बसवेश्वर मंदिर

हिटणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर

इसवी सनाच्या बाराव्या शतकाच्या आरंभी जन्मलेले थोर बंडखोर संत, श्रेष्ठ कन्नड कवी, कळकळीचे समाजसुधारक आणि साक्षात्कारी योगी पुरूष महामानव बसवेश्वर यांचे प्राचीन मंदिर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील हिटणी या गावात आहे. बसवेश्वर हे उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रात प्रभावशाली असलेल्या लिंगायत अथवा वीरशैव या पंथाचे उद्‌गाते होत. बसवण्णा या नावानेही ओळखले जाणारे बसवेश्वर हे शिवगण असलेल्या नंदीचे एक रूप मानले जातात. अनेक मंदिरांप्रमाणेच या मंदिरातही बसवेश्वरांची नंदीस्वरूपात पूजा केली जाते

भारतीय साहित्याचे निर्मातेबसवेश्वर’ (एच. तिप्पेरुद्रस्वामी, अनुवाद रोहिणी तुकदेव, साहित्य अकादमी, २००३) या चरित्रग्रंथानुसार, बसवेश्वर यांचा जन्म .. ११३१ मध्ये कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वरबागेवाडी या गावात एका सुप्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात झाला. काही अभ्यासकांच्या मते हे जन्मसाल ११०५ असे आहे. त्यांचे वडिल मादिराज ऊर्फ मादरस हे बागेवाडी अग्रहाराचे प्रमुख होते. बसवेश्वरांच्या आईचे नाव मादलांबा असे होते. ती बागेवाडीच्या नंदीश्वर या ग्रामदेवतेची परमभक्त होती. अशी आख्यायिका सांगितली जाते की मादलांबा हिला एकदा स्वप्न पडले की महादेवाने नंदीला लोककल्याणाच्या हेतूने अवतार घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार नंदीने प्रकाशरूप धारण करून मादलांबाच्या गर्भात प्रवेश केला. यानंतर मादलांबा गर्भवती झाली. त्यामुळे बसवेश्वर यांना नंदीचा अवतार मानला जातो

बसवेश्वर यांच्या जन्मानंतर त्यांना कुडलसंगम येथील थोर शैव संत जातवेदमुनी तथा ईशान्य गुरू यांनी शुभाशीर्वादपर लिंगदीक्षा दिली होती. त्यांचे जन्माच्यावेळीच लिंगधारणेद्वारे उपनयन झाले असल्याने त्यांनी आपल्या मुंजीस विरोध केला. परंतु वडिलांनी मुंजीचा आग्रह धरल्याने त्यांनी घर सोडले. त्यावेळी ते वर्षांचे होते. तेथून ते कुडलसंगम येथे जातवेदमुनी यांच्या अध्ययनकेंद्रात गेले. जातवेदमुनी हे शैव धर्ममताच्या कालामुख पंथाचे गुरू होते. त्यांच्याकडून बसवेश्वर यांनी धर्मशिक्षण घेतले. आपल्या गुरूंच्या आग्रहाखातर त्यांनी तरूणपणी विवाह केला. त्यांचे मामा बलदेव हे कलचुरी घराण्याचे सामंत बिज्जल यांचे कोषाध्यक्ष होते. बलदेव यांची कन्या गंगांबिका आणि बिज्जलाची मानलेली बहिण नीलांबिका या दोघींशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर ते बिज्जलाची राजधानी मंगवाडा (मंगळवेढे) येथे राहू लागले. कालांतराने बिज्जलाने बंड पुकारून कल्याणच्या चालुक्य घराण्याचे राज्य ताब्यात घेतले. त्याच्या आग्रहावरून बसवेश्वर यांनी त्याच्या राज्याचे मंत्री (कोषाध्यक्ष) म्हणून जबाबदारी घेतली. याच काळात त्यांनी मोठे धार्मिक आणि सामाजिक कार्य केले. जात, संप्रदाय अथवा लिंगाधारित भेदभाव करता सर्वांना समान सामाजिक धार्मिक संधी खुल्या करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बसवेश्वर यांनी केले. त्यांनी स्त्रियांची धार्मिक शृंखलांतून मुक्तता केली. वेदांतील कर्मकांडाला त्यांनी कडाडून विरोध केला. शेकडो देवदेवतांच्या उपासनेवर टीका करून त्यांनी एकेश्वरवादाचा प्रसार केला. वीरशैव धर्माचे प्रेषित असलेल्या बसवेश्वरांचेलिंगैक्य’(निधन) .. ११६७ मध्ये झाले

हिटणी येथे हिरण्यकेशी नदीच्या काठावर नंदीस्वरूपातील बसवेश्वरांचे भव्य मंदिर वसलेले आहे. द्रविड स्थापत्य शैलीतील अत्यंत कलात्मक बांधणीचे हे मंदिर २०० वर्षांपूर्वीचे आहे, असे सांगितले जाते. भक्कम तटबंदी असलेल्या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर चौथरा त्यावर तीन थरांची अष्टकोनी दीपमाळा आहे. चौथऱ्यावर चारही बाजूस पानाफुलांची नक्षी आहे. या चौथऱ्याच्या वर आणखी एक लहान चौथरा आहे. त्यावर चारही कोपऱ्यांध्ये गजशिल्पे आहेत. याशिवाय येथे एक हनुमानाची मूर्ती आहे. या दीपमाळेत दीप प्रज्वलन करण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. वर्तुळाकार रिंगणाने दीपमाळेचे थर विभागलेले आहेत. त्यापुढे मंदिराचे तीनमजली दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडे ध्यानस्थ शंकराचे मोठे चित्र रेखाटलेले आहे.

