मुंबईतील ‘मिनी मद्रास’ म्हणून एकेकाळी संबोधल्या जाणाऱ्या माटुंगा या मध्य रेल्वेमार्गावरील उपनगरात दक्षिण भारतीय संस्कृतीचा जिवंत ठेवा आस्तिक समाज मंदिराच्या माध्यमातून जपण्यात आला आहे. प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित असलेले हे मंदिर गेल्या सुमारे शतकभरापासून असंख्य दक्षिण भारतीय भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भव्य आणि कलाकुसरीने नटलेले शिल्पसमृद्ध राजगोपुरम. द्रविडी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेले हे राजगोपुरम् येथून जाणाऱ्या-येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे आहे.
दाक्षिणात्य संस्कृतीची, त्यातही खास करून दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीची अमीट छाप असलेला माटुंगा परिसर दक्षिणेकडील दादरच्या खोदादाद सर्कलपासून उत्तरेकडील किंग्ज सर्कल रेल्वे स्थानक आणि रेल्वे उड्डाणपुलापर्यंत विस्तारलेला आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत हा परिसर म्हणजे एक ओसाड रान होते. देवगिरीच्या रामदेवराव यादवाचा चौथा पुत्र असलेल्या राजा बिंबदेव ऊर्फ भीमदेव यादव याने इ.स. १२९५ मध्ये माहीम म्हणजेच महिकावती येथे आपली राजधानी स्थापन केली. असे सांगण्यात येते की माटुंग्याच्या परिसरात या राजाची मोठी गजशाळा होती. संस्कृतमध्ये हत्तीला मातंग असेही म्हटले जाते. यावरून या भागास मातंगालय असे म्हटले जाऊ लागले. त्याचा मातंगा, मातुंगा असा अपभ्रंश होत माटुंगा हे नाव पडले असावे. काहींच्या मते, येथील हत्तींच्या देखभालीसाठी बिंब राजाच्या काळात येथे मातंग समाजाची वस्ती होती. त्यामुळे या भागास माटुंगा हे नाव पडले असावे. पौराणिक आख्यायिकेनुसार या परिसरात मतंग ऋषींचे निवासस्थान होते. त्यावरून माटुंगा हे नाव आले.
१८९६ च्या प्लेगच्या साथीनंतर, मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी १९०० च्या पहिल्या असाधारण दशकात ब्रिटिश सरकारने माटुंगा हे मुंबईतील पहिल्या नियोजित उपनगरांपैकी एक म्हणून विकसित केले. मुंबईच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासामुळे येथे संपूर्ण भारतातून स्थलांतरितांच्या लाटा येऊन धडकल्या. विसाव्या शतकाच्या आरंभी येथे दक्षिण भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाला. माटुंग्यामध्ये या समाजाची मोठी वस्ती होती. त्यामुळे या भागाला ‘मिनी मद्रास’ असे म्हटले जात असे. दक्षिण भारतातून, विशेषतः केरळमधील पलक्कड येथून आलेल्या लोकांनी १९२३ मध्ये येथे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यासाठी एका संस्थेची स्थापना केली. या संस्थेस आस्तिक समाज असे नाव देण्यात आले. या संस्थेच्या छताखाली काही भाविक रोज आज जेथे मंदिर आहे त्या ठिकाणी संप्रदाय भजनासाठी एकत्र येत. आपली इष्टदेवता प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेसमोर ते विष्णूसहस्रनामाचे पठण करीत असत. हळूहळू येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होऊ लागली. कालांतराने या छोट्याशा जागेत मोठे मंदिर स्थापन करण्यात आले.
१९५३ मध्ये कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरू श्री शंकराचार्य यांच्या आशीर्वादाने येथे प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या मूर्तींची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना करण्यात आली आणि या समाजाला एका पूर्ण रूपातील मंदिराचा दर्जा प्राप्त झाला. हे मंदिर केवळ पूजाअर्चापुरते मर्यादित न राहता दक्षिण भारतीय ‘संप्रदाय भजना’ची परंपरा मुंबईत रुजवणारे पहिले केंद्र ठरले.
