बिल्व अथवा बेल झाडाला धार्मिक व आयुर्वेदिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेलाच्या त्रिदल पत्राला महादेवाच्या त्रिनेत्राची उपमा दिली जाते. बिल्व हे महादेवाचे एक नाव सुध्दा आहे. पवित्र असल्यामुळे बेलाचे लाकूड इंधन म्हणून जाळू नये, असा धार्मिक संकेत आहे. सांख्यायन आरण्यक, यजुर्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपत ब्राम्हण, तैत्तिरिय संहिता, वाल्मिकी रामायण आदी ग्रंथात या झाडाचे महत्त्व विषद केलेले आहे. महादेवाच्या पूजेत या झाडाच्या पानांचे आणि फळांचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच महादेवाला बेलेश्वर नावाने देखील संबोधले जाते. भारतात बेलेश्वर महादेवाची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. भूम तालुक्यातील पाखरुड गावातील बेलेश्वराचे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे.
हेमाडपंती स्थापत्य शैलीचे हे मंदिर १७५३ साली बांधून पूर्ण झाल्याची येथे नोंद आहे. खर्डा संस्थानचे राजे सुलतानराव निंबाळकरांनी काशीहून आणलेल्या सात शिवपिंडी आपल्या संस्थानात विविध ठिकाणी स्थापित केल्या. राजांचे गुरू तुकारामतीर्थ महाराजांच्या मठातील बेलेश्वर महादेव त्यापैकीच एक. या शिवपिंडीच्या विशाल शाळूंकेवर बेलपान कोरलेले असल्याने महादेवास बेलेश्वर नावाने संबोधले जाऊ लागले. देवस्थानचा देऊळवाडाही राजांनीच बांधून दिलेला आहे.
तुकारामतीर्थ महाराज मूळचे सातारा जिल्ह्यातील कटगुम या गावाचे पुरंदरे घराण्यातील. महाराजांच्या मनात विरक्ती निर्माण झाली आणि ते देवाच्या शोधार्थ फिरत फिरत बेलेश्वर परीसरात आले. १६८८ साली त्यांनी या घनदाट अरण्यात तपश्चर्या केली. त्याकाळी ते मिळालेल्या भिक्षेतून गाय, कुत्रा यांना घास घालून देवास प्रसाद दाखवीत. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन श्रीदत्तात्रयांनी एकमुखी रुपात त्यांना दर्शन दिले. दत्तगुरूंच्या भेटीची खूण म्हणून श्रीदत्तात्रयांनी आपल्या हातातील काठी येथे रोवली. त्या काठीतून चिंचेचे झाड उगवले. या झाडाला दोन फांद्या फुटल्या. त्यातील एका फांदीचा पाला गोड तर दुसऱ्या फांदीचा पाला आंबट चवीचा आहे. हा दैवी चमत्कार असल्याचे भाविक सांगतात.
भाविक या चिंचेचा पाला प्रसाद म्हणून भक्षण करतात.
हे मंदिर गावापासून जवळ आहे. मंदिराच्या मार्गावर स्वागतकमान आहे. मंदिराला सुमारे २० फूट उंचीची किल्ल्यासारखी भासणारी तटबंदी आहे. या तटबंदीवर वरील बाजूला बाशिंगीं कठडा आहे. तटबंदीत असलेल्या मोठ्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर नक्षीकाम आहे व दोन्ही बाजूला द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वारातून काही पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. पायरी मार्गाच्या उजवीकडे तीन समाधीस्थळे आहेत. त्यातील दोन सती समाध्या तुलसी वृंदावन रूपात आहेत. समाध्यांच्या पलिकडे भाविकांना राहण्यासाठी ओवऱ्या आहेत.
