कोकणावर, खासकरून दक्षिण कोकणावर सृष्टीनिर्मात्याने निसर्गसौंदर्याची भरभरून उधळण केली आहे, पण त्यातही मालवण तालुक्यातील धामापूरला जरा अधिकच उजवे माप दिले आहे. येथील पर्वत, त्यातील वृक्षराजी, नारळी–पोफळीची झाडे आणि अर्थातच धामापूरचा ऐतिहासिक तलाव यातून असे काही अफलातून निसर्गचित्र उभे राहिले आहे की त्याची भुरळ साहित्यिकांपासून सामान्यांपर्यंत आणि शास्त्रज्ञांपासून भाविकांपर्यंत सर्वांनाच पडली आहे. जागतिक वारसा सिंचन स्थळ असलेला हा तलाव आणि त्याच्या काठावर वसलेली देवी भगवती असा शिव आणि सुंदरम् यांचा संगम येथे झालेला आहे.
हे मंदिर आणि तलाव यांची ऐतिहासिक कथा अशी सांगण्यात येते की विजयनगर साम्राज्याचा येथील प्रांताधिकारी नागेश नाईक याने इ.स. १५३० मध्ये धामापूर येथील तलाव व त्याकाठी भगवती देवीचे मंदिर उभारले. हा परिसर चौदाव्या शतकात हरिहर आणि बुक्क यांनी स्थापन केलेल्या विजयनगरच्या साम्राज्याचा भाग होता. पुढे इ. स. १४७० मध्ये बहामनी सल्तनतीचा वजीर मोहम्मद गवान याने गोवा जिंकला आणि कोकणातील हा भाग परकीय अमलाखाली गेला. कालांतराने कोकणावर आदिलशाही सत्ता आली. २५ नोव्हेंबर १५१० रोजी विजयनगरचा दर्यासारंग थिमय्या याच्या साह्याने आफाँस द अल्बुकेर्क या पोर्तुगीज सेनानीने गोव्यावर हल्ला केला आणि गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. तेव्हा नागेश नाईक हा येथील सत्ताधिकारी असण्याची शक्यता नव्हती किंवा असलाच तर आदिलशाहीतील अधिकारी असावा. त्याने सार्वजनिक हिताकरीता लोकांकडून निधी उभारून या तलाव–धरणाची उभारणी केली.
मातीचा बांध घालून हे विस्तीर्ण तलाव–धरण तयार करण्यात आले आहे. पाच एकर क्षेत्रातील हा जलाशय धामापूर आणि त्याच्या पूर्वेकडील काळसे गाव येथील घनदाट जंगलाने वेढलेला आहे. अत्यंत शांत परिसर, नितळ आणि निर्मळ पाणी, त्यात पडणारे बाजूच्या वृक्षराजीचे प्रतिबिंब, दिवसाच्या प्रत्येक प्रहरी बदलणारे त्याचे रूप यामुळे हा तलाव असंख्य लोकांना आकर्षित करतो. जैवविविधता, जलसिंचन, मासेमारी व पर्यटन या दृष्टीने एक आदर्श स्थान असलेल्या जलाशयाच्या काठी भगवती देवीचे प्राचीन मंदिर आहे. ही देवी धामापूर परिसराचे आणि या तलाव–धरणाचे रक्षण करते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. यासंदर्भात १९७२ सालच्या दुष्काळाच्या काळातसुद्धा हा तलाव भरलेला होता, अशी आठवण ग्रामस्थ सांगतात.
मुख्य रस्त्यालगतच असलेल्या स्वागतकमानीतून काही पायऱ्या चढून उंच टेकाडावर गेल्यावर एका बाजूस सातेरी देवीचे कौलारू मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह असे या जुन्या मंदिराचे स्वरूप आहे. आत उंच वारुळाच्या स्वरूपातील सातेरी देवी विराजमान आहे. डाव्या बाजूस हे मंदिर आणि उजवीकडे नव्याने रंगकाम केलेले छोटेसे तुळशी वृंदावन यांच्यामधून पेव्हर ब्लॉक अंथरलेल्या रस्त्याने काही पावले जाताच समोर भगवती देवीचे मंदिर आहे. आजही या मंदिराचा जुना बाज तसाच जतन करण्यात आलेला आहे.
