बाबुलनाथ मंदिर

बाबुलनाथ, मलबार हिल, मुंबई

मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून काही अंतरावर एका उंच टेकडीवर असलेले बाबुलनाथाचे मंदिर हे या महानगरीतील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक शिवालय आहे. एके काळी बाभळीचे दाट वन असलेल्या या टेकडीवर वसलेले हे शिवमंदिर मुंबईतील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांची अशी श्रद्धा आहे की येथील महादेव हा मनोकामनांची पूर्ती करणारा आहे. यामुळे या सुंदर व भव्य अशा शिवमंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. श्रावणी सोमवारी आणि शिवरात्रीला तर येथे पाय ठेवण्यासही जागा नसते. बाबुलनाथाच्या भक्तगणांमध्ये सामान्यांपासून प्रतिष्ठित नागरिकांपर्यंत आणि सेलिब्रिटींपर्यंत अनेकांचा समावेश आहे.

बाबुलनाथाच्या मंदिरास अठराव्या शतकापासूनचा इतिहास आहे. पेशवे दरबारातील बारभाईच्या कारस्थानानंतर श्रीमंत राघोबादादा तथा रघुनाथराव पेशवे यांनी मराठी सत्तेच्या विरोधात इंग्रजांकडे धाव घेतली. ते मुंबईला इंग्रजांच्या आश्रयास आले. सन १७७९ मध्ये रघुनाथराव पेशवे आणि इंग्रजांच्या फौजेने मिळून पेशव्यांच्या राज्यावर आक्रमण केले. त्यावेळी सरदार महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फौजेने वडगावनजीक इंग्रजांच्या फौजेचा धुव्वा उडवला. त्यामुळे इंग्रजांना शरणागती पत्करावी लागली. पहिले इंग्रज-मराठा युद्ध म्हणून ओळखले जाणारे हे युद्ध संपल्यानंतर एका वर्षातच, सन १७८०मध्ये मलबार हिलनजीक असलेल्या या टेकडीवर येथील मराठी समाजाने भगवान शंकराचे हे मंदिर उभारले.

या मंदिराविषयी विविध आख्यायिका सांगण्यात येतात. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी यांनी १८९५ साली प्रसिद्ध केलेल्या ‘द हिंदू टेम्पल्स ऑफ बॉम्बे’ या पुस्तकानुसार, १७८०च्या सुमारास ‘हॉर्नबी वेलार्ड’ (वरळीचा बांध. सध्याचा लाला लजपतराय मार्ग.) बांधत असताना तेथे बाबुल नावाच्या एका मराठी सुतारास एक शिवलिंग सापडले. त्याने या टेकडीवरील जागा साफ करून तेथे एक छोटेसे मंदिर बांधले आणि त्यात या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. बाबुल या सुताराच्या नावावरून या शिवलिंगास बाबुलनाथ असे नाव पडले. काहींच्या म्हणण्यानुसार या टेकडीवर त्या काळी बाभळीचे रान होते. त्यामुळे येथील शिवशंकरास बाभुळनाथ वा बाबुलनाथ असे नाव देण्यात आले. मुंबईविषयक निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ‘द चार्म ऑफ बॉम्बे’ (१९१५) या पुस्तकाचे संपादक आर. पी. करकरिया यांनी ही व्युत्पत्ती खोडून काढली आहे. या शिवालयास बाबुलनाथ हे नाव बाबुल सुताराच्या नावावरून पडले असे मत त्यांनी मांडले आहे. या मंदिराविषयीची अन्य एक कथा सॅम्युएल टी. शेपर्ड यांच्या ‘बॉम्बे प्लेस नेम्स अँड स्ट्रीट नेम्स : ॲन एक्सकर्शन इनटू द बाय-वेज ऑफ द हिस्ट्री ऑफ बॉम्बे सिटी’ (द टाइम्स प्रेस, १९१७) या पुस्तकात आलेली आहे. त्यात रावबहादूर पी. बी. जोशी यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे, की एका यजुर्वेदी ब्राह्मणाने या मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. या मंदिराच्या बांधकामासाठी सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीतील बाबलजी हिरजी नाथ या गृहस्थाने पैसे दिले होते. त्यामुळे त्यांच्या नावावरून या मंदिरास बाबुलनाथ असे नाव देण्यात आले.

