नंदगिरी किंवा नंदीग्राम या किल्ल्याच्या नावावरून नांदेड नाव पडलेल्या या शहरात शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांची समाधी व गुरुद्वारा आहे. मराठीतील आद्य कवी रघुनाथ पंडित व वामन पंडित यांचे जन्मस्थळ असलेल्या या शहरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. येथील प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले बालाजी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धास्थानांपैकी एक आहे. मंदिरात भगवान व्यंकटेश्वराची, अर्थात बालाजीची अतिशय देखणी, तेजस्वी आणि प्रसन्न मूर्ती प्रतिष्ठित आहे. हे मंदिर केवळ धार्मिकच नव्हे, तर शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले जाते.
असे सांगितले जाते की खाजगी मालकीच्या वाड्यात असलेल्या या मंदिराची स्थापना इ.स. १६७० मध्ये निजामकाळात झाली होती. येथील बालाजी मूर्तीची स्थापना हरिनाथ बाबा बैरागी यांनी केली आहे. या मंदिरास १७७० मध्ये राजा दुर्जन सिंह यांनी एक सनद दिली होती, तर दुसरी सनद १७७२ मध्ये सरदार राजगोपाल यांनी दिली होती. या मंदिरात सुरुवातीपासून आजवर महंत परंपरा सुरू आहे. सध्या मंदिरात तेरावे महंत कार्यरत आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत हे मंदिर असून त्याचे स्वरूप प्राचीन वाड्यासारखे आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार साधेसे आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. सभामंडपाचे छत भिंतींवर आहे व छताला पितळी घंटा आणि काचेचे झुंबर टांगलेले आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. पुढे सभामंडपापेक्षा किंचित उंचावर अंतराळ आहे. अंतराळात चार स्तंभांच्या रचनेतून तीन प्रवेशद्वारे साकारली आहेत. हे चार स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. अंतराळात स्टेनलेस स्टीलचे सुरक्षा कठडे लावून रांगांचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.
अंतराळात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे आहेत. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी व स्तंभशाखांवर तोरण आहे. गर्भगृहात वज्रपीठावरील मखरात बालाजीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज मूर्ती आहे. देवाच्या उजव्या वरच्या हातात चक्र व खालचा हात अभयमुद्रेत आहे. देवाच्या डाव्या वरच्या हातात शंख आणि खालचा हात कमरेवर आहे. मूर्तीवर चांदीचा मुकुट व देवाच्या पायाजवळ गरुड शिल्प आहे. ही मूर्ती गरुडारूढ असल्यामुळे अन्य बालाजी मंदिरांप्रमाणे येथे स्वतंत्र गरुडध्वज वा गरुडखांब नाही. मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. मखराच्या दोन्ही बाजूला दोन नक्षीदार स्तंभ व त्यावर गजराज तोरण आहे. तोरणात वर मध्यभागी कीर्तिमुख आहे. मखराच्या दोन्ही बाजूला लाकडी लहान मखर आहेत. त्यात इतर देवी-देवतांच्या पितळी मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या छतावर द्रविडी शैलीतील उरूशृंगी प्रकारचे शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी आमलक व कळस आहे.
शारदीय नवरात्रोत्सव हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिपदेला उत्सवाची सुरुवात देवाच्या महाअभिषेकाने होते. दहा दिवस मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, नृत्य, नाटिका आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी देवाचा रथोत्सव साजरा केला जातो. यावेळी बालाजीची उत्सवमूर्ती रथात बसवून मंदिराला पाच प्रदक्षिणा केल्या जातात. नंतर रथ वजिराबाद येथील मारुती मंदिरात नेला जातो. मारुती मंदिरातील पुजारी देवाची मानाची पूजा करतात. त्यानंतर देव परत स्वस्थानी येतात. रथोत्सवादरम्यान देवाचा रथ ओढण्यासाठी सुमारे वीस हजारांहून अधिक भाविक उपस्थित राहतात.
गोकुळाष्टमी म्हणजेच कृष्ण जन्मोत्सव हा येथील दुसरा महत्त्वाचा उत्सव आहे. यावेळी देवाची मूर्ती पाळण्यात ठेवून भाविक पाळणा गीते, भजन व स्तुतीगीते गातात. देवाच्या जन्मानंतर दहीहंडी फोडली जाते व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते. चैत्र पाडवा, रामनवमी, दिवाळी, श्रावणमास, पुरुषोत्तममास, कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा आदी वर्षभरातील इतर सण व उत्सव मंदिरात साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवार, गुरुवार, एकादशी, पौर्णिमा आदी दिवशी मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.