मंदिर कोकणी स्थापत्यशैलीतील आहे. सभामंडप, उपसभामंडप, अंतराळ आणि अंतराळातून प्रदक्षिणा मार्ग असलेला गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुख्य सभामंडप उंच कौलारू, दोन पाखी, खुल्या प्रकारचा आणि लांबलचक आहे. या मंडपात दोन्ही बाजूंस सहा–सहा मोठे गोलाकार स्तंभ आहेत व त्यावर आडव्या लाकडी तुळया आहेत. येथील एका तुळईवर ‘सभामंडप बांधला शके १८२७’ व त्याखाली ‘धोंडी विश्राम थवी’ असा मजकूर कोरलेला आहे. यावरून इ.स. १९०४ मध्ये धोंडी विश्राम थवी या सुताराने हा सभामंडप बांधला, असे स्पष्ट होते. धामापूरमध्ये थवी कुटुंबाची चार–पाच घरे आहेत. त्यांच्या पूर्वजांनी या सभामंडपाचे तसेच मंदिराचे बांधकाम केलेले आहे.
मुख्य सभामंडपाच्या पुढे सुमारे फूटभर उंचीवर उपसभामंडप आहे. तिन्ही बाजूंना कक्षासने, त्यात बुटके दगडी नक्षीदार स्तंभ, त्यांपासून आतल्या बाजूस काही अंतर सोडून उभे असलेले दोन स्तंभ असे या उपसभामंडपाचे रूप आहे. हे स्तंभ खालच्या बाजूस चौकोनी, वरच्या बाजूस सुरूदार व त्यावर नक्षीदार तरंगहस्त आहेत. येथून दोन पायऱ्या उंचावर मंदिराचे अंतराळ आहे. अंतराळाचे लाकडी प्रवेशद्वार म्हणजे काष्ठशिल्पाचा उत्तम नमुना आहे. या त्रिशाखीय प्रवेशद्वाराच्या दोन शाखांवर वेलबुट्टीदार नक्षी कोरलेली आहे. त्यातील पहिल्या पसरट शाखेवर खालच्या बाजूस सिंहाकृती आहे. त्यावर एकीकडे हनुमानाचे, तर दुसऱ्या बाजूस गरुडाचे कोरीव शिल्प आहे. सर्वांत बाहेरची शाखा स्तंभासारखी कोरलेली आहे. द्वारचौकटीवर ललाटबिंबस्थानी गणेश आणि त्याच्या दोन्ही बाजूंस चवऱ्या ढाळणाऱ्या सेविकांचे शिल्प आहे. द्वारशाखांच्या वरच्या बाजूस आडव्या पट्टीवर नागदेवता कोरलेल्या आहेत व त्यांच्या मधोमध मोठे कीर्तिमुख आहे. अंतराळात उजव्या बाजूस तरंगहस्त आहेत. त्यात दांडेकर देवता, रवळनाथ, जैन ब्राह्मण, पावणाई, बाराचा पूर्वस, घाडीवस यांचे हे तरंग आहेत. समोरच गर्भगृहात वज्रपीठावर, सुंदर कोरीव काम केलेल्या महिरपीमध्ये देवी भगवतीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवीच्या उजव्या बाजूस गणेशाची, तर डाव्या बाजूस महादेवाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या दर्शनी भागात विविध देवतांच्या जुन्या चित्रशैलीतील तसबिरी आहेत. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे शिखर गाभाऱ्यावर नसून ते सभामंडपावर आहे.
