भद्रेश्वर मंदिर / वाकेश्वर मंदिर,

वाई, ता. वाई, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या वाई (पूर्वीचे नाव विराटनगरी) या गावाचीदक्षिण काशीअशी ख्याती आहे. पांडवांचे वास्तव्य लाभलेल्या या गावात कृष्णा नदीच्या उत्तर तीरावर भद्रेश्वर मंदिर, तर दक्षिण तीरावर वाकेश्वर मंदिर ही महादेवाची दोन प्राचीन प्रसिद्ध मंदिरे आहेत. असे सांगितले जाते की आता ज्या ठिकाणी भद्रेश्वर मंदिर आहे तेथे ब्रह्मदेवाने कठोर तपस्या केली होती. त्याचे चांगले (भद्र) फळ मिळाले, म्हणून या मंदिराला भद्रेश्वर असे नाव पडले.

भद्रेश्वर मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की आपला वनवास काळ संपवून पांडव अज्ञातवासाच्या एका वर्षाच्या काळात विराटनगरीत आश्रयाला होते. येथील सोनजाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विराटनगरीत खडकाळ भाग असल्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष होते. त्यावेळी भीमाने जमिनीत प्रहार केल्यानंतर येथे पाणी लागले हा परिसर समृद्ध झाला. व्यासमुनींच्या स्कंदपुराणातील सह्याद्री खंडातील ११व्या अध्यायामध्ये कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या येथील भद्रेश्वर मंदिराचा उल्लेख आहे.

भद्रेश्वर मंदिराभोवती उंच दगडी तटबंदी आहे. नदीपात्रापासून मंदिरात जाण्यासाठी २५ ते ३० दगडी पायऱ्या आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या एक प्राचीन वृक्षाच्या पारामध्ये चार ठिकाणी देवळ्या असून त्यामध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. भाविकांच्या सोयीसाठी या पाराच्या सभोवताली पत्र्याची शेड बांधण्यात आली आहे. मंदिराजवळ नंदीची अखंड काळ्या पाषाणातील मोठी मूर्ती आहे. दर्शन मंडप, सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील दर्शन मंडपातील लाकडी खांबांवर कोरीव नक्षीकाम आहे. एखादा जुना वाडा भासावा, अशी त्याची रचना आहे. सभामंडपात मात्र हेमाडपंती शैलीतील दगडी खांब असून त्यावरील बांधकामही तसेच आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेल्या देवळीत श्रीगणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या ललाटबिंबावरही श्रीगणेशाचे शिल्प आहे. गर्भगृहात मध्यभागी काळ्या पाषाणातील चौकोनी आकाराची शिवपिंडी आहे. महाशिवरात्रीला येथे शेकडो भाविक एकत्र बसून शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

भद्रेश्वर मंदिराच्या समोरील बाजूस, काही अंतरावर, कृष्णा नदीच्या पलीकडील तीरावर वाकेश्वर मंदिर आहे. या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की पांडवांनी दौपदीला पूजाअर्चा करता यावी यासाठी हे मंदिर बांधले होते. विराटनगरीत पांडव जेव्हा अज्ञातवासात होते, तेव्हा स्नानासाठी द्रौपदी या घाटाचा वापर करीत असे. त्यामुळे या घाटाजवळच पांडवांनी हे मंदिर उभारले.

वाई गावाच्या एका टोकाला निसर्गरम्य परिसरात वाकेश्वर मंदिर आहे. एखाद्या किल्ल्याला असते, तशी त्याला भक्कम दगडी तटबंदी आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर प्रथम काळ्या पाषाणात कोरलेल्या नंदीचे दर्शन होते. थोडे पुढे गेल्यावर मंदिराच्या बाहेर आणखी एक नंदी आहे. स्वतंत्र नंदीमंडप, सभामंडप गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. संपूर्ण दगडी बांधणीच्या या मंदिराच्या सभामंडपात २४ दगडी खांब असून वरच्या बाजूला त्यावर पुष्पशिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला श्रीगणेशाची प्राचीन अखंड पाषाणातील मूर्ती आहे. या गर्भगृहात जाण्यासाठी सभामंडपातून पायऱ्या उतरून जावे लागते. काहीशा ओबडधोबड आकाराच्या काळ्या पाषाणातील ही शिवपिंडी चौकोनी आहे. या पिंडीतून बाराही महिने पाणी वाहत असते. शिवपिंडीच्या समोरील भिंतीमधील देवडीत पार्वतीची मूर्ती आहे. शिवपिंडीतून झिरपणारे पाणी हे एका मार्गिकेमार्फत मंदिर परिसरातील असलेल्या एका तलावात साठवले जाते.

या मंदिराचे वैशिष्ट्य असे की बाहेरील बाजूस यावर विविध हत्तींची शिल्पे कोरलेली आहेत. हत्ती म्हणजे समृद्धीचे प्रतीक. त्यामुळे पूर्वीपासून हा परिसर समृद्ध असावा, असे मानले जाते. याशिवाय दोन असुरांची दोन हरिणांची एकमेकांत गुंतलेली शिल्पे आहेत, ज्यांचे डोके विरुद्ध बाजूला असून पोटाच्या भागी ते जोडलेले आहे. साधकाचे शिल्प आणि फुलांच्या आतील बाहेरील बाजूला असणाऱ्या पाकळ्यांची वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे येथे कोरलेली आहेत. मंदिराचा खालचा भाग हा दगडांत बांधलेला असून कळसाकडील भाग चुना आणि विटांचा वापर करून बांधण्यात आला आहे.

मंदिर परिसरात गर्द झाडे असल्याने विविध पक्ष्यांचे कुजन कानावर पडते. त्यामुळे येथील वातावरण प्रसन्न भासते. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाला असलेल्या पाराजवळ एक शिवलिंग नंदी आहे. तेथून काही अंतरावर एका कोपऱ्यात एक लहानसे दार असलेली चौकोनी जागा आहे. तीच द्रौपदीची न्हाणी असावी, असे सांगितले जाते. याशिवाय मंदिराच्या प्रांगणात विठ्ठलरुख्मिणीचे एक लहानसे मंदिर आहे.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून ३२ किमी अंतरावर 
  • कृष्णा नदीच्या अलीकडील पलीकडील तीरावर मंदिरे
  • वाहनांतून जायचे झाल्यास किमी अंतर
  • मंदिरांच्या वाहनतळापर्यंत खासगी वाहने जाऊ शकतात
  • संपर्क : भद्रेश्वर मंदिर, पुजारी : ९८९०७५२५१९
Back To Home