बालाजी मंदिर

गोदातट-गंगाखेड, ता. गंगाखेड, जि. परभणी

परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले गंगाखेड हे गाव ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी नदीकाठी प्रभू श्री व्यंकटेश बालाजींचे प्राचीन मंदिर आहे. मराठवाड्यातील ‘प्रति बालाजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानाची ख्याती महाराष्ट्रातील बालाजींचे पहिले मंदिर म्हणून आहे. येथे गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते आणि या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व अधिक वाढले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख ‘खेटकपूर’ या नावाने आढळतो. मंदिराच्या सभामंडपासमोर असलेला एक उंच गरुडखांब प्रभू बालाजींच्या सस्न्मानार्थ दर तिसऱ्या दिवशी मूर्तीच्या दिशेने किंचित झुकतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रभू बालाजींचे परमभक्त आनंदराय स्वामी महाराज यांनी या मंदिराची उभारणी केली. ते दरवर्षी पायी तिरुपतीला दर्शनासाठी जात असत. वयोमानामुळे तेथे जाणे अशक्य झाल्याने त्यांनी या ठिकाणी मंदिर उभारण्याचा संकल्प केला. त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार या मंदिराची स्थापना करण्यात आली, ही लोकोक्ती प्रचलित आहे. आनंदराय स्वामी स्वतः उत्तम चित्रकार आणि मूर्तिकार होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य याच मंदिर परिसरात व्यतीत केले.

हे मंदिर एका उंच जगतीवर म्हणजेच चौथऱ्यावर आहे. मुख्य मंदिरात येण्यासाठी वीस दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दगडी फरसबंदी केलेले प्रशस्त प्रांगण लागते. या प्रांगणात सुरुवातीलाच एका छोट्या देवळीत हनुमानाची मूर्ती विराजमान आहे. मंदिराच्या सभामंडपासमोर पितळी पत्र्याचे आवरण असलेला एक उंच गरुडखांब आहे. मंदिराची मूळ वास्तू दुमजली आहे. ही वास्तू दगड आणि मातीचा वापर करून मराठा स्थापत्यशैलीत उभारलेली आहे. सभामंडप आणि दोन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे.

मंदिराच्या सभामंडपात प्रख्यात संत वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी यांचे तैलचित्र आहे. त्यांनी याच क्षेत्रातील गोदावरीच्या काठावर संन्यासदीक्षा घेतली होती. हा ऐतिहासिक संदर्भ या मंदिराशी जोडलेला आहे. सभामंडपातून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी जिना आहे. वरच्या मजल्यावर प्रवेश करताच प्रथम शेंदूरचर्चित गणपतीचे दर्शन होते. येथून काही पावलांवर असलेल्या गर्भगृहात रेणुका मातेचे स्थान आहे. येथे देवीचा मोठा शेंदूरचर्चित तांदळा असून त्यावर डोळे, नाक आणि ओठ कोरलेले आहेत. देवीच्या नाकात सोन्याची नथ आणि कपाळावर मोठे कुंकू आहे. दोन गर्भगृहांच्या मधोमध असलेल्या चौथऱ्यावरील लाकडी देव्हाऱ्यात एकमुखी दत्तात्रयांची मूर्ती प्रतिष्ठित आहे. या मूर्तीचे दर्शन घेऊन मग बालाजींच्या दर्शनासाठी जाण्याचा येथे प्रघात आहे. या चौथऱ्यावर मध्यभागी वामन अवताराची मूर्ती असून एका बाजूस रेखीव गजशिल्प कोरलेले आहे.

दत्तात्रयांच्या चौथऱ्याच्या उजवीकडील मुख्य गर्भगृहात एका मोठ्या मखरामध्ये प्रभू बालाजींची चतुर्भुज स्वरूपातील मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या वरच्या दोन हातांमध्ये शंख व चक्र आहेत. मूर्तीचा खालचा उजवा हात भक्तांना अभय देणारा आहे. ही मूर्ती वालुकामय असल्याचे सांगण्यात येते. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ असून त्यावर नाजूक कलाकुसर केलेली आहे. दत्तात्रयांच्या चौथऱ्याच्या डावीकडे असलेल्या दुसऱ्या गर्भगृहात शेषशायी विष्णूंची मूर्ती आहे. या मूर्तीच्या चरणांशी लक्ष्मीमाता विराजमान आहे. या गर्भगृहाच्या दर्शनी प्रवेशद्वारावर बालाजींना नमन करणाऱ्या विविध देवदेवतांची चित्रे रेखाटलेली आहेत. मंदिराच्या भिंतीवर सहा देवकोष्टके असून त्यात गरुडदेव, विठ्ठल-रखुमाई आणि इतर देवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत.

येथे दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमा या काळात मोठा दसरा महोत्सव साजरा होतो. या महोत्सवात शहरातील चौधरी, शेटे, लव्हाणे, महाजन, पाठक, दलाल आणि तमखाने या घराण्यांना मानाचे स्थान आहे. बारा बलुतेदारांतील एकूण ३२ घराण्यांना मानाचा विडा देऊन या उत्सवातील विविध कामांची संयुक्त जबाबदारी सोपवली जाते. उत्सवादरम्यान बालाजींना दररोज विविध वस्त्रालंकारांनी सजवले जाते. भाविक या काळात मोठ्या संख्येने अभिषेक आणि नैवेद्य अर्पण करतात. या विधींसाठी विश्वस्तांकडे आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असते.

दसरा महोत्सवादरम्यान दररोज विविध वाहनांतून बालाजींची मिरवणूक काढली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होऊन या उत्सवाची सुरुवात होते. पहिल्या दिवशी ध्वज असलेल्या वाहनातून, दुसऱ्या दिवशी नाग, तिसऱ्या दिवशी मोर, चौथ्या दिवशी वाघ आणि पाचव्या दिवशी ‘तोंड हाल्या’ हत्तीवरून प्रभूंची ग्रामप्रदक्षिणा होते. पाचव्या दिवशी सायंकाळी पालखीतूनही मिरवणूक निघते. सहाव्या दिवशी अंबारी हत्ती, सातव्या दिवशी सकाळी सूर्य व सायंकाळी चंद्र वाहनातून आणि आठव्या दिवशी मारुती वाहनातून मिरवणूक निघते. नवव्या दिवशी गरुड वाहनावरून बालाजींचे आगमन होते.

विजयादशमीच्या दिवशी सकाळी २५ फूट उंचीच्या लाकडी रथातून मंदिर परिसरात प्रदक्षिणा होते. त्यानंतर दुपारी ३ वाजता ३० फूट उंचीच्या सागवानी लाकडी रथातून बालाजींची गावातून शोभायात्रा काढली जाते. या रथयात्रेत विदर्भ आणि मराठवाड्याच्या विविध भागांतून हजारो भाविक सहभागी होऊन “व्यंकट रमणा गोविंदा” असा जयघोष करतात.

शहरातील शनिमंदिर, आंबेडकर नगर, दिलकश चौक आणि मोठा मारुती मंदिर या मार्गावरून ही यात्रा पुन्हा मंदिराकडे येते. सायंकाळी गोदावरी काठी रावणदहन होते. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होणाऱ्या दीपोत्सवाने या महोत्सवाची सांगता होते. दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • गंगाखेड बस स्थानकापासून सुमारे १ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून सुमारे ३६ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून गंगाखेडसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८३२९१६६५४०

बालाजी मंदिर

गोदावरी के तट – गंगाखेड़, तालुका गंगाखेड़, जिला परभणी

Back To Home