सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या चिंदर या गावामध्ये देवी भगवतीचे पुरातन स्थान आहे. कोकणातील खास अशा गावपळण या परंपरेचे आजच्या काळातही पालन करणाऱ्या चिंदर या गावाचे ही देवी आराध्य दैवत आहे. देवीचे मूळ स्थान येथील डोंगरामध्ये असल्याचे सांगण्यात येते. मात्र तिचे भव्य आणि देखणे मंदिर येथे बांधण्यात आले आहे. ही देवी नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
भगवती हे आद्यशक्ती देवीचे स्वरूप मानले जाते. ‘दुर्गा सप्तशती’ ग्रंथात या देवीचे माहात्म्य वर्णन केले आहे. त्यात देवीच्या व्युत्पत्तीची कथा सांगितलेली आहे, ती अशी की पूर्वी कल्पान्तकाळी सर्व जगत् जलमय झाले होते. त्यावेळी विष्णू शेषशय्येवर योगनिद्रेचा अवलंब करून निद्रिस्त झाले होते. त्या वेळी त्यांच्या कर्णमलापासून मधु व कैटभ हे दोन असुर जन्मले. एकदा त्यांनी ब्रह्मास पाहिले असता ते त्याला मारण्यासाठी धावले. तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूकडे धाव घेतली; परंतु ते निद्रिस्त होते. तेव्हा त्यांना जाग यावी यासाठी ब्रह्मदेवाने देवी भगवतीची स्तुती करण्यास सुरुवात केली. तेव्हा देवी प्रसन्न झाली व ‘विष्णूच्या मुखनेत्रकर्णातून। उदर हृदय बाहूपासून। निघोन ब्रह्मदेवा दर्शन। देती झाली त्या समयी।।’ व अशा प्रकारे योगनिद्रेतून विष्णू मुक्त झाला. त्यास देवीने सामर्थ्य दिले, तसेच ‘त्यांना (त्या असुरांना) महामायेने मोहिले’ व त्यामुळे विष्णू त्यांचा वध करू शकला.
अशी ही देवी भगवती कोकणातील गावऱ्हाटीतील बारा-पाचाच्या संप्रदायात राजसत्ता मानली जाते. ती या स्थळाची मुख्य देवी असते. चिंदर गावातील डोंगरावर या देवीचे पुरातन मूळ स्थान आहे. मात्र ग्रामस्थांनी शेकडो वर्षांपूर्वी गावात मंदिर बांधून देवीची प्राणप्रतिष्ठा केली. या ठिकाणी जुन्या पद्धतीचे देवीचे मंदिर होते. अलीकडेच त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. येथे आता भव्य व देखणे असे मंदिर उभे आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह आणि गर्भगृहावर उंच शिखर अशी या मंदिराची रचना आहे.
मंदिरासमोरील प्रशस्त जागेत एका उंच चौथऱ्यावर तीन प्राचीन दगडी दीपस्तंभ आहेत. या चार स्तरीय दीपस्तंभांच्या वर गोलाकार फळासारखा आकार आहे. येथून काही फूट उंचीवर मंदिराचा खुल्या प्रकारचा मोठा सभामंडप आहे. सभामंडपात सर्वत्र चकचकीत फरशा बसवल्या आहेत, त्यामुळे त्याचा आकार अधिकच मोठा भासतो. या सभामंडपातून नऊ पायऱ्या उंचावर अंतराळ आहे. अंतराळ अर्धखुल्या प्रकारचे आहे. त्यात भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. अंतराळात एका बाजूस सहा तरंगकाठ्या आहेत. येथून गर्भगृहास प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग आहे. गर्भगृह संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेले आहे. त्याच्या वरच्या बाजूस महिषासुरमर्दीनीचे तैलरंगातील मोठे चित्र आहे. गर्भगृहात वज्रपीठावर देवीची प्रसन्नवदन मूर्ती आहे. देवी महिषासुरमर्दिनीच्या अवतारात आहे. तिने हातात त्रिशूल, नाग, खड्ग धारण केलेले आहे. या मूर्तीच्या मागे चांदीची सुंदर महिरप आहे व त्यावर पानाफुलांच्या नक्षीबरोबरच दोन मयुराकृती कोरलेल्या आहेत.
येथे देवीची नित्यनियमाने पूजा-अर्चा केली जाते. या मंदिरातील देवीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचा जत्रोत्सव. पाच दिवस चालणाऱ्या या जत्रेस दिंड्याची जत्रा असे म्हणतात. याबाबतची आख्यायिका अशी की गावकऱ्यांना शेकडो वर्षांपूर्वी डोंगरात जेव्हा देवीचे प्रथम दर्शन झाले होते, त्या वेळी दिंडे नावाच्या वनस्पतींनी देवीस वेढलेले होते. त्याची स्मृती म्हणून जत्रेच्या दिवशी दिंडे वनस्पतीच्या सुमारे अर्धा फूट लांबीच्या काठ्यांची मशाल केली जाते. या काठ्यांच्या टोकाला चिंध्या बांधून त्या तेलात बुडवल्या जातात व पेटविल्या जातात. त्यामुळे या जत्रोत्सवास दिंडेजत्रा असे म्हणतात. भजन, कीर्तन आणि उदे गं अंबे उदेच्या गजरात केला जाणारा गोंधळ हे या उत्सवाचे एक आकर्षण असते.
चिंदर गावची ही जत्रा जशी पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहे, त्याच प्रमाणे हे गाव गावपळण या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्गातील आचरे, मसुरे, देवगड तसेच रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील वाघण या गावांप्रमाणेच गावपळण या परंपरेचे पालन चिंदरकर आजही करतात. गावपळण म्हणजे संपूर्ण गावाने काही दिवसांसाठी माणसा-जनावरांसह गावाच्या वेशीबाहेर उघड्या माळावर जाऊन राहणे. पूर्वी हे राहणे महिनाभराचे असे, मात्र आता ते तीन, पाच वा सात दिवसांवर आले आहे. या परंपरेचा उगम व कार्यकारणभाव अज्ञात आहे. चिंदरमध्ये दर तीन वर्षांनी गावपळण होते. त्या वेळी देवीचा कौल घेऊन दिवस ठरवला जातो. तीन दिवस, तीन रात्री संपूर्ण गाव वेशीबाहेर राहते. यावेळी घरे-दारे बंद करून दारावर नारळाच्या झावळ्या बांधून घराभोवती राखेचे रिंगण घालून चिंदरचे ग्रामस्थ गाववेशीबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जातात.