राक्षसांचा संहार करून भक्तांचे रक्षण करणारी परमदयाळू देवी म्हणून बनशंकरी देवीची पूजा केली जाते. बनात राहते म्हणून बनशंकरी या नावाने ती ओळखली जाते. महाभारतामध्ये अर्जुनाने युद्धापूर्वी केलेल्या देवीस्तुतीत तिला ‘दुर्गा कान्तारवासिनी’ असे म्हटले आहे. बनशंकरी ही देवी म्हणजेच शाकंभरी, असेही सांगितले जाते. बनशंकरी देवीचे मूळ स्थान कर्नाटकातील बदामी येथे आहे व ती चालुक्य राजघराण्याची कुलदेवता आहे. या देवीची मंदिरे संपूर्ण भारतभर आहेत. यापैकीच एक महत्त्वाचे स्थान जत तालुक्यातील बनाली गावी आहे.
‘करवीर माहात्म्य’ तसेच अन्य पौराणिक आख्यायिकांनुसार बनशंकरी ही देवी श्रीजगदंबेचा अवतार आहे. अगस्ती ऋषींनी करवीर येथे येऊन महालक्ष्मीची आराधना सुरू केली. त्यावेळी प्रसन्न झालेल्या देवीने त्यांना असे सांगितले की ‘माझ्या येथील क्षेत्राप्रमाणेच दक्षिणेला तिलकवनात तुम्ही जावे आणि श्रीशंकरी (बनशंकरी) क्षेत्री जगाच्या कल्याणाच्या हेतूने राहावे.’ (विद्यते शंकरीक्षेत्रं तिलकारण्यमध्यगं। तत्र वासस्तथा कार्यो जगत्कल्याणहेतवे।।) हे तिलकवन कर्नाटकमध्ये आहे. असे सांगतात की या भागात पूर्वी १०० वर्षांचा दुष्काळ पडला होता. तेव्हा देवीने पाताळातून आलेल्या पाण्यावर तेथे झाडेझुडुपे आणि भाजीपाला तयार केला. ते पाहून दैत्यांनी त्या क्षेत्राची नासधूस करण्यास सुरूवात केली. तेव्हा देवीने व्याघ्रारूढ होऊन आपल्या नऊ कोटी सख्यांसह दैत्यांवर चाल केली व त्यांचा निःपात केला.
देवीने आपल्या देहातून शाकभाजी निर्माण करून, तसेच पाताळातील हरिद्रातीर्थातून पाणी आणून लोकांचे प्राण वाचवले म्हणून तिला ‘शाकंभरी’ (शाकान् विभर्ती इति शाकंभरी) असे नाव पडले. ही देवी वनात राहिली म्हणून तिला वनशंकरी वा बनशंकरी असे नाव प्राप्त झाले. बनशंकरी देवीने दुर्गमानसुर तसेच शंभासुर नावाच्या दैत्याचा वध केला असा उल्लेख स्कंद, पद्म आदी पुराणांत आहे. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथील बनशंकरी देवीच्या मूळ स्थानी चालुक्य राजांनी सातव्या शतकात भव्य मंदिर बांधले. बदामीचे चालुक्य बनशंकरीची पूजा शक्तीरूपात करीत असत.
या देवीच्या बनाली येथील मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगण्यात येते की या भागातील शेगाव गावातील एक भक्त नित्यनेमाने बदामी येथे देवीदर्शनासाठी जात असे. पुढे वृद्धापकाळामुळे त्याला बदामी येथे जाणे शक्य होत नव्हते. तेव्हा त्याने देवीला आपल्यासोबत शेगाव येथे येण्याची विनंती केली. देवीने त्याची विनंती मान्य करून त्याच्यासोबत येण्यास संमती दाखविली. परंतु चालताना मागे पाहायचे नाही, अशी अट देवीने त्याला घातली. ती अट मान्य करून भक्त पुढे व देवी मागे असे चालू लागले. बनाली गावाजवळ पोहोचल्यावर भक्ताचा विश्वास डळमळीत झाला व त्याने देवी आपल्या मागे येते की नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी मूर्तीरूपात येथे स्थिर झाली. पुढे बनाली येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी मंदिर बांधले.
