प्राचीन शिवमंदिर व सहस्रकुंड धबधबा

इस्लापूर, ता. किनवट, जि. नांदेड

महानद्यांचे तीर, संगम आणि धबधबे ही ठिकाणे नैसर्गिक सौंदर्याने नटलेली असतात. ती पर्यटनाच्या दृष्टीने खास आणि धार्मिक दृष्ट्याही अत्यंत महत्वाची मानली जातात. भारतात धबधब्यांच्या ठिकाणी असलेल्या मंदिरांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात अशी प्राचीन मंदिरे कोकण प्रांतात अधिक आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील धोपेश्वर गावातील धूतपापेश्वर व कामेश्वर मंदिर, गोव्यातील तांबडी सुर्ला मंदिर, तसेच देवरुख येथील मार्लेश्वर मंदिर ही काही खास मंदिरे धबधब्यांच्या सान्निध्यात आहेत. असेच एक प्राचीन व प्रसिद्ध मंदिर नांदेड जिल्ह्यात आहे. ते किनवट तालुक्यात इस्लापूर गावात सहस्रकुंड धबधब्याजवळ आहे. येथील जागृत महादेव भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

हे प्राचीन मंदिर सुमारे ३०० ते ४०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मंदिराजवळ पैनगंगा नदीच्या पात्रात सहस्त्रकुंड धबधबा आहे. येथील सहस्र कुंड भगवान परशुरामाने जमिनीत बाण मारून निर्माण केले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. यावरून हे देवस्थान हजारो वर्षे प्राचीन असल्याचा अंदाज येथील पुजारी व्यक्त करतात. येथे सुमारे ३० ते ४० फूट उंच काळ्या कातळकड्यावरून जलधारा कोसळतात. त्या शंकराच्या जटातून पडणाऱ्या गंगेसारख्या भासतात. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य काही औरच दिसते.

हिमायतनगरपासून इस्लापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंदिराची स्वागतकमान आहे. कमानीत महिरपी कमानीने एकमेकांना जोडलेले स्तंभ आहेत. त्यांच्यावर सज्जा व सज्जावर तीन गोलाकार शिखरे आहेत. मधल्या शिखरात असलेल्या देवकोष्ठकात महादेवाची मूर्ती आहे. कमानीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सहस्रकुंड धबधबा व शिवमंदिर आहे. शिवमंदिराच्या समोर असलेल्या वाहनतळापर्यंत पक्की सडक आहे. वाहनतळाच्या आसपास खाद्यपदार्थ, पूजा साहित्याची व विविध वस्तूंची दुकाने आहेत. मंदिराचे प्रांगण पेव्हर ब्लॉक्सने आच्छादित आहे. प्रांगणात काही चौथरे व त्यावर शिवपिंडी आहेत. असे सांगितले जाते की या शिवपिंडी म्हणजे महापुरुषांच्या प्राचीन समाध्या आहेत. मंदिरासमोर दर्शनमंडप आहे. त्याला लोखंडी स्तंभांवर सिमेंट पत्र्यांचे छत आहे. येथेही काही चौथरे व त्यावर शिवपिंडी आहेत. दर्शनमंडपातील एका चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे.

पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. या लाकडी प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे. तसेच ललाटबिंबावर कमळ फुलाची प्रतिकृती आहे. प्रवेशद्वाराच्या लाकडी झडपांवर नक्षीकाम आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडक्या व गवाक्षे आहेत. सभामंडपात मध्यभागी एका चौथऱ्यावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभपाद चौकोनी व अधिक रुंद आहेत.

सभामंडपापेक्षा गर्भगृहाचे प्रवेशद्वार काहीसे उंचावर आहे. गर्भगृहाचे बांधकाम प्राचीन व काळ्या पाषाणातील आहे. प्रवेशद्वाराला नक्षीदार द्वारशाखा आहेत. त्याच्या ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. उंबरठ्यास चंद्रशिळा आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर पितळी मुखवटा आहे. त्याला वेटोळे घातलेला पितळी नाग आहे. नागाने आपल्या फण्याने शिवपिंडीवर छत्र धरले आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले पितळी अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. गर्भगृहातील भिंतीत दोन देवकोष्ठके आहेत. त्यापैकी एकात भगवान परशुराम यांची धनुष्यबाण घेतलेली उभी द्विभुज मूर्ती आहे. भगवान परशुरामाने जमिनीत बाण मारून सहस्रकुंड निर्माण केले, अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. दुसऱ्या देवकोष्ठकात महादेवाची मूर्ती आहे. गर्भगृहातून बाहेर पडण्यासाठी मागील बाजूस पायऱ्या व दरवाजा आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने अर्धप्रदक्षिणा मार्ग आहे.

मंदिराच्या बाजूने पैनगंगा नदी वाहते. नदीपात्रातील उंच कड्यावरून जलधारा कोसळत असल्यामुळे येथे सुंदर धबधबा तयार झाला आहे. पर्यटकांना धबधब्याचे सौंदर्य व्यवस्थित न्याहाळता यावे, यासाठी वनविभागाने येथे तीन निरीक्षण मनोरे तयार केले आहेत. पर्यटकांना येथून धबधब्याचे मनोहारी रूप न्याहाळता येते.

मंदिरात महाशिवरात्री व श्रावणातील सर्व सोमवारी उत्सव साजरे केले जातात. यावेळी मंदिरात महाअभिषेक, भजन, कीर्तन, प्रवचन आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. सर्व सोमवारी, प्रदोष, पौर्णिमा व अमावास्या अशा दिवशी अनेक भाविक येथे येतात. तसेच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशीही धबधब्याचे सुंदर रूप पाहण्यासाठी व देवाच्या दर्शनासाठी हजारो पर्यटक व भाविक येथे येतात.

उपयुक्त माहिती:

  • इस्लापूर बस स्थानकापासून ५ किमी अंतरावर
  • नांदेड येथून १०२ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून इस्लापूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा नाही

प्राचीन शिव मंदिर और सहस्रकुंड झरना

इस्लापुर, ताल. किनवट, जिला. नांदेड़

Back To Home