आनंदेश्वर मंदिर

लासूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात पूर्णा नदीच्या तीरावर लासूर येथे आनंदेश्वर मंदिर उभे आहे. गर्भगृहातील स्वयंभू मानली जाणारी आनंदेश्वर महादेवाची पिंड परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गावाच्या दक्षिण सीमेवर काळ्या पाषाणात उभारलेले हे देवालय स्थानिक भाषेत ‘आंधळेश्वर’ अथवा ‘अंधारे बुवांचे मंदिर’ या नावाने ओळखले जाते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने या देवालयाची ऐतिहासिक वास्तुकला लक्षात घेऊन याला राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

लासूरचा इतिहास पूर्णा नदीच्या प्राचीन खोऱ्याशी जोडलेला आहे. हे गाव पूर्णा, चंद्रभागा आणि काटेपूर्णा नद्यांच्या संगमाजवळील सांगवामेळ क्षेत्राजवळ वसले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अमरावती जिल्हा गॅझेटिअर (१९६८) नुसार लासूर हे दर्यापूर तालुक्यातील जुने खेडे आहे. या देवालयाचे बांधकाम काळ्या बसाल्ट पाषाणात केले आहे. लासूरच्या स्थानिक परिसरात हा पाषाण उपलब्ध नाही. मंदिर वास्तुकलेच्या अभ्यासकांच्या मते उत्तरेकडील सातपुडा पर्वतश्रेणीतील खाणींमधून हा कठीण पाषाण काढून पूर्णा नदीच्या पात्रातून लाकडी तराफ्यांवर वाहून येथे आणला गेला.

या मंदिराच्या उत्पत्तीविषयी स्थानिक परंपरेत एक आख्यायिका सांगितली जाते. लंकापती रावणाचा भाचा लवणासुर आणि त्याचे पिता मधू शिवभक्त होते. लवणासुर या भागात शंकराची रुद्रपूजा करत असे. तो ऋषीमुनींच्या वैदिक यज्ञांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याकारणाने ऋषींच्या प्रार्थनेवरून प्रभू श्रीरामांचे बंधू शत्रुघ्न यांनी त्याचा वध केला. लवणासुराने एकाच रात्रीत हे देवालय उभारण्याचा विडा उचलला होता. काम पूर्ण होण्यापूर्वीच दिवस उजाडल्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिले. त्यामुळे मंदिरावर शिखर व कळस उभारला गेला नाही अशी लोकमान्यता आहे. पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे वाहून आलेल्या गाळ आणि मातीखाली हे देवालय पूर्णपणे गाडले गेले होते. त्या काळात केवळ स्वर्गमंडपाचा वरचा गोलाकार भाग जमिनीवर दिसत होता. ब्रिटिश कालखंडात यावरील मातीचे ढिगारे बाजूला काढून उत्खनन करण्यात आले. दीर्घकाळ जमिनीखाली अंधारात राहिल्यामुळे स्थानिक लोक या स्थानाला ‘अंधारे बुवांचे मंदिर’ म्हणतात.

आनंदेश्वर मंदिराची निर्मिती इ.स. १२७१ ते १३११ या काळात, देवगिरीच्या यादव राजवटीत झाली. यादव राजे रामचंद्र देव यांच्या शासनकाळात त्यांचे पंतप्रधान हेमाद्री पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे देवालय साकारले गेले. चुना किंवा कोणत्याही रासायनिक जोडणीचा वापर न करता केवळ घडीव पाषाण एकमेकांत खाच पद्धतीने बसवून उभारलेली ही हेमाडपंती रचना आहे. काळाच्या ओघात जीर्ण झालेल्या वास्तूचे संवर्धन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या नागपूर मंडळामार्फत केले गेले. नदीच्या पुराच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने सभोवती दगडी तटबंदी उभारली आहे.

