अमृतेश्वर व बसवाण्णा मंदिर

निंगुडगे, ता. आजरा, जि. कोल्हापूर

दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकात प्रभावशाली असलेल्या वीरशैव अथवा लिंगायत या पंथ वा धर्माचे उद्‌गाते महात्मा बसवेश्वर आणि त्यांचे आराध्य दैवत असलेल्या शिवलिंगाचे मंदिर निंगुडगे येथे स्थित आहे. महात्मा बसवेश्वर यांना बसवाण्णा असेही म्हणतात. ते शिवगण असलेल्या नंदीचे एक रूप मानले जातात. या मंदिरात त्यांची नंदीस्वरुपातच पूजा केली जाते. येथील नंदीची मूर्ती सात फूट उंच व आठ फूट लांब अशी आहे. या नंदीमूर्तीमुळे तेराव्या शतकातील हे बसवाण्णा व अमृतेश्वर मंदिर सुप्रसिद्ध आहे.

बसवेश्वर यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे झाला. त्यांचे वडील मादिराज हे तेथील ‘पुरवराधिश्वर’ म्हणजे बारा गावांचे प्रमुख होते. लिंगायत धर्मपंडितांच्या मते बसवेश्वरांचा जन्म इ.स. ११३१ मध्ये झाला, तर काही अभ्यासक त्यांचे जन्मसाल ११०५ असल्याचे नोंदवतात. त्यांच्या जन्माबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की बसवेश्वरांची माता मादलांबा ही बागेवाडीच्या नंदीश्वर या ग्रामदेवतेची परमभक्त होती. तिला एकदा एक स्वप्न पडले की शिवाचे रेणुक, दारूक, भृंगी, वृषभ व स्कंद असे जे गण आहेत, त्यातील वृषभ म्हणजेच नंदीला त्यांनी लोककल्याणाच्या हेतूने अवतार घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार नंदीने प्रकाशरूप धारण करून मादलांबाच्या गर्भात प्रवेश केला. यानंतर त्यांच्या पोटी बसवेश्वरांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना नंदीचा अवतार मानले जाते.

वीरशैव विश्वकोशाचे सहलेखक डॉ. अशोक मेनकुदळे यांनी लिहिलेल्या ‘क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर’ या चरित्रग्रंथाच्या प्रस्तावनेत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण यांनी बसवेश्वरांचे विभूतीमत्व उलगडले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ‘महात्मा बसवेश्वरांच्या विचारविश्वाचं अधिष्ठान समता हे आहे. त्यासाठीच त्यांनी पारंपरिक धर्मविचारांचं पुनमूर्ल्यांकन केलं. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांचं ऐहिक व पारमार्थिक कल्याण कसं साधता येईल याची अहर्निश चिंता बाळगली.’ डॉ. मेनकुदळे यांनी असे म्हटले आहे की त्यांनी एक देवोपासनेचा हिरिरीने पुरस्कार केला. तसेच त्यांनी शिवस्वरूपी विश्वाची प्रतिकृती आणि मनाने इच्छिलेले इष्ट ते देणाऱ्या इष्टलिंगाची भक्ती प्रतिपादली.

कल्याणच्या चालुक्य घराण्यातील राजा तैलप तिसरा याच्याविरोधात बंड करून त्याचा सैन्याधिकारी बिज्जल याने ते राज्य ताब्यात घेतले. या बिज्जलाची मानलेली बहिण नीलांबिका हिच्याशी बसवेश्वर यांचा विवाह झाला होता. बिज्जलाच्या आग्रहावरून त्यांनी त्याचे मंत्रीपद (कोषाध्यक्ष) स्वीकारले. याचा काळात त्यांचे धार्मिक व सामाजिक कार्य सुरू होते. त्यामुळे राज्यातील सनातन्यांनी बिज्जलाचे कान फुंकून बसवेश्वरांचा काटा काढण्याचा प्रयत्न चालवला होता. राजपुरोहितांच्या दबावाखाली येऊन बिज्जलाने काही क्रूर कृत्ये केली. त्यामुळे अखेर बसवेश्वरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन कल्याणचे राज्य सोडले. यानंतर काही दिवसांनी, इ.स. ११६७ मध्ये कुडलसंगम येथे त्यांचे निर्वाण (लिंगैक्य) झाले.

