भवानी देवी मंदिर

भवानी मंडप, कोल्हापूर, ता. करवीर, जि. कोल्हापूर

भवानी देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी. ही देवी भक्तांचे संरक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करणारी शिवशक्तीरूप आहे. करवीरनगरीमध्ये ज्या प्रमाणे महालक्ष्मी-अंबाबाईचे स्थान आहे, त्याच प्रमाणे येथे भवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात छत्रपती घराण्याचे देवघर आहे व त्यास अंबा देवघर असे म्हटले जाते. कोल्हापूरच्या जुन्या राजवाड्यातील भवानी मंडप या भागात ते स्थित आहे. या देवघरात शिवरायांच्या हाताचे चांदीतील ठसे आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर असंख्य भाविक या मंदिरात भवानी मातेच्या दर्शनासाठी येत असतात.

महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तिपीठे आहेत. ‘देवीभागवता’च्या सातव्या स्कंधामधील अडतिसाव्या अध्यायात ‘कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मीः सदा स्थिता। मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम्। तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च।’ असे म्हटलेले आहे. यानुसार कोल्हापूर आणि माहूरप्रमाणेच तुळजापूर हे पूर्णपीठ आहे. तेथील भवानी देवी हे छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्यदेवता होती. ‘सभासदाची बखर’मध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा अफझलखान चालून आला तेव्हा महाराज प्रतापगडावर गेले. तेथे त्यांनी ‘मारितां मारितां जें होईल तें करूं. सला करणें नाहीं’ असा विचार केला. महाराजांना त्याच रात्री ‘श्रीभवानी तुळजापूरची इणें मूर्तिमंत दर्शन दिलें आणि बोलिली कीं आपण

प्रसन्न जाहालों. सर्वस्वें साह्य तुला आहे. तुझे हातें अफजलखान मारवितों.’ या बखरीत भवानी तलवारीचा उल्लेख नाही. मात्र भवानीचा आशीर्वाद मिळाल्यानंतर महाराजांनी स्वपराक्रमाने अफझलखानाचा वध केला. त्यानंतर महाराजांनी प्रतापगडावर इ.स. १६६१ मध्ये भवानी देवीची स्थापना केली. त्या उत्सवास महाराज स्वतः देवीचे भोपे बनले होते.

या भवानीमातेच्या ‘जय भवानी’ या जयघोषाचा कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजचिन्हात समावेश आहे. शाहू महाराजांची राजमुद्रा ‘श्री महादेव श्री श्री तुळजा भवानी। चांद्रीलेखेव वर्धिष्णुर्जनानंदप्रदायिनी। शाहू छत्रपतेर्मुद्रा शिव सूनोर्विराजते।।’ अशी आहे. त्यातही तुळजा भवानीचा उल्लेख आहे. कोल्हापूरमधील जुन्या राजवाड्यात आजही भवानी मातेची नित्यनेमाने पूजा केली जाते. हा जुना राजवाडा मराठा स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो. सुमारे २०० वर्षांपूर्वी तो बांधण्यात आला. करवीर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांच्या काळात १७७० च्या दशकात या राजवाड्याची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना राजवाडा या ऐतिहासिक वास्तूचा भवानी मंडप हा एक भाग आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कन्या राधाबाई ऊर्फ आक्कासाहेब महाराज यांचा ५ मार्च १९०८ रोजी विवाह झाला. त्या विवाहाप्रीत्यर्थ जुन्या राजवाड्याच्या समोर हा भवानी मंडप उभारण्यात आला. थोर चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिलेल्या ‘शाहू छत्रपती – ए रॉयल रिव्हॉल्युशनरी’ या इंग्रजी चरित्रग्रंथातही हा उल्लेख आहे. याच मंडपामध्ये छत्रपती घराण्याचे मंदिरासारखे मोठे देवघर आहे.

जुना राजवाडा परिसरात मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नगारखान्याची पाच मजली प्राचीन इमारत व सध्याचे राजाराम हायस्कूल या महत्त्वाच्या वास्तू आहेत. नगारखान्याच्या समोरच उंच गोलाकार व कोरीव काम केलेला पाषाणस्तंभ आहे. यास क्रीडा स्तंभ असे म्हणतात. कोल्हापूरची मान क्रीडा क्षेत्रात उंचावणाऱ्या क्रीडापटूंच्या स्मरणार्थ हा स्तंभ उभारण्यात आला आहे. यापुढे काही अंतरावर भवानी मंडपाची भव्य दुमजली वास्तू आहे.

मंडपाच्या बाहेरच्या बाजूस पत्र्याची भली मोठी व उंच अशी शेड बांधण्यात आली आहे. तेथे देवीचा रथ ठेवलेला आहे. मंडपाचे पूर्वेकडील मुख्य प्रवेशद्वार तीन मजली उंचीचे दगडी बांधणीचे आहे. तेथून आत येताच मध्यभागी मोठा चौक दिसतो व त्याच्या बाजूस प्रशस्त ओवऱ्या आहेत. चौकाचा भाग सोडून वरच्या मजल्यास गच्च्या आहेत. चौकात पाषाणाचे चौरसाकार स्तंभ, त्यावर सुरुदार लाकडी स्तंभ व त्यावर लाकडी कोरीव काम असलेली महिरप आहे.

समोरच अंबा देवघर म्हणजे भवानी मातेचे मंदिर आहे. देवघरात वज्रपीठावर तुळजा भवानीची मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या मागच्या बाजूस चांदीची कोरीवकाम केलेली महिरप आहे. मूर्तीच्या खालच्या बाजूस छत्रपती घराण्याच्या नित्यपूजेत असलेल्या गणपती, खंडोबा, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, शंकर-पार्वती व बालगणेश, तसेच रामपंचायतन, महिषासुरमर्दिनी, गणेश, बालगणेश, शंख, बाण यांच्या मूर्ती आहेत. त्याच प्रमाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचा चांदीचा मोठा ठसा (चांदीचा पंजा) आहे. सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाल्यानंतर तेथे चुन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या तळहाताची निशाणी घेण्यात आली होती. त्यावरून हा ठसा घेण्यात आला आहे. त्याचीही येथे नित्यपूजा होते.

देवघराच्या बाहेरच्या बाजूस डावीकडे छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती लाकडी पुतळा आहे. या ठिकाणी शाहू महाराजांनी शिकार केलेला व पेंढा भरून ठेवलेला गवा, बिबट्या आणि तसेच दोन हरणे पाहावयास मिळतात. या मंदिरात नवरात्रात अष्टमीच्या तसेच नगरप्रदक्षिणेच्या दिवशी करवीरनिवासिनी महालक्ष्मी-अंबाबाईची उत्सवमूर्ती पालखीतून येते.

उपयुक्त माहिती

  • कोल्हापूर रेल्वे स्थानकापासून ४ किमी अंतरावर
  • महाराष्ट्र व कर्नाटकमधील अनेक शहरांतून
  • कोल्हापूरसाठी थेट एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home