मुंबईतील सुप्रसिद्ध शैव मंदिरांपैकी एक असलेले भवानी शंकराचे ऐतिहासिक मंदिर ग्रँट रोड भागातील गोवालिया तलावाजवळ स्थित आहे. हे मंदिर २२० वर्षे जुने आहे. ते मुंबईतील दैवज्ञ ब्राह्मण समाजाच्या सर्वांत जुन्या मंदिरांपैकी एक आहे. एकोणिसाव्या शतकातील मुंबईमधील एक सधन व्यापारी शंकरशेट मुर्कुटे यांनी या मंदिराची स्थापना केली. मुंबईच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळींचा आणि विविध लोककल्याणकारी सुविधांचा पाया घालणारे आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिवभक्त नाना शंकरशेट यांचे ते वडील होत. दख्खनी-मराठा वास्तुशैलीत उभारलेले हे मंदिर या परिसरातील असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे भवानी शंकराची यात्रा भरते.
‘दैवज्ञमित्र’ या नियतकालिकाचे माजी संपादक विनायकराव माधवराव पितळे यांनी ‘श्रीमंत नामदार जगन्नाथ शंकरशेट ऊर्फ नाना शंकरशेट यांचे चरित्र’ हे पुस्तक सन १९१६ मध्ये प्रसिद्ध केले. त्यातील माहितीनुसार, नाना शंकरशेट हे मूळचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबातील होते. या घराण्याच्या मूळपुरूषांपैकी नारायणशेट हे गुजरातेत पोरबंदर येथे मोत्यांचा व्यापार करीत असत. नारायणशेट यांचे चिरंजीव माणिकशेट यांच्याकडे मुरबाडची पोतदारी होती.
माणिकशेट यांचे पुत्र बाबुलशेट हे नानांचे आजोबा. पोर्तुगीजांच्या त्रासामुळे त्यांनी ठाण्यानजीकच्या घोडबंदर या तेव्हाच्या व्यापारास सोयीस्कर अशा बंदराच्या ठिकाणी स्थलांतर केले व तेथून ते व्यापार करू लागले.
बाबुलशेट हे शिवभक्त होते. मुरबाड येथे त्यांनी अमृतेश्वराचे मंदिर उभारले होते. घोडबंदर येथील आपल्या बंगल्यानजीकही त्यांनी शिवमंदिर स्थापन केले होते. शंकरशेट हे त्यांचे चिरंजीव. या पिता-पुत्राने पुढे व्यापारवृद्धीच्या दृष्टीने मुंबईस स्थलांतर केले. येथे त्यांनी एक पेढी स्थापन करून सराफीचा व्यवसाय सुरू केला. १७९९ मध्ये म्हैसूरच्या टिपू-इंग्रज युद्धात त्यांनी अमाप धन कमावले. त्या वेळी त्यांच्या तिजोरीत १६ लक्ष रुपये रोख व १ लाखाचे जवाहीर होते, अशी नोंद विनायकराव पितळे यांनी केली आहे. या शंकरशेट आणि त्यांची द्वितीय पत्नी भवानीबाई ऊर्फ ताईबाई यांच्या पोटी १० फेब्रुवारी १८०३ रोजी, महाशिवरात्रीच्या उत्तररात्री जगन्नाथ उर्फ नानांचा जन्म झाला. नानांच्या जन्मानंतर काही वर्षांतच भवानीबाई यांचा मृत्यू झाला. यानंतर १८०६ मध्ये शंकरशेट यांनी आपल्या या प्रिय पत्नीच्या स्मृत्यर्थ हे मंदिर बांधले. मुर्कुटे घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या शंकराच्या लिंगाची आणि देवी भवानीच्या मूर्तीची त्यात स्थापना करण्यात आली. त्याच वर्षी दत्तजयंतीच्या मुहूर्तावर या मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
या मंदिराच्या नावात नानांच्या पित्याचे आणि मातेचे नाव गुंफलेले आहे. विनायकराव पितळे लिखित चरित्रग्रंथातील माहितीनुसार, या मंदिराच्या बाजूला शंकरशेट यांनी एक धर्मशाळाही बांधली होती.
