भुदरगड किल्ल्यावरून कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे भुदरगड हे नाव पडले आहे. शिलाहार वंशातील शेवटचा राजा दुसरा भोज याने बांधलेल्या या किल्ल्याने अनेक राजवटी व स्थित्यंतरे पाहिली. या किल्ल्यावरील दुधाळ रंगाचे पाणी असलेला दूधसागर तलाव तसेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भैरवनाथाचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे. हा देव नवसाला पावणारा आणि हाकेला धावून येणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. माघ कृष्ण प्रतिपदेला भैरवनाथाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. या उत्सवासाठी शिवप्रेमींसह हजारो भाविकांची येथे उपस्थिती असते. शेकडो वर्षांपासून उत्सवाची ही परंपरा आजही कायम आहे.
भुदरगड हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून तो ३१९० फूट उंचावर आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, शिलाहार राजा दुसरा भोज याच्या कार्यकाळात (इ.स. ११७५ ते १२१२) तो बांधण्यात आला. नंतर विजापूरच्या आदिलशहाने तो जिंकला. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याची पकड घट्ट करण्यासाठी दक्षिणेकडील किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये भुदरगडाचाही समावेश होता. इ.स. १६६७ मध्ये शिवरायांनी या किल्ल्याची दुरुस्ती करून प्रबळ ठाणे बनवण्याचा प्रयत्न केला; परंतु अल्पावधीतच मोगलांनी हा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. पाच वर्षांनी पुन्हा मराठ्यांनी भुदरगडवर हल्ला चढवून हा किल्ला ताब्यात घेतला.
राजाराम महाराजांनी जिंजीहून परतताना या किल्ल्यावर काही दिवस मुक्काम केला होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज स्वराज्यात परत आल्यानंतर सातारा व कोल्हापूर अशी दोन राज्ये निर्माण झाली. कोल्हापूरच्या किंवा करवीरच्या छत्रपतींनी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करल्यानंतर इंग्रजांच्या जाचक कारभाराला कंटाळून करवीर संस्थानातील गडकऱ्यांनी इ.स.१८४४ मध्ये बंड केले. त्यावेळी भुदरगडाचे गडकरीही त्यात सामील झाले होते. ब्रिटिशांनी भुदरगडावर आक्रमण करून किल्ला जिंकून घेतला होता. या किल्ल्यावर भैरवनाथाच्या मुख्य मंदिराशिवाय इतर चार मंदिरे आहेत. याशिवाय काही वाड्यांचे अवशेष, गुप्त भुयार किंवा चोर दरवाजा, दोन तलाव व काही कबरी आहेत. यातील एका तलावातील पाणी त्यातील पांढऱ्या वाळूमुळे पांढरेशुभ्र दिसते. त्यामुळे त्याला दूधसागर तलाव म्हणतात. हा संपूर्ण किल्ला व त्यातील बहुतांशी बांधकामे जांभा दगड व चुना वापरून केलेली आहेत.
पेठ शिवापूर गावाकडून भुदरगड किल्ल्याकडे येणारा रस्ता आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ शिवापूरसह गडबिद्री, जकिंनपेठ, शिंदेवाडी, कदमवाडी, वरेकरवाडी, राणेवाडी, माडेकरवाडी, कालेकरवाडी, घावरेवाडी, चोपडेवाडी, पडखंबे, बारवे अशी गावे आणि वाड्या आहेत. या ग्रामस्थांची येथील भैरवनाथ देवस्थानावर विशेष श्रद्धा आहे. किल्ल्याभोवती असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारातून पठारावरील किल्ल्यात प्रवेश होतो. येथून भैरवनाथ मंदिरासाठी गाडीरस्ता आहे. मंदिरासमोर प्रांगणात तटबंदीला लागून असलेल्या चौथऱ्यावर वरच्या दिशेने निमुळती होत गेलेली व शिखर असलेली दीपमाळ आहे. मंदिराच्या उजवीकडे एका वीराची समाधी आहे व तिच्या दोन्ही बाजूस दोन लहान दीपमाळा आहेत. तसेच मंदिराच्या तटभिंतीबाहेर एक दीपमाळ आहे व तिच्या लगत चौथऱ्यावर एक जुनी तोफ ठेवण्यात आलेली आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी संरचना असलेल्या या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ दोन खिडक्या आहेत. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. प्रवेशद्वार व दोन्ही खिडक्यांच्या बाजूला देवकोष्टके आहेत. येथील बंदिस्त सभामंडप (गूढमंडप) मूळ मंदिराला नंतर कधीतरी जोडला गेला असावा, असा अंदाज येथील ग्रामस्थ व्यक्त करतात. सभामंडपातून पुढे अंतराळाचे लाकडी प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांचे नक्षीकाम आहे. येथील ललाटबिंबावर गणपती व दोन्ही बाजूस भिंतीत अश्वमुखे आहेत. अंतराळातून पुढे जाताना दोन्ही बाजूस दगडी कमानी आहेत. गर्भगृहाची दगडी द्वारशाखा नक्षीकामाने सुशोभित आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी असलेल्या वज्रपीठावर भैरवनाथाची काळ्या पाषाणातील द्विभूज मूर्ती आहे. मूर्तीच्या एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात अमृतपात्र आहे. मूर्तीवर वस्त्रालंकार कोरलेले आहेत. मूर्तीच्या मागे नक्षीदार प्रभावळीवर कीर्तिमुख व नाग आहेत. इ.स. १६७२ मध्ये मोगलांकडून मराठ्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा मोगलांचा किल्लेदार मारला गेला होता. त्याची निशाणे मराठ्यांनी भैरवनाथ देवास अर्पण केली होती. ती आजही देवाजवळ आहेत.
माघ कृष्ण प्रतिपदेस भैरवनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी देवाच्या महाअभिषेकाने दिवसाची सुरुवात होते. दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवाचे नवस फेडले व नवे नवस बोलले जातात. राज्यभरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.
प्रांगणात मंदिराच्या बाजूला धर्मशाळेची वास्तू आहे. मंदिरापासून काही अंतरावर असलेली पडकी वास्तू ही प्रशासकीय कचेरी होती, असे सांगितले जाते. येथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा भालजी पेंढारकर यांनी १९४५ साली साकारलेला अर्ध पुतळा असलेले मंदिर आहे. या मंदिरात शिवपिंडी आहे. पुढे दूधसागर तलावाच्या काठावर अनेक लहान मंदिरांसह अंबाभवानी देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावरील गुहेत जखूबाई देवीचे मंदिर आहे.