अध्यात्माचा थोर वारसा लाभलेल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक थोर संत-महात्मे होऊन गेले. आधुनिक काळातही या भूमीमध्ये संत-महात्म्यांचे अवतार होत आहेत. त्याच मांदियाळीतील एक साक्षात्कारी आणि चमत्कारी संत पुरुष म्हणजे संत बाळूमामा. ‘मी आहे म्हणणाऱ्याला आहे, नाही म्हणणाऱ्याला नाही’, असा रोखठोक आस्तिक्यवाद सांगणारे बाळूमामा धनगर समाजात जन्मले; परंतु आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर परराज्यांतीलही सर्व जातीसमुदायांच्या लोकांत त्यांचे हजारो भक्त आहेत. संत बाळूमामा यांच्या आदमापूरमधील भव्य अशा समाधी मंदिरात रोज हजारो भाविक नतमस्तक होण्यासाठी येत असतात.
महाराष्ट्रात ज्या काळात शेगावचे गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, गुलाबराव महाराज, भगवानबाबा यांच्यासारखे चमत्कारी, साक्षात्कारी पुरुष वावरत होते, त्याच काळात येथे बाळूमामा यांचा जन्म झाला. ते १८ वर्षांचे असताना शेगावचे गजानन महाराज यांनी आपले अवतारकार्य समाप्त केले. सातारा जिल्ह्यातील गोंदवल्याचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, माणगावचे टेंबे स्वामी, पैजारवाडीचे चिले महाराज हे त्यांचे समकालीन चमत्कारी संत होत. संपूर्ण देश ब्रिटिश सत्तेच्या टाचांखाली रगडला जात असतानाच्या गुलामीच्या कठीण काळात अवतार घेतलेल्या या संतांनी येथे भावभक्तीचा मळा फुलवून अनेकांना सन्मार्गास लावले. बाळूमामा हे याच संतांच्या मालिकेतील एक थोर संत गणले जातात.
भारतमातेचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत जाऊन हिंदू धर्माची पताका फडकवली, त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे १८९२ मध्ये ३ ऑक्टोबर रोजी (सोमवार, अश्विन शुद्ध द्वादशी शके १८१४) बाळूमामा यांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘रिव्ह्यू ऑफ लिटरेचर’मधील वर्षा चव्हाण या संशोधिकेने प्रसिद्ध केलेल्या ‘श्रीक्षेत्र आदमपूर – ए स्टडी ऑफ ए पिलग्रिम सेंटर’ या संशोधनपर निबंधात बाळूमामा यांच्या इतिहासाच्या काही महत्त्वाच्या नोंदी आहेत. त्यानुसार बाळूमामा यांचे पूर्वज हे देसाई घराण्यातील होते. या घराण्यातील एका व्यक्तीला इ.स. ११५६ मध्ये विजापूर नजीकच्या तोरवी या गावची पाटीलकी मिळाली. त्या कुटुंबाचे वारस नंतर बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील आरभावी येथे स्थलांतरित झाले. त्यांना तेथील पाटीलकी मिळाली होती. तेथील मारुती मंदिराच्या पूजेचे अधिकार त्यांच्याकडे होते. इ.स. १६५६ मध्ये ते कुटुंब अक्कोळ येथे स्थलांतरित झाले. त्या काळात त्यांना आरभावे आणि अरबाळे अशी आडनावे मिळाली.
याच घराण्यातील मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यभामा या सत्शील दाम्पत्याच्या पोटी बाळूमामा यांचा अवतार झाला. असे सांगतात की बालपणी ते एकांतप्रिय, गंभीर प्रवृत्तीचे आणि प्रसंगी अवधूत वृत्तीचे होते. त्यांना कामात गुंतवण्यासाठी त्यांच्या माता-पित्याने त्यांना चंदुलालशेठ जैन यांच्या घरी गुरे राखण्याच्या कामी ठेवले होते. तेथे त्यांना जेवणासाठी दिलेल्या ताटात चंदुलालशेठच्या पत्नीला जैन मंदिराचे दर्शन घडले. त्यामुळे तिने ती थाळी स्वतःकडे ठेवून घेतली. बाळूमामा यांना ते न पटल्याने त्यांनी ते काम सोडले. यानंतर बाळूमामा यांना त्यांची बहीण गंगुबाई हिऱ्याप्पा खिलारे हिच्या घरी पाठवण्यात आले. तेथे त्यांची भाचरे त्यांना मामा म्हणत. त्यामुळे ते सर्वांचेच मामा झाले. वयाच्या साधारणतः विसाव्या वर्षी बाळूमामांचा विवाह त्यांची भाची सत्यव्वा हिच्याशी झाला. पसंत नसताना, केवळ माता-पित्याच्या आग्रहामुळे त्यांना हे लग्न करावे लागले. मात्र त्यांचे मन संसारात रमत नव्हते. त्यांचा ओढा परमार्थाकडे होता. अशात एके दिवशी नेहमीप्रमाणे मेंढ्या चरायला नेल्या असता, बाळूमामा यांची भेट मुळे महाराजांशी झाली. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथील बाळकृष्ण जयराम मुळे महाराज हे एक निःसंग सत्पुरुष होते. त्यांनी बाळूमामांना अनुग्रह दिला. त्या दिवसापासून बाळूमामा यांचे जीवन बदलून गेले. त्यांनी संसारत्याग केला व परमार्थाची खडतर वाट अंगिकारली. हळूहळू त्यांची शिकवण, त्यांनी केलेले चमत्कार, त्यांची पुढे खरी ठरलेली भाकिते यांमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. भक्तांची अशी श्रद्धा आहे की त्यांना वाचासिद्धी प्राप्त होती.
