कोळगिरी हे गाव ज्या जत तालुक्यात येते तो भाग पौराणिक आख्यायिकांनुसार रामायण काळातील दंडकारण्याचा भाग होता. या गावात वाल्या कोळी राहात असे व त्याने ध्यानसाधना केलेली गुंफा कोळगिरी येथील डोंगरात असल्याची कथा सांगण्यात येते. अशा या पुराणप्रसिद्ध गावाची भैरवनाथ ही ग्रामदेवता आहे. भैरव याचा एक अर्थ भयापासून रक्षण करणारा असाही असल्याचे सांगण्यात येते. यामुळेच हा संरक्षक देव अनेक गावांची ग्रामदेवता म्हणून प्रतिष्ठापित असतो. कोळगिरीमध्ये या भैरवनाथाचे सुमारे ९०० वर्षे प्राचीन मंदिर आहे.
‘शिवपुराणा’च्या आठव्या अध्यायात भैरव अवताराची कथा सांगण्यात आली आहे. ती अशी की सुमेरू पर्वतावर ध्यानमग्न असलेल्या ब्रह्मदेवाकडे एकदा सर्व देवता गेल्या. त्यांनी त्याला सृष्टीनिर्मितीचे रहस्य काय, तसेच या सृष्टीतील अविनाशी तत्त्व कोणते असा प्रश्न केला. त्यावर ब्रह्मदेव स्वतःची प्रशंसा करू लागला व मीच ही सृष्टी उत्पन्न केली असे सांगू लागला. ते ऐकून विष्णूस वाईट वाटले. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. तेव्हा त्यांनी वेदांची साक्ष काढली. वेदांनी शिव हेच परमतत्त्व असल्याचे सांगितले. परंतु ते ऐकण्यास दोन्ही देव तयार नव्हते. त्यांचा वाद सुरू असताना अचानक ब्रह्मदेवाने शंकराबाबत अपमानास्पद टिप्पणी केली. ते ऐकून शंकरास क्रोध आला आणि त्या क्रोधातून एक पुरूष निर्माण झाला. त्याचेच नाव भैरव.
त्याला पाहून शंकर म्हणाले की ‘हे कालराज, तू साक्षात काळासमान आहेस. म्हणून आजपासून तू कालभैरव या नावाने ओळखला जाशील.’ त्यांनी या काळभैरवाला ब्रह्मदेवास शासन करण्याची आज्ञा दिली व त्यानुसार काळभैरवाने आपल्या डाव्या हाताच्या करंगळीने ब्रह्मदेवाचे पाचवे मुख कापून टाकले. जेथे काळभैरवाने हे कृत्य केले त्या ठिकाणास कपालमोचन तीर्थ म्हणतात. ते मुख काळभैरवाच्या हातालाच चिकटून राहिले. तो काशीत गेल्यानंतर तेथे ते गळून पडले. त्यामुळे काशीस पापनाशिनी असे मानतात, असेही शिवपुराणात म्हटले आहे. याच भैरवाची अनेक मंदिरे गावोगावी आहेत.
भैरवनाथाचे येथील मंदिर शुष्कसांधी शैलीत बांधलेले आहे. यादव सम्राट रामदेवरायांचे श्रीकरणाधिर म्हणजे मुख्य प्रधान हेमाद्री सोडवीकार ऊर्फ हेमाडीपंत यांनी या शैलीतील अनेक मंदिरे बांधली असल्याने, ही शैली आता हेमाडपंती या नावाने ओळखली जाते. मात्र त्यांच्यापूर्वीही या शैलीत बांधकामे झालेली मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. कोळगिरी येथील भैरवनाथ मंदिर हे त्यातीलच एक आहे. या मंदिरातील कन्नड भाषेतील शिलालेखावरून ते अकराव्या शतकात, कल्याणच्या चालुक्यांच्या काळात बांधण्यात आले, असे सांगण्यात येते. या काळात कुंतल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सातारा, सोलापूर व सांगलीमध्ये विक्रमादित्य सहावा, तसेच त्याचा पुत्र सोमेश्वर तिसरा ऊर्फ आहवमल्ल यांची सत्ता होती. याच सोमेश्वराच्या काळात इ.स. ११३४ मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली. पुढे चालुक्यांचा मांडलिक असलेला मंगळवेढ्याचा राजा बिज्जल याने बंड करून कल्याणच्या चालुक्यांची सत्ता हस्तगत केली. तो स्वतःस कलचुरी वंशाचा म्हणवून घेत असे. या कलचुरी राजांच्या काळात, यादवांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मात्र त्याच्या मूळ रचनेत फारसा बदल करण्यात आला नाही. पुढे १९८० मध्ये मंदिराच्या छताची डागडुजी करण्यात आली. त्यावेळी त्यावर शिखर बांधून कलशारोहण करण्यात आले. यामुळे मूळचे मंदिर व शिखर यांच्या स्थापत्यशैलीत मोठा फरक आढळतो.
