हिंदू पुराणांनुसार, जिथे भगवान शिव स्वतः प्रकाशाच्या स्वरूपात प्रकट झाले, ती ठिकाणे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखली जातात. ही केवळ मंदिरे नव्हेत, तर ती चैतन्याची आणि ऊर्जेची जागृत स्थाने आहेत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळेच शिवाच्या या तेजोरूप बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे. सोमनाथपासून केदारनाथपर्यंत देशभर पसरलेल्या या सर्व पवित्र स्थानांचे दर्शन सर्वांनाच शक्य होत नाही. मात्र, नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील मंदिरात या बाराही ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती एकाच छताखाली पाहता येतात. त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी संपूर्ण तीर्थयात्रेचे पुण्य अनुभवता येते, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.
हे मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीचे असावे, असे येथील ग्रामस्थ सांगतात. येथील प्राचीन हेमाडपंती शैलीचे बांधकाम पाहून मंदिराच्या प्राचीनत्वाची प्रचिती येते. या मंदिराची आख्यायिका अशी की रामायणाची रचना पूर्ण झाल्यानंतर वाल्मिकी ऋषी बारा ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भारत भ्रमण करीत येथे पोहोचले, तेव्हा महाशिवरात्री पर्व सुरू झाले होते. या पर्वात आपल्याला कोणत्याही ज्योतिर्लिंगाचे दर्शन होणार नाही, याचे त्यांना फार वाईट वाटले.
त्यामुळे त्यांनी माळरानात पडलेले बारा पाषाण एकत्रित केले व त्यातून बारा ज्योतिर्लिंगे स्थापून पूजा केली. वाल्मिकी ऋषींची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी ऋषींना दर्शन दिले व या बारा ज्योतिर्लिंगांत ते स्थापित झाले.
गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मोठी स्वागतकमान आहे. दोन्ही बाजूस दोन चौकोनी नक्षीदार स्तंभ महिरपी कमानीने जोडलेले आहेत. त्यावरील सज्जावर बाशिंग आहे. बाशिंगातील देवकोष्ठकात गणेशाची मूर्ती आहे, तर बाशिंगाच्या दोन्ही बाजूस महादेवाच्या मूर्ती आहेत. बाशिंगावर शीर्षभागी आमलक आणि त्यावर कळस आहे. येथून पुढे मंदिराच्या पेव्हर ब्लॉक आच्छादित प्रांगणात प्रवेश होतो. मंदिरासमोर लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असलेला दर्शनमंडप आहे. दर्शनमंडपापेक्षा मंदिराचे प्रवेशद्वार सुमारे सहा फूट उंच आहे. या प्रवेशद्वारासमोर सुमारे पाच फूट रुंद चौथरा आहे. चौथऱ्याभोवती स्टेनलेस स्टीलचा सुरक्षा कठडा आहे. उंच चौथऱ्यावर चढण्यासाठी आठ पायऱ्या आहेत. प्रवेशद्वारास रजतपटल आच्छादित नक्षीदार लाकडी झडपा आहेत. प्रवेशद्वाराच्या वर दर्शनी भिंतीत असलेल्या देवकोष्ठात गणेशाची मूर्ती आहे. देवकोष्ठाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार वामनस्तंभ व वर कळस आहे. सभामंडपाच्या मध्यभागी वज्रपीठावर नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपापेक्षा गर्भगृह सुमारे एक फूट खोलगट आहे, त्यामुळे आत जाण्यासाठी दोन पायऱ्या उतरून जावे लागते. गर्भगृहात मोठ्या वज्रपीठावर बारा ज्योतिर्लिंग शिवपिंडी आहेत. या सर्व शिवपिंडींवर जलधारा धरलेली बारा पितळी अभिषेकपात्रे छताला टांगलेली आहेत. वज्रपीठावर पितळी चतुर्मुख शिवलिंग मुखवटा आहे. गर्भगृहातील भिंतीत दोन देवकोष्ठके आहेत, त्यात गणपती व मारुती यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. या खिडक्यांना रजतपटल आच्छादित लाकडी झडपा आहेत. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी मागील बाजूला एक दरवाजा आहे. गर्भगृहाचे वितान घुमटाकार आहे, त्यात खालील बाजूस कमळफुलांच्या नक्षीचे रिंगण व वर उभ्या धारेची नक्षी आहे.
गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे गोलाकार शिखर आहे. या शिखरावरील पहिल्या दोन थरात प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यात देवप्रतिमा आहेत. तिसरा थर गोल घुमटाकार आहे आणि चौथ्या थरात कमळफुलांचे रिंगण आहे. पाचव्या निमुळत्या थरावर उभ्या धारेची नक्षी आहे. शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे.
मंदिरास लागून प्रशस्त सभागृह आहे, त्याचा वापर सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी केला जातो. मंदिराच्या परिसरात गोड्या पाण्याची विहीर आहे. ही बारा ज्योतिर्लिंगे याच विहिरीत सापडली असावीत, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सात दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. सातही दिवस मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद, जागरण आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते. माघ महिन्याच्या अमावस्येला देवाचा रथोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवाचा चतुर्मुख शिवलिंग मुखवटा रथात ठेवून ग्रामप्रदक्षिणा घातली जाते. रथ मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक भाविक येथे उपस्थित राहतात. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळत, देव ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिरात स्थापित केले जातात. वार्षिक उत्सवांच्या वेळी देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी हजारो भाविक मंदिरात उपस्थिती दर्शवतात. श्रावण मास, सर्व सोमवार, प्रदोष, पौर्णिमा, अमावस्या आदी दिवशी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.