कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका म्हणजे पूर्वीचे कागल संस्थान. इ.स. १५७२ साली विजापूरचा सुलतान मुहम्मद बादशाहकडून पिराजी राजे घाटगे यांना ७० गावे असलेले हे संस्थान इनाम मिळाले होते. तालुक्यातून वाहणाऱ्या दूधगंगा नदीमुळे हा भाग सुजलाम् सुफलाम् आहे. कृषी व दुग्ध उत्पादनात तालुक्याचे नावकौकिक आहे. तालुक्यातील जास्त दूध संकलन करणारी दूध उत्पादन सहकारी संस्था साके गावात आहे. साके गावातील ग्रामदैवत भैरवनाथाचे जागृत स्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवालयातील गोमुखातून अखंड प्रवाहित असलेले पाणी, हे येथील वैशिष्ट्य आहे.
या मंदिराबाबत आख्यायिका अशी की गावाजवळील डोंगराच्या कड्यावर भैरवनाथाचे स्थान होते; परंतु डोंगराची वाट बिकट असल्यामुळे अनेक भाविकांना इच्छा असूनही तेथे दर्शनासाठी जाणे शक्य होत नसे. तेव्हा भैरवनाथ डोंगराच्या मध्यापर्यंत आले. मात्र हे ठिकाण भक्तांना कळून आले नाही. एके दिवशी एक गाय या ठिकाणी पान्हा सोडत असताना गवळ्याने पाहिले. कुतूहलापोटी त्याने या जागेवरील पालापाचोळा दूर सारून पाहिले. तेव्हा त्याला तेथे देवाची पिंडी दिसली. ही गोष्ट त्याने गावकऱ्यांना सांगितली, तेव्हा सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधले. देवाचा कौल घेऊन पुजारी म्हणून गावातील गोसावी गिरी यांची नेमणूक करण्यात आली व तेव्हापासून आजपर्यंत गिरी कुटुंबीयांच्या अनेक पिढ्या देवाच्या सेवेत आहेत.
डोंगराच्या कुशीत वसलेल्या या देवालयाची स्वागत कमान पायथ्याला सुरू होणाऱ्या पायऱ्यांशी आहे. येथून सुमारे ५० पायऱ्या चढून मंदिरापर्यंत पोहोचता येते. पायऱ्या चढून जाताना दोन्ही बाजूस असलेल्या गर्द हिरव्या झाडीमुळे गारवा जाणवतो. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक धबधब्यांचे दर्शन होते. पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या मंदिराच्या प्रांगणात एका चौथऱ्यावर भैरवनाथांच्या घोड्याची पितळी मूर्ती आहे. गावाच्या संरक्षणासाठी भैरवनाथ घोड्यावर रपेट मारतात, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे.
मंदिरासमोर भिंती नसलेल्या कौलारू छपराखाली यज्ञकुंड आहे. वार्षिक उत्सव व इतर विधींच्या वेळी हे यज्ञकुंड धगधगत असते. त्यामागे चौथऱ्यावर वर निमुळती होत गेलेली गोलाकार दीपमाळा आहे. दीपमाळेच्या बाजूला भैरवनाथाचे भक्त यमाजी बुवा गिरी गोसावी यांची संजीवन समाधी व इतर स्थानिक देवतांचे पाषाण आहेत. यज्ञकुंडाच्या पुढे मंदिराच्या सभागृहासमोर दोन लहान दीपमाळा आहेत. दीपमाळेच्या खालच्या भागात दीप प्रज्वलन करण्यासाठी हस्त आहेत व वरच्या भागात कमळाची नक्षी कोरलेला चौकोन आहे. दीपमाळेचा प्रत्येक थर अखंड पाषाणातील असून ही रचना वेगळी भासते. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. जमिनीपासून उंच असलेल्या मंदिराच्या मुखमंडपात जाण्यासाठी पाच पायऱ्या चढाव्या लागतात. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे व त्यातील सर्व स्तंभ एकमेकांशी कमानीने जोडलेले आहेत. गर्भगृहातील मखरात वज्रपीठावर भैरवनाथ व त्यांच्या शक्तींच्या पिंडी आहेत. या पिंडींच्यामागे भैरवनाथाची अश्वारूढ पितळी द्विभूज उत्सव मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात त्रिशूल व पाश आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस दोन पितळी अश्व असून मागील पितळी प्रभावळीवर दोन्ही बाजूंस गजराज आहेत.
मंदिराच्या डावीकडील बाजूस गोमुख आहे व यातून अखंड पाण्याचा प्रवाह वाहत असतो. या गोमुखाच्या बाजूला जोगाई देवीचा पाषाण आहे. मंदिरात महाशिवरात्री, चैत्र पाडवा, नवरात्री, दसरा, दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा आदी उत्सव साजरे केले जातात. माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी व सोमवारी येथे मोठी यात्रा (माही) असते. कागल तालुक्यातील ही मोठी यात्रा समजली जाते. या वेळी हजारो भाविक भैरवनाथाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी उपस्थित असतात. दसरा व जत्रोत्सवाच्या वेळी भैरवनाथ पालखीत बसून ग्राम प्रदक्षिणा करतात. गर्द वनराई व निसर्गसमृद्ध परिसरात स्थित असलेल्या या ठिकाणी भाविकांसोबतच अनेक पर्यटकही येत असतात.