत्सव साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.