पारंपरिक द्राविडी स्थापत्यशास्त्र आणि आधुनिक बांधकाम शैली यांचा सुरेख संगम या मंदिरात पाहावयास मिळतो. या मंदिरास भव्य आणि शिल्पसमृद्ध असे राजगोपुरम आहे. सहा स्तराच्या या गोपुरमचा आकार खालच्या बाजूस रुंद आणि वरच्या दिशेला निमुळता होत जाणारा सूचीस्तंभ प्रकारचा आहे. प्रत्येक स्तरावर ‘कूट’ आणि ‘शाला’ प्रकारची छोट्या देवकोष्टकांची रचना आहे. गोपुरममधील एकेक स्तर एकेका देवतेस वाहिलेला आहे. सर्वात खालच्या स्तरावर राम-जानकी विवाहाचा प्रसंग शिल्पांकित केलेला आहे. येथे गरुड आणि हनुमंतांच्या मूर्ती तसेच, शंख आणि कमल ही शुभचिन्हे आहेत.
त्यावरील स्तरांवर शंकर-पार्वती, तिसऱ्या स्तरावर लक्ष्मी-नारायण आणि त्यावर राम-सीता यांच्या मूर्ती आहेत. या शिवाय या गोपुरमवर गणेश, कार्तिकेय यांसह विविध देवी-देवता, यक्ष, गंधर्व यांचीही सुबक शिल्पे आहेत. गोपुरमच्या अगदी वरच्या टोकावर सोन्याचा मुलामा दिलेले ताम्र कळस आहेत. प्रवेशद्वाराच्या चार पायऱ्या चढून या मंदिराच्या आंतरमंडलात प्रवेश होतो. येथे समोरच श्रीकोविलमध्ये (गर्भागार) प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या द्राविड शैलीतील मूर्ती विराजमान आहेत. पारंपरिक आगम शास्त्राच्या आधारे या मूर्ती घडवलेल्या आहेत. या शिवाय मंदिरात भगवान कोचू गुरुवायुरप्पन म्हणजेच श्रीकृष्ण, कार्तिकेय, स्वामी अय्यप्पा आणि नवग्रह यांची श्रीकोविलही आहेत. येथे १९६५ मध्ये भगवान कार्तिकेय, १९६७ मध्ये नवग्रह, १९७४ मध्ये भगवान कोचु गुरुवायुरप्पन आणि १९७८ मध्ये स्वामी अय्यप्पा यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रत्येक देवतेचे स्वतंत्र स्थान आणि त्यांचे शिल्पकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेषतः अय्यप्पा आणि गुरुवायुरप्पन यांची श्रीकोविलही केरळच्या मंदिर शैलीत उभारलेली आहेत.
या मंदिरात रविवारी सकाळी ५ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४.२५ ते रात्री ९, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ५ ते ११ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ९,
तर गुरुवार आणि शनिवारी सकाळी ५ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ९ या वेळेत भाविकांना देवदर्शन घेता येते. या मंदिरात वर्षभर विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात, जे केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचे माध्यमही आहेत. कोचु गुरुवायुरप्पन प्रतिष्ठा दिन, श्रीकृष्ण जयंती, स्कंद षष्ठी, स्वामी अय्यप्पा प्रतिष्ठा दिन, थाईपुसम आणि श्रीराम नवमी हे येथील मुख्य उत्सव आहेत. येथे होणारा ‘श्रीमद भागवत सप्ताह महायज्ञ’ पाहण्यासाठी दूरवरून भाविक येतात. सन २०२३ मध्ये आस्तिक समाज मंदिर स्थापनेच्या शताब्दीनिमित्ताने येथे ‘विश्व शांती महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता. त्यास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी उपस्थिती लावली होती. या महायज्ञात ११ प्रकारचे विविध होम करण्यात आले होते. ते पुढीलप्रमाणे – विघ्नहर्ता गणेशासाठी अथर्वशीर्ष महागणपती होम, दीर्घायुष्यासाठी आयुष होम, ग्रहांच्या शांतीसाठी नवग्रह होम, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुदर्शन होम, धनप्राप्तीसाठी लक्ष्मी कुबेर होम, त्याचप्रमाणे नक्षत्र होम, धन्वंतरी होम, महान्यास पूर्वक एकादश रुद्राभिषेकम, मृत्युंजय होम, शांती कार्य सिद्धी जयदी होम आणि विश्वशांती महान्यास पूर्वक एकादश रुद्राभिषेकम. येथे ‘श्री सीता राम कल्याण मंडपम’ हा आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असा हॉल देखील आहे. येथे विवाह, उपनयन आणि इतर सामाजिक व धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.