सन १८२२ मध्ये शंकरशेट यांचे निधन झाल्यानंतर त्या वेळी १९ वर्षांच्या असलेल्या नानांवर कुटुंबाची आणि व्यापार-उदिमाची मोठी जबाबदारी पडली. नानांनी ती उत्तमरीत्या पार पाडली. यानंतरच्या आपल्या ४३ वर्षांच्या कारकिर्दीत नाना शंकरशेट यांनी मुंबईत अनेकविध लोककल्याणकारी कार्ये केली. स्थानिक लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी येथे ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली. स्वतःच्या वाड्यात त्यांनी ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायन्टिफिक सोसायटी’ तसेच ‘जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा’ सुरू केली. मुंबईत विधी महाविद्यालयाचा पाया त्यांनी घातला. ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’, ‘जे जे स्कूल ऑफ आर्ट्स’, ‘प्रिन्स अल्बर्ट म्युझियम’ (भाऊ दाजी लाड संग्रहालय), राणीची बाग (जीजामाता उद्यान) यांच्या स्थापनेत त्यांचे योगदान होते.
स्त्रीशिक्षणास प्राधान्य, सतीप्रथेस, बालविवाहांस विरोध, याच बरोबर मुंबईतील आरोग्यव्यवस्था, पाणीव्यवस्था आणि रुग्णसेवा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव कामे केली. मुंबईत पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. या रेल्वेसाठी नानांनी १८४३ साली येथे ‘ग्रेट ईस्टर्न कंपनी’ची स्थापना केली होती. त्यांच्या अथक प्रयत्नांनी येथे रेल्वे आली, त्यामुळेच त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते. बोरीबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया रेल्वे टर्मिनस) इमारतीच्या मधल्या चौकातील दर्शनी भागावरील दगडी कोंदणात सर जमशेदजी जीजीभाई, लॉर्ड एल्फिन्स्टन, लॉर्ड रे, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, सर बार्टल फ्रियर यांच्याबरोबरच नाना शंकरशेट यांचा मुखवटा कोरलेला आहे.
नाना हे सुधारकी विचारांचे व धार्मिक वृत्तीचे होते. नाशिक येथे आपल्या पित्याचा श्राद्धविधी करण्यासाठी ते गेले असता, ते ब्राह्मणेतर असल्यामुळे त्यांना श्राद्धविधी शास्त्रोक्त व यथासांग करण्याचा अधिकार नाही असे सांगत तेथील पुरोहितांनी तेथे दंगा माजवला. त्यांनी नानांच्या पालखीवर दगडफेक केली. त्या वेळी नाशिकच्या कलेक्टरने पोलीस पथक आणि घोडेस्वार पाठवून त्यांचे संरक्षण केले. अशा घटनेनंतरही नानांच्या धर्मपरायणतेत खंड पडला नाही. ते शंकराचे निस्सीम उपासक होते. पुण्यातील आपल्या बंगल्याच्या आवारात त्यांनी मोठे शिवमंदिर बांधले होते. माथेरान, तसेच शहापूर येथेही त्यांनी शिवमंदिर उभारले होते. भुलेश्वर, वाळकेश्वर, घोडबंदर, वज्रेश्वरी, शहापूर येथे त्यांनी भाविकांसाठी धर्मशाळा बांधल्या होत्या. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर त्यांनी भवानी शंकर मंदिराच्या परिसराचे नूतनीकरण करून या परिसरात ‘अंजीरबाग’ नावाची बाग तयार केली. ही बाग पूर्वी अत्यंत विस्तीर्ण होती.f5 ती आजच्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकापासून भाटिया रुग्णालयापर्यंत पसरलेली होती,
असे सांगितले जाते. वाळकेश्वर, महालक्ष्मी आणि गिरगाव या आसपासच्या भागातील गरीब नागरिकांना वैद्यकीय उपचारांसाठी भायखळ्यापर्यंत जावे लागत असे. हे लक्षात घेऊन त्यांनी या मंदिराच्या संकुलात एक दवाखाना सुरू केला होता. नाना शंकरशेट यांनी या मंदिराचे नूतनीकरण केल्यामुळे ते त्यांनीच बांधले असा लोकसमज निर्माण झाला. १८६३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या गोविंद नारायण माडगावकर यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकातही, हे मंदिर “प्रख्यात श्रीमंत जगन्नाथजी शंकरशेट यांनी” बांधले असा उल्लेख आहे.