स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा सदरा, डोईस रूमाल, खांद्यावर कांबळे, पायांत वहाणा, हातात धनगरी काठी अशी बाळूमामांची वेशभूषा होती. त्यांचा वर्ण सावळा होता. शरीरयष्टी सडपातळ होती. ते कानडी व मराठी या भाषांत बोलत असत. आपल्या मेंढ्यांचा कळप घेत ते कर्नाटक तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी फिरत असत. संचारी संत म्हणून ते ओळखले जाऊ लागले. या फिरतीत त्यांनी अनेक ठिकाणी भक्तांच्या कल्याणासाठी चमत्कार घडवले. असंख्य लोकांना परमार्थाची वाट दाखवली. अन्नदान हे पवित्रदान असल्याने त्यांनी १९३२ सालापासून ‘भंडारा उत्सव’ सुरू केला. बाळूमामा यांच्या समाधीनंतरही आदमापूर येथे हा उत्सव सुरू आहे. आदमापूर येथील मार्गुबाई मंदिरात बाळूमामा आपला बराच वेळ व्यतीत करीत असत. याच मंदिरात वयाच्या ७४ व्या वर्षी, ४ सप्टेंबर १९६६ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले. कालांतराने याच गावात त्यांचे भव्य असे समाधी मंदिर बांधण्यात आले.
बाळूमामांच्या येथील मंदिराबाबतची आख्यायिका अशी की बाळूमामांनी समाधी घेतली त्याच्या काही दिवस आधी त्यांची काही निकटची भक्तमंडळी व अनुयायी एकत्र आले व त्यांनी बाळूमामांचे मंदिर बांधण्याचे ठरवले. त्याकरीता त्यांनी काही पैसे जमवले; परंतु बाळूमामांना लोकांकडून पैसे जमा करून मंदिर बांधणे पसंत नव्हते. तेव्हा त्यांनी आपल्या त्या भक्तांना ते पैसे ज्यांच्याकडून आले त्यांना-त्यांना ते परत करण्यास सांगितले. भक्तांनीही बाळूमामांची आज्ञा पाळली. बाळूमामा इहलोकातून गेल्यानंतर बाळूमामांच्या स्वतःच्या पैशाने येथे समाधी मंदिर उभारण्यात आले. अर्थात काही भक्तांनी स्वेच्छेने दिलेल्या देणग्या त्यासाठी वापरण्यात आल्या.
आदमापूरमधील विस्तीर्ण अशा भूखंडावर हे समाधी मंदिर उभे आहे. दोन्ही बाजूला येथे रोज येणाऱ्या हजारो भक्तांच्या निवाऱ्यासाठी लोखंडी खांबांवर बांधलेले पत्र्याचे दोन प्रशस्त मंडप आणि मधोमध बाळूमामांचे भव्य आणि देखणे असे मंदिर अशी येथील रचना आहे.
मंदिराच्या प्रांगणात सर्वत्र संगमरवरी फरसबंदी आहे. आत प्रवेश करताच समोरच दिसतो तो पिंपळाच्या जुन्या झाडाखाली बांधलेला पार. या पाराच्या वरच्या बाजूस भिंतीवर भाविकजन नाणी चिकटवतात. नाणे चिकटल्यास मनातील इच्छा पूर्ण होणार, अशी लोकांची श्रद्धा आहे. येथून काही अंतरावर समोरच्या बाजूस समाधी मंदिर आहे. मंदिराची वास्तू पूर्णतः संगमरवरात बांधलेली आहे. त्यावर गुर्जर स्थापत्यशैलीचा स्पष्ट प्रभाव आहे. मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराचे शिखर मराठा वास्तुशैलीतील आहे. गोलाकार व वर निमुळते असे हे शिखर पाच स्तरीय आहे. खालील चारही स्तरांवरील देवकोष्टकांत विविध देवी-देवतांच्या आणि संतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. पाचवा स्तर आमलकाचा. घुमटाकार आकारावर कमळपाकळ्यांत आमलक अशी त्याची रचना आहे. त्यावर कळस आहे.
