बहिरम बाबा मंदिर

कारंजा बहिरम, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कारंजा बहिरम गावानजीक सातपुड्याच्या उंच टेकडीवर भगवान भैरवनाथाचे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. लोकपरंपरेनुसार भैरव हे भगवान शंकराचे अंशरूप तसेच प्रखर तांत्रिक व शीघ्र फलदायी क्षेत्रपाल दैवत मानले जाते. महाराष्ट्र आणि लगतच्या मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत आहे. हे स्वयंभू स्थान नवसाला पावणारे मानले जाते. विदर्भातील प्रदीर्घ काळ चालणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवासाठी हे तीर्थक्षेत्र संपूर्ण मध्य भारतात ओळखले जाते.

सातपुडा पर्वतमालेच्या पायथ्याशी असलेल्या या परिसराला प्राचीन काळापासून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभलेले आहे. इसवी सन १९११ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार: अमराओती डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर’मधील नोंदीनुसार या टेकडीचा उल्लेख ‘बहिरम हिल’ असा येतो. मूळ संस्कृत शब्द ‘भैरव’ याचा लोकभाषेतील अपभ्रंश ‘बहिरम’ असा झाला आहे. हा परिसर मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे येथे पुरातन काळापासून मराठी व हिंदी भाषक संस्कृतींचा मिलाफ दिसतो. वऱ्हाड प्रांतातून उत्तरेकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गांवर आणि गाविलगड परिसराच्या संरक्षणात्मक कक्षेत हे स्थान येते.

या स्थानाविषयी दोन प्रमुख आख्यायिका लोकपरंपरेत रूढ आहेत. पहिल्या कथेनुसार, प्राचीन काळी महादेव आणि माता पार्वती सालबर्डीहून पंचमढीकडे जात असताना त्यांनी या टेकडीवर विश्रांती घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या भैरवनाथाला सातपुड्याच्या या टेकडीवरील निसर्गाची भुरळ पडली. त्याने महादेवाला येथेच राहू देण्याची प्रार्थना केली. महादेवाने ती विनंती मान्य करून येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मनोरथ पूर्ण होईल, असा आशीर्वाद दिला. दुसऱ्या आख्यायिकेनुसार, रुक्मिणीहरणाच्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मी यांच्यात झालेल्या युद्धानंतर सैन्यातील काही गवळी बांधवांनी टेकडीच्या पायथ्याशी गाव वसवले. ते बहिरम बाबाचे उपासक बनले. देवासमोर सुपारी व शेंदूर अर्पण करताना ते लोणी व तूप लावत. त्या लोणी, तूप व शेंदुराचे थर शतकानुशतके साचून मूळ पाषाणाने महाकाय रूप धारण केले, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सध्या अस्तित्वात असलेले मंदिर अठराव्या शतकाच्या पहिल्या दशकात (इ.स. १७०१ ते १७१०) तुळशीराम मढे या स्थानिक शेतकऱ्याने बांधले. मढे घराण्याचे हे कुलदैवत होते. मूळ देवस्थान त्यापूर्वीपासून सुमारे एक हजार वर्षे जुने असल्याचे स्थानिक मानतात. मंदिराच्या प्रांगणात एका मजबूत लोखंडी कमानीला टांगलेली २४० किलो वजनाची पितळी घंटा भाविकांचे लक्ष वेधून घेते. खातरतळे गावातील बळीराम मोराडकर सराफ यांनी ही घंटा देवाला अर्पण केली. तत्कालीन केंद्रीय कृषी व सहकार मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या हस्ते ३० नोव्हेंबर १९५७ रोजी ही घंटा मंदिरात विधिपूर्वक बसवण्यात आली.

कारंजा गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उंच टेकडीवर हे देवालय उभे आहे. या मंदिराची रचना मराठा व स्थानिक वास्तुकलेचा मेळ दर्शवते. मुख्य रस्त्यावरून टेकडीकडे जाताना पहिली स्वागतकमान लागते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे दीडशे पायऱ्यांची वाट आहे. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दोन प्राचीन नंदीशिल्पे आणि त्यांच्या पाठीमागे दोन लहान दीपमाळा आहेत. पायरी मार्गालगत लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. टेकडीच्या पायथ्याशी लोखंडी स्तंभ व अर्धचंद्राकार कमानीने युक्त दुसरी कमान आहे. प्रांगणात उंच दीपमाळा उभ्या आहेत. मंदिराची रचना अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे. सभामंडपात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. मध्यभागी चौथऱ्यावर नंदीची मूर्ती व तिच्यासमोर यज्ञकुंड आहे. मंडपाच्या डाव्या बाजूला एका चौथऱ्यावर हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. सभामंडपापेक्षा उंचावर असलेले अंतराळही अर्धखुल्या स्वरूपाचे आहे. अंतराळात समोरील बाजूस चार आणि गर्भगृहाकडे चार असे आठ चौकोनी स्तंभ छताला आधार देतात.

