महाराष्ट्राचे वर्णन करताना अनेकदा ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ असे म्हटले जाते. यातील चांदा म्हणजे चंद्रपूर आणि बांदा म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील गोव्याच्या सीमेकडील सर्वांत मोठी बाजारपेठ. मोठा ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि अनेक युद्धांचे प्रहार झेललेल्या या शहराचे बांदेश्वर हे ग्रामदैवत आहे. स्वयंभू बांदेश्वराचे भव्य आणि देखणे असे मंदिर येथे आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात साडेअकरा स्वयंभू लिंगे विराजमान आहेत. हे देवस्थान जागृत समजले जाते. ते असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
प्राचीन काळी तळकोकणातील एक महत्त्वाचे बंदर असलेल्या बांद्यास प्राचीन इतिहास आहे. यादव काळापासून बांदे या नावानेच ते ओळखले जाई. आदिलशाही कालखंडात या शहराचे नामांतर आदिलाबाद असे करण्यात आले होते. सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात या भागामध्ये मोठी अंदाधुंद माजली होती. पोर्तुगीज, विजयनगरचा रामराया तसेच निझामशहा विरोधात आदिलशहा असा संघर्ष सुरू होता. १९ सप्टेंबर १५४७ मध्ये या रामराया, निझाम व पोर्तुगीज यांच्यात आदिलशाहाविरोधात लढण्याचा करार झाला होता. त्यात जिंकलेला सर्व भाग विजयनगरला मिळेल, मात्र बांदा ते सिंताकोर या दरम्यानचा प्रदेश पोर्तुगीजांकडे जाईल, असे ठरले होते. या अशा युद्धग्रस्त कालखंडात, १५५० ते १५५३ या काळात बांदा येथील रानात एका शिवभक्ताला शिवलिंगे सापडली. नंतर त्यांचीच येथे स्थापना करण्यात आली व त्यास बांदेश्वर नाव देण्यात आले.
याबाबत अशी आख्यायिका आहे की सध्या बांदेश्वराचे मंदिर ज्या भागात वसले आहे तेथे पूर्वी जंगल होते. त्या रानात एक शिवभक्त शेतकरी आपली गुरे चारण्यासाठी येत असे. त्यावेळी त्याला तेथे ११ व एक अर्धवट तुटलेले अशी साडेअकरा शिवलिंगे सापडली. या आख्यायिकेचा एक पाठभेद असा आहे की हा शेतकरी गुरे चारावयास नेत असे. त्यावेळी त्याच्या लक्षात एक गोष्ट अशी आली की त्याची एक गाय घनदाट वृक्षराजी असलेल्या एका विशिष्ट ठिकाणी जाऊन पान्हा सोडते. त्याने ती गोष्ट गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी त्या जागेची पाहणी केली असता, त्यांना ही शिवलिंगे सापडली. तेव्हा सर्वांनी त्यांची पूजा करून, त्याच जागी एक मंदिर बांधले. तेच हे बांदेश्वराचे मंदिर होय. या शेतकऱ्याचे नाव नार जोग सावंत मोरया असे होते. जुन्या मंदिराच्या गाभाऱ्यात ‘श्री देव बांदेश्वर. नार जोग सावंत मोरया’ असा मजकूर असलेला शिलालेख होता.
बांद्यातील बाजारपेठेतून पिंपळेश्वर गणपतीच्या पारानजीकच्या चौकातील रस्त्यानजीक एका प्रशस्त अशा आवारात बांदेश्वराचे अत्यंत भव्य आणि देखणे असे मंदिर उभे आहे. मंदिराचे आवार रस्त्यापासून काही फूट उंचावर आहे. सात पायऱ्या चढून आवारात प्रवेश होतो. प्रवेशताच डाव्या बाजूस उंच व वरच्या बाजूस मंदिर शिखराचा आकार असलेला दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभावरील आमलकावर दीप लावण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे. येथेच बाजूस तुळशी वृंदावन आहे. आवारात समोर मंदिराचा गुलाबी पाषाणातील (पिंक स्टोन) मुखमंडप आहे. येथे कक्षासने आहेत. येथील चार मोठ्या स्तंभांवर मोठा घुमट आहे. त्यावर बसक्या आकाराचा आमलक आणि कळस आहे. या संपूर्ण मंदिराचे बांधकाम राजस्थानी ढोलपुरी दगडात करण्यात आले आहे, तर मंदिराच्या भूतलासाठी मकराना या संगमरवरी दगडाचा वापर केलेला आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे.
बंदिस्त प्रकारच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुख कोरलेले आहे. सभामंडपात मकराना संगमरवरी फरशांचा वापर अशा पद्धतीने करण्यात आला आहे की येथील भूतलावर काश्मिरी गालिचा अंथरल्यासारखे वाटते. कोरीवकाम केलेल्या कमानदार व जाळीदार खिडक्या, तसेच अंतराअंतरावर असलेली प्रवेशद्वारे यामुळे सभामंडपात भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा आहे. सुबक कोरीवकाम केलेले खांब हे या मंदिराचे एकूणच वैशिष्ट्य म्हणता येईल. प्रत्येक खांबावर तळापासून शीर्षस्थानापर्यंत कोरीव काम आहे. सभामंडपापेक्षा अंतराळ थोडा लहान असला तरी ती सभामंडपाचीच प्रतिकृती आहे. सभामंडप व अंतराळाचे छत गजपृष्ठाकार आहे.
