एखाद्या गावाऐवजी त्याची छोटी वाडीच ख्यातनाम व्हावी याचे एक दुर्मिळ उदाहरण म्हणजे आंगणेवाडी. मालवण तालुक्यातील मसुरे या गावाच्या बारा वाड्यांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी आहे; परंतु आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या जत्रेमुळे आज हे गाव महाराष्ट्रात सुप्रसिद्ध झाले आहे. आंगणेवाडीची भराडीदेवी ही नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हे जागृत देवस्थान असल्याचे मानले जाते. दक्षिण कोकणची प्रतिभवानी म्हणून भराडीदेवीची ख्याती आहे. त्यामुळे मार्लेश्वर व कुणकेश्वर येथील यात्रेप्रमाणेच आंगणेवाडीची जत्रा अत्यंत लोकप्रिय झाली आहे.
कोकणचे पंढरपूर अशीही ओळख असलेल्या या देवस्थानाविषयी वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. त्यातील एक आख्यायिका अशी की भरड माळरानावर ही देवी प्रकटली, म्हणून तिला भराडीदेवी असे म्हणतात. काही जणांच्या मते भरड माळावर तांदळाच्या वड्यातून देवी प्रकटली म्हणून तिला भराडीदेवी नाव पडले. या आख्यायिकेमुळे येथील ग्रामस्थ देवीच्या जत्रेत प्रसाद म्हणून तांदळाचे वडे वाटतात. मात्र त्याबाबतचे पथ्य असे की हे वडे येथेच संपवावे लागतात. यामागे गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की देवी त्या वड्याच्या माध्यमातून प्रकट झाली होती. ती परत बाहेर जाऊ नये म्हणून वडे येथेच संपवले जातात. ते बाहेर नेले जात नाहीत.
याबाबत आणखी एक आख्यायिका अशी की पहिल्या बाजीरावाचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या सेवेत आंगणेवाडी येथील एक व्यक्ती होती. काहींच्या मते, तो वीर पुरुष होता, तर काहींच्या मते तो चिमाजी आप्पा यांचा जासूस होता. त्याच्याकडे एक दुभती गाय होती. ती रोज सायंकाळी राईत एका विशिष्ट स्थानी जाऊन पान्हा सोडत असे.
हे त्याच्या लक्षात आले. त्याने सर्व गावकऱ्यांना याबाबत माहिती देऊन ती राई साफसूफ करून घेतली. तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक स्वयंभू पाषाण सापडला. हीच ती भराडीदेवी असे म्हटले जाते. चिमाजी आप्पा यांच्या जन्मसालाचा तपशील अज्ञात आहे. मात्र पहिल्या बाजीरावाचा जन्म १७०० साली झाला. त्यांच्यानंतर चिमाजी आप्पा जन्मले व त्यांचा मृत्यू १७ डिसेंबर १७४० रोजी झाला. सदर आख्यायिकेनुसार त्यांच्या पदरी असलेल्या व्यक्तीस भराडीदेवीचा स्वयंभू पाषाण आढळला. हे पाहता भराडीदेवीच्या स्थानास सुमारे ३०० वर्षांचा इतिहास आहे. असे सांगितले जाते की चिमाजी आप्पा यांनाही एका मोहिमेवर जाताना या देवीची प्रचीती आली होती. त्यामुळे त्यांनी या देवस्थानास बावीस हजार एकर जमीन दान दिली होती.
या ठिकाणी पूर्वी जुने कोकणी पद्धतीचे कौलारू मंदिर होते. अलीकडे येथे प्रशस्त आवारात अत्यंत भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. आंगणेवाडीतील आंगणे कुटुंबीयांचे हे खासगी देवालय आहे. या मंदिराच्या बांधकामात जैन व भूमीज मंदिर स्थापत्यशैलीचा वापर करण्यात आला आहे. हे मंदिर दुमजली आहे. अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी त्याची साधारण संरचना आहे. मंदिराच्या अर्धमंडपावर व महामंडपावर स्तूपासारखी वा गजपृष्ठाकार शिखरे आहेत. यातील अर्धमंडपावरील शिखर आकाराने लहान आहे. या शिखरांवर बसक्या स्वरूपाचे आमलक आहेत. गर्भगृहावरील शिखर उंच व नागर स्थापत्यशैलीतील अर्धोध्वर पद्धतीचे आहे. अर्धोध्वर म्हणजे वरपर्यंत सरळ; परंतु शीर्षस्थानी आमलकाच्या खाली अचानक आतील बाजूस वळलेले शिखर. या शिखरावर चारही बाजूंनी मोठी देवकोष्ठके व त्यावर शिखराची प्रतिकृती आहे. या देवकोष्ठकांमध्ये देवतांच्या मूर्ती प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. गर्भगृहाच्या छताच्या चारही कोपऱ्यांत मुख्य शिखराच्या लहान प्रतिकृती आहेत.