मंदिराच्या प्रांगणाचा भवताल वनराईने नटलेला आहे. रस्त्यापासून उंच असलेल्या प्रांगणाच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस सुरक्षा कठडे आहेत. विस्तीर्ण प्रांगणात ठिकठिकाणी चिंचेची मोठी झाडे व त्याखाली भाविकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था आहे. मंदिरासभोवती पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. सभामंडप, अंतराळ व तीन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. अर्धखुल्या पद्धतीच्या सभामंडपास बाह्य बाजूस कठडा व त्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासनांची व्यवस्था आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. अधिक रुंद व चौकोनी स्तंभपादावर उभे असलेले स्तंभ वरच्या बाजूस गोलाकार, चौकोनी, षट्कोनी व अष्टकोनी अशा विविध भौमितिक आकारात आहेत. स्तंभांवर चौकोनी कणी, त्यावर नक्षीदार हस्त आहेत, हस्तांवर तुळई व त्यावर छत आहे. सभामंडपातील देवकोष्टकांत प्राचीन मूर्ती आहेत.
सभामंडपात उजव्या बाजूस जोगेश्वरी देवीच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर अस्पष्ट शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या स्तंभांवरील तुळईवर तोरण नक्षी आहे. मंडारकावर पानाफुलांची नक्षी आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस असलेल्या उभ्या शिळांवर नागशिल्प आहेत. गर्भगृहातील जमिनीवर जोगेश्वरी देवीची पाषाणपिंडी आहे. जोगेश्वरी देवीच्या गर्भगृहाच्या दुसऱ्या बाजूला पुढे दुसरे अंतराळ व त्यापुढे दुसऱ्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. ललाट पट्टीवरील तोरणात तीन शिखरे व दोन व्यालशिल्पे आहेत. मंडारकावर चंद्रशीला व त्यावर कीर्तीमुख आहे. गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी व त्यावर छत्र धरलेला पितळी नाग व जलधार धरलेले अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे.
पुढे मंदिराचे मुख्य अंतराळ आहे. बंदिस्त स्वरूपाच्या अंतराळात उजव्या आणि डाव्या बाजूला प्रवेशद्वारे आहेत. या प्रवेशद्वारांच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ व त्यावर सज्जा आहे. सज्जावरील पट्टीवर दोन व्यालशिल्पे व तीन ठिकाणी शिखरनक्षी आहेत. प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूस यक्षशिल्पे आहेत. मंडारकास चंद्रशीला व त्यावर कीर्तिमुख आहे. अंतराळातील भिंतीलगत सुमारे पाच फूट उंच कन्नड लिपीतील शिलालेख आहे. अंतराळाच्या पुढे भैरवनाथाचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर नक्षीकाम व ललाटबिंबावर गणेश शिल्प आहे. ललाटबिंबाच्या वरील तोरणावर तीन शिखरे व दोन व्याल आहेत. मंडारकाला चंद्रशिला आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर भैरवनाथ देवाची काळ्या पाषाणातील उभी मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील पाठ शिळेवर चक्रनक्षी व मूर्तीसमोर त्रिशूल आहे.
मंदिराच्या छतावर चहुबाजूने कठडा आहे. अंतराळाच्या छतावर चारही कोनांवर सिंहशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या छतावर अलीकडील काळात बांधलेले पाच थरांचे उंच शिखर आहे. शिखराच्या पहिल्या चौकोनी थरात चारही भिंतींवर गजराज, कीर्तिमुख व नंदीच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या अष्टकोनी थरात आठ देवकोष्टके व त्यात विविध देवता व ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत. त्यावरील थरात कमळदल नक्षिंची पाच रिंगणे आहेत. त्यावरील दोन थरात उभ्या धारेची नक्षी आहे. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिराबाहेर प्रांगणात अनेक वीरगळ शिल्पे आहेत. यात घोडेस्वार, गजारुढ युद्ध प्रसंग तसेच हिंस्र प्राण्यांशी झालेले संघर्ष शिल्पांकित केलेले आहेत. प्राण्यांशी युद्ध प्रसंग असलेले हे वीरगळ दुर्मिळ समजले जातात. प्रांगणात तसेच मंदिर परिसरात अनेक ठिकाणी भग्न, जीर्ण मूर्ती व शिवपिंडी आहेत.
या मंदिराच्या परिसरात कुस्तीचे मैदान आहे. यात्रेच्या व इतर उत्सवांचे वेळी येथील कुस्तीच्या आखाड्यात स्पर्धा आयोजित केल्या जातात. मंदिरात श्रावणातील तिसऱ्या सोमवारी वार्षिक उत्सव साजरा केला जातो. रविवारी मंदिरास फुलांनी व रोषणाईची सजावट करून यात्रेस सुरवात होते. दोन दिवस भजन, कीर्तन, जागरण, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवारी दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप केले जाते. वार्षिक उत्सवांचे वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काळभैरवाची आरती कन्नड भाषेतून गायली जाते. तिचा थोडक्यात अर्थ असा की ‘देवा तुम्ही येथे मालक म्हणून आला आहात. तुम्ही काशीखंडाचे मालक आहात. तुम्ही येथे युगानुयुगे आहात. हे कोळगिरीसिद्धा, तू असुरांचा संहार केलेला आहेस. तू स्वयंभू आहेस. तुझ्या आरतीसाठी देव–सूरवर आले आहेत.’