शंकरशेट यांनी उभारलेल्या या मंदिराची कालौघात रया गेली होती. मुंबईच्या वारसा वास्तूंच्या यादीतही त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मुंबईतील इतर ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच हे मंदिरही नष्ट होण्याचा धोका होता. हे लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे तत्कालीन संचालक डॉ. सदाशिव गोरक्षकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मंदिराची डागडुजी करून वास्तूला तिचे मूळ रूप मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि सन १९९७-९८ मध्ये या मंदिराचे संवर्धन कार्य सुरू करण्यात आले. गोव्यातील छत्रपती शिवरायांनी उभारलेले सप्तकोटेश्वर मंदिर, शांतादुर्गा मंदिर, मेणवलीतील नाना फडणवीसांचा वाडा, मुंबईतील बाणगंगा तलाव परिसरातील मंदिरे, तसेच मुंबईतील नरिमन रोडवरील एचएसबीसी बँकेची इमारत यांचे संवर्धन व जीर्णोद्धार ‘वास्तुविधान’ या कंपनीने केले होते.
याच कंपनीने भवानी शंकर मंदिराचे संवर्धन कार्यही केले. या प्रकल्पासाठी शंकरशेट कुटुंबाने निधी दिला होता. सन २००२ मध्ये झालेल्या या संवर्धन व जीर्णोद्धारानंतर मंदिरास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ग्रँट रोड येथील नाना चौकात विस्तीर्ण आवारात हे मंदिर वसले आहे. येथील आवारभिंतीस मोठा लोखंडी जाळ्यांचा दरवाजा आहे. समोर फरसबंदी केलेले प्रांगण आहे. प्रवेशद्वारानजीक आणि प्रांगणात ‘कैलासपती’चे उंच वृक्ष आहेत. या वृक्षाचे शास्त्रीय नाव ‘कोरौपिटा गियानेन्सिस’ असे आहे. हा मूळचा मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील वृक्ष सुमारे ३०० वर्षांपूर्वी आशियात आला. या वृक्षाला तोफेच्या गोळ्यांसारखी फळे येतात. त्यामुळे त्याला ‘कॅननबॉल ट्री’ किंवा ‘तोफगोळ्याचे झाड’ असेही म्हणतात. या झाडाची फुले अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. या मोठ्या फुलांची आतील रचना काहीशी शिवलिंगासारखी दिसते, तसेच त्यांच्या पाकळ्या नागफण्यासारख्या दिसतात. त्यामुळे या वृक्षाला ‘नागालिंगम’ किंवा ‘कैलासपती’ वृक्ष म्हटले जाते. शिवमंदिरांच्या आवारात हे वृक्ष आवर्जून लावले जातात.
मंदिराच्या आवारात अत्यंत कलात्मक अशा दोन दगडी दीपमाळा आहेत. समोरच दख्खनी-मराठा स्थापत्यशैलीतील मंदिर उभे आहे. कोकणी शैलीतील कौलारू छपरे, महाराष्ट्रीय पद्धतीची दगडी फरसबंदी, इस्लामिक वास्तुकलेतील जाळ्या अशा वास्तुकलेच्या विविध सांस्कृतिक शैलींचे मिश्रणही या मंदिराच्या रचनेत आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे आणि त्याला घुमटाकार शिखर आहे. छतावरील कठड्यावर गणेशाची मूर्ती विराजमान आहे. सभामंडपास तिन प्रवेशद्वारे आहेत. आतील भिंतींना कमानींचा आकार देण्यात आलेला आहे. सभामंडपाच्या घुमटाकार वितानावर काचेचे जुन्या पद्धतीचे झुंबर टांगलेले आहे. सभामंडपाच्या समोरच्या भागात दगडी चौथऱ्यावर नंदीची पाषाणात घडवलेली मूर्ती विराजमान आहे. अंतराळास मोठी महिरपी दगडी कमान आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडील सोनेरी देवकोष्टकात गणेशाची मूर्ती विराजमान आहे, तर उजवीकडील देवकोष्टकात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. गर्भगृहास सपाट पाषाणी द्वारचौकट आहे.
गर्भगृहाचे छत घुमटाकार आहे. भूतलावर शिवशंकराची पिंड विराजमान आहे आणि भिंतीवरील देव्हाऱ्यामध्ये भवानी मातेची मूर्ती आहे. संपूर्ण पाषाणात बांधलेल्या या गर्भगृहाच्या वर मराठा स्थापत्य शैलीतील कोरीव कामाने सुशोभित असे शिखर आहे.