मंदिर परिसरात आल्यावर तटबंदी आणि साधे प्रवेशद्वार दृष्टीस पडते. प्रांगणात पुरातत्त्व खात्याचे माहितीफलक व पाणपोई आहे. सुमारे चार फूट उंच जगतीवर (अधिष्ठान) उभारलेले हे मंदिर लांबून गढीसारखे भासते. पायऱ्या चढून आल्यावर मंदिराचे पंचशाखीय मुख्य प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वाराच्या शाखांवर पर्णशाखा, पुष्पशाखा आणि स्तंभशाखांचे कोरीवकाम पाहायला मिळते. ललाटबिंबावर गणेशमूर्ती कोरलेली आहे. वितनावरील कोरीव छत्र या मूर्तीवर छाया धरते. प्रवेशद्वारातून आत आल्यावर अष्टकोनी आकारातील अर्धखुल्या स्वर्गमंडपात प्रवेश होतो. ज्या मंडपाच्या छताचा मध्यभाग मोकळा ठेवून आकाशाचे दर्शन घडवले जाते, त्या रचनेला ‘स्वर्गमंडप’ म्हणतात. उत्तरायणात दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे आणि पौर्णिमेचा चंद्रप्रकाश थेट या उघड्या छतातून मंडपाच्या केंद्रभागी पडतो. हा स्वर्गमंडप मध्यभागी अष्टकोनात उभ्या असलेल्या १२ मुख्य स्तंभांवर आणि भिंतींना जोडलेल्या ६ अशा एकूण १८ स्तंभांवर तोलला आहे. या स्तंभांचे तळ चौकोनी आहेत. स्तंभदंडात षट्कोन, अष्टकोन आणि वर्तुळाकार आकार कोरले आहेत. स्तंभांच्या माथ्यावरील हस्तांवर भारवाहक यक्षांची शिल्पे आहेत.

स्वर्गमंडपातून समोर, डावीकडे आणि उजवीकडे तीन अंतराळे व त्यामागे तीन गर्भगृहे जोडलेली आहेत. या त्रिदल (त्रिकूट) रचनेतील तिन्ही अंतराळांत प्रकाश व हवेसाठी दगडी जाळीदार गवाक्षे बसवली आहेत. डाव्या व उजव्या बाजूच्या दोन्ही गर्भगृहांची प्रवेशद्वारे पंचशाखीय आहेत. त्यांच्या ललाटबिंबावर गणेशमूर्ती आणि उंबऱ्याजवळ चंद्रशिळा व कीर्तिमुखे कोरलेली आहेत. या दोन्ही गर्भगृहांतील वज्रपीठांवरील मूळ मूर्ती सध्या अस्तित्वात नाहीत. स्थानिक लोक त्यांना सीतेची न्हाणी व विहीर मानतात. पश्चिमेकडील मुख्य गर्भगृहाचे सप्तशाखीय प्रवेशद्वार पर्णलता, पुष्पलता आणि द्वारपालशिल्पांनी सजवले आहे. या गर्भगृहात काळ्या पाषाणातील एका वज्रपीठावर आनंदेश्वराची पिंड आहे. त्यासमोर अखंड पाषाणातील नंदी आहे. मंदिराच्या बाह्य मंडोवरावर अधिष्ठानावरून प्रदक्षिणा मार्ग जातो. बाहेरील देवकोष्टकात नंदीवर आरूढ असलेले महादेव आणि त्यांच्या मांडीवर बसलेली पार्वती यांचे उमा-महेश्वर शिल्प कोरलेले आहे. मंडोवराच्या भिंतींवर हिरण्यकशिपूचा वध करणारा नरसिंह, गोवर्धन पर्वत उचलणारा श्रीकृष्ण, चतुर्भुज भैरव, कामशिल्पे आणि वादक-नर्तकांच्या मूर्ती आहेत. मंदिराचा मूळ घुमट व कळस अस्तित्वात नसल्याने वास्तूचा वरचा भाग सपाट दिसतो.

मंदिरात दररोज सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत दर्शन घेता येते. महाशिवरात्रीचा उत्सव हा आनंदेश्वर मंदिरातील सर्वांत मुख्य वार्षिक सोहळा मानला जातो. माघ वद्य त्रयोदशी व चतुर्दशी या काळात विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतून भाविक दर्शनासाठी दाखल होतात. महाशिवरात्रीला मंदिरात अहोरात्र हरिनामाचा गजर, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम चालतात. या दिवशी भाविक पूर्णा नदीत स्नान करून महादेवाला बेलपत्र अर्पण करतात. संपूर्ण श्रावण महिन्यात आणि विशेषतः श्रावणी सोमवारी येथे रुद्राभिषेकाचे विशेष अनुष्ठान केले जाते.

उपयुक्त माहिती

  • दर्यापूर शहरापासून १४ किमी अंतरावर
  • अमरावती शहरापासून ६७ किमी अंतरावर
  • दर्यापूर व अकोला येथून लासूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • दर्यापूर आणि अकोला शहरात निवास व न्याहारीचे पर्याय उपलब्ध
Back To Home