नंदीस्वरूपातील बसवेश्वरांची अनेक मंदिरे महाराष्ट्र तसेच कर्नाटकात आहेत. त्यातीलच एक प्राचीन व भव्य मंदिर निंगुडगे येथे वसलेले आहे. हे मंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे असावे, असे सांगितले जाते. मंदिराचे घडीव दगडांत केलेले हेमाडपंती शैलीतील बांधकाम व येथे असलेले पुरातन वीरगळ पाहता याची सत्यता पटते. असे सांगितले जाते की येथील नंदीस दिवाळी पाडव्यात तैलस्नान (स्थानिक भाषेत ‘म्हादन’) घालतात. त्यावेळी सुमारे तीन किलो तेल नंदीच्या मूर्तीत जिरते. हा नंदी सजीव असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिरास पेव्हर ब्लॉक लावलेले प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात चौथऱ्यावर पाच थरांची निमुळती होत गेलेली दीपमाळा आहे. त्यावर दीप लावण्यासाठी स्वतंत्र हस्त आहेत. नक्षीदार चौकोनी चौथऱ्यावर खालच्या बाजूस चार कोनात चार गजमुखशिल्पे आहेत. चौथऱ्याच्या चारही बाजुंनी कमळ फुलांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय चौथऱ्यांच्या वर व दीपमाळेच्या पायाशी चार कोनांत चार सिंहशिल्पे आहेत. प्रांगणात असलेल्या तुळशी वृंदावनाच्या खालील भागात कमळ फुलाची प्रतिकृती आहे. त्यावरील चौकोनी भागात चार दिशांना गजमुख आहेत. येथील कुंड कमळ फुलाच्या आकाराचे आहे.

सभामंडप व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिरास तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य प्रवेशद्वार पाच द्वारशाखांनी सुशोभित आहे. पहिल्या दोन द्वारशाखांवर पुष्पलता व पर्णलता नक्षी व तिसऱ्या द्वारशाखेवर नक्षीदार स्तंभ प्रतिमा कोरलेली आहे. चौथ्या आणि पाचव्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी व ललाटबिंबावर गजलक्ष्मी विराजमान आहे. मंडारकावर दोन्ही बाजूस कमळ फुलांची नक्षी व मध्यभागी गूढ प्रतिमा कोरलेली आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस एका हातात गदा व दुसरा हात कटीवर ठेवून उभे असलेले द्वारपाल आहेत. तिन्ही प्रवेशद्वारांवर छताकडील बाजुस देवकोष्टके व त्यांत मूर्ती आहेत. सभामंडपात प्रत्येकी आठ स्तंभांच्या चार रांगा आहेत. स्तंभात चौकोन, षट्कोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार वापरलेले आहेत. छताच्या मध्यभागी अष्टदिग्पाल (आठ दिशांच्या देवता) आहेत. ऐरावतारूढ इंद्र, छागारुढ म्हणजे मेंढ्यावर आरूढ अग्नी, महिषारुढ यम, पुरूषारुढ नैऋत्ती, मकरारुढ वरुण, मृगारुढ वायू, अश्वारुढ कुबेर व वृषभारुढ ईशान यांनी अनुक्रमे वज्र, शक्ती, पाश व दंड, खड्ग, नागपाश, ध्वज, गदा आणि त्रिशूल धारण केलेले आहेत.

