भगवती मंदिर

मुणगे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

कोकणातील मालवण आणि देवगडच्या सीमेवर, सागरी महामार्गास लागून मुणगे या ऐतिहासिक गावामध्ये देवी भगवतीचे जागृत देवस्थान आहे. स्थानमाहात्म्यानुसार, प्राचीन काळी या गावामध्ये ऋषी-मुनींचे वास्तव्य असे. त्यामुळे या गावाला मुनीग्राम असे म्हणत व त्याचाच अपभ्रंश मुणगे असा झाला. देवी भगवती ही या गावाची ग्रामदेवता आहे. येथील देवीचे मंदिर पेशवे काळातील असल्याचे सांगण्यात येते. मंदिरात देवीची महिषासुरमर्दिनीच्या रूपातील मूर्ती आहे. या पाषाणमूर्तीची प्रतिष्ठापना २०० वर्षांपूर्वी करण्यात आलेली होती. या देवीच्या अस्तित्वामुळे मुणगे हे गाव शक्तिस्थान बनले असल्याची येथील भाविकांची श्रद्धा आहे.

या मंदिराची आख्यायिका अशी की बारा वाड्यांच्या या गावानजीकच्या बांबरवाडीतील ‘बायची देवी’ हे पूर्वी मुणगे गावचे आद्यस्थान होते. कालांतराने मध्यवर्ती स्थानी असलेल्या भगवती देवीस ग्रामदेवतेचा मान देण्यात आला. या देवीचे मंदिर प्रशस्त आवारात वसले आहे. मुख्य रस्त्यापासून मंदिराकडे जाण्यासाठी पेव्हरब्लॉकने छोटा रस्ता तयार करण्यात आला आहे. येथे देवीच्या पूजा साहित्याची, खणा-नारळाची विक्री करणारी काही दुकाने आहेत. समोरच देवीच्या मंदिराची आवारभिंतीत असलेली कमान दिसते. तेथून आत प्रवेश करताच उजव्या बाजूस चौथऱ्यावर चार, तर डाव्या बाजूस एक, असे एकूण पाच कोकणी पद्धतीचे दीपस्तंभ आहेत. समोरच देवीचे कोकणी स्थापत्यशैलीतील उतरत्या छपराचे कौलारू मंदिर आहे. सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि अंतराळात प्रदक्षिणा मार्ग असलेले गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.

या मंदिराची बहुतांश बांधणी लाकडात केलेली आहे. सभामंडप प्रशस्त आणि खुल्या स्वरूपाचा आहे. त्यात बाजूने चौकोनी खांब आहेत व त्यापासून आत काही अंतरावर दोन्ही बाजूंनी सात-सात लाकडी सुरूदार खांब आहेत. या खांबांच्या मध्ये लाकडाच्या महिरपी कमानी आहेत. उपसभामंडप चार पायऱ्या उंचावर आहे. त्यात लाकडी अष्टकोनी स्तंभ आहेत. याच ठिकाणी हनुमानाची मूर्ती, तसेच एका चौथऱ्यावर पादुका आहेत. अंतराळाच्या दर्शनीभिंतीच्या दोन्ही कडेच्या खांबांवर वरच्या भागात जय-विजय या वैष्णव द्वारपालांच्या सुंदर काष्ठमूर्ती आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वारावर ललाटबिंबस्थानी गणेश व त्याच्या दोन्ही बाजूंस उभ्या असलेल्या रिद्धी-सिद्धी या गणेशपत्नी आहेत. हे काष्ठशिल्प खास मराठी शिल्पशैलीतील आहे. त्याच्या बाजूस फुलांची नक्षी तसेच मयूर प्रतिमा कोरलेल्या आहेत. प्राचीन काष्ठशिल्पकलेचे उत्तम उदाहरण अशी ही द्वारपट्टी आहे.