बाबुलनाथ मंदिरास हे नाव कशावरून पडले व ते नेमके कोणी उभारले याविषयी एकवाक्यता नसली, तरी येथील मूळ मंदिर १७८०मध्ये वा त्या सुमारास बांधण्यात आल्याचे स्पष्ट आहे. गोविंद नारायण माडगांवकर यांनी मात्र ‘मुंबईचें वर्णन’मध्ये, हे मंदिर पांडुशेठ सोनार यांनी बांधल्याचे स्पष्ट म्हटले आहे. पांडुशेठ सोनार हे त्यावेळचे एक प्रख्यात व्यापारी व सरकार दरबारी वजन असलेले प्रतिष्ठित गृहस्थ होते. भुलेश्वर येथील मुंबादेवीचे मंदिर त्यांनीच उभारले होते. यास बाळकृष्ण बापू आचार्य आणि मोरो विनायक शिंगणे यांनी ‘मुंबईचा वृत्तांत’(१८८९) मध्ये दुजोरा दिलेला आहे. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उर्फ के. रघुनाथजी सांगतात की सुरुवातीपासूनच या जागेचे सौंदर्य आणि शहरापासूनचे जवळचे अंतर यामुळे हे मंदिर लोकप्रिय झाले. पुढे गुजराती वाणी आणि भाटिया व्यापारी समुदायाने या मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे ठरवले. त्यासाठी वर्गणी काढली. १८३६मध्ये पुनर्बांधणीचे काम सुरू झाले. सन १८४०च्या सुमारास ते पूर्ण झाले.

मंदिराचे विश्वस्त चैतन्य मेहता यांनी अशी माहिती दिली की ही संपूर्ण टेकडी पांडुशेठ यांच्या मालकीची होती. त्यांच्या निधनानंतर या मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी ती ख्रिश्चन समुदायाने विकत घेतली. नंतर त्यांनी ती पारशी पंचायतीस विकली. पारशी पंचायत आणि हिंदू समाजात या मालमत्तेवरून वाद होता. १८३६च्या आधी हा वाद मिटवण्यासाठी बडोद्याचे महाराज श्रीमंत माधवराव गायकवाड यांनी मध्यस्थीचे प्रयत्न केले होते. ते अयशस्वी ठरल्यानंतर, सन १८०८मध्ये हा वाद मुंबईच्या तत्कालीन न्यायालयात नेण्यात आला. न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने निकाल दिला व निम्मी मालमत्ता हिंदूंना दिली. १८३६मध्ये या मंदिराचा कारभार भाटिया समाजाने आपल्या हातात घेतला. सध्याच्या मंदिराचे बांधकाम त्यावेळी सुरू करण्यात आले आणि ते १८४०मध्ये पूर्ण करण्यात आले. १९६०मध्ये या मंदिरावर एक आपत्ती कोसळली. त्यावर्षीच्या पावसाळ्यात या मंदिरावर वीज कोसळली होती. त्यामुळे मंदिराचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्याची नंतर दुरूस्ती करण्यात आली.

विशेष म्हणजे आता प्रामुख्याने येथील विश्वस्त, तसेच पुजाऱ्यांकडून या मंदिराच्या निर्मितीविषयी सांगण्यात येणाऱ्या आख्यायिकेत बाबुल आणि पांडुशेठ सोनार यांच्या कथा एकत्र करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पांडुशेठ यांच्याकडे बाबुल हा गुराख्याचे काम करीत असे. तो या टेकडीवर गायीगुरे घेऊन येत असे. त्यातील एक कपिला नावाची गाय एका विशिष्ट ठिकाणी दुधाची धार सोडत असे. बाबुलने पांडुशेठ यांना या चमत्काराविषयी सांगितल्यानंतर त्यांनी तेथे खोदाई केली. त्यात काळ्या पाषाणातील शिवलिंग मिळाले. ते बाबुलला सापडले म्हणून त्याचे नाव बाबुलनाथ असे ठेवण्यात आले.

बाबुलनाथाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या टेकडीवर हे मंदिर स्थित आहे. मंदिर परिसरास भव्य असे दगडी प्रवेशद्वार आहे. येथील दगडी फरसबंदी केलेल्या मार्गावर काही अंतरावर मंदिराच्या सुरक्षेसाठीची तपासणी चौकी आहे. तेथून पुढे मंदिराच्या दगडी पायऱ्या सुरू होतात. येथे वृद्ध, लहान मुले, महिला, तसेच विकलांग वा आजारी व्यक्तींसाठी दोन लिफ्टची (उद्‌वाहनांची) व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिराच्या प्रांगणास दगड आणि गुलाबी वाळूच्या खडकात (सँडस्टोन) १९५१ साली बांधलेले महाद्वार आहे. पुढे या पायरी मार्गालगत ‘अनंत भवन’ची इमारत आहे. विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी सन २०२२ मध्ये बांधलेल्या या सभागृहास त्यांचेच नाव देण्यात आले आहे.

