आंबोली घाटात उगम पावणारी हिरण्यकेशी नदी गडहिंग्लज तालुक्याची भाग्यविधाती समजली जाते. देशात अशा नद्यांच्या किनाऱ्यावर मानवी वस्ती निर्माण झाली, मोठमोठी नगरे व गावे वसली आहेत. लोकसंस्कृतीमधील श्रद्धास्थाने असलेली विविध देवालये अशाच नद्यांच्या किनाऱ्यांवर स्थित आहेत. यापैकीच एक प्रसिद्ध व प्राचीन गणेश मंदिर गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गावात आहे. हिरण्यकेशीच्या तीरावर असलेल्या या मंदिरातील गणेशास फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उगवत्या सूर्याची पहिली किरणे प्रकाशाभिषेक घालतात. येथील गणपती हाकेला धावणारा व नवसाला पावणारा आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
असे सांगितले जाते की येथे तेराव्या वा चौदाव्या शतकात हेमाडपंती शैलीप्रमाणे स्थापत्यरचना असलेले मंदिर होते. पेशवेकाळात १७०७ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची नोंद आहे. पुढे २०० वर्षांनी, १९०७ मध्ये या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार व विस्तार झाला होता. अलीकडील काळात १९८७ ते १९९२ या काळात झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. २०१९ मध्ये जिल्हा परिषदेने २० लाख रूपये खर्चून मंदिर परिसरात सुधारणा कामे केली. असे सांगितले जाते की समर्थ रामदास स्वामींनी या गणपती मूर्तीचे वर्णन लिहून ठेवलेले आहे. त्यामुळे या मंदिराचा इतिहास थेट शिवकाळापर्यंत पोहोचतो. पुराणात वर्णन असलेल्या एकवीस गणपतींपैकी हा एकविसावा गणपती आहे. या देवाच्या दर्शनाने एकवीस गणेशाच्या दर्शनाचे पुण्य मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे
इंचनाळ गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य मार्गाशेजारी विस्तीर्ण परिसरात हे मंदिर आहे. मंदिर प्रांगणाभोवती सुमारे पाच फुट उंचीची आवारभिंत आहे. या आवारभिंतीत वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वार आहे. दोन चौकोनी स्तंभांनी तोलून धरलेल्या तुळईवर असलेल्या अर्धवर्तुळाकार कमानीवर मध्यभागी एक व बाजूच्या दोन्ही स्तंभांवर दोन असे एकूण तीन शिखराकार आहेत. येथून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात जागोजागी असलेल्या नारळांच्या तसेच इतर शोभेच्या व फुलझाडांमुळे मंदिर परिसर सुशोभित झालेला आहे. येथे एका बाजूस मोठ्या चौथऱ्यावर मंदिर स्थित आहे. पादप्रक्षालनासाठीच्या उथळ कुंडात पाय धुवून, सात दगडी पायऱ्या चढून या चौथऱ्यावर प्रवेश होतो. येथे उंच जगतीवर मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम कर्नाटकातील आरभावी प्रकारातील दगडांत करण्यात आलेले आहे. समतल छत असलेला सभामंडप, गर्भगृह आणि त्यावर मराठा स्थापत्यशैलीतील उंच शिखर अशी मंदिराची संरचना आहे.
सभामंडपासमोर छोटी ओवरी आहे. तिच्या नक्षीदार प्रवेशद्वारावरील स्तंभांत खालच्या बाजुला जय विजय हे द्वारपाल, वर एका बाजूला विष्णू व दुसऱ्या बाजूला कृष्ण अशी शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या मुख्य महिरपी कमानीवर एका बाजूस मारुती दुसऱ्या बाजूला गरुड अशी शिल्पे आहेत. प्रवेशद्वारावर अगदी वर सज्जात मध्यभागी असलेल्या देवकोष्टकात शिवपार्वतीची मूर्ती आहे. त्याच्या दोन्ही बाजूस नंदी आहेत. यामुळेच या मंदिराला गणेश पंचायतन मंदिर असेही म्हटले जाते. सभामंडपाच्या द्वारशाखांवर पाना फुलांची नक्षी व ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. त्यावर उत्तरांग भागात सात अश्वांच्या रथावर आरुढ असलेल्या सूर्यनारायणाची प्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन गोलाकार स्तंभांवर तोललेल्या चार महिरपी कमानी आहेत व येथे ३९ फूट लांब व १० फूट रुंदीचा नगारखाना आहे. आत सभामंडपात दंडगोलाकार स्तंभ व त्यावर तुळई आहेत. तुळईमुळे छतावर चौकोन तयार झाले आहेत. या चौकोनांत चक्राकार नक्षीकाम केलेले आहे. येथील सभामंडप बंदिस्त स्वरुपाचा (गुढमंडप) आहे. या सभामंडपात भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ हातात लाडू घेतलेला मुषकराज आहे.
गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर दोन्ही बाजूस देवकोष्ठके आहेत. गर्भगृहाच्या पितळी द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. ललाटबिंबावर मध्यभागी गणपतीची मूर्ती, एका बाजूला शिवपिंडी व दुसऱ्या बाजूला नंदी आहे. द्वारशाखेवर १७७३ सालचा उल्लेख आहे व त्यात रुपये १००/- खर्च झाल्याचे नमूद केलेले आहे. गर्भगृहातील वज्रपिठावर काळ्या पाषाणातील गणेशाची दोन फूट उंचीची चतुर्भुज मूर्ती आहे. या मूर्तीच्या उजव्या वरील हातात पाश व खालील हातात वरदहस्त आहे. डाव्या वरील हातात अंकुश व खालील हातात अमृतपात्र आहे. याशिवाय कमरेला नागाचा वेढा आहे. या गणेशाच्या दर्शनासाठी गर्भगृहात सोवळे नेसून जाण्याची पद्धत आहे. या मंदिराचे बांधकाम करताना खगोलशास्त्राचाही विचार केलेला आहे. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील पहिले सात दिवस सूर्याची किरणे गर्भगृहातील गणेशमूर्तीवर पडतात.
मंदिराच्या छतावर सर्व बाजुंनी सिंह शिल्पे आहेत. तीन थरांत असलेले अष्टकोनी शिखर हे ६६ फूट उंचीचे आहे. प्रत्येक थरात असलेल्या आठ देवकोष्ठकांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखरावर कमळ फुलाची नक्षी असलेले आमलक व त्यावर कळस आहे. मंदिराच्या प्रांगणात उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर व डाव्या बाजूला गोमुख आहे.
मंदिरात गणेशोत्सवाप्रमाणेच शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी आदी वार्षिक उत्सव साजरे होतात. दिवाळी व दसऱ्याला देवाचा पालखी सोहळा उत्साहात साजरा केला जातो. गणेश जयंतीनिमित्त हरीनाम सप्ताहाचे व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सर्व वार्षिक उत्सवांच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनाला येतात. दर संकष्टी व अंगारकी चतुर्थीला भाविकांची येथे गर्दी उसळते.