भावई देवस्थान

कुणकेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

भावई देवी हे श्रीदेवी भगवतीचेच एक रूप. सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथे भावई देवीचे मोठे मंदिर आहे. ही देवी नवसाला पावणारी असल्याची श्रद्धा असल्याने येथे दर्शनासाठी भाविकांची सतत वर्दळ असते. कोकणातील अनेक गावांमध्ये ‘भल्ली भल्ली भावय’च्या जल्लोषात भावई उत्सव साजरा होत असतो. कुणकेरी गावात होळीच्या निमित्ताने साजरा होणारा हुडोत्सव हा या गावाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. वैशिष्ट्यपूर्ण प्रथा-परंपरा जपणाऱ्या या हुडोत्सवास दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी उसळते. भावई देवीच्या मार्गशीर्ष कृष्ण दशमीस होणाऱ्या जत्रोत्सवातही हजारो भाविक सहभागी होत असतात.

कुणकेरीमध्ये सीमाभिंतीने बंदिस्त अशा आवारात देवी भावईचे मोठे मंदिर आहे. या जुन्या मंदिराचा काही वर्षांपूर्वीच जीर्णोद्धार करण्यात आला. प्रशस्त सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ, गर्भगृह आणि पिरॅमिडच्या आकाराचे शिखर अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिरासमोर एका ओट्यावर सहा स्तरीय व सुंदर रंगकाम केलेला दीपस्तंभ आहे व त्या शेजारी तुळशी वृंदावन आहे. समोरच सभामंडपाचे रुंद लाकडी प्रवेशद्वार आहे. मंदिराचा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यास प्रकाशासाठी खिडक्या आहेत. या मंडपातून बाहेर पडण्यासाठी पुढच्या बाजूला दोन्हीकडे दोन रुंद दरवाजे आहेत. दोन पायऱ्या उंचावर मंदिराचा उपसभामंडप आहे. तेथे भिंतीलगत कक्षासने आहेत. समोरच छोट्या आकाराचे अंतराळ आहे. तेथून गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाचे प्रवेशद्वार साधे लाकडी आहे. आत उंच वज्रपीठावर भावई देवीची काळ्या पाषाणातील बसलेल्या स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या

पाठटेकणीच्या शिळेवर खालच्या बाजूस सूरसुंदरींच्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याच्या वरच्या भागात दोन्ही बाजूंस शुंड उभारलेले दोन गजराज व शीर्षस्थानी व्यालप्रतिमा कोरलेली आहे. गर्भगृहात वज्रपीठाच्या बाजूला दोन पाषाणलिंगे, तसेच लोकदेवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिरासमोरच नागोजीवंस सावंत भोसले गणपतीचे मंदिर आहे.

दर वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण दशमीस भावई देवीची जत्रा असते. त्यावेळी हजारो भाविकांच्या गर्दीत, वाद्यांच्या गजरात देवीमातेची पालखी काढली जाते. कुणकेरीतील आणखी एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे हुडा उत्सव. होळीच्या या अत्यंत आगळ्यावेगळ्या अशा उत्सवासाठी कुणकेरी सर्वत्र ओळखली जाते. या हुडोत्सवास दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेस प्रारंभ होतो व सात दिवस तो विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. हुडा म्हणजे होळीचा खांब. हा खांब सुमारे १०० फूट उंचीचा असतो. त्यास सजवून, तसेच त्यावर ‘अवसार’ म्हणजे ज्यांच्या अंगात देवशक्तीचा संचार होतो, अशा व्यक्तीस चढता यावे यासाठी सोय केलेली असते. त्यास स्थानिक भाषेत हुडा असे म्हणतात. या हुड्यावर चढणारे अवसारी देव आणि त्यांच्यावर भाविकांनी केलेला दगडांचा मारा असे या उत्सवाचे मुख्य स्वरूप असते. ज्या कोणाचा दगड वर चढलेल्या अवसाराच लागेल, त्यास भविष्यात चांगले दिवस येतात, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

भावई देवीच्या या उत्सवात फाल्गुन पौर्णिमेस रात्री चव्हाट्यावर म्हणजेच हुड्याजवळ वाद्यांच्या गजरात होळी खेळली जाते. त्या दिवशी घटस्थापना केली जाते. तसेच गावाच्या मानकऱ्यांचे ढोल-ताशे चव्हाट्यावर आणले जातात. दुसऱ्या दिवशी सर्व ढोल भावई देवीच्या मंदिरात आणले जातात. तेथील धार्मिक कार्यक्रमांनंतर ते ढोल प्रत्येक वाडीतील प्रत्येक घराकडे नेले जातात. पौर्णिमेपासून चार दिवस हा कार्यक्रम चालतो. चौथ्या दिवशी हळदीचा व रंगपंचमीचा कार्यक्रम असतो.

पाचव्या दिवशी येथे खेळ्यांचे कार्यक्रम आणि रोंबाट हा कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण खेळ साजरा होता. यात राधेचे सोंग काढले जाते. सहाव्या दिवशीही देवीच्या मंदिरातून निशाणकाठीसह रोंबाट काढले जाते. यावेळी सोंगे काढली जातात. या सर्व कार्यक्रमांची विशिष्ट रीत ठरलेली असते. सातव्या दिवशी १०० फुटी हुड्यावर चढलेल्या संचारी अवसारांवर दगडफेकीचा कार्यक्रम होतो. तत्पूर्वी घोडे मोडणी, वाघाची शिकार आदी परंपरेप्रमाणे होत असलेले कार्यक्रम केले जातात. रोंबटात वाघाची लुटुपुटुची शिकार केली जाते. आंबेगावचा श्री देव क्षेत्रपाल हा भावई देवाचा मोठा बंधू, तर कोलगांवचा कलेश्वर हा लहान बंधू मानला जातो. हे देव आपल्या बहिणीच्या या उत्सवात तरंग, काठीसह सहभागी होतात. या उत्सवास चाकरमान्यांसह हजारो लोक उपस्थित असतात. याठिकाणी तसेच भावईच्या मंदिरात नवस करणे, नवस फेडणे, ओटी भरणे असे कार्यक्रम होतात.

उपयुक्त माहिती

  • सावंतवाडीपासून ७ किमी, तर ओरोसपासून ३४ किमी अंतरावर
  • सावंतपाडीपासून एसटी तसेच खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home