पांडवांची कुलदेवी असलेली भद्रकाली देवी म्हणजे शिव आणि शक्तीचे एकत्रित रूप. भारतीय युद्धाने जेथील भूमी रक्तरंजीत झाली त्या कुरुक्षेत्रामध्ये मुख्य शक्तिपीठ असलेल्या या भद्रकाली देवीचे एक स्थान मालवण तालुक्यातील रेवंडी गावात आहे. गड नदी आणि कालावली खाडीच्या निसर्गसौंदर्याने समृद्ध अशा परिसरात भद्रकाली देवीचे सुंदर व भव्य असे मंदिर आहे. गावातील एका छोट्या टेकडीवर, शांत, रमणीय भागात हे मंदिर वसलेले आहे. ही देवी मनोकामना पूर्ण करणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे व तिच्या दर्शनार्थ येथे सतत भाविकांची वर्दळ असते.
रेवंडी येथील भद्रकालीच्या स्थानाबद्दल दोन आख्यायिका सांगण्यात येतात. त्यातील एक आख्यायिका अशी की पार्वती माता काही कारणास्तव शंकरावर रूसून या ठिकाणी आली होती. तिथे काही दिवसांनी शंकर आपल्या गणांसह पार्वती मातेचा रूसवा घालवण्यासाठी आले. पार्वती माता जेव्हा शंकरासोबत जाण्यासाठी निघाली, तेव्हा तिच्या भक्तांना तिने सांगितले की शिव आणि शक्तीच्या रूपात मी इथेच कायम वास्तव्य करीन. ते ऐकून भक्तमंडळी आनंदली व त्यांनी भद्रकाली देवीची स्थापना करून तिची पूजा-अर्चा करण्यास सुरुवात केली. दुसरी आख्यायिका अशी की रेवंडीच्या कांबळी घराण्यातील मूळ वंशज हे काशीहून सध्याच्या कांबळीवाडी येथे वास्तव्यास आले. रेवंडीतील मध्यवर्ती जागा निवडून त्यांनी येथे शंकर व पार्वती या उभयता देवतांची काळ्या पाषाणाची लिंग स्वरूपात स्थापना केली. भद्र म्हणजे शिवशंकर व काली म्हणजेच पार्वती माता असून ही देवता ‘भद्रकाली’ या नावाने प्रसिद्ध झाली.
शिवपुराणाच्या रुद्रसंहितेत भद्र आणि काली यांच्या जन्माबद्दलची कहाणी देण्यात आली आहे. ही पौराणिक कथा अशी की शिवपत्नी सती ही दक्षराजाची कन्या होती. एकदा दक्षाने यज्ञाचे आयोजन केले होते. मात्र त्याने शंकर आणि सती यांना निमंत्रण दिले नाही. तरीही ती शिवगणांसह वडिलांच्या घरी हक्काने गेली. तिथे दक्षाने तिचा अपमान करून शिवनिंदा केली. आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन सतीने योगमार्गाने वायू आणि अग्नीची धारणा करून प्राणत्याग केले. सती योगाग्नीने भस्मसात झाल्याचे वृत्त शिवगण व नारदाकडून समजल्यानंतर शंकर क्रूद्ध झाले. संतापाच्या भरात त्यांनी आपल्या मस्तकावरील एक जटा उखडली आणि ती पर्वतावर आपटली. त्या जटेचे दोन तुकडे झाले. त्याच्या पूर्वभागातून महाभयंकर असा महाबली वीरभद्र प्रकट झाला, तर दुसऱ्या भागातून महाकाली उत्पन्न झाली. या दोघांनी दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. रेवंडी येथील मंदिरात भद्रकालीच्या मूर्तीसमोर भद्र आणि काली या दोन्ही देवतांचे पाषाण एका वज्रपीठावर विराजमान आहेत.
रेवंडी येथील या मंदिराची स्थापना सुमारे ४०० वर्षांपूर्वी झाल्याचे देवस्थानचे जुनेजाणते मानकरी सांगतात. इ.स. २००० मध्ये या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. गावाच्या मध्यभागी हे मंदिर असले तरी मंदिराच्या परिसरात घरे नाहीत. एका उंच टेकडीवर घनदाट झाडीच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर वसलेले आहे. प्रवेशकमानीतून २७ पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. एखाद्या किल्ल्यास तटबंदी असते तशा प्रकारे या मंदिराला सर्व बाजूंनी आवारभिंत बांधण्यात आली आहे. सभामंडप, अंतराळ आणि अंतराळातून प्रदक्षिणा मार्ग असलेले गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे छत समतल आहे व सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह यांवर शिखरे आहेत.
