बल्लाळ देवी मंदिर

अमडापूर, ता. चिखली, जि. बुलडाणा

विदर्भाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवात अमडापूर येथील श्री बल्लाळ देवी मंदिराला मानाचे स्थान आहे. चिखली तालुक्यातील एका निसर्गरम्य टेकडीवर वसलेले हे जागृत शक्तिपीठ पांडवकालीन मानले जाते. लोकश्रद्धेनुसार, अज्ञातवासाच्या काळात महाबली भीमाने येथे देवीच्या ५१ फूट उंच भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. आजही मंदिर परिसरात आढळणारी ६ फूट लांबीची पावले आणि विशाल तलवारीची मूठ या प्राचीन दंतकथेची तसेच मूर्तीच्या भव्यतेची साक्ष देतात. यादवकाळात ‘अन्वरापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावातील मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती संभाजी महाराज यांचे सरदार खंडोबल्लाळ यांनी केला. त्यामुळे या देवीला ‘बल्लाळ देवी’ हे नाव प्राप्त झाले.

चिखली-खामगाव-देवरी या राज्य महामार्गावरील अमडापूर-लव्हाळा मार्गावर अमडापूर हे गाव आहे. गावाच्या दक्षिण दिशेला सुमारे ७५० मीटरवर स्थित एका छोट्या टेकडीवर देवीचे हे मंदिर वसले आहे. टेकडीच्या पायथ्याशी देखील एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये असलेल्या शिलालेखानुसार भाईदेवाचा पुत्र मंगल आणि अमडापूरचा रहिवासी पेदुमनसेठी यांनी या मंदिरासाठी तोरण बांधून दिले. हा शिलालेख शके ११३३ मधील (इ.स. १२११-१२) म्हणजेच देवगिरीचा यादव नृपती सिंघणदेव याच्या काळातील आहे. त्यात या गावाचा उल्लेख ‘अन्वरापूर’ असा आहे, असे गॅझेटिअरमध्ये नमूद आहे.

हे मंदिर विदर्भातील जगदंबा मातेच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अमडापूर येथील कमाविसदार खंडोबल्लाळ यांनी सर्वप्रथम या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे या देवीला ‘बल्लाळी देवी’ हे नाव पडले. पूर्वी गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीतून जगदंबा देवीचे दर्शन घेता येईल, अशा पद्धतीने लाल शेंदराचे लेपन करण्यात आलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मूळ मूर्तीवर खूप शेंदूर लावल्याने १९६२ मध्ये या मूर्तीजवळ अष्टादशभुजा (अठरा हातांच्या) देवीच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे ‘बुलडाणा जिल्हा गॅझेटिअर’मध्ये नमूद आहे. यादव माधव काळे लिखित ‘वऱ्हाडचा इतिहास’ या पुस्तकातही या मंदिराचा उल्लेख आढळतो.

काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या परिसरात घनदाट जंगल होते. भाविक केवळ दिवसा येथे दर्शनासाठी येत असत. परिसरात अनेक जंगली श्वापदे असल्याने रात्रीच्या वेळी येथे येण्याचे लोक टाळत असत. १९८४ मध्ये गावातील तेजराव रंगराव देशमुख यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ट्रस्ट स्थापन केला. त्यानंतर या परिसराची स्वच्छता करून या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार केला आणि मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. राज्य सरकारने या मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा दिला आहे.

बल्लाळ देवीचे मंदिर असलेल्या टेकडीवर चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. नव्याने खासगी वाहने जाऊ शकतील अशी पक्की सडकही तयार करण्यात आली आहे. पायरी मार्ग संपल्यावर प्रांगणात दोन्हीकडे लहान-लहान मंदिरे आहेत. तेथून मुख्य मंदिराकडे येण्यासाठी पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेली मार्गिका आहे. या मार्गिकेवर दोन्ही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. मार्गिकेच्या दोन्ही बाजूंना अनेक प्राचीन मूर्तींचे दर्शन घडते. त्यात सूर्य व चंद्रांच्या मूर्तींचाही समावेश आहे. गावात झालेल्या उत्खननादरम्यान अनेक प्राचीन मूर्ती सापडल्या. या मूर्तींचे येथे जतन करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील बालाजी तसेच कालभैरव मंदिरातील मूर्तीही उत्खननादरम्यान सापडल्या होत्या. मंदिर परिसरात खंडोबाचेही मंदिर आहे. याच ठिकाणी एका चौथऱ्यावर सहा फूट लांबीची पाषाणी पावले आणि सहा फूट घेराची तलवारीची मूठ आहे. पांडवकाळात येथे ५१ फूट उंचीची देवीची मूर्ती होती, अशी आख्यायिका आहे.