अंतराळातील गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या एका बाजूस नंदीची मूर्ती, तर दुसऱ्या बाजूस तरंगकाठ्या आहेत. गर्भगृहात उंच वज्रपीठावर देवीची काळ्या पाषाणातील, सुमारे चार फूट उंचीची सुहास्य वदन मूर्ती दिसते. या मूर्तीच्या बाजूला चांदीची नक्षीदार महिरप आहे. इ.स. १८१० मध्ये देवीच्या या पाषाणमूर्तीची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली होती. येथे देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात आहे. खड्ग, त्रिशूल, ढाल आणि शंख धारण केलेली देवी महिषासुरावर पाय ठेवून उभी आहे. देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूस शिवलिंग आहे. ते श्री देव ठाणेकराचे स्थान मानले जाते.

मंदिराबाहेर, सभामंडपाच्या उजव्या बाजूस लांबलचक ओवरी आहे. त्यात देव गायगरब, गांगो, चिटक्याचा चाळा, देवी अनभवणी यांची पाषाणे, तसेच मूर्ती आहेत. मंदिराच्या डावीकडे एका ओवरीत देवी भावयचे स्थान आहे. या देवीच्या कोरीव पाषाणाच्या मागे काही वीरगळ व सतीशिळा आहेत. यातील काही वीरगळ व सतीशिळांवरील उठावशिल्पे झिजलेली आहेत. मात्र काही सतीशिळा अजूनही शाबूत आहेत. मंदिर आवारात ब्राह्मणदेवाचे मंदिरही आहे व येथील गर्भगृहात शिवलिंग प्रतिष्ठापित केलेले आहे.

मंदिराचा संपूर्ण परिसर अतिशय रमणीय आणि शांत आहे. मंदिराच्या मागील बाजूस एक पाण्याचा झरा आहे. त्याला बाराही महिने पाणी असते. या ठिकाणी सूचिर्भूत होऊनच देवीचे दर्शन घेतले जाते. येथून थोडे पुढे गेल्यावर महापुरुषाचे जागृत स्थान आहे. पौष पौर्णिमेला या देवीची यात्रा असते. ती पाच दिवस चालते. ही देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने यात्रोत्सवाच्या काळात नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यात्रा काळात येथे देवीचा गोंधळ, भजन, प्रवचन-कीर्तन, पालखी मिरवणूक असे कार्यक्रम असतात. यात्रेच्या अखेरच्या रात्री येथे लळित या लोककलेचा कार्यक्रम असतो.

एका आख्यायिकेनुसार, देवी भगवती ही काशीहून मुणगे या गावी आली, तेव्हा ती पहिल्यांदा येथील कारिवणे वाडीतील पाडावे कुटुंबीयांच्या घरी वास्तव्यास राहिली. त्यामुळे पाडावे यांचे घर हे देवीचे माहेर मानले जाते. येथे देवी दर तीन वर्षांनी माहेरपणाला येते. त्यास देवीची माहेरस्वारी म्हणतात. येथे देवीची पूजा-अर्चा झाल्यानंतर वाजत-गाजत ती मंदिरात येते.

चैत्र महिन्यात पूर्ण महिनाभर देवीची पालखी असते. या काळात मंदिराच्या आवारात पालखीच्या वेळी बारा-पाचाच्या मानकऱ्यांच्या वसंतपूजा केल्या जातात. मंदिरात ज्येष्ठ मासात ‘देसरूढ’ काढण्याचा विधी असतो, तर श्रावणात रोज श्रावणी पूजा केली जाते. याच प्रमाणे येथे देवीचा डाळपस्वारीचा म्हणजे बारा-पाचाच्या मानकऱ्यांच्या घरांना भेटीचा सोहळाही मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. मंदिरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा व देवदिवाळी हे उत्सवही धार्मिक वातावरणात साजरे केले जातात. देवीचा शिमगोत्सव हा धुळवडीपर्यंत साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून येथे रात्री रोंबाटे, तमाशा, दशावतार, नाट्यप्रयोग आयोजित केले जातात. या देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.

उपयुक्त माहिती

  • देवगडपासून २० किमी, तर मालवणपासून २८ किमी अंतरावर
  • देवगड व मालवण येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४२०३०५६२५
Back To Home