लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ या तालुक्याच्या गावी भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या अनंतपाळाचे मंदिर आहे. या मंदिरामुळेच या गावाला शिरूर अनंतपाळ हे नाव मिळाले आहे. साधारणपणे अकराव्या ते बाराव्या शतकात कल्याणीच्या चालुक्य राजवटीच्या काळात या मंदिराची निर्मिती झाली. लातूर जिल्हा गॅझेटिअरमधील संदर्भानुसार हे मंदिर मराठवाड्याच्या प्राचीन स्थापत्य वैभवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भाद्रपद महिन्यातील अनंत चतुर्दशीला येथे जत्रा भरते. या जत्रेदरम्यान चौदा गाठींचा दोरा बांधून करण्यात येणारे ‘अनंत व्रत’ हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे.
या मंदिराच्या उत्पत्तीविषयी दोन वेगवेगळ्या कथा प्रसिद्ध आहेत. पहिल्या कथेनुसार, चंद्रदेवाला कलेकलेने क्षय होण्याचा शाप मिळाला होता. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याने या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली.
त्याची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी त्याला येथे अनंत स्वरूपात दर्शन दिले आणि त्या शापातून त्याची अंशतः मुक्ती केली. भक्तांचा प्रतिपाळ करणाऱ्या या अनंतस्वरूप विष्णूवरूनच मंदिराला अनंतपाळ हे नाव देण्यात आले. दुसऱ्या एका लोककथेनुसार, येथील विष्णूमूर्ती मूळची उत्तर भारतातून एका भक्तासोबत आली होती. विष्णूमूर्ती घेऊन तो भक्त शिरूर परिसरात आला असता त्याने विसावा घेण्यासाठी ती जमिनीवर ठेवली. विश्रांती संपल्यानंतर त्याने मूर्ती पुन्हा उचलण्याचा प्रयत्न केला असता ती तिथून हालली नाही. देवाला हेच स्थान आवडले आहे, असा संकेत मानून स्थानिक भाविकांनी तेथेच या मूर्तीची रीतसर स्थापना केली.
या मंदिराविषयी अनेक स्थानिक श्रद्धा आणि आख्यायिका जोडलेल्या आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रत्यक्ष शेषनागाचे वास्तव्य आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. काही भक्तांना आणि पुजाऱ्यांना पहाटेच्या वेळी गाभाऱ्यात प्रत्यक्ष नाग दिसतो आणि तो नाग मूर्तीचे रक्षण करतो, असे मानले जाते. पूर्वीच्या काळात शत्रूचे आक्रमण झाले असताना ही मूर्ती स्वतःहून अदृश्य झाली होती, अशीही एक आख्यायिका सांगितली जाते.
शिरूर अनंतपाळ परिसरात जेव्हा कधी पाऊस पडत नाही आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होते, अशा वेळी अनंतपाळाला साकडे घातले जाते. त्यानंतर त्वरित पाऊस पडल्याचे अनुभव स्थानिक नागरिक सांगतात.
हे मंदिर एक हजार वर्षांपेक्षा अधिक प्राचीन असल्याचे मत इतिहासकार व्यक्त करतात. त्याकाळी मंदिरात वेदपाठशाळा चालवली जात असे. इसवी सनाच्या आठव्या ते दहाव्या शतकात म्हणजेच इ.स. ७५३ ते ९७३ या काळात हा प्रदेश राष्ट्रकूट राजवंशाच्या अधिपत्याखाली होता. राष्ट्रकुटांच्या काळात ‘लत्तालूर’ म्हणून प्रसिद्ध असलेले व सध्याचे लातूर हे एक सत्ता केंद्र म्हणून उदयास आले. राष्ट्रकूट सम्राट पहिला अमोघवर्ष याच्या ‘शिरूर’ आणि ‘नीलगुंद’ ताम्रपटांमधील उल्लेखांवरून हे सिद्ध होते की लत्तालूर हे राष्ट्रकुटांचे मूळ वतन असलेले शहर समृद्ध होते. राष्ट्रकुटांच्या पतनानंतर हा प्रदेश कल्याणीच्या चालुक्य राजांच्या नियंत्रणाखाली गेला. चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य आणि त्यांचा मुलगा तीसरा सोमेश्वर यांच्या राजवटीत या परिसराचा सांस्कृतिक आणि धार्मिक विकास झाला. या भागातील पुराव्यांची साखळी समजून घेण्यासाठी चालुक्य काळातील शिलालेख आधारभूत ठरतात.