अंतराळात डाव्या बाजूला तरंगकाठ्या ठेवलेल्या आहेत. अंतराळातून गर्भगृहाचा प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहासमोर सलग पाषाणात कोरलेली नंदीची मोठी मूर्ती आहे. मूर्तीची रचना, त्यावरील कोरीव काम यावरून ही मूर्ती प्राचीन असल्याचे स्पष्ट होते. गर्भगृहाच्या दर्शनीभिंतीवर सुंदर कोरीव काम केलेल्या व देव्हाऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या देवकोष्टकांत डावीकडे हनुमानाची तर उजवीकडे गणेशाची सुबक मूर्ती आहे. आत भूतलावर एका चौकोनी खोलगट भागात बांदेश्वराची पिंडी आहे. त्यास खेटूनच आणखी एक छोटी पिंडी आहे. या चौकोनी खोलगट भागावरील मुखलिंगाखाली नार जोग सावंत यास सापडलेली शिवलिंगे प्रतिष्ठापित केलेली आहेत. त्यावर अभिषेकपात्र आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या पवित्र विहिरीतून त्यात नळीद्वारे सतत पाणीपुरवठा केला जातो. भाविक या विहिरीतून पाणी शेंदून ते तेथे बसवलेल्या भांड्यात टाकत असतात. गर्भगृहातील दुसरी लहान शिवपिंडी हे बाणलिंग आहे व त्यावर पुष्पपत्रे वाहिली जातात. बांदेश्वराचे दर्शन घेतल्यावर प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूंनी मार्ग आहेत.
कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बांदेश्वर मंदिराच्या वास्तुरचनेचे एक वैशिष्ट्य हे येथील कोरीवकाम हे जसे आहे, तसेच त्या मंदिरावर असलेले कळस हेही आहे. मंदिराच्या मुखमंडपापासून अंतराळापर्यंतच्या गजपृष्ठाकार छताच्या दोन्ही बाजूंस १२–१२ बसके आमलक व त्यावर कळस अशा प्रकारची शिखरे आहेत. त्याच प्रमाणे छताच्या मध्यभागी एका रांगेत एकूण ४० कळस बसवण्यात आले आहेत. गर्भगृहाच्या उंच अष्टकोनी शिखरावरील घुमटाकार आमलकावर कळस आहे.
बांदेश्वराची पालखी प्रदक्षिणा रोज असते आणि भजनाचाही कार्यक्रम असतो. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तिन्ही राज्यांमधून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. गुढीपाडवा, नारळी पौर्णिमा, हनुमान जयंती, नरक चतुर्दशी, देव दिवाळी, होळी, महाशिवरात्र, नवरात्रोत्सव या सणांना मंदिरात भाविक गर्दी करतात.
बांदेश्वर मंदिराच्या शेजारी भूमिका देवीचे मंदिर आहे. भूमिका देवी ही बांदा गावची ग्रामदेवता आहे. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार, बांदा या गावात पूर्वी देवकोंड नावाचा भाग होता. आता हा भाग येथून जाणाऱ्या मुंबई–गोवा महामार्गाच्या परिसरात आहे. तेथे बांद्याच्या ग्रामदेवता व परिवार देवतांचे स्थान होते. बांदेश्वराचे स्वयंभू लिंग सापडल्यानंतर सर्व देव एकाच जागी असावेत या हेतूने १७५३ मध्ये देवकोंडातील देवतांची स्थापना बांदेश्वराजवळ करून येथे शिव पंचायतन स्वरूपात मंदिर बांधले गेले. तेव्हापासून हे मंदिर श्री बांदेश्वर भूमिका पंचायतन अशा नावाने ओळखले जाते.
भूमिका देवीच्या मंदिरात दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदेच्या पहाटे देवीला महास्नान घालण्यात येते. वस्त्रालंकाराने देवीला सजविले जाते. पाच मानाच्या वरसलदारांकडून पाच फळांनी देवीची ओटी भरली जाते. त्यानंतर माहेरवाशिणी देवीची ओटी भरतात. नवस फेडणे आणि नवस करणे हा कार्यक्रम चालू असतो. त्यादिवशी बांदेश्वर व भूमिका देवी यांची एकत्र पालखी प्रदक्षिणा होते. इतर वेळी केवळ बांदेश्वराचीच पालखी प्रदक्षिणा दर सोमवारी होत असते. एकत्रित पालखी प्रदक्षिणेनंतर रात्री दशावताराचा कार्यक्रम होतो. दुसऱ्या दिवशी दहीकाला असतो. दहीकाल्यानंतर पालखीतून देवतांना नदीवर नेण्यात येते. येताना देवांना धन, फळ व इतर खाद्यपदार्थ अर्पण केले जातात. मंदिरात आल्यावर मोठ्या भक्तिभावाने आराधना करून देवीला स्थानापन्न करण्यात येते. भूमिका देवीच्या जवळच गणपती, रवळनाथ व वेताळ यांची मंदिरे आहेत. रवळनाथालाही यात्रेत कौल लावला जातो. ही चार मंदिरे व श्री बांदेश्वर यामुळे ‘शिव पंचायतन’ अशी मंदिराची रचना आहे. बांदा गावामध्ये संत सोहिरोबा यांचे स्मृती मंदिर आहे, तसेच पूर्वीच्या डच वखारीमध्ये, जेथे आता पोलिस ठाणे आहे तेथे पाटेश्वराचे मंदिर आहे.