धाराशिव जिल्ह्यातील वाशी हा अवघी ५४ महसुली गावे असलेला छोटासा तालुका आहे. येथील भुमी श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे, अशी मान्यता आहे. या भागातील अनेक मंदिरे प्रागैतिहासिक काळातील आहेत व त्यांचा संबंध थेट रामायण काळाशी असल्याचे प्रचलित आख्यायिका सांगतात. देवस्थाने अतिप्राचीन असली तरी ही मंदिरे मात्र यादव अथवा चालुक्य काळातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरांचे शुष्कसंधी बांधकाम, दगडांवरील कलाकुसर व स्थापत्य देशोदेशीच्या अभ्यासकांना आकर्षित करतात. अशाच प्राचीन मंदिरांपैकी एक भिमाशंकर महादेव मंदिर या तालुक्यातील खानापूर गावात आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिरातील स्तंभाची रचना पाहता ते चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. परंतु याबाबत निश्चित पुरावा उपलब्ध नाही. या मंदिराची अख्यायिका अशी की रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीराम सीतेच्या शोधात रानोमाळ भटकत असताना पार्वती मातेने सीतेचे रूप घेऊन श्रीरामाची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला. परंतू श्रीरामाने पार्वती मातेला तत्काळ ओळखल्याने पार्वती माता खजील होऊन या ठिकाणी थांबलेल्या महादेवाकडे परत आली व येथील तलावात सुवर्ण पाषाण रूपात स्थिरावली. त्यावेळी महादेव येथे भीमाशंकर रूपात ध्यानस्थ बसले होते. यामुळे या शिवपिंडीस भीमाशंकर म्हणून ओळखले जाते.
गावाजवळील निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात विपूल वृक्षराजी आहे. मंदिरासमोर कोरीव पाषाणात बांधलेला चौथरा व त्यावर प्राचीन गोलाकार दीपमाळ आहे. दीपमाळेसमोर तुलसी वृंदावन, नंदीची मूर्ती व विरगळ आहेत. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर व्यालशिल्पे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात समोरील बाजूस कठडा आहे व त्यात मध्यभागी प्रवेशद्वार आहे.
सभामंडप प्रांगणापेक्षा उंचावर असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर तीन पायऱ्या आहेत. मंडारकास चंद्रशिला आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. बाह्य बाजूचे स्तंभ कठड्यात व भिंतींत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत व ते स्तंभदंड चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ अशा विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी व त्यावर हस्त आहेत. प्रत्येक चार स्तंभांमधील वितान चौकोनात चौकोन अशा आकारात आहे. सभामंडपाच्या डाव्या व उजव्या भिंतीत प्रत्येकी तीन देवकोष्टके आहेत. सभामंडपात स्तंभ व भिंतींना तैलरंगाने लिंपन केले असल्याने त्यांवरील नक्षीकाम काहीसे पुसट झालेले आहे.
सभामंडपात अंतराळाच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला अंतराळाच्या दर्शनी भिंतीलगत चौथरे आहेत. डावीकडील चौथऱ्यावर पाषाण पादुका, उजवीकडील चौथऱ्यावर शिवपिंडी व प्राचीन शिल्पे आहेत. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात डाव्या व उजव्या बाजूला देवकोष्टके आहेत व त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. त्यावर जलधारा धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे.
मंदिराच्या प्रांगणात स्थानिक देवतांची लहान मंदिरे व नव्याने बांधलेली मंगल कार्यालयाची इमारत आहे. येथे विवाहविधी पार पाडले जातात. प्रांगणाला लागून लहान ओहोळ वाहत आहे. असे सांगितले जाते की या ओहोळाच्या तळाशी सोनेरी खडकाच्या रूपात पार्वती माता विराजमान आहे. मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी देवाचा लघूरूद्र अभिषेक करून दिवसाची सुरूवात होते. मंदिरात यावेळी भजन, किर्तन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात भाविकांची येथे दर्शनासाठी गर्दी असते.