भगवती हळदोळणकरीण मंदिर
खांडोळा, माशेल, ता. फोंडा, जि. उत्तर गोवा
विविध ग्रंथांत त्वरजा, तुरजा, त्वरिता, तुळजा, अंबा या नावांनी ओळखली जाणारी, छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी. या शक्तिपीठ देवतेच्या मूर्तीसारखीच देवी भगवतीची मूर्ती गोमंतकातील अंत्रुज महालातील खांडोळा गावी स्थित आहे. येथील देवीचे मंदिर सुमारे ४५० वर्षे प्राचीन आहे. या वाठारातील अनेकांची आराध्य देवता असलेल्या या देवीची यात्रा ‘माल्यांची जात्रा’ म्हणून सुप्रसिद्ध आहे. फाल्गुन शुद्ध द्वितियेस होणाऱ्या या यात्रेत हजारो भाविक सहभागी होतात.
भगवती हे आद्यशक्ती देवीचे स्वरूप मानले जाते. ‘दुर्गा सप्तशती’ ग्रंथात या देवीचे माहात्म्य वर्णन केले आहे. त्यात देवीच्या उत्पत्तीची कथा सांगितलेली आहे. ती अशी की पूर्वी कल्पान्तकाळी सर्व जगत् जलमय झाले होते. त्यावेळी विष्णू शेषशय्येवर योगनिद्रेचा अवलंब करून निद्रिस्त झाले होते. त्या वेळी त्यांच्या कर्णमलापासून मधु व कैटभ हे दोन असूर जन्मले. एकदा त्यांनी ब्रह्मदेवास पाहिले असता ते त्याला मारण्यासाठी धावले. तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूकडे धाव घेतली. परंतु ते निद्रिस्त होते. तेव्हा त्यांना जाग यावी यासाठी ब्रह्मदेवाने देवी भगवतीची स्तुती करण्यास सुरूवात केली. तेव्हा देवी प्रसन्न झाली व ‘विष्णूच्या मुखनेत्रकर्णातून। उदर हृदय बाहूपासून। निघोन ब्रह्मदेवा दर्शन। देती झाली त्या समयी।।’ अशा प्रकारे योगनिद्रेतून विष्णू मुक्त झाले. त्यास देवीने सामर्थ्य दिले, तसेच ‘त्यांना (त्या असुरांना) महामायेने मोहिले’ व त्यामुळे विष्णू त्यांचा वध करू शकले.
तुळजाभवानी देवीच्या ‘तुळजा माहात्म्या’तील आख्यायिकेनुसार, कृतयुगात कुक्कूट नावाच्या एका दैत्याने एका पतीव्रता महिलेची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने मनोमन पार्वतीचा धावा केला. तेव्हा पार्वती माता तेथे भवानी स्वरूपात प्रकट झाली व तिने कुक्कुट दैत्याचा वध केला. या दैत्याने मरता मरता महिषासुराचे रूप घेतले होते. देवीने त्याचा वध केल्यामुळे ती तुळजापूर येथे महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात विराजमान आहे. देवीचे हेच महिषासुरमर्दिनी रूप खांडोळा येथील मंदिरात विराजमान आहे.
येथील मंदिराचा इतिहास असा की इसवी सनाच्या बाराव्या शतकात हळदोणे या गावामध्ये महिषासुरमर्दिनीच्या रुपातील भगवती देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. असे सांगण्यात येते की देवीची मूर्ती तुळजापूर येथून आणण्यात आली होती. इ.स. १५१०मध्ये गोवा बेटांत पोर्तुगीजांचा प्रवेश झाला. त्यांची धर्मांधता आणि क्रौर्य यांमुळे येथील हिंदूंचे जगणे कठीण झाले. ख्रिश्चनांतील जेसुईट या सनातनी विचारसरणीच्या पंथाने येथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले. धर्मग्रंथ आणि मंदिरेच नव्हे, तर माणसे जाळण्यापर्यंतचे प्रकार त्या काळी घडले. १५६०मध्ये इन्क्विझिशन म्हणजेच धर्म समीक्षण संस्थेची स्थापना झाल्यानंतर या अत्याचारांचे प्रमाण प्रचंड वाढले. या काळात पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भागांमधील मंदिरांतील मूर्ती वाचवण्यासाठी त्यांचे स्थलांतर करण्यात आले. त्यात हळदोणे येथील देवीच्या मूर्तीचाही समावेश होता. येथील महाजनांनी इ.स. १५६७मध्ये एके दिवशी गुपचूप देवीची मूर्ती डिचोली तालुक्यातील मये येथे हलवली. तेथे ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केली त्या भागास हळदोणवाडा असे म्हणतात. देवीचे हे पहिले स्थलांतर होय. यानंतर मये येथूनही देवीचे दुसरे स्थलांतर करण्यात आले, ते खांडोळा या गावामध्ये. यावेळी श्री दाड, रवळनाथ, सिद्धनाथ, लक्ष्मीनारायण या पंचायतन देवतांचेही स्थलांतर करण्यात आले.
कालांतराने येथे देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले. पोर्तुगीज राजवटीत १९२८ मध्ये वसाहतकालीन कायद्यांतर्गत (रेग्युलॅमेन्तो माझानिया) या मंदिराची नोंदणी करण्यात आली. या योगे मंदिरास पोर्तुगीज सरकारची मान्यता मिळाली.