तालुक्यातील गणेशवाडी येथे इ.स. १०९९ साली सापडलेल्या व चालुक्य सम्राट सहावा विक्रमादित्य याचा सेनापती भीमनाथ याने कोरलेल्या संस्कृत शिलालेखात परिसरातील प्राचीन ग्रामनामांचे उल्लेख आढळतात. असाच एक कोरीव लेख लातूर येथे पापाविनाश मंदिरात सापडला आहे. १० फेब्रुवारी ११२८ रोजीच्या या लेखात चालुक्य सम्राट तिसरा सोमेश्वर याच्या काळात लत्तालूरमध्ये ५०० विद्वानांचे वास्तव्य असल्याचा आणि सोमेश्वराच्या राज्यकारभाराचा उल्लेख आढळतो. कल्याणीच्या चालुक्य काळातील व गणेशवाडी येथे सापडलेल्या एका लेखात हा प्रदेश ‘पाशुपत शैवपंथ’ किंवा ‘शिवलिंगी संतान’ यांचे मुख्य पीठ व धर्मशाळा असल्याचे पुरावे सापडतात. असाच एक बाराव्या शतकातील शिलालेख अनंतपाळ मंदिर परिसरात नंदी मंडपाजवळ सापडला आहे. चालुक्य काळातील या लेखात या नगरीचा ‘शिरूरी’ आणि देवतांचा ‘अनंतेश्वरा’ व ‘नारायणदेवा’ असा उल्लेख आढळतो.
सर्व शिलालेख व कोरीव लेखांवरून असे स्पष्ट होते की कल्याणी चालुक्यांचे मंत्री आणि सेनापती ‘अनंतपाळ दंडनायक’ यांना हे गाव चालुक्य राजांकडून जहागीर म्हणून मिळाले असावे. अनंतपाळ दंडनायकानेच या परिसरात शिवालये आणि पाण्याचे तलाव निर्माण केले. मध्ययुगीन कालखंडात मंदिराची नावे त्यांच्या निर्मात्यांच्या नावावरून ठेवण्याची पद्धत रूढ होती. याच न्यायाने येथील शिवालयाला ‘अनंतपाळ मंदिर’ हे नाव प्राप्त झाले. कालौघात या गावाचे नाव ‘भोजराज शिरूर’ वरून बदलून ‘शिरूर अनंतपाळ’ असे रूढ झाले.
कल्याणीच्या चालुक्यांनंतर हा प्रदेश देवगिरीच्या यादवांच्या वर्चस्वाखाली आला. यादवांनी या परिसरातील मंदिरांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी मदत केली होती. त्यानंतरच्या काळात हा प्रदेश बहामणी आणि पुढे हैदराबादच्या निजामांच्या अधिपत्याखाली गेला. सप्टेंबर १९४८ मध्ये मराठवाड्याच्या विलीनीकरणानंतर हा भाग मुंबई प्रांतात आणि शेवटी १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. १५ ऑगस्ट १९८२ रोजी लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर उस्मानाबादमधून हा भाग वेगळा करण्यात आला आणि २३ जून १९९९ रोजी शिरूर अनंतपाळ तालुक्याची अधिकृत निर्मिती झाली. कल्याणी चालुक्यकालीन स्थापत्यशैलीचे हे मंदिर बेसॉल्ट पाषाणात घडवलेले आहे. वाड्यासारखी रचना असलेल्या या मंदिराला भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीमध्ये प्रवेशद्वार बांधलेले आहे. प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूस भाविकांना बसण्यासाठी आसने आहेत. प्रांगणात मंदिरासमोर कोरीव पाषाणात बांधलेली दीपमाळा आहे. तसेच त्याच्या बाजूला नंदीमंडप आहे. दोन थरांच्या उंच चौथऱ्यावर चार कोनांवर चार नक्षीदार स्तंभ व स्तंभांवरील तुळईवर छत असे नंदीमंडपाचे स्वरूप आहे. हा नंदीमंडप आणि मंडपातील वज्रपीठावर असलेली नंदीची मूर्ती चालुक्य कालीन आहे. नंदीमंडपाच्या छतावर चौकोनी घुमटाकार शिखर आहे.
