भगवती देवी मंदिर

पेडणे, जि. उत्तर गोवा

भगवती हे आद्यशक्ती देवीचे स्वरूप मानले जाते. हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध धर्मातही देवीचा उल्लेख करण्यासाठी भगवती हा शब्द वापरला जातो. देशात भगवती देवीची अनेक प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. गोव्यात खांडोळा येथील हळदोळणकरीण, मार्से येथील चिमुलकरीण, पार्से, मुळगाव या ठिकाणी असलेली भगवती देवीची मंदिरे प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक मंदिर उत्तर गोव्याच्या पेडणे शहरात आहे व येथील जागृत देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. कोकणातील अनेक कुळांची ही देवी कुलदेवता आहे. देवी भागवत या ग्रंथात भगवती देवीचे गुणवर्णन आले आहे. प्रकृती, पराप्रकृती, माया, आदिमाया, राधा, वैष्णवी, गायत्री, भगवती, जगदंबा, सिद्धी, सिद्धिदा, बुद्धी, निद्रा, क्षुधा, पिपासा, छाया, तन्द्रा, दया, स्मृती, चेतना, पुष्टी, तुष्टी, षष्ठी, मंगलचंडी, मनसा, भ्रामरी आदी देवीच्या अनेक रूपांचे वर्णन व महिमा या ग्रंथात आहे. सत्व, रज व तम गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरस्वती, लक्ष्मी व काली या तिन्ही देवींचे एकत्रीत रूप म्हणजे देवी भगवती होय. कृष्ण हा मुळपुरुष आणि त्याची शक्ती राधा हीच देवी भगवती असल्याचे संदर्भही काही ग्रंथांमध्ये येतात.

गोवा प्रांतात पोर्तुगीजांची आल्यानंतर अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला. त्याही काळात काही मंदिरे वाचली व आजतागायत ती उभी आहेत. पेडणे येथील भगवती देवीचे मंदिर त्यापैकीच एक होय. गोव्यातील काही मूळ मंदिरांपैकी हे एक मंदिर असल्याने या मंदिरास विशेष महत्त्व आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या या मंदिराजवळ पूजा साहित्य विक्रीची अनेक दुकाने आहेत. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौकोनी स्तंभ आहेत. या स्तंभांवर अर्धचंद्राकार तोरणे, त्यावर सज्जा, बाशिंग व बाशिंगावर शिखरे आहेत.

मंदिराचे प्रशस्त प्रांगण रस्त्यापेक्षा खोलगट भागात असल्याने काही पायऱ्या उतरून प्रांगणात प्रवेश होतो. मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात तटबंदीला लागून भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात चौथऱ्यावर पाच थरांची दीपमाळ आहे. मंदिरासमोर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन चौथरे व त्यावर गजराज शिल्पे आहेत. गजराजांच्या उंचावलेल्या सोंडींमध्ये मशाली आहेत. सभामंडप, मुख्य सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. अर्धखुल्या स्वरूपाच्या सभामंडपात चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. सभामंडपात मधल्या दोन रागांतील स्तंभांवर अर्धचंद्राकार तोरण आहेत. सभामंडपाचे कौलारू छत लाकडी संरचनेवर तोललेले आहे.

पुढे बंदिस्त स्वरूपाच्या मुख्य सभामंडपाला अर्धचंद्राकार प्रवेशद्वार आहे. मुख्य सभामंडपातील डाव्या व उजव्या बाजूचे स्तंभ अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत.

या सभामंडपात दोन्ही बाजूला भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. पुढे काही फूट उंच चौथरा आहे व त्यावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रतिहारी द्वारपाल शिल्पे आहेत. चतुर्भुज द्वारपालांच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म आहेत. या प्रवेशद्वारात नक्षीदार स्तंभशाखा व ललाटबिंबस्थानी इष्टशिल्प आहेत. अंतराळात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. अंतराळातून बाहेर पडण्यासाठी डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्टके आहेत व त्यात स्थानिक देवतांच्या पाषाण मूर्ती आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला असलेल्या स्तंभांवर छत्रतोरण आहे. प्रवेशद्वाराला नक्षीदार स्तंभशाखा आणि ललाटबिंबावर कीर्तीमुख आहे. गर्भगृहात वज्रपीठावर भगवती देवीची काळ्या पाषाणातील अष्टभुजा महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती आहे. देवीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट, हातात त्रिशूल, तलवार, ढाल, पाश, भाला आदी शस्त्रे आणि अंगावर वस्त्रालंकार कोरलेले आहेत. मूर्तीच्या मागे असलेल्या चांदीच्या प्रभावळीत पानाफुलांच्या नक्षी आहेत.

मंदिराच्या छतावर प्रवेशद्वाराकडे डाव्या व उजव्या बाजूला मेघडंबरी आहेत. अंतराळाच्या छतावर चौकोनी घुमटाकार शिखर व शिखराच्या शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे शिखर आहे. शिखरातील खालील पहिला थर षटकोनी व वरील थर घुमटाकार आहे.

या मंदिराच्या प्रांगणात सातेरी देवीचे मंदिर आहे. मंदिर प्रांगणापेक्षा उंच चौथऱ्यावर आहे व त्यासाठी दहा पायऱ्या आहेत. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी सातेरी देवी मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे. सभामंडपात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने व कक्षासनांत एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले स्तंभ आहेत. येथील गर्भगृहाच्या लाकडी द्वारशाखांवर देवीची विविध रूपे कोरलेली आहेत. ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात वज्रपीठावर सातेरी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिराच्या शेजारी द्वारपाल मंदिर आहे. सभामंडप व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गर्भगृहात जमिनीवर उभ्या पाषाण स्वरूपात द्वारपाल देवतेची मूर्ती आहे.

दसरा हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा असा सलग पंधरा दिवस नवरात्रोत्सव साजरा केला जातो. दसऱ्याला देवीची पालखी मिरवणूक निघते. ढोल ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत देवी पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेला निघते. या सोहळ्यात परिसरातील हजारो भाविक सहभागी होतात. नवरात्रोत्सवात देवीची खणानारळाने ओटी भरून साडीचोळी व सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात. चैत्र पाडवा, होळी, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, श्रावण मास आदी वर्षभरातील सर्व सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी असते. दररोज सकाळी ९ ते दुपारी १ व दुपारी ३.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरांत दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती:

  • पेडणे बस स्थानकापासून ३०० मीटर अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून पेडणेसाठी राज्य परिवहन बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home