भार्गवराम मंदिर

आजगाव, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

आपल्या पराक्रमाने समुद्र मागे हटवून भृगुकच्छपासून (भरूच) केरळपर्यंतचा अपरान्त हा प्रदेश निर्माण करणाऱ्या परशुरामाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव मंदिर आजगाव येथे आहे. प्राचीन काळी आद्यग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाचे परशुराम हे श्रद्धास्थान आहे. परशुरामाचा जन्म हा भार्गव कुळात झालेला असल्यामुळे त्यास ‘भार्गवराम’ असेही संबोधले जाते. आजगावमध्ये भार्गवराम या नावाने परशुरामाची पूजा केली जाते. येथे त्यांचे कोकणी स्थापत्य शैलीत बांधलेले मंदिर आहे.

वायुपुराण तसेच मत्स्यपुराण यांनुसार परशुराम हा विष्णूचा एक अवतार आहे. तो वैदिक ऋषी होता. परशुरामास सप्तचिरंजीवांपैकी एक मानले जाते. याबाबतचा संस्कृत श्लोक असा आहे – ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तौते चिरंजीविनः।।’ या नुसार अश्वत्थामा, बळीराजा, महर्षि व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य व परशुराम हे सात चिरंजीव आहेत. पुराणे, तसेच रामायण व महाभारत या इतिहासग्रंथांतील माहितीनुसार, भृगुकुलात परशुरामाचा जन्म झाला. जमदग्नी ऋषी व इश्वाकू वंशातील एका राजाची कन्या रेणुका हे त्याचे माता-पिता होते. हरिवंशात अशी कथा आहे की कार्तवीर्य अर्जुन (किंवा हैहय वा सहस्त्रार्जुन) याने एकदा आपव वसिष्ठ नावाच्या ऋषींचा अपमान केला. त्यामुळे त्यांनी कार्तवीर्याला शाप दिला की तुला व उन्मत्त झालेल्या क्षत्रियांना मारण्यासाठी विष्णू अवतार घेईल. त्यानुसार नर्मदातीरी असलेल्या जमदग्नींच्या आश्रमात वैशाख शुद्ध तृतीयेला परशुरामाचा जन्म झाला. पुढे परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली. परशुरामाने आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार मातेचा शिरच्छेद केल्याची व नंतर पित्याकडे वर मागून मातेस जिवंत केल्याचीही पौराणिक कथा आहे.

महाभारतातील आदिपर्वातील कथेनुसार, क्षत्रियांच्या हत्येचे पातक दूर करण्यासाठी परशुरामाने यज्ञ केला होता. त्या यज्ञाचे प्रमुख ऋत्विज कश्यप हे होते. त्यांना यज्ञदक्षिणा म्हणून परशुरामाने पृथ्वीचे दान केले. त्यावर कश्यपाने त्याला सांगितले की ही सर्व भूमी आता माझ्या मालकीची आहे. तेव्हा तू आता दक्षिणेकडे जा. त्यानुसार परशुराम आर्यावर्ताचा त्याग केला. त्यानंतर त्याने आपल्या पराक्रमाने पश्चिम सागरास मागे हटवून अपरान्त हा प्रदेश निर्माण केला. त्यानंतर त्याने आपला परशू दक्षिणेकडे फेकला व त्यामुळे शूर्पारक प्रदेश (आजचे ठाणे जिल्ह्यातील सोपारा) निर्माण झाला. अशा प्रकारे परशुराम हा कोकणच्या वसाहतीचा निर्माता असून त्याला सप्तकोकणचा देव मानला जातो. येथे अनेक ठिकाणी परशुरामाची मंदिरे आहेत. त्यातील चिपळूणनजीक महेंद्रगिरीवरील परशुरामाचे मंदिर चालुक्य सम्राट पुलकेशी याच्या काळात इ.स. ५७० मध्ये बांधण्यात आले होते. महिंद्र पर्वतावर परशुरामांनी तपश्चर्या केली होती अशी कथा असल्याने या मंदिरास विशेष धार्मिक महत्त्व आहे. आजगाव (भोमवाडी) येथील भार्गवरामाचे मंदिर जुने आहे. काही वर्षांपूर्वी त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.

या मंदिरास मोठे आवार आहे व त्यास सीमाभिंत घातलेली आहे. आवारास उंच मोठी वेस आहे. वेशीच्या छतावर मध्यभागी परशुमाची हाती परशू घेतलेली, धनुष्य धारण केलेली सुंदर मूर्ती कोरण्यात आलेली आहे. प्रवेशद्वाराच्या रुंद स्तंभांवर दोन्ही बाजूंस हाती कमंडलू व जलपात्र घेतलेल्या सेविकांच्या उंच मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. प्रवेशद्वार व मंदिरास सुंदर रंगकाम केलेले आहे.

वेशीतून आत जाताच काही पावलांवर सहा स्तरीय गोल दीपस्तंभ आणि तुळशी वृंदावन आहे. उंच जोत्यावर मंदिर बांधलेले आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या दर्शनीभिंतीवर, प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस नमस्कार मुद्रेतील गरुडाची, तर डाव्या बाजूस हनुमानाची उंच उभी मूर्ती कोरलेली आहे. प्रवेशद्वार रुंद आणि दंडगोलाकार आहे. सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा व साधासा आहे. मंडपाचे छत आतून कोकणी शैलीप्रमाणे दोन्ही बाजूस उतरते आहे. येथे लाकडाची जाळीदार भिंत उभारून अंतराळ तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी देवाची लाकडी पालखी ठेवण्यात आलेली आहे. येथून गर्भगृहास प्रदक्षिणा मार्ग आहे.

गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर दंडगोलाकार प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस उंच दंडगोलाकार देवकोष्ठांत जय-विजय या वैष्णव द्वारपालांच्या मूर्ती आहेत. आत उंच वज्रपीठावर परशुरामाची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. सौम्य मुद्रा असलेली ही मूर्ती द्विभूज असून, एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात बाण आहे. मूर्तीच्या मस्तकी उंच मुकुट आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जटा व दाढी-मिशा विरहीत आहे. मूर्तीमागे चांदीची प्रभावळ आहे. या मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे, अन्य मंदिरात परशुरामासमवेत काळ आणि काम या देवतांच्या मूर्ती असतात. येथे मात्र एकट्या परशुरामाचीच मूर्ती आहे. या मंदिरात नैमित्तिक पूजा-अर्चेबरोबरच रामनवमीचा, तसेच वैशाख शुद्ध तृतीयेस परशुराम जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

उपयुक्त माहिती

  • सावंतवाडीपासून २४ किमी तर ओरोसपासून ५१ किमी अंतरावर
  • सावंडवाडी येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : दत्तात्रय पुराणिक, मो. ९४२२४३६१४७,
  • गुरुदत्त नातू, मो. ९४२१०१४०६५
Back To Home