मंदिर उंच अधिष्ठानावर आहे. अर्धमंडप, सभामंडप, अंतराळ आणि तीन दिशांना तीन गर्भगृहे (त्रिदल पद्धत) अशी मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या अर्धमंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. अर्धमंडपाच्या प्रवेशद्वारात लाकडी नक्षीदार द्वारशाखा व झडपा आहेत. अर्धखुल्या स्वरूपाची संरचना असलेल्या अर्धमंडपात बाह्यबाजूने कठडे आहेत. कठड्यावर नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपात मधल्या चार स्तंभाच्या मधे रंगशिळा आहे. पूर्वी देवाच्या रंगभोगासाठी येथे नृत्य, गायन, नाट्य आदी सादर केले जात असे. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभदंडामध्ये चौकोन, षटकोन, अष्टकोन आणि वर्तुळ असे विविध भौमितिक आकार पाहायला मिळतात. स्तंभदंडांवर विविध शिल्पे व नक्षी कोरलेली आहेत. स्तंभाच्या शीर्षभागी कणी आहे. या कणीवर हस्त आणि हस्तांवर तुळई बसवलेली आहे. सभामंडपाच्या वितानावर मध्यभागी चक्रनक्षी आहे. सभामंडपात भिंतीवर सप्तमातृका शिल्प व शेषशयनी विष्णू शिल्प आहे. सभामंडप आणि अंतराळात अनेक देवकोष्टके आहेत. या देवकोष्टकांमध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आहेत.
सभामंडपाच्या समोर, डाव्या व उजव्या बाजूला असे एकूण तीन अंतराळ व त्यापुढे गर्भगृहे आहेत. सर्व गर्भगृहाच्या प्रवेशद्वात द्वारशाखांवर द्वारपाल व चामरधारी सेविकांची शिल्पे आहेत. द्वारशाखांवर पानाफुलांची नक्षी आहे. तसेच ललाटबिंबावर गणपती शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात जमिनीवर स्वयंभू शिवपिंड आहे.
शिवपिंडीवर छत्र धरलेला चांदीचा नाग आहे. तसेच मागील भिंतीजवळील देवाचे चांदीचे मुखवटे आहेत. डाव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपीठावर महादेव आणि महादेवाच्या मांडीवर बसलेल्या पार्वती मातेची मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या गर्भगृहात वज्रपीठावर विष्णू आणि विष्णूच्या मांडीवर बसलेल्या लक्ष्मी मातेची मूर्ती स्थित आहे. त्यापुढे शेषशाही विष्णूची मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्यबाजूस अधिष्ठान व भिंतींवर विविध प्रकारची नक्षी, सुरसुंदरी, वादिका इत्यादी शिल्पे आहेत. प्रांगणात विद्यालयाची इमारत, पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने, देवस्थानाचे कार्यालय व इतर वास्तू आहेत. मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ नावाचे कुंड आहे. कोरीव पाषाणात बांधलेल्या या कुंडात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
शिरूर अनंतपाळ येथील अनंत चतुर्दशीची जत्रा हा या परिसरातील मोठा वार्षिक सोहळा आहे. या दिवशी जत्रेला सुरुवात होते आणि ही जत्रा साधारणपणे ३ ते ५ दिवस चालते. जत्रेमध्ये अनंताची पालखी काढली जाते. ढोल-ताशे, लेझीम पथके आणि टाळ-मृदंगाच्या गजरात देवाची पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते.
त्यावेळी भक्तगण पालखीवर गुलाल आणि फुले उधळतात. जत्रेच्या दिवशी पहाटे देवाचा महाअभिषेक केला जातो आणि देवाला नवीन वस्त्रे व आभूषणे परिधान केली जातात. अनेक भाविक या दिवशी मनोभावे अनंत व्रत करतात. हाताला १४ गाठींचा अनंत दोरा बांधण्याची पद्धत येथे पाळली जाते, यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी लाभते, अशी भक्तांची धारणा आहे.
जत्रेच्या शेवटच्या दिवशी येथे कुस्त्यांचा फड रंगतो. या फडात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील नामांकित पैलवान सहभागी होतात. जत्रेच्या संपूर्ण काळात विविध सामाजिक संस्था आणि भक्तांकडून महाप्रसादाचे म्हणजेच भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.
याशिवाय महाशिवरात्री, श्रावणी सोमवार, नागपंचमी, दसरा, दिवाळी इत्यादी सण व उत्सव येथे साजरे केले जातात. दररोज सकाळी ६ ते दुपारी १.३० आणि सायंकाळी ४.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात अनंतपाळाचे दर्शन घेता येते.