‘रजतनगरी’ असा लौकिक लाभलेल्या खामगावमध्ये बालाजीचे (श्रीरामपंचायतन) प्रसिद्ध मंदिर आहे. शहरातल्या जुना सराफा भागात वसलेल्या या तीन मजली मंदिरात एकाच पाषाणातून घडवलेल्या रामपंचायतनाच्या मूर्तीचे दर्शन घडते. दीडशे वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या या मंदिरात रामनवमी, हनुमान जयंतीसह विविध उत्सव साजरे होतात. डोल एकादशी (भाद्रपद शुक्ल एकादशी) तसेच दसऱ्याच्या दिवशी या मंदिरातून निघणाऱ्या पालखीयात्रा हे येथील प्रमुख आकर्षण आहे.
खामगाव ऐतिहासिक काळापासून कापूस आणि चांदीच्या व्यापाराचे मोठे केंद्र राहिले आहे. या शहराच्या जडणघडणीत मारवाडी आणि उत्तर भारतीय व्यापारी समुदायाचा मोठा वाटा आहे. या समाजात भगवान विष्णूच्या विविध रूपांना आणि हनुमानाला अत्यंत आदराने ‘बालाजी’ संबोधले जाते. याच व्यापारी आणि उत्तर भारतीय परंपरेचा मोठा प्रभाव या मंदिराच्या नावावर दिसून येतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे हनुमानाशी असलेले नाते. उत्तर भारतात, विशेषतः राजस्थान आणि हरियाणामध्ये, हनुमानाला ‘बालाजी’ (उदा. मेहंदीपूर बालाजी) म्हटले जाते. खामगावच्या या मंदिरात संपूर्ण ‘रामपंचायतन’ विराजमान आहे. या पंचायतनात हनुमानाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याने, भक्तांनी श्रद्धेने या मंदिराला ‘बालाजी मंदिर’ म्हणण्यास सुरुवात केली.
धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर, भगवान विष्णूच्या व्यंकटेश रूपाला दक्षिण भारतात ‘बालाजी’ म्हणतात. श्रीराम हे विष्णूचेच अवतार असल्याने, विष्णूच्या कोणत्याही रूपाच्या मंदिराला ‘बालाजी मंदिर’ म्हणण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी तीन बैराग्यांनी ही मूर्ती येथे आणली. त्यानंतर काळाच्या ओघात व्यापारी वर्गाच्या प्रभावामुळे ‘राम मंदिर’ या नावापेक्षा ‘बालाजी मंदिर’ हे नाव अधिक लोकमान्य झाले. आज हे मंदिर याच नावाने प्रसिद्ध आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे व मोठे शहर असलेले खामगाव हे सर्व बाजूंनी उंच-सखल भागाने वेढलेले आहे. पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या एका मोठ्या नाल्यामुळे हे शहर दोन भागांत विभागले आहे. शहराच्या जुन्या सराफा बाजारातील आदिनाथ जैन मंदिराजवळ हे बालाजी मंदिर आहे. या मंदिराच्या तीन मजली वास्तूला दोन प्रवेशद्वारे आहेत. तळमजल्यावर मोठा सभामंडप आणि मध्यभागी गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार नक्षीयुक्त कमानींचे आहे. सभामंडपात हनुमान व शिवशंकरांची छोटी मंदिरे आहेत. सभामंडपातील एका देवकोष्ठकात गणेशाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मागील भागात एके ठिकाणी देवीची मूर्ती आहे. सभामंडपात मध्यभागी असलेल्या गर्भगृहासमोर स्टेनलेस स्टीलचे रेलिंग बसवण्यात आले आहे.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार सुंदर नक्षीकाम असलेल्या चांदीच्या चौकटीचे आहे. प्रवेशद्वारावर दोन कृष्णप्रतिमा चित्रित केल्या आहेत. गर्भगृहाच्या भिंतींवर बसवण्यात आलेल्या रंगीत संगमरवरी फरशांवर फुलांची नक्षी, मोर तसेच लक्ष्मी, विष्णू आदी देव-देवतांची चित्रे आहेत. उजवीकडील भिंतीवर शेषशायी विष्णू, नारद, हनुमान, गरुड यांच्या प्रतिमा आहेत. डावीकडील भिंतीवर नर्तिकांच्या प्रतिमा आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर आकर्षक नक्षीकाम केलेले आहे, तसेच मध्यभागी गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. गर्भगृहात सुंदर मखरामध्ये रामपंचायतन स्वरूपाची मूर्ती विराजमान आहे. मुख्य मूर्ती श्रीरामांची आहे आणि त्यांच्या बाजूला सीतामाता आहे. मूर्तीच्या डावीकडे लक्ष्मण आहेत, तर उजवीकडे भरत आणि शत्रुघ्न आहेत. खालील भागात हनुमान, नल, नील, जांबुवान आदींच्या मूर्ती आहेत. सभामंडपातील एका भिंतीवर मूळ मूर्तीचे चित्र रंगवण्यात आले आहे.
या मंदिरात नित्यनेमाने पूजा-अर्चा केली जाते. दर शुक्रवारी मूर्तींवर पंचामृताने अभिषेक करून साजशृंगार केला जातो. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. सहसा हा प्रसाद खिरानंदाचा असतो. तो बनवण्यासाठी दुधात तांदूळ व पाच प्रकारचा सुकामेवा, केशर, वेलची टाकून ते उकळवले जाते.
या मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी आदी उत्सव साजरे केले जातात. डोल एकादशी येथे मोठ्या उत्साहात साजरी होते. श्रीकृष्णाच्या जन्माच्या अठराव्या दिवशी यशोदेने त्यांची जलपूजा (घाटपूजा) केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. हा दिवस डोल एकादशी म्हणून साजरा केला जातो. जलपूजनाला ‘कुआ पूजा’ असेही म्हटले जाते. या एकादशीला परिवर्तिनी एकादशी, जलझुलनी एकादशी किंवा वामन एकादशी असेही म्हणतात. या दिवशी मंदिरातून श्रीकृष्णाच्या शाळीग्राम मूर्तीला स्नान घालण्यासाठी येथील सतीमातेच्या मंदिराजवळील विहिरीजवळ पालखीतून वाजतगाजत आणण्यात येते. या मूर्तीसह विहिरीत उडी मारून मूर्तीला स्नान घातले जाते. त्यानंतर आरती झाल्यावर उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले जाते. या मंदिरात दसऱ्याच्या दिवशीही मोठा उत्सव होतो. या दिवशी पालखीतून श्रीराम-लक्ष्मण-सीता-हनुमानाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात येते. तत्पूर्वी मंदिरात ध्वजारोहण करण्यात येते. या मिरवणुकीनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेत अनेक तरुण श्रीराम-लक्ष्मण तसेच हनुमानाच्या वेशभूषेत सहभागी होतात. वाजतगाजत ही शोभायात्रा शहरातील रावणटेकडीवर येते. येथे रावणाच्या प्रतिमेचे दहन झाल्यावर मूर्तींवर अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर आरती झाल्यावर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात येते.