एकूण १०८ पायऱ्या चढून वर आल्यानंतर समोरच बाबुलनाथ मंदिराची भव्य आणि सुंदर अशी वास्तू दिसते. संगमरवरी फरसबंदी केलेल्या या मंदिराच्या प्रांगणात दोन उंच दीपस्तंभ आहेत. सिंह, मोर यांची सुंदर शिल्पेही येथे पाहावयास मिळतात. वाळूच्या खडकाचा वापर करून नागर स्थापत्यशैलीत उंच चौथऱ्यावर हे मंदिर उभारलेले आहे. भव्य मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मंदिराचे स्तंभ, त्यांमधील कमानी, मकरतोरणे, मंडपांतील छत, छताचे कठडे कोरीव नक्षीकामाने सुशोभित केलेले आहेत. येथील खांबांवरील देव-देवतांची कोरीव शिल्पे विशेष प्रेक्षणीय आहेत. प्रामुख्याने गुजराती मंदिरांवर पाहावयास मिळणाऱ्या वादक-तपस्व्यांच्या मूर्ती या मंदिराच्या छतावरील कठड्यांवरही आहेत. मंदिराच्या सभामंडपामध्ये सोनेरी चौथऱ्यावर नंदीची सोनेरी आवरण असलेली मोठी मूर्ती आहे. त्यासमोर कूर्मनारायणाचीही मूर्ती आहे. सभामंडपात उजव्या बाजूस उंच वेदीवर उभारलेल्या मखरामध्ये श्रीगणेशाची मूर्ती विराजमान आहे. या मूर्तीच्या बाजूस रिद्धी-सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. या मखरात गणेशाची एक काळ्या पाषाणातील प्राचीन मूर्तीही विराजमान आहे. येथे हनुमानाचेही स्थान आहे. तेथील मखरात गदाधारी हनुमानाची धातूची उभी मूर्ती आहे.

गर्भागाराच्या दर्शनी भिंतीवर डावीकडील उंच उभ्या देवकोष्ठकात गणेशाची, तर उजवीकडील देवकोष्ठकात काळभैरवाची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम केलेला सोनेरी पत्रा जडवलेला आहे. येथील द्वारस्तंभावर खालच्या बाजूस द्वारपालांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. द्वारचौकटीच्या ललाटबिंबस्थानी गणेशाची मूर्ती कोरलेली आहे, तर उत्तरांग भागामध्ये मधोमध भगवान शिवशंकराची मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूंस गजराज आणि शिवसेवकांची कोरीव शिल्पे आहेत. मंदिराचे गर्भगृह पूर्णतः सोनेरी पत्र्याने मढवलेले आहे. आत भूतलावर, चांदीचे आवरण असलेल्या चौकोनी शाळुंखेमध्ये बाबुलनाथाचे पाषाणातील शिवलिंग विराजमान आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर एका बाजूने नागप्रतिमा कोरलेली आहे. शाळुंखेच्या बाजूस त्रिशूल आहे. येथील शिवलिंगावर उत्सवप्रसंगी सोनेरी मुखवटा घालण्यात येतो. गर्भगृहातील देवळीमध्ये पार्वती माता, तसेच देवी भगवतीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या मंदिरात अनेक वर्षांपासून एक अखंड ज्योत तेवत आहे. ही ज्योत सुमारे दीडशे ते दोनशे वर्षे अखंड तेवत असल्याचे सांगण्यात येते.

मंदिरास जोडून समोरच्या भागात उभारलेल्या भव्य मंडपामध्ये भगवान भोलेशंकराचा ‘गजरथ’ आहे. येथील खालच्या बाजूस असलेल्या मखरांमध्ये महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी यांच्या मूर्ती विराजमान आहेत. या मखरांच्या वरच्या भागात कर्पूरगौर शंकराची मूर्ती आहे. येथे शंकराच्या अंकांवर गणेश आणि पार्वती विराजमान आहेत. या प्रशस्त मंडपामध्ये अनेक भाविक ध्यानास बसत असतात. बाबुलनाथ मंदिराच्या गर्भगारावर नागर शैलीतील उरुशृंग पद्धतीचे उंच शिखर आहे. त्यावर आमलक आणि कलश असून धर्मध्वज फडकत आहे. मंदिराच्या उजवीकडे एका उंच व प्रशस्त ओट्यावर सुशोभित असा मंडप उभारण्यात आलेला आहे. त्यात लक्ष्मी-नारायण, शीतलादेवी, नागदेवता, काशीविश्वनाथाचे शिवलिंग, गणेश या देवतांचे स्थान आहे.

या मंदिरात दर सोमवारी सकाळी ६ ते रात्री १० या काळात भाविकांना दर्शन घेता येते. मंगळवार ते रविवार या काळात दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ९ अशी आहे. येथे रोज सकाळी ५.३० ते ६.३०, दुपारी ११.३० ते १२.३०, सायंकाळी ५.३० ते ६.३० आणि रात्री ८ ते ८.३० या काळात आरती होते. दर सोमवारी आरतीची वेळ दु. १२ ते १ अशी असते. मंदिरात विविध सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे केले जातात. महाशिवरात्र हा त्यातील सर्वांत मोठा उत्सव होय. या वेळी मंदिर परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. सुमारे पाच ते सहा लाख भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येथे येतात. मंदिरात रोज सुमारे ५ ते १० हजार भाविक येतात. श्रावणी सोमवारी या संख्येत वाढ होते.

उपयुक्त माहिती:

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापासून ६ किमी अंतरावर
  • मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक व एसटी स्थानकापासून सुमारे २.५ किमी अंतरावर
  • शहरातील अनेक भागांतून बेस्ट बसची सुविधा उपलब्ध आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, दूरध्वनी : ०२२-२३६७८३६७

बाबुलनाथ मंदिर

बाबुलनाथ, मालाबार हिल, मुंबई

Back To Home