या मंदिराच्या मागच्या बाजूस श्रीरामाचे मंदिर आहे. कृष्णराव रघुनाथजी नवलकर ऊर्फ के. रघुनाथजी यांच्या सन १८९५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ या पुस्तकानुसार, नाना शंकरशेट हे दैवज्ञ ब्राह्मण (सोनार) ज्ञातीतील होते. या ज्ञातीतील एका विशिष्ट वादामध्ये त्यांनी सामोपचाराने समेट घडवून आणला. त्या प्रीत्यर्थ त्यांनी या मंदिराची उभारणी केली होती. अलीकडे करण्यात आलेल्या जीर्णोद्धारानंतर या मंदिरास सध्याचे आधुनिक रूप प्राप्त झाले आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहावर काहीसे अष्टकोनी आकाराचे शिखर आहे आणि त्यावर त्रिस्तरीय कलश आहे. गर्भगृहामध्ये उंच वेदीवर श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या संगमरवरी व वस्त्रालंकारांनी शृंगारलेल्या मूर्ती विराजमान आहेत. या मंदिराच्या डाव्या बाजूला एका मोठ्या मंडपात नाना शंकरशेट यांचा अर्धपुतळा आहे.
या मंदिरात सकाळी ६ ते रात्री ८.३० या कालावधीत भाविक देवदर्शन घेऊ शकतात. या मंदिराला ‘भारतरत्न’ लता मंगेशकर, ‘बालगंधर्व’ यांसारख्या अनेक नामांकित व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. नानांचे वारसदार सुरेंद्र शंकरशेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांच्या गानकारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळात त्यांचे कुटुंबीय मंदिराशेजारील निवासस्थानी राहत असे. त्या वेळी लतादीदी संगीत स्टुडिओत जाण्यापूर्वी रोज या मंदिरात येत असत.
येथील मुख्य उत्सव महाशिवरात्र हा आहे. या दिवशी, तसेच श्रावणातील सोमवारी या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनास येतात. याशिवाय येथे रामनवमी, गोकुळाष्टमी, दत्तजयंती हे उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मार्गशीर्ष पौर्णिमा हा देवाच्या यात्रेचा दिवस आहे. पूर्वी या यात्रेचा मोठा थाट असे. विनायकराव माधवराव पितळे यांच्या नानांच्या चरित्रग्रंथात याबाबत अशी माहिती दिली आहे की, “नानांच्या वेळी या जत्रेचे महत्त्व फार मोठे होते. सर्व देवळाभर, त्याच्या आवारात, देवळालगतच्या धर्मशाळेच्या भव्य इमारतीभर आणि खुद्द नानांच्या राजविलासी बंगल्यावर दिव्यांची उत्कृष्ट रोषनाई केलेली असे. जिकडे तिकडे ध्वज आणि पताका लटकवलेल्या असत. ती जागा उत्तम प्रकारे शृंगारलेली असे. ती इतकी की पाहणाऱ्याचे डोळे दिपून जात. वरील जत्रेच्या प्रसंगी आमंत्रित मंडळींमध्ये नामदार गव्हर्नर साहेब, कौन्सिलचे सदस्य, हायकोर्टाचे जजेस, बाटलीवाले व शहरातील इतर प्रतिष्ठित लोकांचा समावेश असे. आमंत्रित मंडळी बैठकीच्या ठिकाणी जमा झाल्यावर त्यांच्या करमणुकीसाठी नृत्याचा कार्यक्रम होत असे. त्याचप्रमाणे गुलाब, हार आणि तुरे देऊन झाल्यावर मंडळी त्याच बंगल्याच्या वरील विस्तृत व शृंगारलेल्या गच्चीवर जात असत. तिकडला आरासही अप्रतिम असे. मंडळींना बसण्यासाठी मखमलीने व उंची साटनने मढवलेले कोच आणि खुर्च्या असत. मंडळी स्थानापन्न झाल्यावर बंगल्याच्या समोर नानांचीच एक मोठी विस्तृत बाग होती, तिला अंजीरबाग म्हणत. त्या बागेत नानातऱ्हेचे शोभेचे दारूकाम सुरू व्हायचे. ते अप्रतिम होत असे. या दारूकामाची मोठी ख्याती होती, असे म्हणतात. नंतर समारंभ बरखास्त होत असे.”