येथील सभामंडप बंदिस्त (गूढमंडप) स्वरूपाचा आहे व त्यात हवा व प्रकाश येण्यासाठी गवाक्ष आहेत. सभामंडपातील देवकोष्ठकांत गर्भगृहाच्या डाव्या बाजूस मयुरारुढ त्रिमुखी कार्तिक स्वामी व उजव्या बाजूस शक्ती गणेश यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. गणेशाच्या बाजूला वाहनारुढ अष्टमातृका पट आहे. तसेच शंख, चक्र, गदाधारी विष्णू, वीरभद्र, सिहारुढ अष्टभुजा महिषासुरमर्दिनी यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत.

सभागृहातील अमृतेश्वर लिंगासमोरील चार नक्षीदार दगडी स्तंभांच्यामध्ये वज्रपिठावर बसवाण्णा (महानंदी) यांची सुमारे सात फूट उंच व आठ फूट लांब अखंड पाषाणातील सालंकृत मूर्ती आहे. मूर्तीच्या भवताली नक्षीदार दगडी कठडा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील द्वारशाखांवर स्तंभप्रतिमांची नक्षी व ललाटबिंबावर गणेश विराजमान आहे. ललाटपट्टीवर पर्णलता व मध्यभागी ओम चिन्हांकित नक्षी आहेत. गर्भगृहातील शिवपिंडीवर छत्र धरलेला पंचफणी पितळी नाग व शिवमुख आहे. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहाच्या भिंतीस जाळीदार गवाक्ष आहेत.

मंदिराच्या बाह्य बाजूने भिंतींना लागून स्तंभ आहेत. भिंतीवरील नक्षीदार हस्तांनी तोलून धरलेल्या छताच्या चार कोनांत लटकलेल्या दगडी साखळ्यातील एकात एक गुंफलेल्या बांगड्या पाहून निष्णात शिल्पकारांच्या सफाईदार कलेची कल्पना येते. छताच्या कठड्यावर विविध प्राण्यांची उठाव शैलीतील नक्षी साकारलेली आहे. कठड्यावर चारही कोनांत लहान शिखरे आहेत. सभामंडपावरील चौकोनी शिखर उरूशृंग प्रकारचे आहे. त्यात लहान लहान पाच शिखरे आहेत. गर्भगृहावरील पाच थरांचे अष्टकोनी मुख्य शिखर सुमारे २० फूट उंच आहे. शिखराचे पहिले दोन थर चौकोनी, त्यावर गज केशरी मुखशिल्पे, त्यावरील थरात कमळदल नक्षीचे रिंगण आहे. वरील तीन थरात असलेल्या देवकोष्ठकांत विविध देवतांची शिल्पे आहेत. शिखरावर आमलक व त्यावर कळस आणि ध्वज पताका आहे.

मंदिराच्या प्रांगणात भिंतीलगत प्राचीन खंडित मूर्ती व वीरगळ आहेत. बाजूला भावेश्वरी देवीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. प्रांगणात विठ्ठल रखुमाईचे मंदिर या मंदिराच्या गर्भगृहातील वज्रपीठावर विठ्ठल-रखुमाईच्या मध्ये गणपतीची मूर्तीं आहे.

दिवाळी पाडवा हा बसवाण्णा म्हणजेच नंदीचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी पहाटेस नंदीस म्हादान म्हणजेच तेलाची आंघोळ घालण्याची प्रथा आहे. या निमित्ताने कुस्त्यांचे फड रंगतात. कार्तिक पौर्णिमेस या मंदिरात दर्शनासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती असते. केवळ याच दिवशी महिलांना या मंदिरात असलेल्या कार्तिक स्वामींच्या मूर्तीचे दर्शन घेता येत असल्यामुळे पंचक्रोशीतील महिला आवर्जून येथे येतात. याशिवाय मंदिरात महाशिवरात्र, आषाढी व कार्तिकी एकादशी आदी वार्षिक उत्सव साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती

  • आजऱ्यापासून १६ किमी, तर कोल्हापूरपासून ८३ किमी अंतरावर
  • आजरा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : पुजारी, मो. ७८७८७०४६२४, ९९२२६९७८३०
Back To Home