मुखमंडप, तसेच सभामंडपात बारीक नक्षीकाम केलेले स्तंभ आहेत. स्तंभांवरील सूरसुंदरींची शिल्पे, मकरतोरणे, गजप्रतिमा, द्वारपालांची शिल्पे, भिंतींवरील, छतावरील विविध प्रकारची नक्षी यांमुळे हे मंदिर शोभायमान झाले आहे. येथे मुखमंडपाच्या सोपानाच्या कठड्यांवर दोन संगमरवरी हत्ती आहेत. शिवाय मुखमंडपाच्या दोन्ही बाजूला पूर्णाकार गजपुतळे आहेत. धनगरी जीवनात अश्व आणि मेंढे यांना महत्त्वाचे स्थान. त्यांचे पुतळेही येथे ठेवलेले आहेत. येथे मुखमंडपाऐवजी बाजूच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. बाळूमामांच्या दर्शनासाठी रोज हजारो लोक येत असतात. त्याशिवाय यात्रा व अन्य उत्सव काळात येथे लाखोंच्या संख्येने गर्दी होत असते. तिच्या नियोजनासाठी येथे मोठी दर्शनरांग बांधण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच मुखमंडपाऐवजी डावीकडील प्रवेशद्वारातून सभामंडपात प्रवेश देण्यात येतो.
मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. मंडपाच्या भिंतीना जाळीदार गवाक्षे आहेत. त्यामुळे येथे भरपूर प्रकाश आणि खेळती हवा असते. येथील गर्दीचा विचार करूनच ही सोय करण्यात आलेली आहे. गर्भगृहात बाळूमामांची समाधी आहे व त्यावर त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत. समोर खडावा आहेत. तेथेच उंच अधिष्ठानावरील मोठ्या संगमरवरी देव्हाऱ्यामध्ये बाळूमामांची मूर्ती आहे. अंगात पैरण, धोतर, लाल मुंडासे, खांद्यावर कांबळे, मांडी घातलेली, दोन्ही हात मांडीवर अशी ही प्रसन्न मूर्ती आहे. त्यांच्या एका बाजूस सद्गुरू मुळे महाराज यांची, तर दुसऱ्या बाजूस विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आहे. या मूर्तींच्या पाठीमागे सोनेरी पत्रा चढवलेले व आकर्षक नक्षीकाम असलेले मखर आहे. येथे दर्शन घेऊन उजवीकडील द्वाराने बाहेर पडल्यानंतर एका औदुंबराच्या झाडाखाली दत्ताचे मंदिर आहे.
मंदिर परिसरात बाळूमामांनी वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे. हे भाविकांच्या आकर्षणाचे एक केंद्र आहे. याशिवाय येथे मंदिर विश्वस्त संस्थेतर्फे भव्य इस्पितळ, तसेच भक्त निवासही बांधण्यात आला आहे. रोज असंख्य लोक त्याचा लाभ घेतात.
बाळूमामा समाधी मंदिरात रोज पहाटे ५ वाजता पूजा व आरती होते. सकाळी ९ वाजता नैवेद्य आणि त्यानंतर सायंकाळी ७ ते ७.३० दरम्यान आरती व नैवेद्य होतो. येथे दर महिन्याच्या अमावस्येला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्या दिवशी येथे भाविकांना प्रसाद म्हणून आंबील दिले जाते. तसेच आमटी-भात आणि खिरीचा प्रसादही दिला जातो. मंदिरात बाळूमामा जयंती (अश्विन शुद्ध द्वादशी) व पुण्यतिथी (श्रावण वद्य चतुर्थी), भाद्रपद अमावस्या, एकादशी या दिवशी मोठे धार्मिक उत्सव होतात. दिवाळी पाडव्याला येथील मार्गुबाई मंदिराजवळ मेंढ्यांच्या लेंड्यांचा ढीग केला जातो. त्याची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते. या दिवशी मेंढ्यांची पूजा केली जाते. मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव म्हणजे गुढीपाडव्याला होणारा भंडारा महोत्सव. या दिवशी येथे विविध गावांतून दिंड्या येतात. ‘बालुमामाचा नवणे चांगभला’ (बाळुमामाच्या नावाने चांगभले) असा जप करीत येणारे लाखो भाविक, भंडाऱ्याची उधळण, कीर्तन, भजन, पालखी सोहळा, धनगरी ढोल-कैताणाचा निनाद, लेझीम, दांडपट्ट्याचे खेळ, बाळूमामांच्या घोड्याची मिरवणूक असा हा जल्लोषी कार्यक्रम असतो.