अंबादेवी व एकवीरा देवी मंदिर

अमरावती शहर, ता. जि. अमरावती

विदर्भाची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी असलेल्या अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात अंबा नाल्याच्या दोन तीरांवर श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी ही दोन प्राचीन देवालये समोरासमोर आहेत. अंबादेवी ही अमरावती शहराची ग्रामदेवता आणि संपूर्ण विदर्भ प्रांताची कुलस्वामिनी आहे. मूळची कोकण किनारपट्टीवरील कोळी व दर्यावर्दी समाजाची कुलदेवता असलेली एकवीरा देवी विदर्भात ‘रेणुकामातेचे स्वरूप’ मानली जाते. त्यामुळे ती महाराष्ट्रातील कुणबी, कराडी, आगरी, कळण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, कोष्टी, त्वष्टा कासार आणि वैश्यवाणी यांसारख्या अनेक समाजांची कुलस्वामिनी आहे. या दोन्ही देवतांची आदिशक्ती म्हणून पूजा केली जाते.

‘अमरावती जिल्हा गॅझेटिअर’ आणि ‘गॅझेटिअर ऑफ द हैदराबाद असाइन्ड डिस्ट्रिक्ट्स’मधील नोंदीनुसार प्राचीन काळी या परिसरात औदुंबराची वने होती. त्यामुळे या भूभागाचे मूळ नाव ‘उदुंबरावती’ पडले आणि कालौघात त्याचे ‘अमरावती’ असे रूपांतर झाले. इ.स. १०९७ च्या सुमारास घडवलेल्या भगवान ऋषभनाथ यांच्या संगमरवरी मूर्तीच्या पाषाणपीठावर ‘अमरावती’ असा नामोल्लेख आढळतो. तेराव्या शतकातील श्री गोविंदप्रभू यांच्या चरित्रात त्यांच्या ‘उंबरावती’ भेटीची नोंद मिळते. या भूभागावर मौर्य, वाकाटक, चालुक्य, देवगिरीचे यादव, बहामनी, मुघल आणि नागपूरकर भोसल्यांचे शासन राहिले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इ.स. १८०६ ते १८२१ दरम्यान पेंढाऱ्यांच्या आक्रमणापासून शहराचे रक्षण करण्यासाठी निजामाने सुमारे पावणेचार किलोमीटर लांबीची दगडी तटबंदी उभारली.

या मंदिरांचा पौराणिक संबंध महाभारतातील विदर्भ राज्याशी जोडला जातो. विदर्भाचा राजा भीष्मक याची राजधानी कौंडिण्यपूर येथे होती. ‘श्रीमद्‌भागवत पुराणा’तील कथेनुसार भीष्मकाची कन्या रुक्मिणी कुलपरंपरेनुसार कुलदेवतेच्या दर्शनासाठी आली असता श्रीकृष्णाने तिचे रथात हरण केले. रुक्मिणी ज्या देवीच्या दर्शनाला आली होती ते हेच अंबादेवी व एकवीरा देवीचे क्षेत्र असल्याचे स्थानिक मानतात. स्थानिक मौखिक परंपरेनुसार या दोन्ही देवतांना बहिणी मानले जाते. त्यानुसार एकवीरा देवी मोठी तर अंबादेवी लहान बहीण आहे.

अंबादेवी मंदिराचा इतिहास किमान एक हजार वर्षांपूर्वीचा आहे. या मंदिरांच्या जीर्णोद्धाराची नोंद सतराव्या शतकातील सिद्धपुरुष जनार्दन स्वामी यांच्याशी जोडलेली आहे. इ.स. १६४० ते १६६० च्या दरम्यान जनार्दन स्वामी अंबा नदीच्या पैलतीरावर पर्णकुटी बांधून राहत असत. पुरामुळे नदी ओलांडता न आल्याने त्यांनी सलग तीन दिवस उपवास केला. तेव्हा देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्यावर स्वामींनी विहिरीतून मूर्ती काढून तिची विधिवत प्रतिष्ठापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकाची निमंत्रणपत्रिका या मंदिरास पाठवण्यात आली होती. स्वातंत्र्यसंग्रामात इ.स. १९२४ मध्ये परदेशी साखरेच्या मिठाईवर बहिष्कार आणि इ.स. १९२७ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने झालेला ‘मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह’ याच परिसरात झाला.

अंबादेवी मंदिराभोवती दगडी तटबंदी उभारली आहे. प्रांगणात इ.स. १८९० मध्ये बांधलेली दुमजली भक्तनिवासाची इमारत व वाहनतळ आहे. प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. आतील मोकळ्या प्रांगणात अष्टकोनी दगडी दीपमाळ उभी आहे. इ.स. १९९५ मध्ये नूतनीकरण केलेल्या सभामंडपातील स्तंभांवर महिरपी कमानी व छतावर मीनाकारी काम आढळते. अंबादेवी मंदिराच्या सभामंडपापुढे दोन गर्भगृहे आहेत. डाव्या गर्भगृहात पद्मासनात बसलेली अंबादेवीची मूर्ती आहे. तिच्यावर इ.स. १९०५ मधील सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा चढवला जातो. उजव्या गर्भगृहात गणपती, पार्वती, महादेव आणि शिवपिंड आहे. दोन्ही गर्भगृहांच्या छतावर इ.स. १८९६ मध्ये बांधलेले चार थरांचे मराठा शैलीतील शिखर आहे. प्रांगणात इ.स. १८९५ मध्ये बांधलेली मारुती व दुर्गादेवीची मंदिरे आहेत.

