भीमाशंकर मंदिर

भिवघाट, नेलकरंजी, ता. आटपाडी, जि. सांगली

ऐतिहासिक मंदिरांना पौराणिक कथा किंवा आख्यायिका जोडल्या जातात, त्या प्राचीन ग्रंथातील स्थान किंवा नाम संदर्भामुळे. केवळ मौखिक परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका जनसामान्यात अधिक प्रचलित झालेल्या दिसतात. आपल्याकडे शिवमंदिराच्या संदर्भात अधिक आख्यायिका प्रचलित असलेल्या पाहावयास मिळतात. अभ्यासकांच्या मते या आख्यायिकांना धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्व असते. असेच एक आख्यायिका ऐतिहासिक संदर्भ असलेले प्रसिद्ध मंदिर आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावातील भिवघाट परिसरात आहे. तळापासून शिखरापर्यंत हेमाडपंती स्थापत्यशैलीतील मंदिराचे एकरेषीय बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे.

या मंदिराबाबत असे सांगितले जाते की हे मंदिर बाराव्या शतकात कलचुरी राजांनी बांधले असल्याचा शिलालेख येथे औंधच्या पंतप्रतिनिधींना सापडला होता तो त्यांनी औंधला नेला. कलचुरी राजवंश हा वाकाटकांनंतर सुमारे ५५०च्या सुमारास उदयास आला. त्यांचा मूळपुरूष कृष्णराज (कार्यकाळ.. सुमारे ५५० ते ५७५) हा होता. मध्य भारत, गुजरात, कोकण, विदर्भाप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रावरही त्याची सत्ता होती. कलचुरी वंशाचे राजे शिवोपासक होते. येथे आढळलेल्या त्यांच्या शिलालेखात पहिला श्लोक संस्कृतमधील पुढील लिखाण १२व्या शतकातील कन्नड भाषेत आहे. या शिलालेखात महादेवाची स्तुती आहे. या मंदिरास कलचुरी राजा सूर्यदेव याने नेलकरंजी गावातील जमिनी दान दिल्याचा उल्लेख आहे. या काळात सूर्यदेवाचा मुक्काम मंगळवेढ्यास होता, असाही उल्लेख त्यात आहे.

मौखिक आख्यायिकेनुसार येथील शिवलिंग पंडुपुत्र भीमाने स्थापन केले त्यामुळेच देवास भीमाशंकर नावाने ओळखले जाते. महर्षि व्यासरचित महाभारताच्या आदिपर्वात हिंडींब राक्षसाच्या वधाची कहाणी आहे. त्यानुसार वारणावतातील लाक्षागृहातून सुखरूप निघून पांडव मत्स्य, त्रिगर्त, पंचाल कीचक या जनपदांतून एकचक्रा नगरीकडे जात होते. तेव्हा वाटेतील निबिड अरण्यात भीमाने हिडींब असुराचा वध केला. भीमाशंकर मंदिराच्या स्थान माहात्म्य कथेनुसार ही घटना भिवघाट परिसरात घडली. तसेच भीम हिडींबा यांच्या घटोत्कच या मुलाचा जन्म येथेच झाला, असेही सांगण्यात येते

कराडआटपाडी रस्त्यावरील भिवघाटात रस्त्याच्या कडेला खाली जाणाऱ्या पायरी मार्गावर मंदिराची स्वागत कमान आहे. कमानीच्या दोन्ही बाजूंना दोन चौकोनी स्तंभ, त्यावरील आडव्या तुळईवरील दोन्ही बाजूंना आमलक त्यावर कळस आहेत. मध्यभागी बाशिंगातील देवकोष्टकात महादेवाचे उठावशिल्प आहे. येथून मंदिरापर्यंत येण्यासाठी सुमारे पन्नास पायऱ्या उतराव्या लागतात. या पायऱ्या घडीव दगडात बांधलेल्या आहेत. पायरी मार्गाच्या दोन्ही बाजूंस दाट झाडी आहे. दगडी आवारभिंत असलेल्या मंदिराच्या प्रांगणास पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. प्रांगणात तटबंदीजवळ भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. प्रांगणातील खुल्या मंडपात एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती मागील शिळेवर नागयुगूल शिल्प आहे. नागशिळेच्या मागे तुलसी वृंदावन आहे.

नव्याने बांधलेला मंडप त्यापुढे प्राचिन बंदिस्त स्वरूपाचा सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराच्या मंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभांवर तुळया तुळयांवर छत आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर पितळी कासव त्यापुढील चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. चौकोनी स्तंभपदाचा वरील भाग चौकोन, षट्कोन, अष्टकोन वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहे. स्तंभांच्या शीर्षभागी कणी त्यावर हस्त आहेत. सभामंडपात उजव्या बाजूस भिंतीवर शेषशाही विष्णूचे प्राचीन शिल्प आहे. यामध्ये विष्णूच्या डोक्यावर छत्र धरलेला पाच फणी नाग आहे पायाकडे बसलेल्या लक्ष्मीच्या मांडीवर विष्णूचा एक पाय आहे. विष्णूच्या बेंबीतून निघालेल्या कमळ फुलात ब्रम्हदेव आहे

सभामंडपात अंतराळजवळ डाव्या उजव्या बाजूला दोन देवकोष्टके आहेत. पुढे अरुंद अंतराळ त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात मध्यभागी शिवलिंग त्यावर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग आहे. मागील भिंतीवर लक्ष्मीचे चित्र आहे. छताला षटकोनी घुमट त्यात चक्राकार नक्षीकाम आणि मध्यभागी झुंबर आहे. गर्भगृहाच्या छतावर अकरा थरांचे चौकोनी शिखर आहे. शिखरात चारही भिंतीत देवकोष्टके आहेत. वरील थरात गोलाकार निमुळते घुमट त्यावरील आमलकावर कळस ध्वजपताका आहे. गर्भगृहाची जमिनीपासून काळसापर्यंत एकसंध रचना आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूला असलेल्या चौथऱ्यावर प्रवेशद्वारातून या मंदिराच्या शिखरात असलेल्या गुप्त कक्षात प्रवेश करता येतो

मंदिराच्या प्रांगणात भक्तनिवास आहे. मंदिराच्या समोर मारुतीचे लहान मंदिर आहे. मंदिरास तीन पायऱ्या आहेत. आत मारुतीची काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्ती आहे. छतावरील गोलाकार शिखराच्या खालील थरात कमळ फुलाची प्रतिकृती वर निमुळत्या होत गेलेल्या भागावर उभ्या धारेची नक्षी आहे. शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे. प्रांगणात संगमरवरी चौथऱ्यावर गणपती दत्तात्रेय यांच्या संगमरवरी मूर्ती असलेले संगमरवरी देव्हारे आहेत. मंदिराच्या मागील बाजूस तलाव आहे. भीमाशंकर मंदिरात महाशिवरात्र हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी पहाटे लघुरूद्र महाअभिषेकाने दिवसाची सुरुवात होते. दिवसभर भजन, कीर्तन, संगीत, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी नवस फेडण्यासाठी येतात. श्रावणातील दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. त्यावेळी या परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते

उपयुक्त माहिती

  • आटपाडीपासून ३१ किमी, तर सांगलीपासून ५९ किमी अंतरावर
  • आटपाडी सांगली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
Back To Home