हे मंदिर चारशे ते पाचशे वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाहेर पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेला प्रशस्त वाहनतळ आहे. वाहनतळासमोर चौथरा व त्यावर तीन थरांची दीपमाळ आहे. दीपमाळेचे थर वर्तुळाकार रिंगणाने विभागलेले आहेत. दीपमाळेच्या बाजुला तुलसी वृंदावन आहे. मंदिराभोवती असलेल्या आवारभिंतीला चारही दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूस असलेल्या प्रवेशद्वारास तीन द्वारशाखा, दोन्ही बाजूस स्तंभ व त्यावर सज्जा आहे. सज्जात सात दीपकोष्टके व त्यावरील भागात मध्यभागी ओम् चिन्ह व दोन्ही बाजूस पानाफुलांची उठाव शैलीतील नक्षी आहे. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात एका चौथऱ्यावर शिवपिंडी आहे. हे कुण्या महापुरुषाचे समाधीस्थळ असल्याचे सांगितले जाते.
मंदिराच्या समोरील मुख्य प्रवेशद्वारासामोर काही समाध्या व चौथऱ्यावर प्राचीन शिवपिंडी आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दगडी बांधणीचे आहे व उंचावर असल्यामुळे पाच पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस चौथरे व स्तंभ आहेत. आतील बाजूस पहारेकरी कक्ष आहेत. या प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात दोन्ही बाजूस प्रत्येकी चार चौकोनी स्तंभ आहेत. स्तंभांवर कणी व त्यावर अर्ध चंद्राकार हस्त आहेत. हस्तांवर तुळई व तुळईवर छत आहे. सभामंडपापेक्षा अंतराळ काहीसे उंच आहे. अंतराळात दर्शनी बाजूस चार स्तंभ, स्तंभांवर कणी व कणीवर कमानी आहेत. स्तंभांना जाळीदार झडपा लावलेल्या आहेत. अंतराळात मध्यभागी कासव शिल्प आहे. पुढे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासामोर मेजावर देवीच्या रजत पादुका आहेत. भाविकांना येथूनच गर्भगृहातील देवीचे दर्शन घ्यावे लागते.
अंतराळापेक्षा गर्भगृह उंचावर आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर स्तंभनक्षी व ललाटबिंबावर कमळ फुलाची नक्षी आहे. गर्भगृहातील वज्रपीठावर असलेल्या देवीच्या पाषाणमूर्तीस चांदीचा मुखवटा, विविध वस्त्रे व अलंकार परिधान केलेले आहेत. मूर्तीच्या पायाजवळ चांदीचे मुखवटे व काही पाषाण आहेत. मूर्तीच्या दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ, त्यावरील प्रभावळीवर मध्यभागी कीर्तिमुख व दोन्ही बाजूस पर्णलता नक्षी आहे. बंदिस्त गर्भगृहात हवा येण्यासाठी गवाक्षे आहेत.
गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे गोलाकार शिखर आहे. शिखराच्या पायाला कमळदल नक्षींचे रिंगण व वरील निमुळत्या होत गेलेल्या भागावर उभ्या धारेची नक्षी आहे. शिखर ग्रिव्हेवर वर्तुळाकार रिंगण आहे व त्यावरील थर मोदकाच्या आकारात आहे. शिखरात शीर्षभागी आमलक व त्यावर कळस आहे. शिखराच्या भोवती चारही कोनांवर लघु शिखरे, त्यावर आमलक व कळस आहेत. मंदिराच्या प्रांगणात आवारभिंतीलगत भक्तनिवास आहे. बाजूला असलेल्या मंदिरात शिवपिंडी व मागील भिंतीजवळ पार्वतीची प्राचीन मूर्ती आहे. शिवमंदिराच्या बाजूला जेठ्याप्पा देवाचे मंदिर आहे. मंदिरात वज्रपिठावर रक्षकदेवाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. बाजूच्या कक्षात देवस्थान ट्रस्टचे कार्यालय आहे. त्याशेजारी येथील स्थानिक देवता ‘मावशी’चे मंदिर आहे. मंदिर प्रांगणात असलेल्या मंगल कार्यालयात विवाह व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
मंदिराच्या अवतीभवती घनदाट जंगल म्हणजे बन आहे. या बनात आंबा, चिंच, जांभूळ अशी फळझाडे आहेत. देवी या बनात विहार करते, अशी मान्यता आहे. मंदिरात अश्विन नवरात्रोत्स मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. अष्टमीच्या दिवशी देवीचा वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी देवीचा पालखी सोहळा साजरा केला जातो. मंदिरात तीन दिवस भाकणुकीचा कार्यक्रम होतो. नवरात्रीचे नऊ दिवस भजन, किर्तन, जागरण, गोंधळ आदी कार्यक्रम होतात. नवव्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. चैत्र नवरात्री व शारदीय नवरात्रीदरम्यान मंदिरात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.