पूर्णतः पांढऱ्या संगमरवरी पाषाणाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भव्यता आणि त्याचे स्तंभ,
कमानी व अन्य भागांवर केलेले अप्रतिम बारीक कोरीवकाम. मंदिराच्या गर्भगृहात काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. जत्रोत्सवात देवीच्या पारंपरिक मूर्तीचे पूजन केले जाते.
मंदिराच्या मागच्या बाजूला दीपमाळ आणि तेथेच मंदिराच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आहे. तुळशी वृंदावनावरही कोरीव काम केलेले दिसते. मंदिराला सर्व बाजूंनी पांढऱ्या संगमरवरी फरशांची आवारभिंत आहे. या भिंतीस अनेक छोटी गवाक्षे आहेत. आवारात मोठे वृक्ष आहेत. त्यांना पार बांधण्यात आले आहेत. या प्रशस्त आवारात उत्सवाच्यावेळी मोठा मंडप बांधला जातो.
या देवीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे येथील जत्रा. ती फेब्रुवारीत भरते. देवांच्या इतर जत्रांप्रमाणे ठरलेल्या विशिष्ट तिथीला ही यात्रा होत नाही, तर देवीला कौल लावून तो दिवस निश्चित केला जातो. देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळमांजरी हा कार्यक्रम होतो.
त्यात सारे मानकरी गावकरी मिळून पारध करण्याचा दिवस ठरवतात. पारध डुकराची करण्यात येते. त्यात गटागटाने सारे गावकरी सहभागी होतात. ज्या लोकांकडून पारध केली जाते त्यांना सुवासिनी ओवाळतात. मंदिरात पुन्हा येऊन त्या डुकराचे मांस वाटण्यात येते. त्या दिवसानंतर तिसऱ्या दिवशी देवीला कौल लावण्यात येतो. पंचांग समोर ठेवण्यात येते. देवी ठरवील तो दिवस जत्रेचा निश्चित केला जातो. या तारखेकडे सर्व भाविकांचे लक्ष लागून राहते.
कोकणासह मुंबई, कर्नाटक, गोवा या राज्यांतूनही भाविक येथे येतात. पूर्वी येथे ‘देवी माझी नवसाची’ असे प्रेमाने म्हटले जाणाऱ्या देवीची छोटी यात्रा भरत असे. या यात्रेस मुंबईतील मालवणी चाकरमानी आवर्जून उपस्थित राहात असत. साधारणतः नव्वदच्या दशकात या यात्रेचे आकर्षण वाढले. वर्षानुवर्ष या जत्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढतच जात आहे. पूर्वी २०-२५ हजार भाविकांच्या उपस्थितीत भरणाऱ्या या यात्रेस हल्ली लाखो लोक येतात. त्यात सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच राजकीय नेते व सेलेब्रिटी यांचा समावेश असतो.
येथे जत्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. गावातल्या प्रत्येक घरातील सुवासिनी मौन व्रत ठेवून देवीसाठी नैवेद्य करतात. डाळ, भात, भाजी, वडे असा बेत असतो. रात्री रांगेत सर्व दाम्पत्ये येतात. देवीला जोडीने नैवेद्य दाखवला जातो. यानंतर येथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद मिळण्याची व्यवस्था करण्यात येते. आंगणेवाडीचे वैशिष्ट्य हे की येथे कोणत्याही घरात जाऊन भाविक प्रसाद ग्रहण करू शकतात. दोन दिवसांच्या या जत्रेत भजन, कीर्तन, दशावतार असे कार्य़क्रम होतात. या ठिकाणी जत्रेव्यतिरिक्त अन्य वेळीही नवस फेडण्यासाठी गर्दी होत असते. अनेक कुटुंबीयांची भराडीदेवी ही कुलदेवता आहे.