शेजारीच असलेल्या एकवीरा देवी मंदिराची वास्तुरचना मध्ययुगीन मराठा स्थापत्यशैलीची आहे. या मंदिराभोवतालच्या घडीव पाषाणाच्या तटबंदीत पश्चिमेस दुमजली प्रवेशद्वार व नगारखाना आहे. प्रांगणात डावीकडे सिद्ध जनार्दन स्वामींची समाधी आहे. जगतीवर उभारलेल्या मुख्य मंदिराच्या मुखमंडपाकडे जाणाऱ्या दहा पायऱ्यांसमोर सिंहशिल्पे कोरली आहेत. एकवीरा देवी मंदिराचा बंदिस्त सभामंडप चोवीस कोरीव स्तंभांवर आधारलेला आहे. मध्यभागी असलेल्या अंतराळातून देवीचे दर्शन घडते. गर्भगृहावर अर्धचंद्राकार कमान आणि नक्षीदार पितळी पत्र्याचे आवरण आहे. आतील चांदीच्या वज्रपीठावर एकवीरा देवीची मूर्ती आहे. याच गर्भगृहात नित्य पूजेतील चांदीची उत्सवमूर्ती ठेवली जाते. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणामार्ग आहे. सभामंडपावर लहान घुमटाकार शिखरे आणि मुख्य गर्भगृहावर नागर शैलीचे उंच गोलाकार शिखर आहे. असे सांगितले जाते की एकवीरा देवी मंदिर परिसरात आज अस्तित्वात असलेल्या गुप्त भुयारी मार्गाने जनार्दन स्वामी स्नानासाठी जात.

दोन्ही मंदिरांमधील नित्य दिनचर्या शास्त्रोक्त पद्धतीने पार पडते. अंबादेवी मंदिरात पहाटे पाच वाजता सनई चौघड्याने सुरुवात होऊन सहा वाजता पंचामृत स्नान, अभिषेक आणि प्रातःआरती होते. दुपारी बारा वाजता पुरणपोळी व खिरीचा महानैवेद्य दाखवून माध्यान्ह आरती होते. सायंकाळी संध्याआरती होते आणि रात्री दहा वाजता चांदीच्या मंचावर देवीची शयनव्यवस्था केली जाते. साडेदहा वाजता शेजारतीने कवाडे बंद होतात. एकवीरा देवी मंदिरात पहाटे पाच वाजता कवाडे उघडून सहा वाजता काकड आरती व महाअभिषेक होतो. दुपारी बारा वाजता माध्यान्ह भोग आरती, सायंकाळी धूपारती आणि रात्री दहा वाजता शेजारती होते. भाविकांच्या सोयीसाठी दोन्ही मंदिरांना जोडणारा पक्का पूल इ.स. १९४८ मध्ये बांधण्यात आला. अंबादेवी संस्थान सामाजिक बांधिलकीतून रुग्णालय, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा केंद्र चालवते.

आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्सव हा दोन्ही मंदिरांचा प्रमुख सोहळा आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात भजन, कीर्तन, ललिता पंचमी पूजन आणि गोंधळाचे आयोजन केले जाते. नवरात्रात हवनासाठी अंबादेवीच्या प्रांगणात दोन स्वतंत्र स्थंडिले तयार केली जातात आणि एकवीरा देवीचे मानकरी तिथे येऊन संयुक्त हवन करतात. या काळात एकवीरा देवी मंदिरात अखंड नंदादीप प्रज्वलित ठेवला जातो व कवाडे मध्यरात्री एक वाजेपर्यंत खुली राहतात. विजयादशमीच्या दिवशी अंबादेवीची आठ चांदीचे खांब असलेल्या पालखीतून ‘सीमोल्लंघन’ मिरवणूक दसरा मैदानाकडे निघते. या मिरवणुकीत श्री बालाजीचा रथही सहभागी होतो. एकवीरा देवीला नवस फेडण्यासाठी खण नारळाची ओटी, साडी चोळी आणि पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. याशिवाय मंदिरात चैत्र नवरात्र, शाकंभरी नवरात्र, गुढीपाडवा, दसरा, दिवाळी आणि कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते.

उपयुक्त माहिती

  • अमरावती रेल्वे स्थानकापासून १.५ किमी अंतरावर
  • अमरावती मध्यवर्ती बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • शहरातील विविध भागांतून एसटी व ऑटोरिक्षांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरांच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी भक्तनिवासासह अनेक पर्याय
  • संपर्क : अंबादेवी संस्थान कार्यालय, ०७२१२५६०८००, ९४२३३३०६७२, एकवीरा देवी मंदिर कार्यालय, ०७२१२५७३२५८, ०७२१२५७३७८८
Back To Home