गर्भगृह अंतराळापेक्षा अधिक उंचीवर आहे. येथे वज्रपीठावर बहिरम बाबांची शेंदूरचर्चित स्वयंभू मूर्ती आहे. मूर्तीला पल्लेदार मिशी असलेला चांदीचा मुखवटा लावला जातो. मस्तकावर बांधलेल्या फेट्यावर चांदीची चंद्रकोर झळकते. या मुख्य पाषाणाच्या मागील बाजूस पाषाणात कोरलेली शारदा देवीची मूर्ती आहे. गर्भगृहात मूर्तीभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर उभ्या धारेचे नक्षीकाम असलेले गोलाकार शिखर उभारले आहे. शिखराच्या रचनेवर भूमिज शैलीचा प्रभाव जाणवतो. बहिरम बाबा मंदिराला लागूनच गणेशाचे स्वतंत्र मंदिर आहे. या मंदिराच्या सभामंडपातील डाव्या बाजूच्या एका स्वतंत्र कक्षात शिवलिंग आहे. गर्भगृहात वज्रपीठावर गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे.

मंदिराच्या मागे ऐतिहासिक ‘भांडी तलाव’ आहे. प्राचीन काळी महाप्रसादासाठी लागणारी स्वयंपाकाची भांडी या पाण्याच्या डोहातून आपोआप वर येत आणि कार्य संपल्यावर पुन्हा पाण्यात विलीन होत, अशी मौखिक आख्यायिका आहे. आजही भाविक या तलावाच्या काठी उघड्यावर चूल मांडून अन्न शिजवतात. मंदिर परिसरात ‘काशी तलाव’ नावाचा दुसरा ऐतिहासिक जलाशय आहे. प्राचीन काळी या भागावर राज्य करणाऱ्या राजा भावसिंग याने काशीहून आणलेली गंगा या तलावात सोडली, अशी लोकमान्यता आहे. या तलावात विशिष्ट प्रकारचे भस्मरूपी कातळ आढळतात. भाविक देवाला लोणी, शेंदूर, गूळ आणि रेवड्या, लाह्या व फुटाणे आणि श्रीफळ अर्पण करतात. नवसपूर्तीसाठी कणकेचे दिवे लावण्याची तसेच आलू व वांग्याची भाजी व गव्हाचे रोडगे यांचा नैवेद्य दाखवण्याची पूर्वापार प्रथा आहे.

प्रतिवर्षी २० डिसेंबरपासून सुरू होणारी ‘बहिरम यात्रा’ सुमारे ४५ दिवस चालते. हा उत्सव विदर्भातील सर्वांत मोठा लोकमेळा मानला जातो. पूर्वी यात्रेच्या काळात मंदिराच्या पायऱ्यांवर जनावरांचा बळी दिला जात असे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात समाजसुधारक संत गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कीर्तने व लोकप्रबोधन करून ही अनिष्ट प्रथा पूर्णपणे बंद पाडली. आज ही यात्रा पूर्णपणे सात्त्विक वातावरणात पार पडते. या दीड महिन्याच्या काळात टेकडीच्या पायथ्याशी मोठी बाजारपेठ भरते. मध्य प्रदेशातील झल्लार भागातील कुंभार येथे काळ्या मातीची भांडी विक्रीसाठी आणतात. या भांड्यांमध्ये शिजवल्या जाणाऱ्या ‘हंडी भोजनाची’ परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. यात्रेत वारकरी दिंडीचे रिंगण आयोजित केले जाते. महाशिवरात्रीलाही मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती

  • परतवाडा अचलपूर येथून १५ किमी अंतरावर
  • चांदूर बाजार शहरापासून १४ किमी अंतरावर
  • परतवाडा चांदूर बाजार व अमरावती येथून एसटी बसची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या शेजारी असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात तसेच पायथ्याशी निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८९०९५५६६४, ९०९६४२२७७५
Back To Home