बालाजी मंदिर

पारोळा, ता. पारोळा, जि. जळगाव

जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहराला ऐतिहासिक आणि अध्यात्माची पंढरी म्हणून ओळखले जाते. सतराव्या आणि अठराव्या शतकातील राज्यकर्त्यांनी या गावात अनेक मंदिरे बांधली. श्रीराम, संतोषी माता, हिंगलाज माता, भाटे मंदिर, स्वामी मंदिर, झपट भवानी, द्वारकाधीश या मंदिरांचा त्यात समावेश आहे. बालाजी मंदिर हे त्यापैकीच एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात साजरा होणारा रथोत्सव खान्देशात प्रसिद्ध आहे. येथे बालाजीची मिरवणूक ज्या रथातून काढली जाते तो रथ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीच्या रथांपैकी एक असल्याचे सांगितले जाते. या रथाची उंची ४१ फूट आणि वजन तब्बल १५०० किलो आहे.

मंदिराची आख्यायिका अशी की पारोळा गावचे रहिवासी गिरिधरशेट शिंपी हे बालाजीचे निस्सीम भक्त होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते पारोळा ते तिरुपती असा पायी प्रवास करून बालाजीच्या दर्शनासाठी जात असत. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी बालाजीस सांगितले की यापुढे मला तुझ्या दर्शनाकरता येणे शक्य होईल असे वाटत नाही. एवढे बोलून ते साश्रु नयनांनी मंदिराबाहेर पडले. परतीच्या मार्गावर असताना त्यांना बालाजीने दृष्टांत देऊन सांगितले की यापुढे तुला मला भेटण्यासाठी 

इतक्या दूर येण्याची गरज नाही, मीच तुझ्यासोबत येत आहे. गिरीधरशेट यांच्या झोळीत अंश रूपाने बालाजी पारोळ्यात आले. गिरीधरशेट तिरूपतीची यात्रा करून पारोळ्यात परतताच येथील जहागीरदार नेवाळकर त्यांना भेटले. पारोळ्यात बालाजींचे मंदिर स्थापन करण्याबाबत त्याची जबाबदारी गिरिधरशेट यांनी घ्यावी याबाबत त्यांनी गिरिधरशेट यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी गिरीधरशेट यांना बालाजीने दिलेला दृष्टांत आठवला. तेव्हापासून ते पारोळ्यातच बालाजीची सेवा करू लागले.

पारोळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मंदिराची रचना दाक्षिणात्य पद्धतीची आहे. २००७ ते २०१७ अशा तब्बल दहा वर्षे सुरू असलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे सुंदर भव्य रूप प्राप्त झाले आहे. हे संपूर्ण मंदिर राजस्थानी बलुआ पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या आवारभितींत भव्य असे गोपुरम आहे. त्याची उंची ७१ फूट आहे ते खालून वर निमुळते होत गेलेले आहे. या गोपुरावर ठिकठिकाणी १८ द्वारपाल मूर्ती वरच्या बाजूला पंचधातूचा कळस आहे. यात अद्ययावत नगारखानाही आहे. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो

प्रांगणात मुख्य मंदिरासमोर एका चौथऱ्यावर ३३ फूट उंचीचा गरूडस्तंभ आहे. अखंड सागवानी खोड आणि बाहेरून पितळी आवरण असलेला हा गरूडस्तंभ १२५ वर्षांपूर्वी श्रीनिवासभाऊ अग्रवाल यांनी स्वखर्चाने उभारला होता. येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ या स्तंभाच्या पूजनाने होते. त्यापुढे मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपात ३२ नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपातील भिंतीमधील देवकोष्टकांत गणेश, कुबेर, श्रीरामसीता, मत्स्यावतार, वामनावतार, देवी पद्मावती, मारूती, गरूड, लक्ष्मी, कूर्मावतार, दत्त, राधाकृष्ण आणि नरसिंहावतार यांच्या सुबक संगमरवरी मूर्ती आहेत. याशिवाय एका देवकोष्टकात गिरीधरशेट शिंपी यांची मूर्तीही आहे.

गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एका काचेच्या पेटीत बालाजीच्या पादुका आहे. आत एका कमी उंचीच्या वज्रपिठावर असलेल्या लाकडी मखरात बालाजीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या कळसास सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. मंदिराच्या आवारात देवाचा रथ ठेवण्यासाठी एक भव्य कक्ष आहे. तेथील रथ नगरदेवळा येथील कारागिरांनी तयार केला आहे. संपूर्ण सागवानी लाकडात असलेल्या या रथावर सुंदर कोरीवकाम आहे. रथाला लाकडी घोडे आणि सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती आहे

बालाजी महाराजांचा रथसोहळा नवरात्रोत्सवात होतो. हा रथोत्सव पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. हा भव्य रथ भाविकांकडून ओढला जातो. बालाजींचे परमभक्त असलेल्या गिरधरशेट शिंपी यांची समाधी राष्ट्रीय महामार्गावर गावालगत आहे. रथोत्सवाच्या काळात आपल्या भक्तास भेटण्यासाठी अश्विन शुद्ध सप्तमीच्या दिवशी बालाजी पालखीतून समाधीजवळ येतात. त्यावेळी श्रींच्या नेत्रातून अश्रू वाहतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्या ठिकाणी पूजा अभिषेक होऊन परत श्रींची पालखी मंदिरात येते. याशिवाय दर शुक्रवारी सकाळी वाजता महाअभिषेक केला जातो. दररोज रात्री .३० वाजता मंदिरात महाआरती होते. दुपारी ११ ते या वेळेत येथे भाविकांना महाप्रसादाची सुविधा आहे.

उपयुक्त माहिती

  • पारोळा बस स्थानकापासून . किमी, तर जळगावपासून ५६ किमी अंतरावर
  • जळगावमधील अनेक शहरांतून पारोळासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२५९७ २२२६०३
Back To Home