बल्लाळ देवीच्या मंदिरासमोर दोन मोठे दीपस्तंभ आहेत. या दीपस्तंभांच्या वरील बाजूस मेघडंबरीप्रमाणे आकार आहे. दीपस्तंभांच्या मध्यभागी हवनकुंड आणि दोन वाघांची शिल्पे आहेत. खुला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. भव्य सभामंडपात, अंतराळाच्या दर्शनी भिंतीवर डावीकडे असलेल्या मोठ्या देवकोष्ठकात शिवशंकरांची मूर्ती व उजवीकडील देवकोष्ठकात गणपतीची मूर्ती आहे. अंतराळाला कमानीच्या आकाराचे प्रवेशद्वार आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना दीपकोष्ठके आहेत. या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवरील भागात तोरणशिल्प आहे. अंतराळातील एका देवकोष्ठकामध्येही गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर कलाकुसर आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर आणि उत्तरांगावर गणेशमूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या खालील बाजूस कीर्तिमुख कोरलेले आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावरील भिंतीत महिषासूरमर्दिनीच्या रूपातील देवीची अष्टादशभुजा असलेली मूर्ती आहे. सिंहावर स्वार झालेल्या या देवीच्या १८ हातांमध्ये तलवार, ढालीसह विविध प्रकारची आयुधे आहेत. तिच्या चरणांखाली महिषासूराचे तसेच म्हशीचे शिल्प आहे. या मूर्तीच्या उजवीकडे बल्लाळ देवीचा मोठा ‘शेंदूरचर्चित’ तांदळा आहे. त्यावर नाक, डोळे, भुवया, ओठ कोरण्यात आले असून देवीच्या नाकात नथ आहे. या सुहास्यवदनी देवीने मुकुट परिधान केला आहे आणि त्यावर चांदीचे छत्र आहे. या मूर्तीवर पूर्वीपासून शेंदूरलेपन करण्यात येत असे. ४ जुलै २०२१ रोजी रात्री मूळ मूर्तीवरील शेंदुराचे कवच गळून पडले. त्यानंतर महालक्ष्मीच्या रूपातील मूळ मूर्तीचे दर्शन झाले. त्यानंतर मूर्तीवर विधिवत अभिषेक व पूजा करण्यात येऊन नव्याने शेंदूरलेपन करण्यात आले. गळून पडलेल्या कवचाची दुसऱ्या दिवशी गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर या कवचाचे ब्राह्मणवाडा धरणात विसर्जन करण्यात आले.

मंदिराच्या गर्भगृहावर मध्ययुगीन स्थापत्यशैलीतील तीन टप्प्यांचे अष्टकोनी आकाराचे, वर निमुळते होत जाणारे शिखर आहे. शिखरांच्या चारही बाजूंनी मनोरे आहेत. शिखरावर मोठ्या आकाराचा आमलक आहे. त्यावर कळस आहे. या मंदिराजवळ उघड्यावर असलेल्या शिवलिंगाच्या मागील बाजूस पंचमुखी नाग आहे. येथे प्राचीन मूर्तींचे खंडित अवशेष आहेत. भीमाने स्थापन केलेल्या मूर्तीचे हे अवशेष असल्याचे सांगण्यात येते. त्यात सहा फूट लांबीची दोन पदचिन्हे तसेच सहा फुटांचा घेर असलेल्या, तलवारीची मूठ धारण केलेल्या देवीच्या हाताचा समावेश आहे. परिसरात जुन्या मंदिराचे काही अवशेषही दिसतात. या अवशेषांवरून पूर्वी येथे शिवशंकरांचे ‘हेमाडपंती’ स्थापत्यशैलीत बांधलेले मंदिर असावे, असा कयास बांधता येतो.

मंदिर परिसरात असलेल्या महादेव मंदिराच्या समोर दगडात घडवलेली नंदीची सुंदर मूर्ती आहे. साजशृंगार केलेल्या या नंदीच्या मूर्तीच्या खालील भागात एक ऋषी नंदीला घास भरवत असताना दाखवण्यात आले आहे. अन्य शिवालयांसमोरील नंदी सरळ रेषेत बसलेला आढळतो. मात्र, येथील नंदी, बैल नैसर्गिकरीत्या ज्या स्थितीत बसतात, तसाच रुबाबदारपणे बसला आहे. त्याची मान थोडीशी तिरकी आहे. ही मूर्तीही गावात झालेल्या उत्खननादरम्यान आढळली. मंदिर परिसरात असलेल्या अन्य एका शिवमंदिराजवळ मनोकामना देवीचे स्थान आहे. परिसरात बल्लाळ देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तेजराव देशमुख यांची समाधीही आहे. मंदिर परिसरात असलेल्या दुमजली मंगल कार्यालयात विवाहासारखे सोहळे होतात. नजीकच असलेल्या खुल्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा आहे. परिसरात गजानन महाराजांचेही छोटे मंदिर आहे.

जागृत देवता असा लौकिक असलेल्या बल्लाळ देवीच्या दर्शनासाठी विदर्भ तसेच मराठवाड्यातील विविध भागांतील भाविक येतात. अनेक भाविक देवीसमोर नवसही करतात. शुक्रवारी आणि मंगळवारी भाविकांची संख्या अधिक असते. येथे चैत्र तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. चैत्र नवरात्रोत्सवाच्या तुलनेत शारदीय नवरात्रोत्सवाचे स्वरूप मोठे असते. या कालावधीत मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप येते. या उत्सवाच्या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अष्टमीला येथे होमहवन करण्यात येते. विदर्भाच्या विविध भागांतून पंढरपूर तसेच शेगावला जाणाऱ्या अनेक दिंड्यांचा या मंदिरात मुक्काम होतो. या दिंड्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात येते. मंदिर व्यवस्थापनातर्फे गोरक्षण करण्यात येते. येथे देशी वाणाच्या ५० हून अधिक गोमातांचे पालनपोषण करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • चिखली येथून २२ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ३८ किमी अंतरावर
  • चिखली व खामगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहाराचीची सुविधा
  • संपर्क: मंदिर कार्यालय, मो. 9822734245

बल्लाल देवी मंदिर

अमदापुर, ताल. चिखली, जिला. बुलढाणा

Back To Home