गोमंतकीय स्थापत्यशैलीत बांधलेल्या या भव्य मंदिराची रचना महाद्वार, सभामंडप, अर्धमंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. महाद्वारास कमानाकार प्रवेशद्वार आणि त्यावर दाक्षिणात्य गोपुराच्या पद्धतीचे शिखर आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस लाल चिऱ्यांच्या पाषाणात बांधलेल्या चौथऱ्यावर दीपस्तंभ आहे. मंदिराचा सभामंडप अर्धखुल्या पद्धतीचा आहे. सभामंडपास मोठमोठ्या कमानदार खिडक्या व प्रवेशद्वारे आहेत. बाजूला भाविकांना बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सभामंडपात एका बाजूला छोटे व्यासपीठ बांधण्यात आले आहे. अर्धमंडपास दगडांत बांधलेले कमानदार प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंस भिंतीतील देवळ्यांत द्वारपालांच्या मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात गणेशाची मोठी मूर्ती आहे.
अर्धमंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. बाह्यभिंतींतील रुंदसर कमानींत कक्षासने आहेत. महामंडपास संगमरवरी पाषाणाचे कमानदार प्रवेशद्वार आहे. आत बाह्यभिंतींपासून काही अंतरावर गोलाकार स्तंभांची रांग आहे. हे स्तंभ मोठ्या कमानींनी एकमेकांस जोडलेले आहेत. त्यांच्या वरच्या छताकडील भागांत लाकडी देव्हाऱ्यांत देवीच्या विविध स्वरूपातील प्रतिमा लावलेल्या आहेत. छतास तीन पितळी घंटा आणि मोठे झुंबर टांगलेले आहे. महामंडपातून गर्भगृहास प्रदक्षिणामार्ग आहे.
गर्भगृहाची दर्शनीभिंत पूर्णतः लाकडी आहे. त्यावर बारीक नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबस्थानी गणेश मूर्ती आहे. उतरांगावर महिषासुरमर्दीनीचे काष्ठशिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडील काष्ठ देव्हाऱ्यात खेतुपुरूषाची, तर उजवीकडे ग्रामपुरूषाची मूर्ती विराजमान आहे. आत चांदीच्या मोठ्या देव्हाऱ्यामध्ये वज्रासनावर देवीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. काळ्या पाषाणात घडविलेली ही मूर्ती वस्त्रालंकार आणि पुष्पमालांनी शृंगारित केलेली आहे. हाती ढाल-तलवार धारण केलेल्या व महिषासुरमर्दीनी स्वरुपातील या देवीच्या मागे चांदीची मोठी प्रभावळ व चांदीचे छत्र आहे. देवीच्या देव्हाऱ्यावर, तसेच प्रभावळीवर कीर्तिमुख कोरलेले आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस उंच पितळी समया आहेत.
गर्भगृहाच्या उजवीकडे प्रदक्षिणामार्गातील देवळीत अनंत पुरूषाची काळ्या पाषाणातील मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहावर तीन स्तरांचे उंच असे शिखर आहे. येथील खालचा स्तर चौकोनाकार, त्यावरील दोन स्तर अष्टकोनाकार आहेत. या मनोऱ्यावर बाजूने सज्जा असलेला मोठा घुमट व त्यावर कलश अशी या शिखराची रचना आहे. मंदिर प्राकारात सातेरी, दाड, रवळनाथ, सिद्धनाथ, लक्ष्मीनारायण, जोशीपुरूष व मल्लिनाथ पुरुष या देवांची स्थाने आहेत. प्राकारात जुन्या पद्धतीचे, लाल पाषाणात बांधलेले काही दीपस्तंभ, तसेच तुलसी वृंदावनही आहे.
येथे भाविकांना सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत देवीचे दर्शन घेता येते. मंदिरात नित्यनैमित्तिक पूजाअर्चेबरोबरच विविध हिंदू सण व उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. नवरात्र हा या मंदिरातील एक महत्त्वाचा उत्सव असतो. येथे अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केली जाते. त्यावेळी रुजवण घालणे म्हणजे नऊ प्रकारच्या धान्याची पेरणी करण्याचा कार्यक्रम केला जातो. दसऱ्याला येथे देवीचा मोठा शिबिकोत्सव होतो. या उत्सवात रवळनाथ व सिद्धनाथ या देवांचे तरंग सजवून त्यांची मंदिर प्राकारात मिरवणूक काढली जाते. यानंतर येथे कौलप्रसादाचा कार्यक्रमही होतो. महापर्वणी हा या मंदिरातील महोत्सव. या दिवशी देवीची पालखी काढली जाते. याच दिवशी येथे दिवजोत्सव साजरा केला जातो. येथील ही जत्रा ‘माल्यांची जात्रा’ म्हणून ओळखली जाते. माले म्हणजे झुंबराच्या आकाराची साधारणतः चार फूट उंच व दोन फूट रुंद अशी मातीची समई. या समईत ५२ पणत्या असतात. जत्रेच्या दिवशी रात्री मोड म्हणजे अंगात देवीचा अवसर (संचार) झालेला पुरूष हे पेटते माले डोक्यावर घेतो. या दिवशी गावातील सर्व सवाष्णी दिवजा पेटवतात व पंचायतनातील सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालतात. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमास हजारो भाविक उपस्थित असतात. गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकात या देवीचे महाजन कुळावी आहेत. कामत, चाटी, चारी, नाईक, कांबळी, पंडित, जोशी व वाघ हे देवस्थानचे सात वांगडी आहेत. वांगडीचा मूळ अर्थ संगती वा सहचरी. भगवती ही या सात कुळांची देवता आहे. हे सर्व लोक या जत्रेस आवर्जून उपस्थित राहतात. मंदिर परिसरात भक्तनिवास आहे.
उपयुक्त माहिती:
- फोंडा येथून १८ किमी आणि पणजी येथून २१ किमी अंतरावर
- खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
- गोव्यातील अनेक शहरांतून येथे येण्यासाठी राज्य परिवहन सेवेच्या बसची सुविधा
- परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