द्वारशाखांवर खालील बाजूस कमळ फुलांची वर पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर गणपती विराजमान आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार अष्टकोनी स्तंभ त्यावर महिरपी कमान आहे. कमानीवर मध्यभागी कीर्तीमुख आहे. अष्टकोनी स्तंभांच्या बाजूला चौकोनी स्तंभ त्यात दीपकोष्टके आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस नगारखाना आहे. त्याच्या वरील मजल्यावर चार स्तंभ तीन कमानी असलेल्या सज्जात मध्यभागी शिव, पार्वती गणेश यांच्या मूर्ती आहेत. त्याच्या डाव्या बाजूला विष्णू उजव्या बाजूला ब्रम्हदेवाच्या मूर्ती आहेत. सज्जावर चार नक्षीदार स्तंभ असलेल्या तीन मेघडंबरी त्यांवर शिखरे आहेत

प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजुला पहारेकरी कक्ष आहेत. येथून मंदिराच्या दगडी फरसबंदी असलेल्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात तटबंदीला लागून धर्मशाळा आहे. मध्यभागी मंदिराची प्राचीन वास्तू आहे. मंदिर उंच जोत्यावर बांधलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी चार पायऱ्या आहेत. या पायऱ्यांसमोर जमिनीवर पितळी कासव आहे. पायऱ्यांच्या कठड्यावर दोन्ही बाजूंस काळ्या पाषाणातील दोन गजशिल्पे आहेत. प्रवेशद्वारास चार अष्टकोनी स्तंभ त्यावर तीन महिरपी कमानी आहेत. मधल्या कमानीवर दोन्ही बाजूस गरुड, हनुमंत मध्यभागी कीर्तीमुख आहेत. प्रवेशद्वाराच्या छताजवळी देवकोष्टकात शंकर, पार्वती गणेश यांच्या मूर्ती आहेत. दोन्ही बाजूच्या स्तंभांवरील देवकोष्टकांत द्वारपाल आहेत. सभामंडपाच्या बाह्य भिंतींच्या खालच्या बाजूस गजराज कोरलेले आहेत.

सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची संरचना आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा आहे. त्याच्या छतावर कमळ फुलांची नक्षी आहे. सभामंडपास मुख्य प्रवेशद्वाराव्यतिरिक्त आणखी दोन दारे आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार रजतपटलाने आच्छादित आहे. द्वारशाखेवर खाली कमळ, वरच्या बाजुला मयूरनक्षी पर्णलता आहेत. मंडारकावर (उंबरठ्यावर) स्वस्तिक ललाटबिंबावर गणपती आहे. गर्भगृहात मध्यभागी वज्रपीठावर नंदीची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. नंदीच्या शिंगांना चांदीच्या शिंगोळ्या मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. प्रभावळीच्या बाजुला नागमैथून शिल्प आहे. 

मंदिराच्या बाह्य भिंतीवर शिखर कळस असलेली देवकोष्टके आहेत. सभामंडपाच्या उजव्या डाव्या बाजूच्या बाह्य भिंतीवर प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ त्यावर कमानी आहेत. मंदिराच्या छताला चारही कोनांत दगडातून घडवलेल्या साखळ्या त्यात अडकवलेल्या घंटा आहेत. वीरशैव पंथातील मंदिरांचे हे एक वैशिष्ट्य मानले जाते. छताला कठडा त्यात चारही कोनांत नंदीशिल्पे आहेत. गर्भगृहाच्या छतावर सात थरांचे शिखर आहे. शिखरात खालच्या थरात आठ अर्ध गजशिल्प कमळ फुलांची नक्षी आहेत. त्यावरील थरात कमळ फुलाची प्रतिकृती, वरच्या दोन थरात प्रत्येकी आठ देवकोष्टके त्यात विविध ऋषी देवतांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक देवकोष्टकावर शिखर त्यावर कळस आहे. देवकोष्टकांस बाजूला असलेल्या स्तंभांवर देखील कळस आहेत. वरील तीन गोलाकार थरात प्रत्येकी २१ गोलाकार स्तंभ आहेत. वरच्या थरात आमलक त्यावर कळस आहे.

या मंदिरात महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते. या दिवशी पालखी मिरवणुकीने हजारो भाविक डोईवर कळशी घेऊन हिरण्यकेशी नदीच्या घाटावर जातात. तेथे गंगापूजन आरती करून कळशांमध्ये पाणी भरून मंदिराकडे येतात. नदीच्या पाण्याने नंदीस अभिषेक केला जातो. नंतर मंदिरातून सजीव नंदी सोबत नंदीची उत्सव मूर्ती पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत सुमारे ५० फूट उंच पाच थरांच्या रथाचा समावेश केला जातो. हा रथ भाविक आपल्या हाताने ओढतात. मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर होतो. निशाण नाचवत गुलालाची उधळण केली जाते. देवाच्या दर्शनासाठी आलेले लाखो भाविक रथयात्रा पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • गडहिंग्लजपासून १४ किमी, तर कोल्हापूरपासून ६७ किमी अंतरावर
  • गडहिंग्लज कोल्हापूरपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ७२४९०६०१०८
Back To Home