या मंदिराच्या मागच्या बाजूस धामापूर तलाव–धरणाचा जलाशय पसरलेला आहे. तेथे सुंदर घाट बांधण्यात आला आहे. याबाबत येथे एक आख्यायिका सांगण्यात येते ती अशी की पूर्वीच्या काळी धामापूरमध्ये कोणाच्या घरी विवाह सोहळा असला आणि त्याकरीता सोन्याचे दागिने करण्याची कोणाची आर्थिक स्थितीनसली की ते लोक येथे येऊन भगवती देवीस प्रार्थना करीत असत. लोक एका परडीत फुले आणि दागिन्यांची यादी ठेवून ती परडी तलावात सोडत असत. दुसऱ्या दिवशी तलावाच्या काठी त्या यादीत नमूद केलेले सर्व दागिने त्या लोकांना मिळत असत. यात निर्बंध असा असे की घरातील मंगलकार्य आटोपल्यानंतर ते दागिने परत परडीत घालून तलावात सोडून द्यावे लागत असत. असे सांगतात की गावातील एका व्यक्तीस त्या दागिन्यांची हाव सुटली. त्याने देवीकडून दागिने घेतले; परंतु नंतर ते परत दिले नाहीत. परिणामी देवी कोपली आणि तेव्हापासून तलावातून दागिने येणे बंद झाले. विशेष म्हणजे मंगलकार्यात मदत करीत असलेला हा कोकणातील दुसरा तलाव आहे. ब्रिटिश काळात नाशिकमध्ये कलेक्टर असलेले व अनंत कान्हेरे यांनी ज्यांचा वध केला ते ए. एम. टी. जॅक्सन हे एक विद्वान व भारतीय संस्कृतीबद्दल आस्था असलेले अधिकारी होते. त्यांनी महाराष्ट्रातील लोककथांचे संकलन केले होते. त्याच्या ‘फोकलोअर नोट्स’ या ग्रंथाच्या दुसऱ्या, कोकणविषयक खंडाच्या पान क्र. १५ वर रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील एका तलावाची अशीच कहाणी देण्यात आली आहे. त्या गावातील कोणाच्या घरी विवाह सोहळा असल्यास त्याकरीता लागणारी भांडी या तलावातील साती आसरा देत असत. मात्र ती भांडी परत करावी लागत. एकाने ती परत केली नाहीत. त्यामुळे तो प्रकार बंद झाला, असे त्या कथेत म्हटले आहे.
आद्यशक्ती देवीचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या देवी भगवतीच्या या मंदिराच्या आवारात सातेरी देवीच्या मंदिराप्रमाणेच नारायण मंदिर व ब्राम्हण देव मंदिर ही दोन स्वतंत्र मंदिरे आहेत. या मंदिरांत गर्भगृह आणि सभामंडप असे दोन विभाग आहेत.
भगवती देवी मंदिरात नवरात्रीत नऊ दिवस जागरण असते. अष्टमीला होम–हवन, कुमारिका पूजन नवमीला महाप्रसाद असतो. येथे दसऱ्याचा कार्यक्रम गावातील भावई देवीच्या मंदिरात केला जातो. त्यात शिव–शक्तीचा विवाह सोहळा पार पडतो. सोने लुटले जाते. पालखीतून मिरवत गेलेली भगवती देवी परत मंदिरात आणली जाते. रामनवमी, हनुमान जयंती हे सणही या मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या कार्यक्रमातही रोज रात्री पुराण वाचन, कीर्तन व देवीची पालखी निघते. पाच मानकरी आणि बारा पूर्वज असे मिळून सारे मंदिराचे नियोजन करतात.
या मंदिराला लाभलेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे येथे अगदी लागूनच असलेला धामापूरचा तलाव. येथील धरणभिंतीची उंची ११.४३ मीटर, तर लांबी २७१ मीटर आहे. धामापूर तलावाची सिंचनक्षमता २३८ एकर एवढी आहे व सध्या १२५ एकर जमीन सिंचनाखाली आहे. या तलावाच्या परिसरात १२५ प्रकारचे पक्षी आढळतात. दुर्मिळ होत चाललेल्या वन्य पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या प्रजातीही येथे आढळतात. या परिसरात प्राणी अभ्यासक, वनस्पती शास्त्रज्ञ संशोधनासाठी नेहमी येत असतात.
२०२३ मध्ये धामापूरनजीक सड्यावर दोन ठिकाणी चार कातळशिल्पे सापडली आहेत. येथील धामापूरच्या गोड्याच्या वाडीच्या हद्दीत, तसेच मोगरणे व साळेल या गावांच्या सड्यावर ही कातळशिल्पे आहेत. कोकणात आढळणारी ही कातळशिल्पे (पेट्रोग्लिफ) प्रागैतिहासिक काळातील आहेत. त्यात प्राण्यांबरोबरच भौमीतिक रचनाही आढळतात. ही शिल्पे आदिम काळातील मानवाने कोरलेली असावीत, असे संशोधकांचे मत आहे.