प्रवेशकमानीतून पायऱ्या चढून वर गेल्यावर मंदिरासमोर दोन्ही बाजूंना दोन दीपस्तंभ दिसतात. येथेच डाव्या बाजूस तुळशी वृंदावन आहे. सभामंडप प्रशस्त आणि हवेशीर आहे. सभामंडपात भूतलावर शुभ्र चकचकीत संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. अंतराळात देवीच्या जत्रोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यात देवीची पालखी व पाच तरंगकाठ्या यांचा समावेश आहे. मंदिराचे गर्भगृह साधेसे आहे. या गर्भगृहास दोन प्रवेशद्वारे आहेत. त्यातील एक प्रवेशद्वार संगमरवरात कोरलेल्या जाळीने बंदिस्त आहे. गर्भगृहात उंच वज्रपीठावर देवीची सिंहासनारूढ, चतुर्भुज व प्रसन्नवदन मूर्ती आहे. देवीसमोरच्या छोट्या पीठावर भद्र आणि काली यांचे पाषाण आहेत.
मंदिराच्या डाव्या बाजूस जैन ब्राम्हण देवाचे देवालय आहे. आत एका चौकोनात एक मोठे आणि तीन लहान अशी काळ्या पाषाणातील लिंगे आहेत. हेच ब्राम्हणदेवाचे स्थान होय. तेथून पुढे आल्यावर देवीच्या चाळ्याचे स्थान आहे. तेही एका चौथऱ्यावर आहे. त्याच्या बाजूला एक चाफ्याचे मोठे झाड आहे. त्याच्या सभोवती पार बांधलेला आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस भक्त निवासाची अद्ययावत सुविधा असलेली दुमजली इमारत आहे.
भद्रकाली देवीचा जत्रोत्सव येथे अत्यंत उत्साहाने आणि धार्मिक वातावरणात साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेस (स्थानिक बोलीभाषेत यास टिपर असे म्हणतात.) येथे जत्रा भरते. या दिवशी सकाळी देवीला मुखवटा लावून साडी-चोळी नेसवून सोन्याच्या दागिन्यांनी मढवले जाते. सकाळी येथे महाप्रसाद बनवला जातो. यासाठीचा शिधा ग्रामस्थांकडून येतो. देवीपुढे बारापाच स्थळांच्या नावे वाडी दाखविली जाते. प्रथम ब्राह्मण प्रसादाचे ग्रहण करतात. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. रात्री देवीसमोर परंपरेप्रमाणे पणत्या पेटवून दीपोत्सव व गाऱ्हाण्याचा कार्यक्रम असतो. त्यानंतर कोहळ्याची विधिवत पूजा केली जाते. दीपमाळेवर कोहळे ठेवले जातात. यानंतर उदो उदोच्या गजरात देवीची अवसारी तत्त्वांसह पालखी जैन ब्राह्मण मंदिर स्थळाकडे नेतात. त्यास गाऱ्हाणे घातल्यानंतर भद्रकाली मंदिराला एक प्रदक्षिणा घालून या एका दिवसाच्या टिपर उत्सवाची सांगता करण्यात येते.
यात्रोत्सवात मंदिरास विजेच्या रोषणाईने सजविले जाते. रात्री उशिरा येथे दहीकाल्याचा कार्यक्रम होतो. मंदिरात नवरात्रोत्सव, दीपावली आदी महत्त्वाचे सण व उत्सव मोठ्या उत्साहाने सादरे करण्यात येतात. येथे माघी गणेशजयंतीनिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. रेवंडी या गावची आणखी एक ओळख म्हणजे मालवणी भाषेला नाटकांच्या माध्यमातून सातासमुद्रापार नेणारे रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी यांचे हे गाव होय. त्यांच्या नाट्यसंस्थेस याच देवीचे नाव देण्यात आलेले आहे.