पुढे दुसरी तटबंदी आहे. तटबंदीत वरच्या मजल्यावर नगारखाना असलेले दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारात आतील दोन्ही बाजूला पहारेकरी कक्ष व येथून वरील नगारखाना व तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारातून पुढे काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर डाव्या बाजूला चिंचेचे झाड आहे. श्रीदत्तात्रयांनी रोवलेल्या काठीतून हे झाड उगवले असल्याचे सांगितले जाते. पुढे दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात उजव्या बाजूला बारमाही पाणी असलेली प्राचीन दगडी बारव आहे. बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रांगणात तुकारामतीर्थ महाराजांचे समाधी मंदिर व बाजूला विठ्ठल-रुक्मणी मंदिर आहे. प्रांगणात सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.
पुढे बेलेश्वर मंदिराचा अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात बाह्य बाजूने भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत. या कक्षासनांत बारा अर्धस्तंभ आहेत. सभामंडपात मध्यभागी सहा पूर्णस्तंभ आहेत. चौकोनी आकाराचे स्तंभ रूंद स्तंभपादावर उभे आहेत. पुढे तीन गर्भगृहे आहेत. सर्व गर्भगृहांच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूस द्वारपाल चित्रे रंगवलेली आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेच्या नक्षी व ललाटबिंबांवर गणेश मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीतील देवकोष्टकांतही गणेश मूर्ती आहेत. उजव्या बाजूला असलेल्या बेलेश्वरच्या गर्भगृहात जमिनीवर शिवपिंडी आहे.
शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग व छताला टांगलेले अभिषेकपात्र आहे. मधल्या गर्भगृहात वज्रपिठावर रेणूका देवीचा तांदळा आहे. देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट, अंगावर विविध वस्त्रे व अलंकार आहेत. डाव्या बाजूच्या गर्भगृहात एकमुखी दत्तात्रयांची द्विभुज मूर्ती आहे. तीनही गर्भगृहांत हवा येण्यासाठी वातायने आहेत. मंडोवरावर देवकोष्टकांत गणपती मूर्ती व भिंतीवर उठाव शैलीतील चक्रनक्षी आहेत.
मंदिराच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या मार्गावर मागील बाजूस तुकारामतीर्थ महाराजांची तपस्या गुहा आहे. असे सांगितले जाते की या गुहेतून आठ किमी अंतरावर असलेल्या खर्डा या गावापर्यंत भुयारी मार्ग होता व तुकारामतीर्थ महाराज येथून खर्ड्याला भिक्षा मागण्यासाठी जात असत. मंदिराच्या छतावर चहूबाजूने कठडा आहे. कठड्याच्या दर्शनी भिंतीवर रांगेने अनेक देवकोष्टके व त्यात मूर्ती आहेत. छतावर समोरील बाजूस चौथरे व त्यावर नंदीशिल्पे आहेत. छतावर चारही बाजूस चौकोनी लघू शिखरे व त्यावरील आमलकांवर कळस आहेत. तिन्ही गर्भगृहाच्या छतावर तीन मुख्य शिखरे आहेत. त्यातील चारही भिंतीवर देवकोष्टकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरांच्या शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहेत.
मंदिरापासून काही अंतरावर वासुदेव स्वामी यांची समाधी आहे. वासुदेव स्वामी तुकारामतीर्थ महाराजांची कीर्ती ऐकून येथे आले होते व ते तुकारामतीर्थ महाराजांचे शिष्यत्व पत्करून कायम येथेच राहीले. आषाढ वद्य द्वितीया सन १८३७ रोजी त्यांनी येथे संजीवन समाधी घेतली. या समाधीच्या बाजूला सच्चिदानंद स्वामी यांची समाधी आहे. ते काशीहून तुकारामतीर्थ महाराजांचे शिष्यत्व पत्करण्यासाठी येथे आले होते. त्यांनी श्रावण शुद्ध अष्टमी सन १८८५ रोजी संजीवन समाधी घेतली.
मंदिरात महाशिवरात्री, दत्त जयंती; तसेच चैत्र वद्य एकादशी हा तुकाराम तीर्थ स्वामींचा, आषाढ वद्य द्वितीया हा वासुदेव स्वामींचा व श्रावण शुद्ध अष्टमी हा सच्चिदानंद स्वामींचा समाधी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.